ही अशा एका उच्चशिक्षित तरुण सरपंचाची कथा आहे, ज्याचे सेवाकार्य पाहून तहसीलदारांनी एक दिवस आपले अख्खे तहसील कार्यालय त्याच्या गावात नेले. दिवसभर सर्व कर्मचाऱ्यांनी केवळ त्या गावासाठीच काम केले. हा सरपंच स्वतः नालीत उतरतो. स्वतःच घाण साफ करतो. स्वतः हाती खराटा घेऊन झाडायला लागतो. पडद्यावरील अनिल कपूरचा ‘नायक’ आपण बघितला. हा सरपंच त्याहून चार पावले पुढे आहे.
अतिश पवार हा तो सरपंच होय. दैनिक ‘सकाळ’चा चांपा येथील स्थानिक बातमीदार असलेला अनिल पवार आणि अतिश हे दोघे भाऊ लोकांच्या प्रश्नांसाठी काम करायचे. कुणाचा अर्ज लिहून दे. कुणाचे काम घेऊन तहसील कार्यालयात जा. कॉलेजला जाताना गावातील लोकांचे अर्ज नागपूर येथील कार्यालयात नेऊन दे. गरीब म्हाताऱ्यांना संजय गांधी रोजगार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वतःच प्रयत्न कर... केवळ सेवेची भावना असल्यामुळे दोघेही लोकांची कामे करायचे.
ग्रामपंचायतीची निवडणूक येताच याच म्हाताऱ्या-कोताऱ्यांनी अतिशला सरपंचपदासाठी जबरदस्तीने तयार केले. गावातील राजकारण दिल्लीहून लय भारी असते, असे म्हणतात. अतिशला हे माहीत होते. त्याने नकार दिला. परंतु, म्हाताऱ्या-कोताऱ्यांच्या अतिआग्रहापोटी तो तयार झाला. मग पॅनेलच लढविले. गावातील दिग्गज, महादिग्गजांना पराभूत करून त्याच्या पॅनेलचा विजय झाला.
अतिशने सरपंचपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा ग्रामपंचायतीच्या खात्यात फक्त दोन हजार रुपये शिल्लक होते. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे सात-आठ महिन्यांचे वेतन झालेले नव्हते. अतिशसाठी ही जबाबदारी नवी होती. विरोधकांचे टोमणे मारणे सुरू होते. हा पारध्याचा पोर काय काम करणार, या शब्दात त्याच्या बाजूला उभे असलेल्या नागरिकांनाही डिवचत होते. अतिशने हिंमत सोडली नाही. निवडून आल्यानंतर सरपंचपदाची सूत्रे घेण्यासाठी तीन महिने शिल्लक असताना अतिशने एक चांगले काम केले. ते म्हणजे, ग्रामपंचायतीचे कामकाज, सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्याचा संपूर्ण अभ्यास करून घेतला होता. परंतु, दोन हजार रुपयांत आता गावाचा कारभार कसा चालवायचा, हा प्रश्न त्याच्या पुढे होताच. त्याचे अक्षरशः डोके दुखायला लागले. नस्ती उठाठेव केली आणि राजकारणात पडलो, असा विचार त्याच्या मनात आला. दरम्यान, मतीन भोसले यांच्या आश्रमशाळेत शिक्षकांची भरती सुरू होती. अतिशची निवडही झाली. गाव सोडून द्यावे आणि आपली सरळसोट नोकरी करावी, या विचाराने त्याच्या मनात घर केले. परंतु, ज्या लोकांनी निवडून दिले, ज्या म्हाताऱ्या-कोताऱ्यांनी निवडणूक लढण्याचा आग्रह केला, त्यांचे चेहरे त्याच्या नजरेसमोर तरळले. मग त्याने निर्धार केला. आता मागे हटायचे नाही. चालून आलेल्या सरकारी नोकरीवरही त्याने पाणी सोडले.
जनसामान्य गरजूंना वैयक्तिक सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा अतिशने सपाटा लावला. आरोग्य शिबिर घेतले. साठेक लोकांना मोफत चश्मे मिळवून दिले. गावातील ऐंशीएक लोकांना उज्ज्वला गॅसचे कनेक्शन मिळवून दिले. सिंगल फेजच्या कनेक्शनमुळे पाण्याची टाकी भरण्यासाठी खूप वेळ लागायचा. वीज विभागाकडे सरपंचाचा अधिकार वापरत मोठे ट्रान्सफॉर्मर लावून घेतले. त्यामुळे त्याचे विरोधक असो की समर्थक, सर्वांना पुरेसे आणि वेळेत पाणी मिळू लागले. गावातील कामे होत होती; परंतु कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसा जमा होत नव्हता. मग कर गोळा करण्याची मोहीम राबविली. एका टॉवर कंपनीला थोडी जागा गावात भाड्याने दिली. त्यातून पैसा जमा व्हायला लागला. त्यातून कर्मचाऱ्याने वेतन देणे सुरू झाले. कर्मचारी मरगळ झटकून कामाला लागले.
हे असे एक गाव होते, ज्या गावात लोक पाण्यापावसात उघड्यावर मृतदेह जाळायचे. अतिशने त्यासाठी मग जिल्हा परिषदेकडे तगादा लावला. शेड उभारले. गावातील ज्या पारधी वस्तीत अतिश राहतो, ती आजवर उपेक्षित वस्ती होती. तिथे त्याने आदिवासी विभागाच्या योजनेतून संपूर्ण अंतर्गत रस्ते केले. एकाही कुटुंबाकडे अधिकृत वीज कनेक्शन नव्हते. ते मिळवून दिले. या वस्तीवर पाणीपुरवठा होत नव्हता. तोही सुरळीत केला. खासदार निधी, आमदार निधी, जिल्हा परिषद, जनसुविधा निधी, आदिवासी विकास, समाजकल्याण विभाग आदी जिथून-जिथून कामे करून घेता येतील, तिथून लाखोंची कामे करून घेतली.
