नव्या दिशेचे सप्तरंग (संदीप वासलेकर)

sundeep waslekar
sundeep waslekar
Updated on

नव्या दिशेचा सातवा रंग हा आधीच्या सहा रंगांचं मिश्रण होऊन तयार झाला आहे. हा रंग आहे सकारात्मक दृष्टिकोनाचा! आत्मविश्‍वास, जागतिक दृष्टिकोन, संशोधनाची वाढती आवड, पर्यावरणाची जाणीव, शेतीचं महत्त्व यांचा एकत्रित विचार केला तर नवीन दिशा एका सकारात्मक मार्गाची असेल यात शंका नाही.

धनेश बोरा हा इचलकरंजीमधला युवक. त्यानं अवकाशशास्त्रासंबंधी संशोधन करून अनेक पेटंट मिळवली आहेत. आता त्यानं घातक पदार्थांची तस्करी लेसरच्या साह्यानं शोधण्याचं एक अभिनव उपकरण स्वतःच तयार केलं आहे.

सचिन जाधव हा ग्रामीण भागातला युवक. त्यानं बॅटरीवर चालणारी विद्युत्‌सायकल तयार केली आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्या विद्युत्‌सायकलचं उद्‌घाटन झालं. खरं तर बॅटरीवर चालणारी ही सायकल स्कूटरसारखीच आहे.

आर्या तावरे ही २३-२४ वर्षांची तरुणी. लंडनमधल्या बांधकामक्षेत्रात गुंतवणूक करणं सर्वसामान्य लोकांना शक्‍य व्हावं म्हणून तिनं स्वतःच्या बुद्धीनं एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. ही युवती पुण्याची आहे. लंडनमध्ये शिक्षण घेताना तिनं हा नावीन्यपूर्ण प्रयोग केला.

श्रीतेज दरोडे हाही २३-२४ वर्षांचा युवक. पुण्याचाच. घरात बांधकामव्यवसायाशी संबंध. मात्र, निरनिराळ्या राज्यांमधून मध उपलब्ध करून तो अतिशय नावीन्यपूर्ण प्रकारे ग्राहकांपर्यंत पोचवण्याचा व्यवसाय श्रीतेजनं स्वतःच्या हिमतीवर सुरू केला असून, त्यामुळे ग्रामीण भागात काही ठिकाणी अर्थार्जनाचा नवीन मार्ग खुला झाला आहे.

सौरऊर्जेवर चालणारं भाजीपाला सुकवण्याचं यंत्र तयार केल्याबद्दल जगभरात जिचं कौतुक झालं ती शीतल सोमाणी व तिची टीम,
भाजीपाल्याच्या निर्यातीत विक्रम करणारा सुशांत फडणवीस, शालाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण देणारा सचिन जोशी, कृषी
पर्यटनकेंद्राची उत्तम उभारणी केलेला मनोज हाडवळे आदींचा उल्लेख मी पूर्वी या सदरातल्या विविध लेखांमध्ये केला आहे.
हे व असे अनेक युवक-युवती महाराष्ट्रात एका नव्या दिशेचे सप्तरंग दाखवत आहेत.

यातला पहिला रंग म्हणजे प्रचंड आत्मविश्‍वास. पदरी काही अनुभव नसताना, यातल्या काही जणांकडे पैशाचं पाठबळ नसताना, सामग्रीची कमतरता असताना केवळ आत्मविश्‍वाच्या जोरावर अनेक युवक अभिनव उद्योग सुरू करत आहेत. माझ्या महाविद्यालयीन काळातली गोष्ट. त्या काळी बॅंकेत अथवा सचिवालयात काम मिळावं अशी बहुतेक युवकांची मानसिकता असायची. माझ्यानंतरच्या काही पिढ्यांमध्ये नोकरीचीच महत्त्वाकांक्षा होती. आता अनेक युवक धाडस करून स्वतःच्या कल्पना वास्तवात आणण्यासाठी उद्योजकतेचा मार्ग स्वीकारताना दिसतात.

नव्या दिशेचा दुसरा रंग म्हणजे जागतिक दृष्टिकोन. अजूनही महाराष्ट्रात जात-धर्माचा पगडा आहे; परंतु अनेक युवक त्यापलीकडे जाऊन देश व जग या पातळीवर विचार करू लागले आहेत. जे उद्योगात आहेत ते निर्यातीचा प्रयत्न करतात, जे विद्यार्थिदशेत आहेत ते धडपड करून इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा दूरदूरच्या देशांत जाऊन शिक्षण घेतात, तसेच भारतातही काही विद्यापीठांत आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करतात.

