नकळत रुजत गेले देशप्रेमाचे संस्कार!

शालेय जीवनात गोडसे बाईंनी मला खूप माया दिली. त्यांच्या सहवासात नकळत देशप्रेमाचे संस्कार आम्हा विद्यार्थ्यांत रुजत गेले. आमच्या वर्गात राष्ट्रीय सण साजरे करणं म्हणजे मोठा सोहळा असे.
old school life
old school lifesakal
Updated on

- विवेक पंडित, pvivek2308@gmail.com

शालेय जीवनात गोडसे बाईंनी मला खूप माया दिली. त्यांच्या सहवासात नकळत देशप्रेमाचे संस्कार आम्हा विद्यार्थ्यांत रुजत गेले. आमच्या वर्गात राष्ट्रीय सण साजरे करणं म्हणजे मोठा सोहळा असे. त्या त्या दिवशी आम्हा मुलांना भाषणं करावीच लागत. विविध उपक्रमांमुळे चरित्रनायकाचे जीवन आणि त्यांनी देशासाठी केलेलं समर्पण विद्यार्थ्यांमध्ये रुजत असे. त्या काळात घरात आणि आसपासही समाजवादी विचारसरणीचं वातावरण होतं. आमच्याही मनात असंतोषाची ऊर्मी आणि विद्रोहाचा अंगार जिवंत होत गेला...

मालाडच्या मुंबई महापालिका शाळेतल्या दिवसांत गोडसे बाईंनी अनेक प्रकारे माझं अक्षर सुधारण्याचे प्रयत्न केले; परंतु शेवटपर्यंत ते काही सुधारू शकलं नाही, याची मला आजही खंत वाटते. अक्षरासारखेच आणखी दोन विषय राहू-केतूसारखे मला छळत... एक होता गणित आणि दुसरा चित्रकला. अंकगणित, बीजगणित आणि भूमिती या तिघांमध्येही मला गती नव्हती.

माझे पाढे पाठ होते; परंतु गुणाकार, भागाकार, त्रैराशिक, समीकरणं काही केल्या माझ्या लक्षात राहिनात. बीजगणितातील ‘क्ष’ची किंमत, ‘य’ची किंमत हे काढायलाच मला कंटाळा येत असे. ‘क्ष’ आणि ‘य’ची किंमत काढायचीच का? इथपासून माझी सुरुवात होई. जणू मी ठरवून टाकलं होतं, की गणित हा माझा विषयच नाही. म्हणून बाईंनी, तसेच माझ्या वर्गातील मित्रांनी मला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले; परंतु कसेबसे पस्तीसपर्यंत मार्क मिळवण्याइतपतच माझं गणित होऊ शकलं.

तसाच दुसरा विषय चित्रकला... हाताने गोल करणं, आकृत्या काढणं, एक सरळ रेषा काढणं मला कधी जमलंच नाही. चित्रकलेला पिंपूटकर गुरुजी होते. माझं चित्र नीट येत नाही, रेषा नीट जात नाहीत म्हणून मी त्यांचा अनेकदा मार खाल्ला आहे. मी त्यांचा नावडता विद्यार्थी होतो. गोडसे बाई माझं कौतुक करायच्या तेव्हा त्यांना अधिकच राग यायचा.

एकदा गोडसे बाईंनी मला फुटपट्टी आणण्यासाठी बाजूच्या वर्गात पाठवलं. त्या वर्गात पिंपूटकर गुरुजींचा तास सुरू होता. नियमाप्रमाणे मी बाहेर उभं राहून, हात पुढे करून, ‘गुरुजी आत येऊ का?’ अशी अनेकदा विनवणी केली; पण गुरुजींनी बराच वेळ मुद्दामहून माझ्याकडे दुर्लक्ष केलं. मग मी बराच वेळ वर्गाबाहेर ताटकळल्यावर विद्यार्थ्यांनी मला विचारलं, ‘तुला काय हवंय?’ ‘बाईंना फुटपट्टी हवीय’ असं मी म्हटल्यावर मुलांनी आत येऊन फुटपट्टी घेऊन जायला सांगितल्यावर मी वर्गात जाऊन ती घेतली.

