मनात रेंगाळणाऱ्या कथा...

साधं, सोपं, सरळ आणि मनाला आनंद देणाऱ्या लेखनांमध्येही आयुष्याचं तत्त्वज्ञान लपून बसलंय. त्यामुळे ‘न मारलेल्या गप्पा’ हे पुस्तक कोणीही स्वतःशी अगदी सहजपणे रिलेट करू शकतं.
Book
Booksakal
Updated on

एखाद्या छान गाण्याच्या हलक्या-फुलक्या शब्दांप्रमाणंच काही तरल आणि सोप्या शब्दांत, अनेक अर्थ दडलेल्या कथा आदित्य महाजन लिखित ‘दुनियादारी’ या ‘सकाळ’ मधील सदरात मागच्या वर्षी वाचायला मिळाल्या, आणि नुकतंच याच कथांचं ‘न मारलेल्या गप्पा’ हे पुस्तक प्रकाशित झालं.

साधं, सोपं, सरळ आणि मनाला आनंद देणाऱ्या लेखनांमध्येही आयुष्याचं तत्त्वज्ञान लपून बसलंय. त्यामुळे ‘न मारलेल्या गप्पा’ हे पुस्तक कोणीही स्वतःशी अगदी सहजपणे रिलेट करू शकतं. यातील काही गोष्टी वाचताना तर आपण स्वतःलाच त्या गोष्टीच्या भूमिकेत बघायला लागतो, यातच लेखकाचं यश आहे.

पुस्तक वाचताना हेही जाणवतं, की प्रत्येक गोष्टीत लेखकानं ‘त्या दोघांमधलं’ एक खास नातं खूप हळवेपणानं खुलवलं आहे. कथा वाचताना छान हसू ओठांवर येईल असा आशय प्रत्येक कथेत आहे. प्रत्येक वेळी प्रियकर-प्रेयसीच नाही तर, नात्यांमधले अनेक पैलू या गोष्टींमध्ये दिसून येतात.

वाचताना असं वाटत राहतं, की हे आपल्यासोबत घडून गेलंय, किंवा असं काहीतरी आपल्यासोबतही घडलं पाहिजे... अनेक जण हे पुस्तक वाचताना मनातल्या मनात शाळा-कॉलेजची चक्कर मारून येतील, कॉलेजमधल्या ‘ती’च्या आठवणीत रमतील! हे पुस्तक फक्त तरुणांचं नाही, तर तरुण राहण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी आहे.

या पुस्तकात ४९ कथा आहेत. प्रत्येक कथांमधील नायक, नायिका त्यांच्याच गोड क्षणांमधून आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. कधी तो खट्याळ, खोडकर, मस्तीखोर आहे, तर कधी तो समजूतदार, आश्वासक, प्रेमळ आहे... तर कधी ती थोडी निरागस, लाडिक पण तितकीच समजूतदारही आहे.

दोघांनीही आयुष्यात एकमेकांसोबत कधीही ‘न मारलेल्या गप्पा’ ते कधी डोळ्यांनी, कधी स्पर्शाने, कधी अंतर्मनातून तर कधी अगदी उघडपणानं मांडताना दिसतात. या कथांचं वैशिष्ट्य म्हणजे यातील कथा कितीही तरल असल्या, तरी त्याचा शेवट अनपेक्षित आहे. काही कथांचा शेवट तर इतका अनपेक्षित आहे, की तुम्ही अंदाजच लावू शकत नाही. त्यामुळं कथा संपल्यावर काहीतरी हातातून निसटतंय अशी भावना मनात रेंगाळत राहते.

पुस्तकातील सगळ्या कथा दोन ते अडीच पानांत संपतात, त्यामुळे एका बैठकीत बऱ्याच कथा वाचून होतात, शिवाय पुस्तकातील अधली-मधली कोणतीही कथा काढून वाचू शकतो. लेखक-दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांची प्रस्तावना आहे. तसेच ‘सकाळ’मधील वाचकांनी दिलेल्या निवडक प्रतिक्रियाही पुस्तकाच्या शेवटी मांडण्यात आल्या आहेत. ज्या वाचताना या कथांमधून अनेकांनी किती काय काय वेगळे पैलू त्यांच्यापुरते घेतले आहेत हे कळतं.

‘न मारलेल्या गप्पा’ या पुस्तकातील ‘रात अकेली है?’, ‘पेहराव’, ‘तेरे नैना’, ‘कम्युनिकेश २.०’, ‘प्रेमाचं चित्र, थोडं विचित्र’, ‘एक नाही सोबत असावा’, ‘ब्रँड्या’, ‘आवडता बोलबच्चन’ या काही मला आवडलेल्या खास कथा आहेत... पण म्हणलं ना, कोणाला कुठली गोष्ट कधी आणि कशी रिलेट होईल सांगता येत नाही... त्यासाठी पूर्ण पुस्तक वाचून आपण कधीही ‘न मारलेल्या गप्पा’ आठवायला हव्यात!

पुस्तकाचं नाव : न मारलेल्या गप्पा

लेखक : आदित्य महाजन

प्रकाशक : उन्मेष प्रकाशन, पुणे

(९८२२९१०९४०, ८८८८३५८०४४ )

पृष्ठं : १६८ मूल्य : २०० रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.