‘टेस्टी’ दिवस (मुकुंद पोतदार)

mukund potdar
mukund potdar
Updated on

पन्नास आणि वीस षटकांच्या क्रिकेटच्या धबडग्यातही पाच दिवसांचं कसोटी क्रिकेट ‘बॅटिंग’ करत होतं, करत आहे. आता चार दिवसांच्या कसोटीसाठी ‘फिल्डिंग’ लावली जातेय. त्या निमित्तानं कसोटी क्रिकेटच्या ‘टेस्टी’ इतिहासावर एक नजर.

‘आमच्यावेळी असं नव्हतं बुवा, गेले ते दिन गेले...’ पिढ्यांमागून पिढ्या बदलतात; पण आयुष्याची तिन्हीसांज झालेली पिढी जीवनाचा आनंद लुटण्यास उत्सुक बनलेल्या, उदंड ऊर्जा असलेल्या आपल्या वारसदारांना कातरवेळी कापलेल्या आवाजात ऐकवते. ते डायलॉग मात्र बदललेले नाहीत. अलीकडं तर ‘जनरेशन गॅप’ इतकी कमी झाली आहे, की अगदी दहाच नव्हे, तर पाच वर्षांनी ज्युनिअर असलेल्या, प्रसंगी बच्चे कंपनीतही मोडणाऱ्या अथवा जेमतेम मिसरुड फुटलेल्या पिढीसाठी सुद्धा तुम्ही आऊटडेटेड झालेले असता.

तंत्रयुगातल्या बदलांच्या झपाट्यात एक गोष्ट टिकून होती, बरीच बॅटिंग करत होती, विकेट राखून होती, किल्ला लढवीत होती ती म्हणजे चेंडू अन्‌ फळीचा खेळ, अर्थात क्रिकेट! ज्याची ओळख ‘जंटलमन्स गेम’ अशी करून दिली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) विविध स्पर्धांमध्येही कसोटी क्रिकेट अस्तित्वासाठी झगडत होते. वन-डे आणि टी-२० या दोन विश्वकरंडकांच्या जोडीला चॅंपियन्स ट्रॉफी अशा स्पर्धांच्या आयोजनानंतरही कसोटी क्रिकेटचं विशेष असं स्थान राहिलं.
पाच दिवसांच्या कसोटीचं स्वरूप बदललं. वन-डेवर टी-२०चा आणि कसोटीवर वन-डेचा परिणाम होतोय, हे उघडपणे दिसत असताना चार दिवसांच्या कसोटीमुळे टी-२०चा थेट कसोटी क्रिकेटवर परिणाम होईल की काय, अशी चिन्हं निर्माण झाली आहेत. पाच दिवसांच्या क्रिकेटचे अविभाज्य अंग असलेले काही घटक तसे नामशेष झाल्यात जमा होते. यात ‘फॉलोऑन’ हा सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा. ‘फॉलोऑनची नामुष्की’, ‘फॉलोऑननंतर डावाच्या पराभवाची मानहानी’ असे वर्तमानपत्रांत दिले जाणारे मथळेसुद्धा आता दिसत नाहीत. याचं कारण कर्णधार २०० नव्हे, तर प्रसंगी साडेतीनशे-चारशे धावांच्या आघाडीनंतरही फॉलोऑन देण्याचं टाळतात. याचं कारण गोलंदाजांवरचा ताण. बहुतेक गोलंदाज तिन्ही फॉरमॅट खेळतात. त्यामुळं सलग दोन डावांत त्यांना गोलंदाजीचा भार पेलायला लावणं धोकादायक ठरतं. दुसऱ्या डावाचं समीकरण कसंही बदलू शकतं. प्रतिस्पर्धी संघानं प्रतिकार केल्यास एका गोलंदाजाला १५-२० षटकं टाकावी लागू शकतात. अलीकडं वर्कलोड मॅनेजमेंट हा परवलीचा शब्द बनला आहे. कसोटी क्रिकेटच्या संदर्भात तो जास्त लागू होतो; पण प्रत्यक्षात त्यामागची कारणं झटपट क्रिकेटशी संबंधित आहेत. त्यामुळं गोलंदाजांवर जास्त ताण पडता कामा नये, ते ‘फ्रेश’ राहायला हवेत, ते ‘रिचार्ज’ झाले पाहिजेत याचा आग्रह असतो. त्यासाठीच कसोटी क्रिकेटमधून फॉलोऑन जवळपास हद्दपार झाला. परंपरावादी कसोटीप्रेमींना ही खंत सदैव वाटत राहील.