फुटपट्टी घेऊन बर्गाबाहेर जाताना गुरुजींनी मला थांबवलं, ‘कुणाला विचारून आत आलास?’ मी माझा खुलासा केला... ‘गुरुजी, आपलं लक्ष नव्हतं, मी अनेकदा विचारलं... मुलांनी मला सांगितलं...’ ‘मुलं कोण सांगणार? तुला परवानगी द्यायची की नाही, हे मी ठरवणार. माझ्या परवानगीशिवाय आलास? आत ये.’ मला गुरुजींनी आत बोलावलं. माझा हात त्यांच्या हाताने धरून तो टेबलवर ठेवला. माझ्या हाताचा पंजा उघडा करायला सांगितला.

लाकडाची गोल जाड काठी त्यांच्या हातात होती. त्यांनी सपासप तीन फटके माझ्या हातावर मारले. मी अक्षरशः कळवळलो. ओक्साबोक्शी रडू लागलो. माझा हात पुरीसारखा फुगला. मी बाहेर पडलो आणि माझ्या वर्गात जाऊन गोडसे बाईंच्या हातात पट्टी दिली. तेव्हा बाईंनी माझा हात पाहिला. मला त्यांनी कारण विचारलं... मी घडलेली सर्व हकिकत सांगितली. बाई म्हणाल्या, ‘तू नक्की विचारून आत गेला होतास का रे?’ मी बाईंना सांगितलं, की ‘बाई,`मी पुन्हा पुन्हा विचारलं.’

बाई तास संपायची वाट पाहत होत्या. तास संपल्यानंतर बाई मला घेऊनच त्या वर्गात गेल्या आणि गुरुजींना विचारलं, ‘याला का मारलं तुम्ही?’ पिंपूटकर गुरुजींनी सांगितलं, ‘हा आगाऊपणा करतो, ऐकत नाही, शिस्त पाळत नाही... न विचारता वर्गात येतो.’ तेव्हा मी मुसमुसतच बाईंना सांगितलं, की ‘बाई,`नाही. मी विचारलं होतं. वर्गातल्या इतर मुलांना विचारा हवं तर..’ बाईंनी वर्गातील इतर मुलांना विचारलं.

इतर मुलांनीही एकमुखाने सांगितलं, की ‘हो... बाई त्याने खूपदा गुरुजींना विचारलं. शेवटी आम्ही त्याला सांगितलं, की ये आत.’ पिंपूटकर गुरुजी आणखी संतापले, ‘परवानगी देणारी मुलं कोण? मी आहे ना.’ सारा प्रकार गोडसे बाईंच्या लक्षात आला. गोडसे बाईंनी पिंपूटकर गुरुजींना सांगितलं, की ‘गुरुजी, तुम्ही माझ्या मुलाला मारलं, हे योग्य नाही केलं.

त्याची चूक असताना मारलं असतं तर माझं काही म्हणणं नव्हतं. पण, त्याची चूक नसताना तुम्ही त्याला मारलं.’ बाईंचा एक हात माझ्या खांद्यावर आणि दुसरा माझ्या गालावर होता. पिंपूटकर गुरुजींनी मला मारलंय, हे मी एव्हाना विसरून गेलो होतो. इतकं प्रेम, इतकी माया गोडसे बाईंनी दिली.

महापालिकेच्या आमच्या शाळेत त्यावेळी दुपारच्या वेळेला ४०० मिली थंड दूध आणि चार ब्रिटानिया बिस्किटं मिळत असत. हे थंड दूध आम्हाला याच्या आधी कधीच मिळालं नव्हतं. आम्ही त्या थंड दुधासाठी आणि सोबतच्या त्या चार बिस्किटांसाठी मधल्या सुटीची वाट पाहत असू. मधली सुटी झाली की, त्या दुधाच्या दिशेने धावत जात असू. मलईदार, थंड दूध आमच्या पोटात गेल्यानंतर आम्हाला विलक्षण आनंद होत असे.

