‘मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं’ हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. हे ओझं कमी कसं होईल यासंदर्भात नियुक्त समितीनं आपला अहवाल -काही सुधारणांसह- पुन्हा एकदा नुकताच सादर केला.
खरंतर, शालेय मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं आणि शिकण्यासंदर्भातलं मनावरचं ओझं या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पाठीवरचं ओझं कमी केलं जाण्याबरोबरच हे मनावरचंही ओझं कसं हलकं होईल या दिशेनंसुद्धा पावलं उचलणं अत्यावश्यक आहे. यासंदर्भात काय करता येईल याविषयीचा हा ऊहापोह...
मुलांच्या पाठीवर असणारं दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी काही ठोस स्वरूपाची उपाययोजना अमलात येईल असं चित्र आता दिसायला लागलं आहे. देशपातळीवर यासाठीचं धोरण निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यादृष्टीनं केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयानं
‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’च्या (एनसीईआरटी) रंजना अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीनं नुकताच एक अहवाल सादर केला असून, दप्तराचं ओझं कमी करण्याविषयीच्या विविध शिफारशी त्या अहवालाद्वारे करण्यात आल्या आहेत. मुळात हा अहवाल याआधीच सादर केला गेला होता. मात्र, त्यातल्या त्रुटींचा अभ्यास करून व त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करून तो आता पुन्हा सादर करण्यात आला आहे.
यात प्रामुख्यानं शाळेतच पाण्याची व भोजनाची व्यवस्था करणं, वह्यांची संख्या व त्यांची जाडी कमी करणं, पुस्तकांची ने-आण कमी करणं अशा अनेक शिफारशी आहेत. त्यांची व्यावहारिकता तपासून घेता येईल; पण या विषयाच्या अनुषंगानं काही कृती-आराखडा तयार होत आहे व तो सार्वत्रिक करण्याचा प्रयत्न केला जात आहे हेही महत्त्वाचं.
मुलांच्या पाठीवर असणारं दप्तराचं ओझं हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यांनी यादृष्टीनं काही उपाययोजना करण्याचे प्रयत्न केले; पण ते पुरेसे आणि सार्वत्रिक स्वरूपाचे नव्हते. त्यातही, दप्तराचं ओझं नेमक्या कोणकोणत्या कारणांमुळे वाढतं आणि ते कसं कमी करता येईल याविषयी एकमतही नव्हतं. यामुळेच प्रत्यक्षात उपाययोजना करण्याचं ठरवूनही मुलांच्या पाठीवरचं ओझं मात्र कमी झालं नाही. काही शाळांनी व सामाजिक संस्थांनी पथदर्शी प्रयोग केले; पण तेही मर्यादितच राहिले. त्या प्रयत्नांना सार्वत्रिक स्वरूप येऊ शकलं नाही. त्यामुळे दप्तराचं ओझं हा शिकण्यातला एक मोठा अडसर बनून राहिलेली बाब झाली आहे. विविध प्रकारच्या वह्या-पुस्तकांपासून ते जेवणाचा डबा, पिण्याच्या पाण्याच्या बाटलीपर्यंतच्या अनेक बाबी मुलांना सोबत घ्याव्या लागतात. पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्थाही आपण उभी करू शकलो नाही हे वास्तव आहे. त्यामुळेच दप्तराचं ओझं हे वह्या-पुस्तकांबरोबरच इतर बाबींमुळेही वाढत जातं.
का वाढतं दप्तराचं ओझं?
शाळेत रोज साधारणतः सहा ते सात विषय शिकवले जातात, त्यामुळे त्या प्रत्येक विषयाची पुस्तकं आणि वह्या या बाबी आपोआपच दप्तरात येतात. त्याचबरोबर आनुषंगिक वह्या म्हणजे गृहपाठाची वही वेगळी, लेखनकामाची वेगळी, निबंधाची वेगळी, चित्रकलेची वेगळी या प्रकारच्या साहित्याचीही त्यात भर पडते. याच जोडीनं अलीकडच्या काळात अगदी बालवयापासून विविध विषयांच्या व प्रकारच्या शिकवण्यांचं मोठंच पेव फुटलं आहे. शाळांवरचा अविश्वास आणि मुलांना शाळेव्यतिरिक्तच्या वेळात कुठंतरी गुंतवून ठेवणं असे दोन्ही प्रकारचे विचार त्यामागं आहेत. शहरी भागात तर शाळा आणि घर यांतलं अंतर हे काही किलोमीटरचं असल्यामुळे आणि प्रवासात काही तासांचा वेळ वाया जात असल्यानं शाळांमधून थेट शिकवणीला जाणं असा पर्याय सोईचा म्हणून निवडला जातो. त्यामुळे शिकवणीसाठीच्या वेगळ्या वह्या मुलं आपल्या दप्तरात ठेवतात. याचबरोबर दोन वेळचं खाणं अधिक संध्याकाळचा शिकवणीच्या वेळचा डबा, दिवसभर पुरेल एवढं पाणी अशा एकामागोमाग एक गोष्टींची भरच दप्तरात पडत जाते. परिणामी, सहा-सात-आठ किलोपर्यंत वजन मुलं पाठीवर वागवतात. पावसाळ्याच्या दिवसांत यात रेनकोट किंवा थंडीच्या दिवसांत स्वेटर आदींसारख्या गोष्टींची अधिकची भर पडते.
