प्रगती आणि पुस्तक (प्रसाद मणेरीकर)

prasad menerikar
prasad menerikar
Updated on

दप्तराचं ओझं कमी करण्याच्या दृष्टीनं गेला बराच काळ चर्चा होत आहे आणि कल्पना मांडल्या जात आहेत. विविध विषयांसाठी एकच पाठ्यपुस्तक अशी कल्पना पुढं आली आहे आणि सरकारी पातळीवर त्या संदर्भात विचारही सुरू झाला आहे. अशा प्रकारे एकच पाठ्यपुस्तक देणं म्हणजे नक्की कसं केलं जाईल, अशा पुस्तकामुळं फायदे होतील की तोटे होतील, सगळ्याच पातळ्यांवर कशा प्रकारचा विचार करावा लागेल आदी गोष्टींबाबत मंथन.

दप्तराचं ओझं कमी करण्याविषयी गेले अनेक महिने महाराष्ट्रात काही सकारात्मक हालचाली घडत आहेत. दप्तराचं ओझं का वाढत जातं याची कारणं शोधून ती कमी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न चालू आहेत. शाळेत पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय करण्यापासून ते सर्व विषयांना एकच वही करण्यापर्यंत अनेक बाबींचा अंतर्भाव आहे. (याच अनुषंगानं ‘मनावरचं ओझं कधी उतरणार?’ असा एक विषय ‘सप्तरंग’मधून (२४ नोव्हेबर २०१९) प्रस्तुत लेखकानं मांडलेला आहेच.)
या पाठीवरचं ओझं कमी करण्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे मुलं वागवत असलेल्या दप्तराचं ओझं कमी करणं. त्यातल्या वह्या आणि पुस्तकं. सध्या प्रत्येक विषयाला स्वतंत्र पुस्तक आहे. (त्यातही काही वर्षांपूर्वी इतिहास-भूगोल-विज्ञान यांना प्राथमिक टप्यावर एकत्र करून परिसर अभ्यास हा एकच विषय केला आहे.) या पुस्तकांचं ओझं कमी करण्याच्या दृष्टीनं सरकार सकारात्मक पावलं टाकत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही काही दिवसांपूर्वी एका लेखातून हा विचार व्यक्त केला आहे. प्रत्येक विषयाचं वेगळं पाठ्यपुस्तक सोबत ठेवण्यापेक्षा जेवढं गरजेचं आहे, तेवढंच एका पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणं आणि त्या कालावधीसाठी एकच पाठ्यपुस्तक सोबत बाळगणं- ज्यामुळं आपोआपच वर्षभराच्या अभ्यासक्रमाची अनेक पाठ्यपुस्तकं बरोबर वागवण्यापेक्षा एका विशिष्ट कालावधीसाठी एकत्रित असं एक पाठ्यपुस्तक बाळगावं, असा यामागचा विचार आहे. म्हणजे समजा पहिल्या दोन महिन्यांमध्ये प्रत्येक विषयाचे दोन किंवा तीन धडे होणार असतील, तर तेवढाच भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट असेल आणि त्यापुढचा भाग क्रमानं पुढच्या पाठ्यपुस्तकांत असेल. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते अभिजीत पानसे यांनीही या दृष्टीनं गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं सरकारदरबारी प्रयत्न केले होते. या निमित्तानं पाठ्यपुस्तकांची ही अशी रचना आणि एकूणच पाठ्यपुस्तक, त्याची उपयुक्तता, त्याचा अधिक प्रभावी वापर आणि त्याच्या मर्यादा याची विस्तृत चर्चा होणं आवश्यक आहे. पहिल्यांदा या एकात्मिक पाठ्यपुस्तकाविषयी.
