गांधी आणि सिनेमा : विसाव्या शतकातलं अद्वैत!

विसाव्या शतकातील भारतीय समाजमनावर निर्विवाद प्रभुत्व गाजविणाऱ्या आणि अमीट वसा उमटवणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे एक - महात्मा गांधी आणि दुसरा - सिनेमा!
the mahatma on celluloid book
the mahatma on celluloid booksakal
Updated on

विसाव्या शतकातील भारतीय समाजमनावर निर्विवाद प्रभुत्व गाजविणाऱ्या आणि अमीट वसा उमटवणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे एक - महात्मा गांधी आणि दुसरा - सिनेमा! एकानं राजकीय जगताला अहिंसेचा मंत्र दिला, तर दुसऱ्यानं साऱ्या जगालाच कवेत घेतलं! भारतात सिनेमाचं आगमन १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या चित्रपटानं झालं, तर महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून १९१५ मध्ये देशाच्या राजकीय रंगमंचावर अवतरले.

गांधी आणि सिनेमा यांच्यातील अद्‍भुत नातं तपशीलात कथन करणारं नवं इंग्रजी पुस्तक म्हणजे ‘द महात्मा ऑन सेल्युलॉइड - अ सिनेमॅटिक बायोग्राफी.’ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे माजी संचालक प्रकाश मगदूम यांनी ‘गांधी आणि सिनेमा’ या दोघांमधील पाठशिवणीचा प्रवास संशोधनपूर्वक या पुस्तकात कथन केला आहे.

गांधीजींच्या हयातीत आणि त्यानंतरही देशात व परदेशात शेकडो लघुपट, डॉक्युमेंटरी व चित्रपट निर्माण करण्यात आले. या साऱ्याची पार्श्वभूमी समजून घेऊन त्यांचा लेखाजोखा या पुस्तकात मांडला आहे. अठरा प्रकरणांत विभागलेलं हे पुस्तक ‘हार्पर कॉलिन्स’ या प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केलं आहे.

गांधीजींचा राजकीय प्रवास आणि सिनेमा माध्यमाचा विकास समांतर कसा होता याबाबत बरेच दाखले पुस्तकात जागोजागी पाहायला मिळतात. सिनेमा आधी मूकपट, मग बोलपट व त्यानंतर रंगीत अशा क्रमानं उत्क्रांत होत होता. त्याच क्रमानं गांधीजीही ‘कॅमेऱ्यात कैद’ होत होते. गांधीजींचा सूर कायम सिनेमाविरोधीच होता. विजय भट्ट यांचा गाजलेला ‘रामराज्य’ हा एकमेव सिनेमा गांधींनी बऱ्याच आग्रहानंतर बघितला.

तोही त्यांच्या विचारांशी मिळत्याजुळत्या कथासाधर्म्यामुळं. तर दुसरा रशियन सिनेमा बघितला तोही अर्धवटच! ‘सिनेमा आणि गांधी’ या दोघांमधील ‘लव्ह हेट रिलेशनशिप’ची वर्णनं या पुस्तकात जागोजागी विखुरली आहेत. त्या काळात सर्वांत जास्त चित्रित झालेले व्यक्तिमत्त्व असूनही, अगदी अंतापर्यंत गांधींचा सिनेमावरील रोष कमी झाला नाही हे अतर्क्यच आहे, असं लेखकानं म्हटलं आहे.

गांधीजींच्या हयातीतच त्यांच्यावर ‘डॉक्युमेंटरी’ करण्याचा पहिला प्रयत्न करणारी व्यक्ती म्हणजे ए. के. चेट्टियार! गांधीप्रेमातूनच चेट्टियार यांनी परिश्रमपूर्वक गांधीजींवर चित्रित झालेले शेकडो रिळांचं फुटेज जमा केलं, प्रतिकूल वातावरणात ते जतन केलं, संकलित केलं आणि त्यातून ‘महात्मा गांधी’ नावाची अडीच तासांची ‘डॉक्युमेंटरी’ बनवली.

गांधींची दृकश्राव्य चरित्रगाथा सांगणारी ही पहिली डॉक्युमेंटरी! ‘महात्मा गांधी स्टारिंग इन महात्मा गांधी’ या प्रकरणात लेखकाने चेट्टियार यांच्या ध्यासाची व अथक परिश्रमांची कहाणी कथन केली आहे.