तंत्रज्ञानातलं संशोधन हा नव्या दिशेचा तिसरा रंग. अनेक युवकांनी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial intelligence) या विषयात तरबेज होऊन त्यावर आधारित संशोधन व व्यवसाय करायला सुरवात केली आहे. चीन या क्षेत्रात खूपच पुढं आहे. चीनमध्ये युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेत तज्ज्ञ केलं जाण्यासाठी सरकारी पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न होतात व होतकरू तरुणांना भरपूर मदत मिळते. भारतात युवकांनी तंत्रज्ञानाच्या नवनवीन क्षेत्रांत जागतिक पातळीवर पुढं जावं यासाठी सरकारी पातळीवरून मोठी मदत पुरवली जात असल्याची माहिती मला नाही. अर्थात आपल्या नेत्यांच्या लेखी सत्तास्पर्धा, भूतकाळात रमणं, भावनिक मुद्दे अशा - देशाला मागं नेणाऱ्या - ‘महत्त्वाच्या विषयां’ना प्राधान्य असल्यामुळे, देशाला पुढं नेण्याचे प्रयत्न करणं हे त्यांना तेवढं महत्त्वाचं वाटत नसावं! अशा परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता, अवकाशशास्त्र, शाश्‍वत ऊर्जानिर्मिती या क्षेत्रांत आपले युवक केवळ स्वतःच्या इच्छाशक्तीवर व मेहनतीवर एक नवीन दिशा शोधत आहेत.

नव्या दिशेचा चौथा रंग म्हणजे नव्या पद्धतीचं राजकारण. जुन्या
पक्षीय राजकारणातून काही निर्मिती होत नसल्यानं काही युवकांनी राजकारणाचा नवीन मार्ग चोखाळला आहे. पुण्यातला सचिन इटकर हा त्याचं एक उदाहरण. गेल्या वर्षी त्यानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा जाहीर कार्यक्रम पुण्यात आयोजिला होता. तेव्हा सरसंघचालकांनी ‘ ‘मुक्त’चं नको, तर ‘युक्त’चं राजकारण असावं’ असं प्रतिपादन केलं होतं. त्यानंतर एका आठवड्यात सचिननं शरद पवार व राज ठाकरे यांचा प्रकट संवाद घडवून आणला होता. त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम झाला. अलीकडे केंद्र सरकारनं लडाख हा केंद्रशासित प्रदेश जाहीर केल्यावर सचिननं लडाखमधून महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी मोहीम उघडली आहे. काही जण समाजमाध्यमांचा वापर करून नव्या पद्धतीचं राजकारण करतात व त्यातून चर्चा, मंथन घडतं. ही तरुण मंडळी पक्षीय राजकारणापासून स्वतः मात्र दूर राहतात.

नव्या दिशेचा पाचवा रंग म्हणजे युवकांमध्ये पर्यावरणाबद्दल जाणीव निर्माण व्हायला सुरवात झाली आहे. मुंबईत आरे कॉलनीतली झाडं यंत्रणेद्वारे तोडण्यात आली तेव्हा तर युवकांनी व सामान्य नागरिकांनी आंदोलन केलं. अनेक उद्योजक कोळसा व तेल यांचा वापर कमीत कमी व्हावा हा उद्देश ठेवून सौरऊर्जेवर चालणारी नवीन उपकरणं तयार करू लागले आहेत. काही नवीन इमारतींमध्ये सौरऊर्जेचा उपयोग पाणी गरम करण्यासाठी होऊ लागला आहे. या क्षेत्रात पाश्‍चिमात्य देशांतले युवक अग्रेसर आहेत. युरोपमध्ये बरेच युवक गाडी बाळगणं अयोग्य समजतात. ते बसनं व रेल्वेनं प्रवास करतात. आपल्याकडे अजूनही स्वतःची गाडी असण्याचं आकर्षण आहे. अनेक युवक पाणी व वीज वापरण्याच्या बाबतीत अजूनही जबाबदारपणे वागताना दिसत नाहीत; पण एका नव्या विचाराला सुरवात नक्कीच झाली आहे.

नव्या दिशेचा सहावा रंग म्हणजे शेतीच्या आधुनिकतेचं महत्त्व समजायला सुरवात झाली आहे. भाजीपाला व फळनिर्यातीचा व्यवसाय येत्या काही वर्षांत बराच वाढेल. अर्थात अजूनही अनेक समस्यांनी बळिराजा त्रस्त आहे. सुशिक्षित युवकांना जसजसं शेतीचं महत्त्व कळेल तसतसे ते शेतीकडे गुंतवणुकीचा मार्ग म्हणून पाहू लागतील. शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठा मिळतील. पल्ला खूप दूरचा आहे; पण योग्य दिशेची समज येऊ लागली आहे.

नव्या दिशेचा सातवा रंग हा बाकीच्या सहा रंगांचं मिश्रण होऊन तयार झाला आहे. हा रंग आहे सकारात्मक दृष्टिकोनाचा! आत्मविश्‍वास, जागतिक दृष्टिकोन, संशोधनाची वाढती आवड, पर्यावरणाची जाणीव, शेतीचं महत्त्व यांचा एकत्रित विचार केला तर नवीन दिशा एक सकारात्मक मार्गाची असेल यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.