एकदाच्या आमच्या अवांतर गप्पा सुरू झाल्या.
मात्र, ‘‘राखेजवळ बसून काय करत होता तुम्ही?’’ असा थेट मूळ विषयाला हात घालताच त्या दोन्ही आजीबाई पुन्हा एकदा सावध होत गप्प बसल्या.
‘‘आज्जी, कशाला करता असलं काम? नातवंडांमध्ये घरी रमायचं आणि आनंदानं दिवस घालवायचे तर...’’
दुसऱ्या आजीबाई म्हणाल्या : ‘‘त्यासाठी नातवंडं पाहिजेत ना?’’
नांदेड ही माझी जन्मभूमी. सगळा गोतावळा, मित्रमंडळी आणि जुन्या सगळ्या आठवणी नांदेडमधल्याच. एरवी जेव्हा जेव्हा नांदेडला जातो तेव्हा तेव्हा घरगुती किंवा सामाजिक कारण असतं. या वेळी जाण्याचं कारण वेगळं होतं. मन व्यथित करणारं होतं. माझे गुरू आदरणीय प्रा. राजाराम वट्टमवार सर यांची पत्नी पद्मिनीबाई वट्टमवार यांचं निधन झालं होतं आणि त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मी नांदेडला गेलो होतो. नांदेडमधलं वट्टमवार सरांचं घर म्हणजे कार्यकर्ते निर्माण करणारं ऊर्जाकेंद्रच. पद्मिनीकाकू या ऊर्जाकेंद्राच्या सर्वेसर्वा. त्या गेल्यानं प्रत्येकाला अवघडल्यासारखं वाटणं हे साहजिकच होतं.
वट्टमवार सरांचा खचलेला चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हता. नांदेडला असायचो तेव्हाची गोष्ट. जेव्हा जेव्हा मन बेचैन, अस्वस्थ व्हायचं, एकटेपणा जाणवायचा तेव्हा तेव्हा मी घाटावर जायचो. ते ठिकाण माझ्या आवडीचं.
नांदेडला गोदावरीच्या काठावर बंदाघाट, नगीनाघाट, गोवर्धनघाट, मरघाट, भीमघाट, नावघाट असे वेगवेगळे घाट आहेत. गोवर्धनघाटावर अंत्यसंस्कार केले जातात. या सर्व घाटांची आपापली वैशिष्ट्यं आहेत. मनोज बोरगावकर यांची चर्चेत असणारी ‘नदीष्ट’ ही कादंबरी याच गोदाकाठावरच्या निरीक्षणाचा उत्कृष्ट नमुना आहे. ही गंगा सगळ्याच विषयांना तिच्यात सामावून घेते असं तिचं महत्त्व. नयन बाराहाते यांच्या घरापासून गोदाकाठ अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. गोदाकिनारी बसून गोदेचं ते सगळं विशाल रूप मी शांतपणे अनुभवत होतो. पलीकडच्या भागात सकाळीच दहनसंस्कार झालेल्या एका मृतदेहाचं रूपांतर राखेत झालं होतं. तिथं दोन-चार कुत्री आजूबाजूला ठेवलेल्या नैवेद्यासाठी जमली होती. परस्परांवर भुंकत ती त्या नैवेद्यावर तुटून पडली होती. त्यांच्या भुंकाभुंकीमुळे त्या ठिकाणी वारंवार लक्ष जात होतं. तरीही होता होईल तेवढं तिकडे दुर्लक्ष करत मी गोदावरीच्या संथ पाण्याकडे पाहत होतो.
नयन यांचा मध्येच फोन आला.
‘‘संदीप, किती वेळ आहे? या लवकर. मी जेवणासाठी वाट पाहतोय.’’
मी काही उत्तर देण्याच्या आधीच नयन यांनी मोबाईल ठेवून दिला.
मी मोबाईल सायलेंट मोडवर ठेवला आणि ज्या बाकावर मी बसलो होतो तिथंच पहुडलो. हवेच्या दोन-तीन झुळकी आल्या आणि डोळा कधी लागला ते कळलंच नाही. जाग आली तेव्हा एक कोळी गाणं म्हणत असल्याचं ऐकू आलं. मोबाईल पाहिला तर नयनचे खूप कॉल येऊन गेले होते.
स्मशानभूमीत एक आजीबाई काहीतरी करत होत्या. दुसऱ्या आजीबाई आजूबाजूला कुणाची तरी वाट पाहत होत्या असं दिसलं. मला काही कळेना. सकाळीच कुणाला तरी अग्नी दिला गेला होता. आता सायंकाळीच राख का बरं भरली जात असेल? मी विचारात पडलो; पण तो विचार फार ताणत बसलो नाही.