एके काळी ‘टाइमलेस’
हेच कसोटी क्रिकेट एके काळी ‘टाइमलेस’ होतं आणि हा इतिहास माहीत असलेल्यांना तर चार दिवसांची कसोटी धक्कादायक ठरेल. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १९३९ मध्ये तीन ते १४ एप्रिल दरम्यान तब्बल दहा दिवसांची कसोटी झाली होती. त्यात दुसऱ्या आणि सातव्या दिवसानंतर रेस्ट डे होता. आठव्या दिवशी पावसामुळे खेळ झाला नव्हता. इंग्लंडसमोर विजयासाठी ६९६ धावांचं आव्हान होतं. त्यांनी ५ बाद ६४५ अशी मजल मारली होती. त्यावेळी खेळ थांबवावा लागला. ‘ड्रॉ बाय ऍग्रीमेंट’ अशी नोंद झाली. याचं कारण तेव्हा दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमा झाले होते. इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना मायदेशी नेणारं जहाज दोन दिवसांनी केपटाऊनहून निघणार होते. त्यासाठी रेल्वेचा दीड दिवसांचा प्रवास करावा लागणार होता. म्हणून ही कसोटी अनिर्णित ठेवावी लागली. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक पातळीवर अनेकविध क्षेत्रांत बरीच उलथापालथ झाली. क्रिकेटमध्येही महायुद्धाच्या ब्रेकनंतर ‘टाइमलेस टेस्ट’ संपल्या.

‘वानखेडे’वरची पहिली कसोटी
भारतात सहा दिवस चाललेल्या कसोटीचा संदर्भ सापडतो. विशेष म्हणजे वानखेडे स्टेडियमवरील ही पहिली कसोटी होती. ज्येष्ठ आकडेवारीतज्ञ सुधीर वैद्य यांची भेट घेतली असता त्यांनी एक किस्साच सांगितला. ‘‘सन १९७५ मध्ये क्‍लाईव्ह लॉईडचा वेस्ट इंडिज संघ दौऱ्यावर आला होता. २-२ अशी बरोबरी असल्यामुळे ही कसोटी निकाली ठरावी, म्हणून सहा दिवसांची करण्यात आली. ता. २३ ते २९ जानेवारी असा कालावधी होता. त्यात तिसऱ्या दिवसानंतर २६ जानेवारी हा ‘रेस्ट डे’ होता. पहिल्या डावात लॉईडनं २४२ धावांची खेळी केली. भारताकडून पहिल्या डावात ‘लोकल बॉय’ एकनाथ सोलकरनं शतक ठोकलं. भारतासमोर ४०४ धावांचं आव्हान होतं. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक ही कसोटी पाहायला आले होते. एका अतिउत्साही तरुणानं मैदानावर धाव घेतल्यामुळं पोलिसांनी त्याला लाठ्या मारल्या. त्यामुळं प्रेक्षक बिथरले. मुख्यमंत्र्यांनी मुत्सद्दीपणे विजय मर्चंट यांना पाचारण केलं आणि प्रेक्षकांना शांततेचं आवाहन करण्यास सांगितलं. त्या कसोटीत फारुख इंजिनिअर दोन्ही डावांत शून्यावर बाद झाला. या अपयशाबद्दल त्यांच्याशी रेडिओ समालोचकांना बोलायचं होतं. इंजिनिअरला घेऊन यावं, असं मला सांगण्यात आलं. मी गेलो. इंजिनिअर तयार झाले. आम्ही कॉमेंट्री बॉक्‍समध्ये गेलो. पहिल्या डावातल्या भोपळ्याबद्दल इंजिनिअर म्हणाला, ‘बर्नार्ड ज्युलियनचा तो बॉल भन्नाट होता. दुसऱ्या डावात मात्र ज्युलियन धावू लागल्यानंतर माझं लक्ष बुटाच्या लेसकडं गेलं. ती सैल झाली असावी, असं वाटलं. एका क्षणाच्या व्यत्ययामुळं माझी एकाग्रता ढळून दांडी उडाली.’ क्रिकेटच्या मैदानावर एकाग्रता किती साधावी लागते याचं महत्त्व यातून अधोरेखित झालं.’’
दोन्ही डावांत शतकच नव्हे, तर दोन्ही डावांत भोपळा अशी कामगिरी कसोटी क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय ठरायची. हवे असलेले किंवा नको असलेले ते ‘माईलस्टोन’ मानले जायचे. सुधीर वैद्य यांच्याशी बोलताना एक उक्ती आठवली. East or West, Test cricket is the best!
चार दिवसांच्या कसोटीनंतर ही उक्ती उधृत करता येईल का, की ‘गेले ते दिन गेले’ अशी हुरहूरच लागेल हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.