या एकात्मिक पाठ्यपुस्तकाचा विचार करताना मुळातच मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी व्हावं, सहाजिकच त्यामुळे पाठीवर आणि मनावर येणारा ताण कमी व्हावा, हा प्राथमिक उद्देश आहे, आणि या उद्देशाचा विचार करता हा निर्णय स्वागतार्ह आहे. पाठीवरचं ओझं आणि त्याचे होणारे शारीरिक दुष्परिणाम याविषयी सातत्यानं चर्चा होत असते, त्यामुळे इथं त्याची वेगळी चर्चा करण्याची गरज नाही. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी समजा होणार असेल, तर काही बाबींची काळजी घेणं निश्‍चितपणे आवश्यक ठरतं, त्याविषयी आपण चर्चा करू.
ही मांडलेली कल्पना प्रभावी असली, तरी पाठ्यपुस्तकाचा केवळ अनेक पाठ्यपुस्तकांऐवजी एक पाठ्यपुस्तक असा आणि इतकाच मर्यादित विचार करून चालणार नाही; याची कारणं अनेक आहेत. म्हणजे केवळ प्रत्येक पाठ्यपुस्तकांमधला काही मजकूर उचलून किंवा जितका विशिष्ट कालावधीसाठी हवा आहे तितकाच मजकूर उचलून एक पाठ्यपुस्तक तयार केलं, तर ओझं कमी केल्याचं समाधान मिळेल; पण ते तितकंच अतार्किकही ठरेल. किंवा अगदी भाषेचे दोन धडे, गणिताचे दोन पाठ, परिसर अभ्यासाचे दोन पाठ अशा प्रकारे पुस्तक तयार केलं, तरी ती जुळवाजुळव ठरेल. त्यामुळे अशी केवळ जुळवाजुळवीची रचना टाळणं हे पहिलं काम असेल.

वाचनक्रमाची संगती
पाठ्यपुस्तक जेव्हा हातात येतं, तेव्हा ते कोणत्याही विषयाचं जरी असलं, तरी मुलं केवळ सुरुवातीचा काही भाग वाचतात किंवा क्रमानं वाचतात असं होत नाही. ती पूर्ण पाठ्यपुस्तक उलगडून पाहतात, त्यातला जो भाग आपल्याला आवडतो तो वाचतात, पुनःपुन्हा वाचतात. (ज्यांना लिखित मजकूर वाचता येत नाही, ती चित्रवाचन करतात.) आपल्या मित्रमंडळींना वाचून दाखवतात. मग तो कदाचित शालेय अभ्यासक्रमाच्या क्रमानं असेल किंवा नसेलही. त्यामुळे भाषा, गणित, विज्ञान, भूगोल इत्यादी विषय एकत्र जोडताना मुलांना पुस्तकाच्या हव्या त्या भागात रमण्याचा जो आनंद मिळतो हा आनंद हिरावून घेतला जाणार नाही ना, याची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी पाठ्यपुस्तकात केवळ तुकडे तुकडे जोडून चालणार नाही, तर त्यातल्या सर्व विषयांची एकत्रित बेमालूमपणे गुंफण करावी लागेल. म्हणजे आपण नेहमीच्या पद्धतीनं केलेले भाषा, गणित, इतिहास, भूगोल असे तुकडे हे पाठ्यपुस्तकात नव्या रूपात येताना तुकडे-तुकडे करून चालणार नाही, तर त्याची योग्य ती सरमिसळ करावी लागणार आहे. म्हणजेच या विविध विषयांचा एकत्रित विचार आणि मांडणी करावी लागणार आहे आणि तरीही गणित, विज्ञान, भूगोल आशा विषयांचा आवश्यक त्या टप्यावर विषय म्हणून परिचय करून देण्याची जबाबदारी शिक्षकांवर द्यावी लागणार आहे. आज कोणतंही पाठ्यपुस्तक घेतलं, तरी त्या पाठ्यपुस्तकाची एक