त्या दोन्ही आजीबाई एका माणसाला पाहताच तिथून लगबगीनं निघून जाऊ लागल्या. जवळजवळ पळतच निघाल्या असं म्हटलं तरी चालेल. नेमकं हे काय होत असावं? थोडा वेळ गेला. अर्ध्या तासानंतर त्या दोन्ही आजीबाई परत आल्या. एक त्या राखेच्या समोर बसून काहीतरी करू लागल्या आणि दुसऱ्या आजूबाजूला पाहत राहिल्या. भोवतालावर नजर ठेवत असल्याप्रमाणे.
मी दुरून हे सगळं पाहत होतो. मी मागच्या बाजूनं गेलो आणि ज्या आजीबाई राखेजवळ बसल्या होत्या, थेट त्यांच्याजवळ जाऊन थांबलो. तेवढ्या गरम राखेजवळ बसून त्या आजीबाईंना घाम फुटला नव्हता; पण मला पाहताच त्यांना घाम फुटल्यासारखं झालं. त्या घाबरून गेल्या.
‘नमस्कार जी’ म्हणत त्या आजीबाईंनी मला हात जोडले.
मी काही बोलायच्या आतच त्या म्हणाल्या : ‘‘कुत्री इथं त्वांड घालत्याल म्हून राखन करीत बसलीया.’’
बोलताना त्या कमालीच्या गोंधळून गेल्या होत्या. पलीकडे थांबलेल्या आजीबाई तेवढ्यात जोरात ओरडल्या : ‘‘बाप्या आला, पळ गं!’’
तो माणूस तिकडून येण्याअगोदर या आजीबाई परत दुसरीकडे पळाल्या. एक म्हातारा माणूस काठी टेकवत टेकवत तिथं आला आणि त्या दोन्ही आजीबाईंना जोरजोरात शिव्या घालू लागला. त्याचा राग थोडासा शांत झाल्यावर त्यानं मला विचारलं :‘‘तुम्ही कोण?’’
‘‘काही नाही, इथं बसलो होतो. त्या दोन आजीबाई इथं काहीतरी करत होत्या ते पाहून मी इकडे आलो.’’
त्यावर तो म्हातारा म्हणाला : ‘‘काई न्हाई. डोकेदुखी हाये वो निसती. काय सापडनार हाये त्या राखेत? पर त्या दोघींन्ला बी काय कामधंदा दिसत न्हाई...सतत इकडं यिऊन राख चिवडत बसत्यात.’’
माझी उत्सुकता आता वाढू लागली होती. मला त्या दोन्ही आजीबाईंशी बोलायचं होतं; पण त्या आता तिथून निघून गेल्या होत्या. थोडंसं पुढं गेलो. बाभळीच्या एका झाडाखाली वाळूच्या ढिगाऱ्यावर त्या दोघी बसल्या होत्या. तो म्हातारा कधी जाईल याची वाट पाहत होत्या. मी त्यांच्या दिशेनं निघाल्यावर त्यांना वाटलं की हाही मृत माणसाचा कुणीतरी नातेवाईक असावा आणि तो आता चिडून आपल्याला शिव्या घालायला येत असावा, म्हणून त्या पुढं पुढं चालायला लागल्या. मी त्यांना ‘आजी, आजी’ म्हणून हाका मारू लागलो तरी त्या थांबायला तयार नव्हत्या. बराच वेळ त्यांचा पाठलाग केल्यानंतर मी त्यांच्याजवळ पोचलो. त्यांना म्हणालो :‘‘घाबरू नका. मी तुमच्याशी सहजच बोलायला आलो आहे.’’
‘हा माणूस ‘सहज’ बोलायला का बरं आला असेल?’ असा प्रश्नार्थक भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता.
मी त्यांना विचारलं : ‘‘ते आजोबा तुम्हाला शिव्या का देत होते?’’
त्या आजोबांचा उल्लेख करताच ‘‘उगं मेला आम्हाला तरास देतोया,’’ असं त्या म्हणाल्या.
थोडा वेळ गेल्यावर दोघींमध्ये जरा मोकळेपणा आला.
‘‘तुम्ही कोन हाईसा?’’ असं मला विचारत राख चिवडणाऱ्या आजीबाई माझ्याशी बोलायला लागल्या.
