नको 'सत्त्व'परीक्षा (डॉ. हमीद दाभोलकर)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features
Updated on

परीक्षेचा काळ विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत अक्षरशः सगळ्यांची 'सत्त्वपरीक्षा' बघतो. अभ्यास किंवा परीक्षा आणि ताण यांचं जवळचं नातं असलं, तरी काही वेळा तो विकोपाला जाऊ शकतो. मुंबईत दहावीतल्या एका मुलाला आलेल्या हृदयविकाराच्या घटनेनं ताणाची ही पातळी समोर आणली आहे. परीक्षेच्या काळात येणाऱ्या ताणाला सामोरं कसं जायचं, अभ्यासासाठी कोणते कानमंत्र वापरायचे, विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या इत्यादी गोष्टींबाबत चर्चा. 

परीक्षा आणि टेन्शन याविषयी मी विचार करायला लागतो, तेव्हा मला माझ्या स्वत:च्या मनोविकारतज्ज्ञ होण्यासाठी दिलेल्या पदव्युत्तर परीक्षेच्या निकालाचा दिवस आठवतो. ज्या परीक्षेमध्ये मी थेट नापासच झालो, अशी माझ्या आयुष्यातली ही पहिलीच परीक्षा होती. स्वाभाविकच त्यामुळं मी खूप नाराज झालो होतो. प्रसिद्ध अभिनेते आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे माझे शिक्षक होते. अगदी तोंड पाडून मी त्यांना भेटायला गेलो. आगाशे सरांनी मोठ्या आवाजात त्यांच्या ऑफिसमधल्या शिपायाला ऑर्डर सोडली : ''अहो जरा पेढे आणा! आपले डॉक्‍टर नापास झालेत!'' आणि मग माझ्याकडं वळून म्हणाले : ''आज तुझं शिक्षण खऱ्या अर्थानं पूर्ण झालं. इतकी वर्षं चांगले मार्क पडण्याचा अनुभव घेतलास, एकदा तरी नापास होण्याचा अनुभव पाहिजेच होता की!'' केवळ माझ्याच नाही तर सध्याच्या सगळ्या विद्यार्थी आणि पालकांच्या दुखण्यावर माझ्या सरांनी हसतहसत अगदी नेमकं बोट ठेवलं होतं. मी जेव्हाजेव्हा 'परीक्षेच्या ताणानं विद्यार्थ्याची आत्महत्या' किवा अगदी परवा झालेली 'दहावीतल्या मुलाला हृदयविकाराचा झटका येण्याची घटना' अशा घटनांचा विचार करतो, तेव्हा मला पहिल्यांदा आगाशे सरांचा सल्ला आठवतो आणि एक अगदी मूलभूत प्रश्न पडतो तो असा, की 'आपण परीक्षेतल्या यशाला आपल्या आयुष्यात सर्वव्यापी महत्त्व का बरं दिलं आहे?' 

परीक्षेत यशस्वी होण्यासाठीची टोकाची धडपड आणि ते जमेल का नाही या चिंतेनं अस्वस्थ होणं हा जणू एक संसर्गजन्य आजार झाल्यासारखी सध्याची परिस्थिती आहे. ज्या कालखंडात व्यवसायाच्या मर्यादित संधी उपलब्ध होत्या, त्या कालखंडात लोकांनी असं अस्वस्थ होणं आपण समजून घेऊ शकतो; पण गेल्या दशकात करिअरच्या अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं महत्त्व कधी नव्हे इतकं कमी झालं आहे. डॉक्‍टर आणि इंजिनिअर यापलीकडं पत्रकारिता, माध्यमं, कॉमर्स, पर्यटन, हॉस्पिटॅलिटीसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध झाल्या आहेत. तरीदेखील ही अस्वस्थता कशामधून निर्माण होते आहे, हे समजून घेणं आवश्‍यक आहे. 

टोकाची स्पर्धात्मकता 
समाजात निर्माण झालेली टोकाची 'स्पर्धात्मकता' हे त्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे. स्पर्धा करणं हा माणसाचा जैविक गुणधर्म आहे. प्रगतीसाठी एका मर्यादेपर्यंत स्पर्धा आवश्‍यकदेखील आहे; पण दुसऱ्याशी स्पर्धा करणं हेच जर आपल्या आयुष्याचं इतिकर्तव्य झालं, तर मात्र त्यामधून अडचणीचे प्रश्न निर्माण होतात. आपल्या स्वत:च्या म्हणून खास अशा क्षमता कोणत्या आहेत आणि त्या क्षमतांचा अधिक चांगला विकास कसा करता येईल, या उद्दिष्टाच्या ऐवजी आपल्याला शेजारच्याच्या तुलनेत कमी तर मिळणार नाही ना, किवा अधिक कसं मिळेल हा विचार एका बाजूला आपण करत असलेल्या अभ्यासामधला आनंद संपवून टाकतो. त्या जागी पूर्णपणे अनावश्‍यक ताणतणाव निर्माण करतो आणि अंतिमत: आपला परफॉर्मन्सदेखील रसातळाला नेतो. 

