अंगाला झोंबणारा वारा कामात व्यत्यय आणू लागल्यावर मात्र माणसांचा धीर सुटू लागला. ती एकमेकांना साद घालून हात पालवून म्हणू लागली : "घरला चला, खैदान आलंया, खैदान...' आभाळाकडं बघत बघतच त्यांची पावलं घराच्या दिशेनं पडू लागली. चालता चालता वाऱ्यावरती लपक लपक करणारी लुगडी-धोतरं सावरू लागली. त्या हडबडीत कधी ठेचकाळत, तर कधी व्हलपडत माणसं चालत राहिली.
कभिन्न कातळाप्रमाणे ईशान्येकडून "उद्भवलेल्या' ढगानं कमालच केली. क्षितिजाकडून वर वर येताना त्यानं पूर्वेकडचं आभाळ पार भरून टाकलं. दाटून आलेल्या त्या काळ्या-निळ्या-जांभळ्या नवलाईच्या पुढून धुळीचेही लोट उठताना दिसू लागले. दिवसभराच्या प्रचंड उकाड्यातही शेतात राब राब राबणारे हात कामाचा पसारा उरकताना आभाळातल्या त्या अनपेक्षित बदलानं ढिले पडू लागले. इतका वेळ निरभ्र वातावरणात "हाताची घडी अन् तोंडावर बोट' या अवस्थेत उभी असलेली झाडं आपलं मौन सोडून वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यावर हेलकावे खात जमिनीशी चवऱ्या ढाळू लागली. अंगाला झोंबणारा वारा कामात व्यत्यय आणू लागल्यावर मात्र माणसांचा धीर सुटू लागला. ती एकमेकांना साद घालून हात पालवून म्हणू लागली : "घरला चला, खैदान आलंया, खैदान' आभाळाकडं बघत बघतच त्यांची पावलं घराच्या दिशेनं पडू लागली. चालता चालता वाऱ्यावरती लपक लपक करणारी लुगडी-धोतरं सावरू लागली. त्या हडबडीत कधी ठेचकाळत, तर कधी व्हलपडत माणसं चालत राहिली. आतापर्यंत मोकळ्या रानातली, वैशाखवणव्यात पार वाळून कोळ झालेली धस्कटं चघळत हिंडत असलेली जित्राबं माणसांमागून वजं वजं निघाली. त्यांची हात हात वरती आलेली अंगावरची ढोपरं आणि पार खपाटीला गेलेली पोटं पाहता ती असल्या जीवघेण्या वाऱ्याबरोबर कुठं दूर फरफटत जातील की काय, असं वाटू लागलं. मात्र, तरीही तोल सावरत ती पुढं पुढं जात राहिली.
झाडापेडांचा थरार पाहून सैरभैर झालेली रानपाखरं वाट मिळेल तिकडं भराऱ्या मारत राहिली. आता धूळभरल्या वातावरणात भूस-कचरा, पाला-पाचोळा, चिंध्याचांध्यांची भर पडली. सगळा आसमंत धुळकट-मळकट झाल्यासारखा वाटू लागला. शेताभोवताली, वाडग्याभोवताली आणि घराभोवताली संरक्षणासाठी लावलेल्या काट्या-कुपान्यांनी आपली हद्द सोडली. वाऱ्यावरती लोटाळत लोटाळत आणि जमीन खरवडत सरासरा आणि फराफरा आवाज काढत त्या काट्याकुपान्या वादळाची भयानकता आणखीच वाढवू लागल्या.
गावकुसातली उघडीवाघडी दारं धडाधड आपटत राहिली आणि बंद दारंही वाऱ्याच्या एका झपाट्यासरशी उघडली गेली आणि गल्ली-बोळांतून, उकिरड्यांतून वाहून आणलेला कूडा-कचरा वाऱ्यानं "सढळ हस्ते' घरात घुसवला.
लगबगीनं उठून माणसं दारा-खिडक्यांना झोंबली. घराबाहेर उंडारणारी पोरंटोरं चिंगाट पळत सुटली आणि बंद दारांना धडका देत बसली. वडीलधाऱ्यांनी त्यांना रागावत, धपके देत घरात घेतलं.
आळीतली मोकाट कुत्री एरवी पडक्यात -खिंडारातच पडून असायची; तीही वादळामुळं होणाऱ्या सततच्या आवाजांनी दचकून उठली, बिनसली आणि वाऱ्याच्या झोताबरोबर सैरावैरा पळू लागली. पळता पळताच घरांच्या वळचणीला आसरा शोधू लागली. पण तिथली पाळीव कुत्री मात्र
त्यांना आसरा घेऊ देईनात. गुर्रर्र...गुर्रर्रनं सुरू झालेली ही कळवंड वाढतच गेली. शेवटी वाऱ्यानंच किमया साधली आणि घराच्या सपरावर ठेवलेलं भुस्काटाचं भोत गडगडत येऊन त्या भांडणाऱ्या कुत्र्यांच्याच अंगावर पडलं आणि कॅंव.... कॅंव...करत ती भटकी कुत्री पुन्हा सैरावैरा झाली.