तार्किक रचना असते. म्हणजे ती सोप्याकडून अवघडाकडे जाणारी असेल किंवा गणित, विज्ञान किंवा भूगोल यांसारख्या ठिकाणी एका संकल्पनेनंतर क्रमबद्धपणे दुसरी संकल्पना या स्वरूपाची असेल. (ही क्रमबद्ध रचना कशी असावी वा आता आहे ती योग्य का अयोग्य यावर मतमतांतरं असू शकतात; पण क्रमबद्ध रचना गरजेची असते हे नक्की) ही अशी रचना कोणत्याही विषयाचं आकलन नीटपणे होण्यासाठी गरजेची असते तशी विद्यार्थ्यांसाठी विषयाचं एकसंध रूप समोर येण्यासाठी गरजेची असते. कारण त्यातूनच मुलं एखादा विचार क्रमबद्धपणे करायला शिकतात. त्याचमुळे नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये या प्रकारचं क्रमबद्धपण दिसावं लागेल. त्यामुळे पाठ्यपुस्तकाचा विचार विशिष्ट कालावधीपुरता किंवा विशिष्ट परीक्षेनंतर दुसरं पाठ्यपुस्तक इतक्या मर्यादित अर्थानं करून चालणार नाही. दुसरा म्हणजे जसं कोणत्याही पाठ्यपुस्तकांमध्ये आधीच्या पानांवर जायची किंवा पुढचा मजकूर पाहायची मुभा असते, अभ्यासाची मुभा असते तशी मुभा या नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये कशी असायला हवी, याचाही विचार करायला हवा. यामुळंच पाठ्यपुस्तकाचं एकसंध रूप मुलांना कसं दिसेल हे पाहावं लागेल.

विद्यार्थ्यांच्या गरजांचा विचार
दुसरं म्हणजे सर्व मुलं एकाच वेळी एकच समान घटक शिक्षकाकडून शिकतात, असं आपलं गृहीत आहे. प्रत्यक्षात असं नसतं. आजची बहुतांश रचनाही तशीच आहे; पण आता हळूहळू ती बदलू लागली आहे. क्षमतेनुसार गट पद्धती वापरून शिकवणं सुरू झालेलं आहे. वर्गात काही मुलं पुढे असतात, काही मागं असतात. मात्र, या स्थितीत काही भाषेत मागं, तर काही गणितात मागं असं होऊ शकतं, या सर्वांच्या गरजेचा विचारही झाला पाहिजे.
आपला दुसरा भाग आहे तो पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचा. आपल्याकडे एकूणच मुलांसाठीच्या साहित्याविषयी अनास्था सार्वत्रिक आहे. मग ते खेळण्यापासून पुस्तकांपर्यंत सगळीकडंच लागू आहे. ‘नाहीतरी मुलंच वापरणार आहेत, खराबही करणार आहेत, मग द्या त्यांना कसंही’ हा दृष्टिकोन सार्वत्रिक आहे. बाजारात मुलांसाठी म्हणून तयार होणारी अनेक पुस्तकं, खेळणी ही अशीच आहेत. यातून बाहेर येण्याला नुकती कुठं सुरुवात झाली आहे; पण तीही पुरेशी नाही. त्यामुळंच मुलांच्या हाती जे जाईल ते दर्जेदारच असलं पाहिजे, याचा विचार आपल्याला करावा लागेल. तशी विचाराची सवय आपल्याला लावावी लागेल. मूल हा समाजातला महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळं त्याच्या हाती जे जाणार आहे ते मुलांची अभिरुची समृद्ध करणारं असावं लागेल. पुस्तकातला आशय असेल, मजकूर असेल, त्यातली चित्र असतील- ती मुलांसाठी आहेत आणि म्हणूनच ती दर्जेदार असावी लागतील.