मी म्हणालो : ‘‘मी माझ्या नातेवाइकांकडे आलो असून नदीच्या घाटावर फिरायला आलोय. तुम्हाला पाहिलं आणि तुमच्या मागं धावणाऱ्या त्या आजोबांनाही पाहिलं. ते आजोबा तुम्हाला विनाकारण त्रास देत आहेत का? नेमकं काय चाललंय हे पाहण्यासाठी मी तुमच्याकडे पळत आलो.’’
‘‘तुमचे कुणी नातेवाईक वारले आहेत का?’’ मी विचारलं.
आजी म्हणाल्या :‘‘न्हाई.’’
‘‘मग तुम्ही काय करत होता तिकडे?’’
‘‘काई न्हाई जी, आसंच!’’ त्या काय करत होत्या हे सांगण्याची त्यांची इच्छा दिसत नव्हती.
थोडं पाणी पिऊन माझ्याकडे पाहत दोघींपैकी एक आजीबाई म्हणाल्या : ‘‘पितासा का पानी?’’
संवाद पुढं न्यायला हे कारण चांगलं आहे असं समजून मी लगेचच पाणी घेतलं.
‘‘कोनच्या गावचं हाये तुम्ही?’’
मी म्हणालो : ‘‘मुंबई.’’
एकदाच्या आमच्या अवांतर गप्पा सुरू झाल्या.
मात्र, ‘‘राखेजवळ बसून काय करत होतात?’’ असा थेट मूळ विषयाला हात घालताच आजीबाई पुन्हा एकदा सावध होत गप्प बसल्या.
‘‘आजी, कशाला करता हो असलं काम? नातवंडांमध्ये घरी रमायचं आणि आनंदानं दिवस घालवायचे तर...’’
दुसऱ्या आजीबाई म्हणाल्या : ‘‘त्यासाठी नातवंडं तं पाह्यजे ना?’’
असं करता करता दोघींकडून सगळी माहिती घेतली.
या दोन्ही आजीबाई नांदेडमधल्या गोधनघाट परिसरात राहणाऱ्या. एकीचं नावं राधाबाई कांबळे आणि दुसरीचं नाव जनाबाई वाघमारे. दोघी सत्तरी पार केलेल्या. उत्साही. त्या माझ्याशी बोलत होत्या खरं; पण स्मशानभूमीत बसलेल्या त्या आजोबांकडेही त्यांचं लक्ष होतं.
दोघी बहिणी आहेत. राधाबाई थोरल्या. राधाबाईंचा नवरा अपघातात गेला. मुलं-बाळं नसलेल्या राधाबाईंना धाकटी बहीण जनाबाईच आधार ठरली. जनाबाईंना कुष्ठरोग होता. त्यात त्यांच्या दोन्ही हातांची आणि पायांची मधली बोटं नाहीशी झाली. हा आजार आपल्यालाही होईल म्हणून जनाबाईंच्या मुलांनी आणि सुनांनी त्यांना आपल्या कुटुंबापासून दूर केलं होतं. खाटेवर पडलेला नवरा सांभाळत त्याच्या व स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी जनाबाई काहीतरी छोटा-मोठा कामधंदा करायच्या. सुरुवातीला दोघी बहिणी नांदेडमधल्या नवा मोढा परिसरात धान्य स्वच्छ करण्याचं काम करायच्या; पण जसजसं वय झालं तसतसं त्यांना ते काम होईना. वजीराबादमध्ये एका व्यापाऱ्याच्या घरीही दोघींनी काही काळ घरकाम केलं; पण ते काम काही कारणानं सुटलं. पुढं अवघड कामं होईनात, छोटी कामं करायला अडचणी, मग जगायचं कसं हा प्रश्न या दोघींपुढे उभा राहिला.
जनाबाई म्हणाल्या : ‘‘आमच्या गल्लीतल्या येक्या बाईनं राखेतलं सोनं काढायचं काम सांगितलं आन् तव्हापासून आम्ही या कामाला लागलो.’’
मी विचारलं : ‘‘राखेतलं सोनं शोधायचं म्हणजे नेमकं काय करायचं?’’
‘‘मेलेल्याला जाळायच्या आदुगर त्येच्या तोंडात सोनं ठिवत्यात. त्ये सोनं त्येच्या हाडांसोबत त्येच्या राखेत ऱ्हातं. शिरीमंत घरातला कुनी मानूस मेल्यावर जास्त बी सोनं सापडतं कधीमधी. राख सावडायच्या आदुगर त्ये सोनं मिळवायासाठी ही समदी धडपड...’’ राधाबाईंनी सांगितलं.