स्वातंत्र्यानंतर अशाच प्रकारचा धाडसी प्रयत्न गांधीवादी विठ्ठलभाई जव्हेरी यांनी केला. त्यांनी साडेपाच तासांची डॉक्युमेंटरी बनवली होती. डॉक्युमेंटरीची संकल्पनात्मक रचना व मांडणी डी. जी. तेंडुलकर या गांधींचं अधिकृत चरित्र लिहिणाऱ्या चित्रपटकारानं केली होती.

याशिवाय गांधींची जीवनकथा चित्रपटातून सादर करण्याचा दृढनिश्चय व ध्यास बाळगणाऱ्या मोतीलाल कोठारी आणि रिचर्ड ॲटनबरा या दोघांच्या अथक परिश्रमाची हकिगत लेखकानं द मेन बिहाइंड ‘गांधी’ या प्रकरणात साद्यंत वर्णन केली आहे. चित्रपटक्षेत्राशी दुरान्वयानंही संबंध नसलेल्या कोठारी यांनी केवळ गांधीप्रेमापोटी ‘गांधी’ चित्रपट निर्माण करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळंच ॲटनबरांनी ‘गांधी’ पडद्यावर आणला.

दुर्दैवानं चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी कोठारी हयात नव्हते. ॲटनबरांनी हा चित्रपट व त्याला मिळालेले ॲकॅडमी अवॉर्ड कोठारींना समर्पित केलं. याचीही हकिगत पुस्तकात सविस्तर कथन केली आहे.

ॲटनबरा यांच्या ‘गांधी’ चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर भारतातील अनेक चित्रपटकारांची गांधींवर व्यापक नजर पडली. त्यातून गांधींचं व्यक्तिमत्त्व चहूबाजूंनी न्याहाळणारे आणि गांधीवादाची नव्याने उकल करणारे अनेक सिनेमे आले. ‘हॉलिवूड’च्या दिग्दर्शकांनी असे खूप असफल प्रयत्न केले. यातील सर्वांत महत्त्वाकांक्षी पण यशस्वी न झालेला धाडसी प्रयत्न डेव्हिड लीन या प्रथितयश दिग्दर्शकानं १९५० मध्ये केला.

या चरित्रपटात ॲलेक गिनिस गांधींची भूमिका करणार होते. दुर्दैवानं हा प्रकल्प कागदावरच संपुष्टात आला. अशा प्रकारच्या अपयशी प्रयत्नांच्या सुरस व रंजक हकिगती ‘गांधींचे न झालेले दर्शन’ या प्रकरणात आवर्जून लिहिल्या आहेत. तर यापेक्षा वेगळी हकिगत ‘थ्री शॉट्स टू इटर्निटी’ या प्रकरणात गांधी हत्येविषयी स्वतंत्र दृष्टिकोन मांडणाऱ्या ‘नाइन अवर्स टू रामा’ आणि ‘ॲट फाइव्ह पास्ट फाइव्ह’ या दोन चित्रपटांबाबत लिहिल्या आहेत.

भारतीय राजकारणात सामान्य माणसाची नस ओळखणारा लोकनेता म्हणून गांधींचं स्थान कालातीत आहे, तर सामान्यजनांमध्ये जनप्रिय म्हणून सिनेमांचं अस्तित्व वादातीत आहे. असं असूनही गांधी आणि सिनेमातील हा सुखद विरोधाभास लेखकानं नेमका पकडला आहे. त्याचमुळं गांधीभक्त आणि सिनेमाशौकीन या दोघांनाही रंजक वाटेल अशी ही शतकभराच्या मैत्रीची हकिगत आहे. श्याम बेनेगल पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात त्याप्रमाणे ‘सिनेमाज् ट्रिस्ट विथ गांधी’ असं हे पुस्तक आहे.

पुस्तक : द महात्मा ऑन सेल्युलॉइड - अ सिनेमॅटिक बायोग्राफी

लेखक : प्रकाश मगदूम

प्रकाशक : हार्पर कॉलिन्स, (९८२२०२६३८९)

पृष्ठ : ३५५

मूल्य : ५९९ रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()