दप्तराचं हे ओझं कमी करण्यासाठी केंद्र सरकारला लक्ष घालावं लागावं इतकी वेळ येण्याचं मुळातच कारण नाही. स्थानिक पातळीवर किंबहुना शालेय पातळीवर उपाययोजना करायची ठरवली तर आणि थोडासा समंजसपणा दाखवला तर सहजसाध्य होण्यासारखी ही बाब आहे. मात्र, आपण उगाचच अनेक गोष्टीचं अवडंबर माजवून ठेवतो. शाळेत मुलांनी विविध प्रकारचं लेखन करणं महत्त्वाचं की प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या वहीमध्येच लेखन करणं महत्त्वाचं ही तारतम्यानं समजून घेण्याची गोष्ट आहे. निबंधाची वही वेगळी आणि त्यासाठी वेगळे गुण यापेक्षा रोजच्या वहीत निबंध लिहिला तर त्या निबंधाची प्रत आणि गुणवत्ता घटण्याचं काही कारण नाही; पण शिक्षणापेक्षा इतरच नको त्या गोष्टींचं महत्त्व आपण वाढवून ठेवल्यामुळे हा प्रकार आपल्या शालेय व्यवस्थेत सातत्यानं दिसत राहतो. मग तो दप्तराच्या ओझ्यापासून ते बूट-टाय आदींच्या ओझ्यापर्यंत सर्वच ठिकाणी आहे.
याचबरोबर घर ते शाळा असं सर्व वह्या-पुस्तकं वागवायचं आणखी एक कारण म्हणजे गृहपाठ. खरं तर मुलांचा घरचा वेळ हा त्यांचा, त्यांच्या घरच्यांच्या हक्काचा वेळ आहे, त्यावर शाळेनं अधिकार गाजवायचं काही कारण नाही आणि पालकांनीही शाळेला तसं करू देता कामा नये; पण दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही. परिणामी, मुलं शाळेत जातात हे कमी म्हणून की काय, क्लासलाही जातात आणि दोन्ही ठिकाणच्या वह्या-पुस्तकांचं व अभ्यासाचं ओझं घेऊन घरी येतात आणि तोही अभ्यास पुन्हा घरी येऊन करत बसतात. यामुळे, ताण हलका करणारं खेळणं मात्र पुरेसं होऊ शकत नाही आणि अगदी गृहपाठ करायचाच असेल तर सर्व विषयांचा गृहपाठ एक-दोन वह्यांत मिळून केला तर बिघडलं कुठं? पण बिघडतं! कारण, कालच्या पानावरून पुढं जाण्याची आपली मानसिकता! नको ते टाकून देण्याची हिंमत आपण दाखवत नाही.
मुळात मुलांच्या मनावर असलेला अभ्यासाचा ताण व पाठीवर असणाऱ्या दप्तराच्या ओझ्यामुळे पाठदुखी, मानदुखीसारखे गंभीर विकार आयुष्यभरासाठी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेक पालकांशी बोलताना हे जाणवतं. एखाद्या विषयाची वही वा पुस्तक शाळेत नेलं नाही म्हणून शिक्षाही केली जाते. शाळेत शिक्षा नको किंवा त्रास नको म्हणून सर्व वह्या-पुस्तकं मुलं घेऊन जातात किंवा पालकही तसं करायला मुलांना भाग पडतात.
