कवी त्याच्या मनोविश्वात कल्पनारम्य, भव्य, उत्तुंग स्वप्ने रंगवत असतो; पण वास्तवात भरलेली नीरस, रुक्षता त्याला बोचू लागते. तेव्हा त्याची काव्यशक्ती एकतर भव्य भूतकाळाकडे किंवा स्वप्न साकार करणाऱ्या भविष्यकाळाकडे धाव घेऊ लागते. बालकवींच्या जीवनाचा विचार करता आर्थिक चणचण, कौटुंबिक विवंचना अन् स्वप्नाळू, तरल भावविश्व अशा कचाट्यात ते सापडले होते.
त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात, बालकवींचे (१८९० ते १९१८) नाव ज्ञात नसलेला मराठी रसिक अभावानेच आढळेल. काव्य जीवनाची जेमतेम १२-१५ वर्षे नि जीवनाची केवळ २८ वर्षे लाभलेला हा प्रतिभावंत, मराठी काव्यांगणात अढळस्थान पटकावून बसला. खरंतर कमी वयात होणारे प्रतिभासंपन्न काव्याविष्कार मराठीला नवे नाहीत. वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीचे अमृतकुंभ भरभरून पाजणारे ज्ञानदेव असो वा केवळ २३ वर्षांच्या चिंचोळ्या जीवनात एकाहून एक सरस काव्यलतांनी मराठी सारस्वत समृद्ध करणारे दत्तकवी असो; ‘गुणाः पूजास्थानम् गुणिषु न च लिंगम् न च वयम् ।’ म्हणत मराठीने नम्रपणे मस्तकावर धारण केलेत. त्यातीलच हा एक बालकवी होय.
बालकवी ही उपाधि त्यांना १९०७ च्या जळगाव येथील मराठी साहित्य संमेलनात उत्स्फूर्तपणे संमेलनाध्यक्ष कीर्तिकरांनी बहाल केली होती. कीर्तिकरांची कीर्ती या त्यांच्या चिमूटभर कर्तृत्वाने चिरकाळ टिकली. बालकवी मनाने मुग्ध होते. केशवसूतादिंनी आरंभिलेल्या समाजप्रबोधनापासून ते दूर होते. त्यामुळेच रा. शं. वाळिंबेंसारख्या समीक्षकांना ते ‘बाल’कवीच राहिल्यासारखे वाटतात. कधी कधी गोविंदाग्रजांसारखा बालकवींवर निरतिशय प्रेम करणारा अभिजात प्रतिभेचा कवीही त्यांना म्हणे, ‘अहो बालकवी! तुम्ही मोठे कधी होणार?’ अर्थात, गडकऱ्यांच्या या प्रश्नांत समीक्षकांसारखी बोचरी खोच नव्हती हे वेगळे सांगायची आवश्यकता नसावी.
कवी त्याच्या मनोविश्वात कल्पनारम्य, भव्य, उत्तुंग स्वप्ने रंगवत असतो; पण वास्तवात भरलेली नीरस, रुक्षता त्याला बोचू लागते. तेव्हा त्याची काव्यशक्ती एकतर भव्य भूतकाळाकडे किंवा स्वप्न साकार करणाऱ्या भविष्यकाळाकडे धाव घेऊ लागते. पण जिथे भविष्याविषयीसुद्धा उदासीनता असेल तर? तर मन आपसूकच निराश, उदास होते. बालकवींच्या जीवनाचा विचार करता आर्थिक चणचण, कौटुंबिक विवंचना अन् स्वप्नाळू, तरल भावविश्व अशा कचाट्यात ते सापडले होते. त्यात कोण्यातरी ज्योतिषाने त्यांच्या अल्पायुष्याचे भाकीत करीत चैत्र वद्य नवमीला त्यांना मृत्यू येणार असल्याचे सांगितले होते. योग म्हणा की कुयोग म्हणा, त्या ज्योतिषाची भविष्यवाणी मे १९१० मध्ये खरी ठरली, रेल्वे अपघातात बालकवींचा बळी गेला. पण या अपघातापूर्वीही कित्येक वर्षे ते चैत्र कृष्ण नवमीला अत्यंत घाबरून जात असत अशी लक्ष्मीबाई टिळकांची पण साक्ष आहे.
अगतिक वास्तव नि अलौकिक प्रतिभेच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बालकवीची उदासीनता ही कविता जन्मते. कवितेच्या आरंभीच कवी पुसतो,
कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला.
काय बोचतें तें समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला.