मी म्हणालो : ‘‘महिन्यातून किती वेळा मिळतं असं सोनं?’’
जनाबाईंनी कपाळावर हात मारला नि म्हणाल्या : ‘‘म्हैन्यातून? छ्या, चार म्हैन्यांतून कधीतरी येखांद्या बारी सोन्याचा बारकुसा तुकडा हाती लागला तं लागंतो, न्हाई तं निसती राख चिवडीत बसायचं न् लोकांच्या शिव्या खात ऱ्हायाच्या.’’
‘‘तुम्हाला भीती वाटत नाही का?’’ मी विचारलं.
राधाबाई म्हणाल्या : ‘‘कुनाची भीती? जो मेलाय त्येच्या नातलगांची? का मसनातल्या भुतांची?’’
राधाबाई शांत स्वभावाच्या, तर जनाबाई जरा तापट स्वभावाच्या होत्या.
मी विचारलेल्या प्रश्नांना बगल देत जनाबाईंनी त्या मघाच्या आजोबांकडे पाहत एक शिवी दिली आणि म्हणाल्या :‘‘अजून जाग्यावरचा हलतच नाही!’’
राधाबाई माझ्याजवळ आल्या आणि माझ्या प्रश्नाला उत्तर देत शांतपणे म्हणाल्या : ‘‘पिरेत जाळल्या जाळल्या तिसऱ्या मिन्टाला तिथं कुनी थांबत न्हाई. दुसऱ्या दिशी सकाळी सुर्व्या माथ्यावं येता येता राख भराया लोक येत्यात. मेलेल्याचं नातलग त्येच्या सोबतीला येत्यात त्ये येवढा येळंच आन् भुतांची भीती काई वाटत न्हाई आम्हास्नी. जित्या मानसाला त्येच्या मनात आसलेल्या भुतांची भीती वाटती. आशेत अडकिवनाऱ्या त्या मोहमायेची भीती वाटती आन् आम्हाला भीती वाटती ती जातीपातीत बांधनाऱ्या मानसातल्या भुतांची.’’
राधाबाईंनी सूक्ष्म निरीक्षणशक्तीच्या जोरावर त्यांचे अनुभव मला सांगितले. त्यांच्या घरचं वातावरण, गोवर्धनघाटावरचे अनुभव, एखादा सोन्याचा तुकडा सापडला की वाटेल त्या भावात मागणाऱ्या सराफाबद्दलचे अनुभव आणि असं बरंच काही त्यांनी सांगितलं.
मी म्हणालो : ‘‘त्या राखेनं भाजत-पोळत नाही का?’’
राधाबाई म्हणाल्या : ‘‘पोळत्या राखंत सोनं हुडाकलं न्हाई तर मंग त्ये हाती लागू शकत न्हाई. मसनात पहारा देनाऱ्या त्या म्हाताऱ्याची नजर चुकवून हे समदं काम करावं लागतं. त्यातूनबी काही घावलच याची काय खात्री नसती. मेलेल्याच्या घरी किती शिरीमंती आसंल, ह्येबी आम्ही पिरेत जाळलं जात आसतानाच्या वक्ताला बारकाईनं बघतो. जास्त शिरीमंत आसंल तर नक्की येखांदा तरी सोन्याचा तुकडा राखंत घावतोच, पर ज्याला मसनातली लाकडं बी घ्येयाला परवडत न्हाईत, त्या बिचाऱ्यांच्या राखंत हाडंच नसत्यात; तर मंग सोन्याचं काय घिऊन बसलात?’’
गेल्या सहा वर्षांपासून या दोन्ही बहिणी राखेतलं सोन शोधायचं काम करत आहेत. या काळात त्यांना कधी केसांना धरून स्मशानभूमीतून हाकलूनही लावण्यात आलं आहे, कधी लाथा-बुक्क्यांचा मारही मिळालेला आहे. कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागलं तरी आम्ही आमचं काम सोडणार नाही, असं दोघीही सांगतात.
एवढा वेळ राखेची राखण करत असलेले आजोबा त्यांच्या झोपडीत गेले आणि या दोन बहिणी परत त्या राखेत सोनं शोधू लागल्या.
एक जण राख चिवडू लागली, तर कुणी येतंय का यावर दुसरी लक्ष ठेवू लागली. त्या दोघींच्या कामांकडे मी एकदा नजर टाकली आणि निघालो. मनात खूप प्रश्न होते...त्यांची उकल कधी न होणारी होती... मनातले प्रश्न मनातच ठेवून मी नयन बाराहाते यांचं घर गाठलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.