पाठ्यपुस्तक आणि दर्जा
पाठ्यपुस्तकांच्या दर्जाबद्दल सातत्यानं प्रश्न निर्माण होतात. केवळ त्यातल्या मजकुराचा भाग नाही, तर त्यातली चित्रं त्याची मांडणी, त्याची रंगसंगती या सगळ्याचाच विचार मुलांच्या हातात पाठ्यपुस्तक देताना व्हायला हवा. असा विचार जाणीवपूर्वक होतो, असं आजच्या पाठ्यपुस्तकांवरून तरी म्हणता येणार नाही. उत्तम प्रतीचं लेखन, चित्रं, उत्तम प्रतीचा कागद, उत्तम छपाई आणि हे सगळं आज तरी आहे असं जाणवत नाही. मुलांबाबतचा हा दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल. जे मुलांच्या हाती जाईल, ते त्यांची अभिरुची वाढवणारं, त्यांची सौंदर्यदृष्टी वाढवणारं असं असेल आणि याचा अतिशय गंभीरपणे विचार पाठ्यपुस्तकं तयार करताना आपल्याला करावा लागेल.
आपल्याकडे एकूणच सौंदर्यदृष्टीचीही उदासीनता जाणवते. सौंदर्य म्हणजे काय यावर मतभेद, वाद होऊ शकतात. एकदा ते घालावेत; पण मुलांसाठी या बाबतीत सर्वांनी एकत्र येण्याची आणि एकमत करण्याची गरज आहे. इथं अभिमान बाजूला ठेवावे लागतील आणि पाठ्यपुस्तक हा शिक्षणातला महत्त्वाचा घटक आपण मानत असू, तर ती सुंदर आणि दर्जेदार असावी लागतील.
ही उदासीनता जशी टाळायला हवी, तशा मुलांबद्दल असणाऱ्या ठोकळेबाज कल्पनाही बदलायला हव्यात. मुलांच्या पुस्तकांत चित्रं हवीत ही अशीच एक ठोकळेबाज कल्पना. मुलांना चित्र आवडतात हे खरं; पण पुस्तकात चित्रांचा उद्देश काय, त्यांची नेमकी भूमिका काय, ती कशा प्रकारची हवीत, वयानुसार त्यात कोणते बादल असायला हवेत... या सर्वाचा नीट अभ्यासपूर्ण विचार आपल्याला करायला हवा आणि तो मुलांच्या दृष्टीनं व्हायला हवा.

चौकटीबाहेरचा विचार
हे करण्यासाठी सरकारी नियम चौकटीतून आपल्याला बाहेर पडावं लागेल. मजकुरासाठी, त्या चित्रांसाठी अतिशय विचारपूर्वक आखणी करावी लागेल. याच्यासाठी शिक्षकांची अभिरुची वाढावी यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि शिक्षक तितक्या प्रभावीपणे हे मुलांपर्यंत पोचवतील यासाठी प्रयत्न करावे लागतील.
पाठ्यपुस्तक ही केवळ मदत आहे, पाठ्यपुस्तकाला अनेक पर्याय आहेत, असं जरी आपण म्हणत असलो, तरी आज बहुतांश ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये मुलांसमोर लिखित साहित्यासाठी पाठ्यपुस्तक हा एकमेव पर्याय आहे. त्यांच्यासमोर दुसरं कोणत्याच प्रकारचं लिखित साहित्य येत नाही. ही मुलं सर्वस्वी वाचनासाठी पाठ्यपुस्तकावर अवलंबून असतात- त्यामुळं मुलांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना वाचन साहित्य मिळावं यात पाठ्यपुस्तकाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. केवळ अभ्यासक्रमाचा एक भाग इतकाच मर्यादित अर्थानं त्याच्याकडे बघून चालणार नाही.
