- प्रा. विशाल गरड, vishalgarad.18@gmail.com
एकोणिसाव्या शतकात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केलं ते पाहता एकविसाव्या शतकात अभिमानानं म्हणावेसं वाटतं, ‘सुधारली कोटी कोटी कुळे सावित्री तुझ्या जन्मामुळे.’ पुण्यातल्या भिडे वाड्यात सुरू केलेल्या मुलींच्या शाळेला ज्या दिवशी सावित्रीबाई जात होत्या.
त्या वेळी त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर पुढील शंभर वर्षांचा काळ दिसला असावा म्हणूनच अनंत पीडा सहन करूनही त्यांनी स्त्री शिक्षणाचा ध्यास त्यावेळी सोडला नाही. जे दुःख आजच्या सामन्यातील सामान्य महिलेच्या नशिबी येत नसेल, त्याहून मोठं दुःख पचवून याच सावित्रीबाईंनी करोडो स्त्रियांचा भविष्यकाळ उज्ज्वल कसा असेल असे पाहिले, त्यांचं आज स्मरण करावंसं वाटतंय.
१८९७ मध्ये प्लेगची साथ आली. त्यात सावित्रीबाईंनाही प्लेगची लागण झाली आणि ही थोर माउली १० मार्चला आपल्याला सोडून अनंतात विलीन झाली. अवघ्या ६६ वर्षांच्या जीवनकाळात जे कार्य सवित्रीबाईंनी करून ठेवलं त्याच्या जोरावर आजच्या स्त्रियांनी आपल्या पिढ्या शिक्षित केल्या. आज घडीला स्त्री शिक्षणाचा पाया इतका बळकट झालाय, की पुढील दहा-पंधरा वर्षांत मुली यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करताना दिसतील.
आज महिन्याला चांगला पगार घेणाऱ्या शासकीय आणि खासगी नोकरदार महिलांनी, करोडोचा नफा कमावणाऱ्या उद्योजक महिलांनी, निवडून येऊन राजकीय पदावर विराजमान होणाऱ्या महिला नेत्यांना क्षणाक्षणाला सावित्रीबाईंचं स्मरण व्हावं इतकं महान कार्य त्यांनी करून ठेवलंय.
आज काही मोजकी घरं सोडली, तर सावित्रीबाई फक्त शासकीय कार्यालयातील भिंतीवर दिसतात. आजच्या मुलींना तुमचा आदर्श कोण ? असं विचारलं जर पहिल्या पसंतीला अभिनेत्रींची नावं येत असतील, तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. मुळात आजच्या घडीला जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीचा पहिला आदर्श सावित्रीबाईच असल्या पाहिजेत पण किती मुली त्यांचे चरित्र वाचतात, त्यांची जयंती वैयक्तिक पुढाकार घेऊन साजरी करतात?
किती जणी त्यांचा फोटो अभिमानानं आपल्या घरात लावतात? त्यांचं कार्य पुढच्या पिढीला कळावं म्हणून प्रयत्न करतात ? तर हा आकडा नक्कीच समाधानकारक नाही. वर्षाकाठी एकदा स्मरण करून किंवा त्यांची प्रतिमा पुजून आम्हाला सावित्रीबाई कळणार नाहीत पण त्यांचं चरित्र अंगीकारून इतिहासालाही दखल घ्यावी लागेल, अशी देदीप्यमान कारकीर्द तुम्ही घडवू शकता हे नक्की.
आजच्या घडीला महान वाटणाऱ्या प्रत्येक स्त्री पेक्षा सावित्रीबाईंचं कर्तृत्व कांकणभर जास्तच श्रेष्ठ ठरतं. कारण एखाद्या मंदिराचं शिखर आणि त्यावर फडकणारा झेंडा सहजासहजी सर्वांना दिसत असतो पण त्या मंदिराच्या पायाशी रचलेले दगड मात्र जमिनीत गाडून गेलेले असतात. सावित्रीबाईंचं कार्य त्या मातीत घट्टपणानं रुतून मंदिराचं वजन पेलणाऱ्या त्या दगडासारखंच आहे.
स्वातंत्र्योत्तर काळातील सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील यशस्वी स्त्रियांचा जयजयकार करताना त्या सगळ्यांच्या पाठीमागं सावित्रीबाईंनी ठेवलेला भक्कम आधाराचा हात आहे, हे ध्यानात घ्यावं. जर देशाच्या इतिहासात १ जानेवारी १८४८ हा दिवस उजाडला नसता, तर समाजातलं स्त्रीचं स्थान आजही उंबऱ्याच्या आतच असतं. घराचा उंबरा, गावची वेस, देशाची सीमा आणि सात समुद्र ओलांडून आभाळात विहार करायला सावित्रीनंच बळ दिलंय.
जिच्यामुळे आम्हाला शिकायला मिळालं, त्याच शिक्षणात आज सावित्रीबाईंच्या चरित्राचा किती उल्लेख आहे? जिथं सावित्रींबाईंनी पहिली मुलींची शाळा भरवली ती खोली कशी आहे? आज लाखो रुपयांची फी भरून वातानुकूलित वर्गात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलीनं लक्षात ठेवायला हवं की कधी काळी त्याच भिडे वाड्यातील एका खोलीत आपल्याला समाजाच्या भीतीपोटी पोत्यात बांधून शिकायला आणलं होतं.
स्त्रीचे वैयक्तिक आयुष्यच एक संघर्ष असतो. त्यातच मग तिला कुटुंबाशी, समाजाशी संघर्ष करावा लागतो. त्यातूनही ती जिंकते. मला एकदा माझ्या मित्रानं सहज विचारले 'सांग, पुरुष श्रेष्ठ का स्त्री?' त्यावर मी त्याला सांगितलं, “जोपर्यंत पुरुष त्याच्या पोटात स्त्री जन्माला घालू शकत नाही, तोपर्यंत स्त्री हीच श्रेष्ठ राहील.'
स्त्री स्वातंत्र्य, स्त्री शिक्षण आणि स्त्री संस्कार हे शब्द कानी पडले, की आपसूकच सावित्रीबाई फुलेंचा चेहरा आठवतो म्हणूनच मला ‘सावित्री’ या नावाचा अर्थ “सामाजिक विजयाची त्रिसूत्री मांडणारी स्त्री” असा करणं यथायोग्य वाटतं. ज्या एका स्त्रीनं अनिष्ट रूढी परंपरांवर आसुड ओढून समाजाला वठणीवर आणण्याचं कार्य केलं.
नावात जरी फुले असली तरी आयुष्यभर मात्र ज्यांच्या वाट्याला फक्त काटेच आले, अशा सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्यकर्तृत्वासमोर मी नतमस्तक होऊन आजची ही धसुडी त्यांच्या कार्यकर्तृत्वास अर्पण करतो.
(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास व विविध सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.