उदासीनता म्हणजे अर्थहीनतेची तीव्र भावना होय. ती जेव्हा सकारण असते, तेव्हा तिचा उगम कळतो अन् उपायही मिळतो. पण जेव्हा ती अकारण अन अचानक दाटून येते तेव्हा तिचा उगम कळत नाही. नित्याच्या बोलण्यात कधी कधी आपण म्हणतो ‘का कोण जाणे, आज मूड ऑफ वाटतोय.’ तेव्हा आपणही नकळत येणाऱ्या उदासीनतेकडेच निर्देश करत असतो. मानसशास्त्र सांगते, की प्रत्येक मानवाला जीवनात केव्हा न केव्हा उदासीनता जाणवतेच. पण कवीला जाणवणारी उदासीनता त्याहून अधिक खोलवर आहे, म्हणूनच तिचे बोचणे तो ‘हृदयाच्या अंतर्हृदयाला’ या शब्दातून व्यक्त करतो. मानसशास्त्राच्या परिभाषेत पाहायचे झाले, तर हे शब्द मनाची नेणीवावस्था (Unconscious Mind) दाखवतात. मानसशास्त्रज्ञांच्या मते नेणीवेचा प्रदेश सुमारे ९० प्रतिशत इतका मोठा असतो अन् तरीही तो अज्ञात असतो. जणू तो मानवाच्या अज्ञानाचा विस्तारच अधोरेखित करतो. कवीची वेदना त्याच अज्ञातात दडलेली दिसते.
जीवनाचा हेतू कळत नाही, जीवनाचे रहस्य आकळत नाही. त्यामुळे मन गोंधळून जाते. मनाचा कल कोणीकडे जातो तेही सांगता येत नाही. हे दाखविण्यासाठी कवी ‘कुणीकडे हा झुकतो वारा’सारख्या चरणाची योजना करतो. या परिस्थितीतून कोण आपल्याला सोडवणार? असा प्रश्न कवीला पडतो. पण लगेच त्याला ध्यानात येते, की आपल्याच मनाला न उमगणारे, हे रहस्य बोलात तरी कसे उमटणार, त्यामुळे हे बोल आपल्यातच विरणार ! या व्यक्त होऊ इच्छिणाऱ्या पण होऊ न शकणाऱ्या अज्ञेय भावनांना अनुलक्षून कवी लिहितो,
मुक्या मनाचे मुके बोल हे
घरें पाडती पण हृदयाला
जेव्हा जळत जळत जळणेच हातात असते तेव्हा ती वेदना कायमची ठसठसत राहाते. त्यामुळेच ती हृदयाला पोखरुन घरे पाडून राहाते, असे कवीला वाटते. इथे हे स्पष्ट करणे जरुरीचे आहे की हृदयात घर करणे वेगळे नि कवी वापरत असलेली घरे पाडणे ही संज्ञा वेगळी. ‘घर करण्यात’ अस्पष्ट कर्तृत्वाचा भाव असतो, ध्यास असतो, निश्चितता असते, कुठेतरी इच्छा असते; पण ‘घरे पाडण्यात’ पडझडीचा भाव असतो, अनिच्छा असते अन् तीव्र वेदना असते. खरतर कवीला येथे ‘छिद्रे पडतात’ असे म्हणावयाचे होते. पण त्याची अडचण अशी, की छिद्रे बुजवता येतात; पण त्याच्या हृदयाला पडणारी छिद्रे एकाहून अनेक असून, ती घरासारखी बृहत अन् न बुजणारी आहेत. शिवाय घरघर लागणाऱ्या घरांसारखी ती व्यापून उरतात, हेच कवीला सूचित करावयाचे असल्याने उपरोक्त रचना करत खात्रीशीरपणे ते सांगतात,
दिव्य औषधी कसली त्याला ?
अगदी आरंभीच उदासीनतचे मूळ ठाऊक नाही सांगत त्याने तिच्या उत्पत्तीविषयीचे अज्ञान प्रकट केले आहे. जिथे कारणच ठाऊक नसते, तिथे रामबाण औषध काय देणार? खरे सांगायचे तर, कुबट आशेचे नि क्षुद्र अपेक्षांचे ओझेच कवीला नकोय. त्यामुळे सलणारी उदासीनता त्याला प्यारी आहे. कारण ती त्याच्या अलौकीक प्रतिभेला चिरंतन साथ देणारी आहे.
उपरोक्त कविता उदासीनता या मनोविकाराच्या लक्षणाची चर्चा करीत असली तरी ती मनोव्यापाराच्या पल्याड जाण्याचा प्रयास करत नाही. कारण तिथे असलेला अमनाचा अर्थात बुद्धीचा रुक्ष प्रदेश तिला नकोय. तर मनोव्यापारात लपलेला प्रतिभेचा दिव्य साक्षात्कार तिला वास्तवात हवाय. असा प्रदेश गवसणे शक्य नाही, अशी साक्ष ‘हा हा हे जर सर्व भास धरता येतील मातें तर’ या शब्दात व्यक्त करत तो प्रदेश सोडून केशवसूत तुतारी फुंकीत बाहेर पडतात, पण ‘समजून मनाला काही उमगत नाही’ म्हणत बालकवी वास्तवाचा प्रदेश नाकारत तिथेच ठाण मांडताना दिसतात. त्यामुळेच त्यांचे दर्शन मनमोहक वाटते, उदास मनाला आरशासारखे प्रतिबिंब दाखवत उजळून सोडते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.