दुसरा मुद्दा आहे आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या 'संधी'विषयक गैरसमजाचा. 'Opportunity knocks your door only once' हा तो गैरसमज. प्रत्यक्षात आयुष्य प्रत्येक माणसाला पुनःपुन्हा संधी देत असतं. आयुष्यात एक संधी चुकली, तर दुसरी मिळत असते. आपला बघण्याचा दृष्टिकोन आपण त्यासाठी सकारात्मक ठेवला पाहिजे. आपली एक संधी गेली, म्हणजे पूर्ण आयुष्यच वाया गेलं असा गैरसमज आपण करून घेतो आणि अनावश्‍यक ओझं डोक्‍यावर वागवू लागतो. 

अपेक्षांचं ओझं 
पालकांच्या 'अपेक्षांचं ओझं' ही पण एक परीक्षेचा ताण वाढवणारी बाब. अनेक पालक स्वत:ची अपूर्ण स्वप्नं ही मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. खरं तर आपल्या मुलाचा नैसर्गिक कल काय आहे, याचा अंदाज घेऊन, मुलाला त्याचं स्वप्न शोधायला पाठबळ देणं ही पालकांची भूमिका असायला पाहिजे. पालकांचा जीवनातल्या अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याच्या जीवनातली स्पर्धात्मकता, अपूर्ण स्वप्नं यांचा मुलाच्या मनावर व्यक्त-अव्यक्त पातळीवर मोठा प्रभाव पडत असतो. याविषयी पालक म्हणून आपण जागरूक नसलो, तर त्याचा मुलाच्या मानसिक स्वास्थ्यावर नक्कीच परिणाम होतो आणि याचा परिणाम परीक्षेच्या वेळी ताण वाढण्यात होतो. 

या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनसुद्धा काही वेळा परीक्षेचं टेन्शन येऊ शकतं. प्रत्येक वेळी बाह्य परिस्थितीच टेन्शनला कारणीभूत असते असं नाही, तर काही मुलांचा मूळ स्वभावसुद्धा पटकन्‌ ताण घेण्याकडं कल असण्याचा असू शकतो. 

अशा वेळी आपल्याला ताण आला आहे, हे स्वत:ला किवा आपल्या जवळच्या व्यक्तीला ओळखता येणं आवश्‍यक असतं. खरं तर टेन्शन आलेलं ओळखणं अजिबातच अवघड नाही. 

झोप कमी होणं, भूक कमी होणं, थोड्या अभ्यासानंतर थकल्यासारखं वाटणं, एकाग्रता कमी होणं, कारण नसताना चिडचिड होणं, छातीत धडधड होणं, सारखा घाम येणं किंवा शरीराला हलकासा कंप सुटणं अशी अनेक शारीरिक आणि मानसिक लक्षणं टेन्शन वाढल्यानं येऊ शकतात. 

कोणताही सामान्य माणूस ही लक्षणं सहज ओळखू शकतो. अशी लक्षणं जाणवत असतील, तर त्याविषयी मोकळेपणानं बोलायला आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. ही लक्षणं म्हणजे त्यांच्यामध्ये काही कमी आहे, अशा नजरेनं त्याकडे न पाहता त्यांना मदतीची गरज आहे, या नजरेनं आपण त्याकडे पाहू शकतो. वेळीच योग्य मदत घेतली, तर ही सगळी लक्षणं कमी होऊन आपला परफॉर्मन्स वाढू शकतो. 

बहुतांश वेळा घरातल्या जवळच्या व्यक्तीनं थोडं समंजसपणे त्या मुलाचं म्हणणं ऐकून घेतलं, थोडा आधार दिला आणि अपेक्षेचं ओझं कमी केलं, तर ही लक्षणं कमी होऊ शकतात. जर त्यानं लक्षणं कमी होऊ शकली नाहीत, तर मात्र समुपदेशक अथवा मनोविकारतज्ज्ञाची मदत घ्यायला हवी. 

मानसिक आरोग्य राखण्याची गरज 
शालेय आणि महाविद्यालयीन मुलामुलींमधलं ताणतणावांचं वाढतं प्रमाण पाहता, शाळेत जसे शारीरिक प्रशिक्षणाचे शिक्षक असतात, तसे मानसिक आरोग्य चागले ठेवायला मदत करणारे कोच किंवा समुपदेशक असणं अनिवार्य करण्याची वेळा आलेली आहे. 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षित झालेल्या मानसमित्रांची किवा त्यासारख्या स्वयंसेवकांचीदेखील आपण मदत घेऊ शकतो. सगळ्यात शेवटी या सगळ्याच्या बरोबरीनं माझे मोठे काका आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ देवदत्त दाभोलकर यांनी अनुवाद केलेली एक कविता या विषयाच्या संदर्भात आपण सर्वांनी ध्यानात ठेवावी अशी आहे. तिच्या ओळी अशा: 
 

'मागेल चित्रगुप्त जेव्हा हिशेब सारा 
सांगेल तो मुळीही मजला नको पसारा 
याचे महत्त्व नाही हरलास जिंकलास 
केव्हा- कधी- कसा रे तू सांग खेळलास 


आयुष्यात हार-जीत होतच असते. आपण निर्धारानं प्रयत्न करत राहायला हवं. एवढं साधं-सोपं तत्त्व आपण मनाशी खूणगाठ म्हणून बांधलं, तर हा परीक्षेचा कालावधी टेन्शनच्या ऐवजी सर्जनाचा होऊ शकेल, अशी अपेक्षा वाटते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.