सुसाट सुटलेल्या त्या खैदानाच्या तडाख्यानं झाडांची जमिनीशी पूर्ण वाकून कमान झाली होती. ज्यांच्यात लवचिकता होती ती तग धरून होती; पण वाऱ्यालाही विरोध करणारी मोठी झाडं हलत-डुलत होती. वारंवार बसणाऱ्या हिसक्यांनी त्यांच्या फांद्या कडाकडा मोडून पडत होत्या आणि वाऱ्यावर इकडं तिकडं जात होत्या. काही झाडं उन्मळून पडत होती, घरावरचे पत्रे उचकटण्याच्या स्थितीत होते.
दारापुढची घमेली, पातेली, ओसरीवरची भांडीकुंडी, टार्लीटुर्ली, डबेडुबे चक्राकार गतीनं पुढं जाऊन एखाद्या अडथळ्याला धडकून थांबत होते.
पावसापूर्वीच्या खैदानानं, वादळानं बाहेरचं वातावरण सगळं हे असं होतं. माणसं घरात सुरक्षित असली तरी त्यांचा सगळा जीव बाहेरच्या दिशेनंच होता. कारण, राखून ठेवलेला चिमणचारा, लाकूडफाटा, जिवापाड जपलेलं पशुधन हे सगळं त्या वादळाच्या तडाख्यात होतं. मधूनच विजा चमकत होत्या. कडकडाट करत होत्या. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच जिवाचा थरकाप होत होता.
असं सगळं असतानाच विजांचा जोरदार कडकडाट सलगपणे सुरू झाला. गहजब माजला.
"गर्जेल तो पडेल काय?' ही म्हण खोटी ठरवत गारांसह जोरदार पाऊस कोसळू लागला. पत्र्यांवर दगड पडावेत तसा आवाज होऊ लागला. आता वादळ पुरतं शमलं होतं. वादळामुळं घरात भेदरून बसलेली बच्चेकंपनी आता गारांच्या ओढीनं बाहेर जाऊ पाहत होती. मात्र, मोठी माणसं या पोरासोरांना बाहेर सोडायला तयार नव्हती. काही मिनिटं गारा कोसळत राहिल्या. नंतर संततधार लागून राहिली. पाऊस उघडायची वाट बघत माणसं झोपी गेली. सकाळी उठून बघतात तर सगळंच होत्याचं नव्हतं झालं होतं. खैदानानं उडवून आणलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचा खच सगळीकडं पडलेला होता. कुणाची काडा-सरमाडाची सपरं उडाली होती तर कुणाची पत्र्याची घरं ही घरं राहिली नव्हती. झाडं तर किती मोडली आणि किती पडली याचा अंदाजच येत नव्हता. कडूनिंबाच्या एका झाडावर वीज कोसळली होती. निम्मं झाड जळून गेलं होतं. अनेक कोंबड्या मरून पडल्या होत्या. आढ्या-मेढीखाली सापडून काही वासरं मरून पडली होती. एकूण, मोठाच उत्पात घडला होता. रानोमाळ वैरणीची चिपाडं विखुरलेली होती. पेंढ्यांचा खच पडला होता. जे झालं ते झालं, आता नुसतं बघत बसण्यात अर्थ नाही, असा शहाणा विचार करून वडीलधारी मंडळी आवरासावरीच्या कामाला लागली.
गुरा-ढोरांना काय खायला घालायचं हा लगेचचा प्रश्न असल्यानं माणसं ती वैरणीची चिपाडंचापाडं गोळा करू लागली. वाकली-झुकलेली सपरं कुणी डेंग्या लावून सरळ केली. पडलेल्या झाडांची, तुटलेल्या फांद्यांची काटछाट करून त्यातून
आढ्यांची-मेढ्यांची तजवीज करण्यात आली. झाडांचाच काडाकुडा अन् पानं सपरं शाकारायला वापरण्यात आली. कशीबशी निवाऱ्याची सोय झाली. हे सगळं होत असताना कालच्या गदारोळातून काही जनावरं रानातून घरी परतलीच नव्हती. त्यांचा शोध घ्यायला गेलेल्यांचाही अद्याप काही पत्ता नव्हता. त्यांच्या वाटेकडंच सगळ्यांचे डोळे लागले होते.