ओझं : पाठीवरचं आणि मनावरचं
पाठीवरचं दप्तराचं ओझं आणि मनावरचं शिकण्याचं ओझं या दोन्ही खरं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुलांना होणारं दप्तराचं ओझं बाहेरून दिसतं; पण त्याचबरोबर शाळाशाळांमधून असणारं शिक्षणाचं ओझं मात्र अनेकदा आपण निमूटपणे वागवत राहतो. शिकण्याची असलेली आनंदाची प्रक्रिया या सगळ्यामुळे अतिशय ताणाची व कंटाळवाणी होऊन बसलेली आहे. या सगळ्याचा मूलभूत विचार आपल्याला करावा लागणार आहे.
शिकताना मुलांवर ताण का नसावेत याचं शास्त्रीय उत्तर शोधण्याचे अनेक प्रयत्न गेल्या काही वर्षांत झाले. या काळात शिक्षणाशी संबंधित विविध शास्त्रं अधिकाधिक विकसित झालेली आहेत. या शास्त्रांच्या आधारे व त्यामध्ये झालेल्या संशोधनानुसार, माणसाचं प्रभावीपणे शिकणं हे त्याच्या मानसिक स्थितीशी जोडलेलं आहे आणि त्याची मानसिक स्थिती जितकी निरोगी, जितकी उत्तम तितकं माणसाचं शिकणं अधिक चांगलं होतं हे आता संशोधनाअंती सिद्ध झालेलं आहे. म्हणजे ताण किंवा ओझी दोन प्रकारची असतात असं म्हणू या.
एक हवंहवंसं वाटणारं आणि दुसरं नकोसं वाटणारं. ‘हवंहवंसं ओझं’ याला आपण ‘सकारात्मक ताण’ असं म्हणू या आणि जेव्हा ताण सकारात्मक असतो तेव्हा ते ‘ओझं’ राहत नाही, तर ती ‘आनंददायी प्रक्रिया’ बनते आणि आपोआपच त्यामुळे शिकणं चांगलं होतं. परिणामी, मुलं चांगली शिकावीत असं जर आपल्याला वाटत असेल तर ती मुळात आनंदी राहायला हवीत. त्यांच्या पाठीवर किंवा मनावर ओझं असेल तर त्याची परिणती नकारात्मक ताण वाढण्यात होते आणि त्याचा अर्थातच परिणाम हा मुलं शिकण्यापासून, शिकण्याच्या प्रक्रियेपासून दूर जाण्याकडे होतो. या परिस्थितीत शिकणं हे आनंददायी न राहता ते त्रासदायक, वेदनादायी होतं.
मुलांच्या पाठीवरचं आज असणारं ओझं हे मुळात लादलेलं आहे. ते त्यांनी स्वखुशीनं स्वीकारलेलं नाही आणि म्हणूनच ते त्यांच्या शिकण्यातला अडथळा बनत आहे. शाळेत असेल वा शिकवण्यांच्या ठिकाणी असेल एका जागी, एका विशिष्ट अवस्थेत तासन्तास सक्तीनं बसून मान मोडून अभ्यास करणं किंवा कंटाळा आला असूनही त्याच त्याच गोष्टी करत राहणार या सगळ्या सक्तीमुळे अर्थातच शिकणं ही प्रक्रिया कंटाळवाणी वाटू लागते.
दप्तराचं ओझं कमी करणं हा या प्रक्रियेतला एक भाग आहे; पण केवळ त्यानं आख्खी शिक्षणाची प्रक्रिया ताणरहित होणार नाही, त्यासाठी अधिक व्यापक पातळीवर असे प्रयत्न आपल्याला करावे लागतील. मुळात आज एकूण स्थिती अशी आहे की मुलांनी काय शिकावं, कसं शिकावं, किती शिकावं हे सगळं कुणीतरी दुसरंच, म्हणजे मोठी माणसं, ठरवतात आणि ते पार पाडण्याची जबाबदारी मात्र असते मुलांवर! कारण, मुलांना काहीच कळत नाही या पारंपरिक विचारावर असणारी आपली श्रद्धा!