कामे व्हायला लागली, तसे गावठी राजकारणात लिप्त असलेल्या राजकारण्यांवरून जनसामान्य जनतेचा विश्वास उडायला लागला. आता चार-दोन स्वार्थी राजकारणी सोडले, तर अख्खे गाव अतिशने आरंभलेल्या विकासकामाच्या यज्ञात वैयक्तिक श्रमाची आहूती देऊ लागले आहे. स्मशानभूमीचे बांधकाम झाले, तेव्हा अतिशने स्वतः कुदळ-फावडे घेतले. सरपंचपद शानशौकिनीने मिरविण्यासाठी नसून सेवेसाठी आहे, हे त्याच्या कृतीतून दिसू लागले. वैयक्तिक योजनांचा लाभ देण्याचा त्याचा सपाटा सुरूच होता. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा निशाताई सावरकर यांना कार्यक्रमाला बोलविले. त्यांनी अतिशचे प्रयत्न पाहून दहा लाख रुपयांचे जिमचे साहित्य मंजूर केले.
राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू झाले होते. ऐन गावातून हा महामार्ग जातो. अतिशने कंत्राटदार कंपनीसोबत चर्चा केली. गावात पाणीपुरवठ्यासाठी भूमिगत संपूर्ण पाइपलाइन करण्याची मागणी केली. त्यामुळे ३० वर्षांपूर्वीची जुनी कमी व्यासाची पाइपलाइन हटवून पुढील पन्नास वर्षे टिकेल अशी पाइपलाइन बसवून घेतली. मोठी मोटार बसवून मागितली. आता केवळ दीड तासात पाण्याची टाकी भरते. जुने काढून टाकलेले पाइप फेकून न देता रिपेअरिंग करून उंचावरील माना वस्तीपर्यंत टाकून दिले. महामार्गावरील खडी-गिट्टीचा मलबा पांदण रस्त्यावर टाकून देण्याची कंत्राटदाराकडे मागणी केली. काही पांदण रस्ते आता भर पावसाळ्यात बैलबंडी नेण्याइतपत चांगले झाले आहेत. गावातील सोळा लोकांना महामार्गावर काम मिळवून दिले.
अतिशने आता गाव आदर्श करत राज्याच्या नकाशावर नेण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यासाठी प्रारंभी त्याने आदिवासी वस्ती निवडली. ती चकाचक करण्याचे काम सुरू केले. लोकांच्या सहभागातूनच ठिकठिकाणी महापुरुषांच्या सिमेंटी फ्रेम आणि त्यावर सुविचार लावणे सुरू केले. त्यासाठी लोक आर्थिक भार उचलायला लागले. मुलीला डान्स नाही आला तरी चालेल, परंतु तिला स्वतःचे संरक्षण करता आले पाहिजे, यासाठी तयार करा, असे प्रेरणादायी अफलातून सुविचार नोंदविणे सुरू केले.
गावात एक फळबाग उभारली. त्यात आंबा, चिक्कू, पेरू अशी पाच हजार झाडे लावली. गावातील लोकांना ग्रामपंचायतीच्या मालकीची फळे खायला द्यायची आहेत, असे अतिश म्हणतो. फळबाग उभारण्यासाठी गावातील ५३ लोकांना नरेगातून २३० रुपये प्रमाणे कामे मिळवून दिले. यापुढे ही कामे सातत्याने देण्यात येणार आहेत. गावात नालंदा वाचनालय सुरू करण्यासाठी तो प्रयत्न करतो आहे.
गावातून वाहणाऱ्या नाल्यावर तीन ठिकाणी छोटे बंधारे बांधून पाण्याचा पुनर्वापर करण्याचे त्याचे नियोजन आहे. महिलांना गावातील नाल्याच्या घाटावर कपडे धुता यावे, एवढे स्वच्छ पाणी साठविण्याची त्याची कल्पना आहे. गावातील निराधारांसाठी हक्काचा निवारा उभारत, त्यांना दोन वेळेच्या जेवणाची सोयही करून देण्याचे अतिशचे स्वप्न आहे.
ग्रामपंचायतीच्या खात्यात केवळ दोन हजार रुपये जमा असताना लाखो रुपयांची कामे करण्याच्या या तरुण सरपंचाच्या झपाटलेपणाची चर्चा केवळ पंचक्रोशीतच नव्हे, तर जिल्हाभर झाली. त्यामुळे उमरेडचे तहसीलदार प्रमोद कदम यांनी आपले उमरेड येथील तहसील कार्यालय इतरांसाठी एक दिवस बंद केले. कर्मचाऱ्यांचा सर्व फौजफाटा या गावात आणला. उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढेही सोबत आले. सर्वांनी दिवसभर काम केले. धडाधड गृह चौकशी करीत जातीचे प्रमाणपत्र दिले. वैयक्तिक कामासाठी ज्या लोकांना आजवर अडचणी येत होत्या, त्या एकाच दिवसात निकाली काढून दिल्या. तब्बल ३५० लोकांचे प्रश्न सोडवून दिले. केवळ सतरा महिन्यांत नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील चांपा या गावाचा नायक ठरलेल्या अतिश पवारला हे गाव देशातील सर्वोत्तम गाव बनवायचे आहे. त्यासाठी त्याला केवळ आशीर्वादाचे बळ नव्हे, तर पाठबळही हवे आहे. देऊया का?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.