गावातली काही वडीलधारी माणसं ज्या वेळी रानात पोचली त्या वेळी वावरं पाण्यानं तुडुंब भरलेली पाहून त्यांना आनंद तर झालाच; पण नुकसानीचा विचार करता वाईटही वाटलं. मोठमोठाल्या ताली फुटून शेतातली माती वाहून बऱ्याच मोठ्या खोंगळी पडलेल्या होत्या. काही झाडं पडली होती. काही कलंडली होती. हलक्या जमिनीतून, माळरानातून खडा फुटला होता. उन्हाळ्यातली रखरख जाऊन काळ्या आईला समाधानाची ओली कळा आली होती. एका रात्रीत मातीतून हिरव्या कोंबांनी डोकवायला सुरवात केली होती. रात्रभर चालू राहिलेल्या ठिपक्यानं धरित्रीचं रूपडं हिरवंगार होणार होतं. असं सगळं पाहत पाहत माणसं पुढं चालली असताना एका ओघळीत कावळ्यांचा कलकलाट ऐकू आला. धावत-पळतच काहीजण तिथं पोचले. अंगात त्राण नसल्यानं एक बैल चढ चढू शकला नव्हता आणि पावसात रात्रभर भिजल्यानं त्याचे पाय आखडल्यामुळे तो तिथंच बसून राहिला होता. कावळ्यांनी त्याचा पार्श्वभाग चोची मारमारून रक्तबंबाळ केला होता. काही माणसांनी त्याला हलवून हाय-हूय करून पाहिलं पण उपयोग नव्हता. मदतीसाठी आणखी माणसं आणि डेंग्या आणणं गरजेचं होतं. बैलाच्या जखमांवर तरवडाच्या फांद्या टाकून माणसं पुढं निघाली. पुढच्या नळीत कुत्र्यांच्या गुरगुरण्यासारखा आवाज येत होता. माथ्यावर गेल्यावर लक्षात आलं की एका थोराड बोकडाला चार-पाच लांडग्यांनी शेळ्यांच्या कळपातून बाहेर काढून त्याचा जीव घेतला होता. लांडगे त्याच्याजवळ बसून राहिले होते. त्यामुळे माणसं पुढं जाऊ शकत नव्हती.
लांडगे तसे कुत्र्याचेच भाईबंद; पण एकदम क्रूर. हातात दगड घेत एकदम आरडाओरडा करत माणसं पुढं सरकू लागली. पुढच्या पायांनी ओली माती उकरत हे लांडगे दात विचकून माणसांना आव्हान देऊ पाहत होते; पण सगळ्यांनी एकदमच दगडांचा मारा केल्यावर त्यांनी पळ काढला. जवळ जाऊन पाहिलं असता लांडग्यांनी निम्मा बोकड फस्त केला होता.
रानावनातले धूळमाखले दगड संततधार कोसळणाऱ्या पावसानं धुऊन निघून चकाकू लागले होते. हे दगड तसे निरुपयोगी वाटत असले तरीही जैवोत्पत्तीसाठी त्यांचं निसर्गातलं अस्तित्व महत्त्वाचंच आहे. त्यांच्या खाली जमिनीत अगणित कृमी-कीटक मातीचं रूपांतर मृदेत करण्याचं काम अखंडपणे करत असतात. त्या सर्वांचे पोशिंदे हे दगड असतात! जैव आणि अजैव घटकांची ही परस्परपूरकता एरवी तशी आपल्या नजरेत सहजपणे भरत नाही. पावसाचा थेंब अन् थेंब जमिनीत मुरतो; पण त्याचं बाष्पीभवन होतं. फक्त दगडाखाली बाष्पीभवन होत नाही. त्यामुळे दगडाखालचं विश्व वाढतं, फोफावतं. जिराईत जमिनीत उद्या जे बीज पडेल, रुजेल त्यातून पाचू उगवतील; पण पावसानं ताण दिल्यानंतरच्याही स्थितीत मातीतले दगड ओलावा टिकवून ठेवत असल्यानं पीक तग धरून राहतं. अर्थात एवढं सगळं होण्यासाठी आधी पाऊस व्हावाच लागतो. त्यामुळे काल भरपूर पडलेल्या पावसानं झालेल्या हानी-नुकसानीचा विचार न करता गावातल्या मंडळींनी परमेश्वराचे आभारच मानले.
शेतकरी आता उद्याच्या खरिपाच्या पिकाचं स्वप्न उराशी बाळगून पेरणीपूर्व तयारीला लागला. औत-काठीची जुळवाजुळव करू लागला. अडगळीत पडलेली पाभर त्यानं काढली. तिची दिंड, दांडी, रुमणं, फण, दात यांची त्यानं सावडासावड केली. पाभर लोहारा-सुताराकडं नेऊन ठोकाठोक करून घेतली. शावकरळ, कानं-हेटं बघितलं. शिळवाट-जू यांची जोडाजोड करून बैलगाड्यांची साकणं आवळली आणि रासण्यासाठी सावडकऱ्याला फराट तयार ठेवायला सांगितलं. कधीही रान वाफशावर आलं की औत रानात पडलंच म्हणून समजा. घरकारभारणीनं लिंपणं फोडून बी-बोणं तयार ठेवलं. एरवीच्या रानासाठी मूग, उडीद, चवळी, तर कठणाच्या रानासाठी हुलगा, मटकी, तूर एकत्र मिसळून दुसऱ्या दिवशीच औत रानात पोचले आणि पेरणी सुरू झाली. "योल कुडंबे, योल कुडंबे, हर हर महादेव, चिंतामणी मोरयाचं चांग भलं' म्हणत अन् च्क्या...च्क्या... च्क्या... करत बळीराजानं उद्याच्या पिकासाठी बैल दापले...
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.