दप्तराच्या ओझ्याबरोबरच शिकण्याचंसुद्धा ओझं वाटावं अशी परिस्थिती गेल्या काही वर्षांत का निर्माण झाली? या काळात शिकण्याचे विषय वाढत जाऊन त्यापाठोपाठ दप्तराचं ओझं वाढत गेलं अशी परिस्थिती का आली? या प्रश्नांची अनेक कारणं देता येतील. जागतिकीकरण आणि स्पर्धा यांचा प्रचंड मोठा बागुलबुवा गेल्या काही वर्षांपासून उभा केला जाऊ लागलेला आहे. त्याचबरोबर शिक्षणाचा विचार काही विशिष्ट संस्था केंद्रस्थानी धरून केला जातो, त्यामुळे ‘गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण’ अशी अवस्था न राहता ते काही ‘विशेष संस्थांपुरतं’ मर्यादित राहिलं आणि गेल्या काही वर्षांत प्रामुख्यानं सरकारी शाळा या ‘गुणवत्ता प्रकारा’तून बाहेर फेकल्या गेल्या. सरकारी शाळा म्हणजे कमी प्रतीचं शिक्षण आणि खासगी शाळा म्हणजे उत्तम प्रतीचं शिक्षण अशी एक विभागणी तयार झाली. हे का झालं, कशासाठी झालं याच्या तपशिलात आत्ता जायला नको; पण प्रामुख्यानं शहरी आणि निमशहरी भागांत तरी सरकारी शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. ‘खासगी शाळा या सरकारी शाळांच्या तुलनेत चांगला अभ्यास करून घेतात’ असं एक चित्रही निर्माण झालं (किंवा केलं गेलं), त्याच जोडीनं विविध प्रकारच्या स्पर्धा शिक्षणाच्या बाजारात उतरल्या आणि मुलांना भविष्यासाठी सज्ज करायचं असेल, तयार करायचं असेल तर आणि जगात उभं राहायचं असेल तर बालपणापासूनच स्पर्धांना पर्याय नाही अशी स्थिती हळूहळू आकाराला यायला लागली. ती जाणीवपूर्वक तयार केली गेली. भोवतालच्या अस्थिर परीस्थितीमुळे स्वत: धास्तावलेले पालक मुलांच्या भविष्यकालीन काळजीमुळे अधिक धास्तावू लागले. त्यामुळे पूर्वीच्या काळी बारा-चौदा वर्षांच्या पुढं सुरू होणाऱ्या स्पर्धा आता आठव्या-नवव्या वर्षापासून सुरू व्हायला लागल्या. मग या स्पर्धा आणि त्यांचं स्वरूप कसं असलं पाहिजे याच्यावर पुरेसा विचार न होता स्पर्धा ठेवल्या जाऊ लागल्या आणि मुलांनी स्पर्धांमध्ये उतरणं आणि त्या प्रथम क्रमांकानं पास होणं (कारण, दुसरा क्रमांक आलेला कुणालाच चालत नाही!) हेच उद्दिष्ट ठरून गेलं आणि या सगळ्यात मुलांची शिकण्याची जी आनंददायी प्रक्रिया होती तीच हरवून गेली. परिणामी, शिकण्याचं ओझं हे वाढत गेलं.
शिकण्याचं स्वातंत्र्य की बंधन?
खरं तर मुलांनी विशिष्ट घटक/विशिष्ट गोष्ट विशिष्ट दिवसांत, त्यातल्या विशिष्ट काळात, विशिष्ट पद्धतीनं शिकली पाहिजे, अन्यथा मुलं शिकायला लायक नाहीत असं ठरवणं हा अन्याय्य प्रकार आहे. एका बाजूला मुलांचं स्वातंत्र्य मान्य करायचं आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या मुलांना एका साच्यात कोंबून पुढं जाण्यासाठी भाग पाडायचं, जर ते पुढं जाऊ शकले नाहीत तर त्यांना त्या व्यवस्थेतून काढून टाकायचं ही आपणच निर्माण केलेली अन्यायकारक व्यवस्था या ओझ्याच्या गाभ्याशी आहे. आम्ही सांगू ते, तितकंच, आम्ही सांगू त्या पद्धतीनं, तितक्या काळातच शिकायचं आणि नाही शिकलात तर तुम्हाला बोल लावायला आम्ही मोकळे! ही अन्याय्य व्यवस्था जोपर्यंत आमूलाग्र बदलत नाही तोपर्यंत केवळ पुस्तकांचं आणि दप्तराचं ओझं कमी करून साध्य काहीच होणार नाही. भले शाळेत येणाऱ्या दप्तराचं ओझं कमी होईल; पण मुलांच्या मनावर असलेल्या ओझ्याचा प्रश्न आणखी बिकट आहे. त्याच्यासाठी मुळातूनच उपाययोजना करायला हवी. मुलांना मोकळेपणा दिला तर ती भरपूर शिकतात, शिकण्यासाठी आवश्यक असलेला ताण स्वतःहून घेतात हे संशोधनाअंती जगभर मान्य झालेलं आहे; पण एका बाजूला संशोधनाचे गोडवे गायचे आणि दुसऱ्या बाजूला भविष्याच्या भीतीत मुलांना लोटत राहायचं हा वागण्यातला दुटप्पीपणा आपल्याला लवकरात लवकर थांबवावा लागेल.