पाठ्यपुस्तकांचं महत्त्व आहे, आज तरी ते निश्चितपणे आहे- त्यामुळंच त्याच्या दर्जाचा अधिक बारकाईनं विचार करावा लागतो. आजही बहुतांश शाळांमध्ये पाठ्यपुस्तक हे एकमेव साधन म्हणून वापरलं जातं आणि बहुतांश सारे शिक्षक आणि मुलं शिकण्यासाठी पाठ्यपुस्तकावर अवलंबून असतात हे वास्तव आहे आणि त्यामुळंच हे वास्तव लक्षात घेऊन पाठ्यपुस्तकाचं महत्त्व नाकारता येणार नाही. केवळ पाठ्यपुस्तकावर अवलंबून राहायचं नसेल, तर परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करावा लागेल आणि ती अधिकाधिक समता कौशल्यावर आधारित घ्यावी लागेल. मागं पाठ्यपुस्तकांच्या धड्यावर तशी काहीशी सुरुवात झालेली आहे; पण हे सगळं अधिक नेमकं, नीट आणि व्यापक प्रमाणात करावं लागेल; पण तो स्वतंत्र मुद्दा आहे. पाठ्यपुस्तकं मुलांना अधिक जवळची वाटतील, या प्रकारे त्यांची रचना करावी लागेल आणि ती योग्य प्रकारे अधिक प्रभावीपणे मुलांपर्यंत कशी पोचतील याच्यासाठीचे शिक्षक तयार करावे लागतील.

पाठ्यपुस्तकांची गरज कुणासाठी?
खरं तर या अनुषंगानं एका मुद्द्याचा पुन्हा विचार आपल्याला करायला हवा. पाठ्यपुस्तकाची गरज नेमकी काय व कोणासाठी? या प्रश्नाच्या निश्चित उत्तरापर्यंत आपण अजून पोचलेलो नाही. पाठ्यपुस्तक हे साधन आहे- साध्य नाही, असा मुद्दा सातत्यानं मांडला जातो आणि तसं असेल तर त्यात अधिक लवचिकता आणायला काय हरकत आहे? म्हणजे शिक्षक मुलांसाठी गरजेनुसार आवश्यक ते साहित्य तयार करू शकतील, ते स्थानिक असेल. यात प्रांत, भाषा, संस्कृती, व्यवसाय इत्यादी सर्वच घटक विचारात घेतले जातील. स्थानिक शिक्षकांचा गट तयार करून हे काम करता येईल, त्यांनाही महत्त्वाच्या कामांत सहभागाची संधी मिळेल. यातून विकेंद्रीकरण होईल, नव्या विचारांना अधिक चालना मिळेल, नवे उपक्रम येतील. मुलांच्या भोवतालाशी पुस्तक जोडून घेता येईल. एकाच पुस्तकात सर्वांचं प्रतिनिधित्व मांडण्याचा अट्टाहास सोडून देता येईल आणि पुढच्या टप्यांवर ते अधिक व्यापक करता येईल. यातून सर्वच समृद्ध होतील. यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण शिक्षकांना देता येईल. म्हणजेच अपेक्षित क्षमतांचा आधार घेत शिक्षकांना स्वत:च साहित्य तयार करायची मोकळीक मिळेल.
‘पाठ्यपुस्तक हे साधन आहे का साध्य,’ हा जसा एक सोडवायचा प्रश्न आहे; तसं ‘ते शिक्षकांसाठी आहे, का मुलांसाठी’ हाही प्रश्न आपण नेमकेपणाने सोडवायला हवा. म्हणजे शिक्षकाच्या शिकवण्याचा विचार करून पाठ्यपुस्तकाची रचना करावी, की मुलांच्या शिकण्याचा? वरवर पाहता यात काही फरक नाही असं वाटेल; पण तसं नाही. जर पाठ्यपुस्तकं मुलांसाठी असं जर आपण म्हटलं, तर मुलांना काय प्रकारे शिकायला आवडतं, कसं वाचायला आवडतं, मुलांसाठीचं चित्र कसं असावं; गोष्टी, माहिती या गोष्टी कशा असाव्यात, शब्द कसे असावेत, उपक्रमांची रचना कशी असावी या सगळ्याचा मूल केंद्रस्थानी ठेऊन विचार करावा लागेल. अधिक बारकाईनं करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.