संवादकौशल्याचे नितळ प्रतिबिंब किल्ले 'रायगड'

Raygad fort
Raygad fortesakal
Updated on


लेखक : देवदत्त गोखले

'रायगड' म्हणजे स्वराज्याची राजधानी आणि शान! सर्वांत सुरक्षित आणि अतिशय योग्य स्थान म्हणून विकसित केलेला हा किल्ला आजही मराठी साम्राज्याचे सामर्थ्य दर्शवत अभिमानाने उभा आहे. याच रायगडाच्या साक्षीने दोन महत्त्वाचे संदेश सगळीकडे पोचले. एक म्हणजे, स्वराज्य हे रयतेचं राज्य आहे आणि दुसरं म्हणजे स्वराज्य सामर्थ्यवान आणि शाश्वत आहे. अत्याधिक आनंद आणि अतोनात दु:ख सहन करण्याचा संदेश रायगडामुळे मिळतो, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. कारण, शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. तर दुसरीकडे रायगडाने अनुभवलेला आणि पचवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन.

या किल्ल्याच्या भौगोलिक रचनेमुळे आणि इथल्या वैशिष्ट्यपूर्ण बांधकामामुळे विशेष संवाद प्रणाली महाराजांनी साधली. म्हणूनच हा किल्ला अजिंक्य होता. याच प्रणालीमुळे महत्त्वाची आणि गुप्त माहिती आसपासच्या किल्ल्यांमध्ये सुरक्षित पद्धतीने आणि लवकर पोचवली जाऊ शकत होती. म्हणूनच एकीकडे स्वराज्याच्या अनेक गुप्त मोहिमा शिवाजी महाराज यशस्वीपणे पार पाडत होते. तर दुसरीकडे शत्रूच्या मोहिमा फोल ठरत गेल्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच किल्ल्याने आपल्याला स्वत्वाचा कणा दिला. स्वराज्य मनामनांत पोचले ते रायगडामुळे.

Raygad fort
खवा विक्रीतून 'तिने' निर्माण केली स्वतःची ओळख

रायगड हा मध्यकेंद्रित किल्ला (center fort) आहे. म्हणजेच रायगड मध्यभागी आणि इतर अनेक महत्त्वाचे गड त्याच्या आजूबाजूला, अशी या किल्ल्याची भौगोलिक रचना आहे. या भौगोलिक स्थानाचा फायदा उत्तम प्रकारे महाराजांनी करून घेतला. म्हणूनच आजूबाजूचे गिरिदुर्ग, कोकण किनारपट्टी आणि जवळपासच्या भुईकोट किल्ल्यांसाठी आवश्यक असणारी संवाद प्रणाली महाराजांनी रायगडाच्या माध्यमातून विकसित केली.
रायगडावर अनेक वैशिष्ट्यपूर्ण सोयी आणि इमारती आढळतात. असं म्हणतात, इथल्या नगारखान्याखाली कितीही हळू आवाजात बोलले तरी सिंहासनाजवळ आजही स्पष्ट ऐकू येतं. ही ध्वनीशास्त्रावर आधारित प्रणाली महाराजांनी रायगडावर निर्माण केली. इथे बांधलेल्या अनेक वास्तू संवादकौशल्य आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या शाश्वत विचारांचे उत्तम उदाहरण आहे.

आपल्या हालचालींची आपल्याच लोकांना माहिती देता यावी यासाठी महाराजांनी या गडकोटांच्या माध्यमातून एक यंत्रणाच उभी केल्याचे अनेक दाखले दिले जातात. उदाहरण द्यायचे झाले, तर एखादं विशिष्ट प्रकारचं लाकूड जाळल्यावर कुठल्या रंगाचा धूर होतो, यावर संकेत ठरायचे. एखादी बातमी कळवायची असेल तर असा धूर रायगडावर केल्यास तो जवळ असलेल्या गडांवर दिसायचा. तिथून पुढच्या गडांवर असाच धूर करून स्वराज्यातील अनेक किल्ल्यांवर अगदी कमी अवधीत निरोप पोचवला जात असे.
शिवाजी महाराजांनी रायगडावर गंगासागर तलावाची निर्मिती केली. १९७२ च्या आसपास पडलेल्या दुष्काळातसुद्धा या तलावात मात्र तुडुंब पाणी होते. यातूनच नैसर्गिक स्रोतांची जपणूक किती महत्त्वाची आहे, हा विचार आणि संदेश त्याकाळी महाराजांनी आपल्या कृतीतून दिला. तसेच इथल्या अंबरखान्यात किडी-मुंगीचा प्रादुर्भाव होतच नव्हता. म्हणून धान्य दीर्घकाळ टिकत असे. यामुळेच गडावर अन्नसाठ्याचा तुटवडा जाणवत नसे. इथे बांधलेल्या अशा अनेक वास्तू बघत राहावं अशाच होत्या. रायगडावर ३५० पेक्षा अधिक इमारती असल्याचे उल्लेख आढळतात. सुरक्षेच्या दृष्टीनेसुद्धा अनेक महत्त्वाच्या उपाययोजना रायगडावर होत्या. महादरवाजाची रचना गोमुखी किंवा जिभी (अर्धवर्तुळाकार) होती. यामुळे हत्तीचा वापर करून दरवाजाला धडक देणं केवळ अशक्यच! त्याचप्रमाणे महादरवाजावर उंचावरती पाण्याच्या टाक्या होत्या. त्याच्याखाली सुरुंग पेरून ठेवले असत. शत्रूने महादरवाजाजवळ येण्याचा प्रयत्न केलाच तर हेच सुरुंग पेटवून पाण्याचे साठे फोडून त्याच्या प्रचंड

Raygad fort
गोष्ट पैशापाण्याची : ‘ती’च्या हाती ‘अर्थसाक्षरते’ची दोरी!

प्रवाहामुळे शत्रू खाली वाहून जाईल, अशी संरक्षणाची एक वेगळी योजना केली होती. म्हणूनच या सर्व वास्तू बघितल्यावर स्वराज्याच्या सामर्थ्य आणि शाश्वततेचे दर्शन होते.
रायगड म्हणजे स्वराज्याचा, महाराजांचा, मावळ्यांचा अनेक शतकांपासून काळाचा प्रचंड गाभारा आपल्या उरात साठवलेला गड. साऱ्या घटनांचे हे केंद्रस्थान, मध्यवर्ती ठिकाण, जणू मूक साक्षीदारच. शंभूराजांच्या पराक्रम गाथाही इथेच घडल्या. महाराजांच्या उत्कृष्ट, निर्मळ आणि स्पष्ट संवादकौशल्यामुळे अनेक माणसं स्वराज्याच्या मोहिमेत जोडली गेली. रायगडावरील अनेक घटना याची साक्ष देतात. तसेच रायगडाच्या भौगोलिक स्थानामुळे आवश्यक असणारी संवाद प्रणाली महाराजांनी रायगडाच्या माध्यमातून विकसित केली. विविध मोहिमांची आखणी, कार्यक्रम, तसेच मुघल, फ्रेंच, डच, इंग्रज अशा अनेकांसोबत संवाद साधणे, स्वराज्याच्या ताकदीचा संदेश त्यांच्यापर्यंत पोचविणे, अशा अनेक घडामोडी रायगडाच्या साक्षीने घडल्या. म्हणूनच किल्ले रायगड संवादकौशल्याचेच प्रतिबिंब आहे, याची जाणीव सतत होते.

(लेखक : गोखलेज अॅडव्हान्सड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (‘गती’), जळगावचे संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.