शिकणं ही सहकार्यातून अधिक प्रभावीपणे होणारी बाब आहे. म्हणजे ‘सहनाभवतु’ म्हणत संस्कृतीचे गोडवे गायचे, ‘सगळे मिळून एकत्र शिकायचं’ हे तत्त्व मान्य करायचं, मात्र प्रत्यक्षात ‘एकत्र बसून आपापलं शिका’ अशी स्थिती निर्माण करत, मुलं एकमेकांशी बोलली तर त्यांना शिक्षा करत, आपण ‘सहकार्या’ऐवजी ‘स्पर्धा’ निर्माण करून मुलांच्यामध्ये गुण मिळवण्यासाठीची चढाओढ निर्माण करत राहायची! आणि सगळ्यांना एकत्र येऊ द्यायचं नाही, तर प्रत्येकानं स्वतःपुरतं पाहायचं अशी स्पर्धात्मक रचना आपण शिक्षणामध्ये निर्माण करत राहिलो आहोत.
स्वप्नांचं दडपण
स्वप्नं पाहणं ही आनंदाची गोष्ट आहे. मुलांना भविष्याची स्वप्नं रंगवू द्यायची असतात; पण आपण त्यांच्या भविष्याची स्वप्नं रंगवली तर व त्याचा त्यांना नकारात्मक ताण दिला तर त्या स्वप्नांचा विस्कोट होऊन जातो. भविष्यातल्या आव्हानांचं आणि भविष्यकालीन स्वप्नांचं ओझं मुलांवर निर्माण होतं. उद्याच्या न पाहिलेल्या भविष्यासाठी आपण मुलांचा आणि आपलाही आजचा वर्तमानकाळ तणावाचा करून टाकतो. या सगळ्यातून काय होतं? तर मुलं सातत्यानं दडपण घेऊन वावरत राहतात. केवळ मुलंच नव्हे तर त्यांचे पालकही त्याच दडपणाखाली वावरत राहतात. शाळेतलं प्रत्येक मूल उत्तम गुणांनी उतीर्ण झालं पाहिजे या दडपणाखाली शिक्षक असतात. शाळेत जास्तीत जास्त प्रवेश व्हावेत यासाठी उत्तम निकाल लागावा या दडपणाखाली शाळा चालवणारे व्यवस्थापक असतात. याचा अंतिम परिणाम मुलांवर होतो. हे दडपण आणि थोड्याशा अपयशानं येणारी निराशा या दोहोंनी मुलांचं आणि पालकांचं जीवन ग्रासून टाकलेलं आहे. कुणीच आनंदी नाही. आनंदाच्या शोधासाठी सगळेच भटकत आहेत अशी स्थिती आहे. यावर उपाय शोधायचा असेल तर ही रचना आमूलाग्र बदलावी लागेल. किरकोळ प्रकारच्या स्वरूपाचे बदल करून चालणार नाहीत. ते पुरेसे ठरणार नाहीत.
उपाय काय?
हे ओझं कमी करायचं असेल तर मुलांच्या शिकण्याविषयीच्या पारंपरिक कल्पना झुगारून द्याव्या लागतील. त्या झुगारायच्या असतील तर शिकणं हे वह्या-पुस्तकं यांच्या बाहेर काढावं लागेल. पंचेंद्रियं प्रभावीपणे वापरून शिकता येईल अशा पद्धती अधिकाधिक वापराव्या लागतील. केवळ लेखनाव्यतिरिक्त अभिव्यक्तीचे आणि पाठ्यपुस्तकापलीकडचे ज्ञानाचे पर्याय शोधावे लागतील. शाळेचं ग्रंथालय समृद्ध करावं लागेल आणि ते मुलांना मुक्तपणे उपलब्ध करून द्यावं लागेल. माहितीजालावरची माहिती नेमकेपणानं कशी शोधायची ते त्यांना समजवावं लागेल. तंत्रज्ञानानं समोर ठेवलेले विविध पर्याय वापरून पाहावे लागतील आणि मुख्य म्हणजे, बदलाला सदैव तयार राहावं लागेल. शाळेला चार भिंतींच्या बाहेर काढावं लागेल आणि साचेबद्ध परीक्षांमधून मुक्ती मिळवण्यासाठी पर्यायी प्रभावी मार्ग शोधावे लागतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.