बराच काळ मुंबई महापालिकेने मुलांना दूध आणि ब्रिटानियाची चार बिस्किटं दिली. थंड दूध बाटलीतून यायचं. बाटलीच्या बुचालाही आतून मलई असे, जी आम्ही जिभेने यथेच्छ चाटून बूच टाकून देत असू. आमच्यातली काही मुलं दूध शिल्लक राहिलं तर दोन दोन, तीन तीन बाटल्यादेखील पीत असत.

आमच्या वर्गात राष्ट्रीय सण साजरे करणं म्हणजे मोठा सोहळा असे. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी, छत्रपती शिवरायांची जयंती, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे काही ठळक सण असायचे, की ज्या दिवशी आम्हा मुलांना त्या त्या विषयावर भाषणं करावीच लागत. एकदा टिळक पुण्यतिथी दिवशी लोकमान्य टिळकांचा नेहमीचा किस्सा, ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही...’ या बाणेदारपणाचा किस्सा मी सांगितला होता.

तो किस्सा रंगात येऊन सांगत असताना, मुलं मात्र जोरजोरात हसत होती. मला कारण कळेना. वाटलं, मुलांना तो किस्सा भावतोय म्हणून मी पुन्हा पुन्हा तो किस्सा सांगत राहिलो अन् मुलं हसत राहिली. भाषण संपल्यानंतर बाईंनी मला जवळ घेतलं. म्हणाल्या, ‘अरे वेड्या, शेंगांच्या सालांनाच तर टरफलं म्हणतात. मग तू टरफलांची सालं, टरफलांची सालं म्हणत होतास, त्यामुळे आम्ही सर्व हसत होतो.’ मग ती चूक माझ्या लक्षात आली.

बाईंना मी म्हटलं, ‘हो, चूक माझ्या लक्षात आली बाई. माफी मागतो तुमची.’ आणि मी बाईंचे पाय धरले. मग बाईंसह सर्व मुलं हसायला लागली. बाई म्हणाल्या, ‘अरे, हरकत नाही. छान म्हणालास तू. फक्त टरफलांची सालं हे इतकंच तुझं चुकलं आणि त्यामुळे आम्ही हसायला लागलो.’ हे ऐकल्यावर मलाही मनोमन हसू आलं.

असे राष्ट्रीय उत्सव शाळेत दिवसभराकरिता व्हायचे. मग लोकमान्यांचा वेश करणं, लोकमान्यांना काळ्या पाण्याची शिक्षा कशी झाली?, मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी, ‘या न्यायालयाचा काहीही निर्णय असला तरी मी निर्दोष आहे, यावर मी ठाम आहे. मला हालअपेष्टा झाल्याने स्वराज्य मिळणार असेल, तर मी त्याला तयार आहे,’ असं त्यांनी कसं ठणकावून सांगितलं, हे भाषण तसंच नाट्यरूपांतर यामार्गे आमच्या मनात दिवसभर रुजवलं जाई.

तो सबंध दिवस लोकमान्यांच्या विचाराने भारलेला असे. तेच भारलेपण २ आॅक्टोबरला गांधी जयंती दिवशी... महात्मा गांधीजींचा वेश करणं, सत्याग्रहाचे निरनिराळे देखावे तयार करणं, दांडी यात्रेसारखी दांडी यात्रा काढणं इत्यादी उपक्रमांमुळे चरित्रनायकाचे जीवन आणि त्यांनी देशासाठी केलेलं समर्पण विद्यार्थ्यांमध्ये रुजत असे. शिवजयंतीच्या वेळेसही संपूर्ण शिवरायांचं जीवन उभं केलं जायचं. शिवरायांवरील गाणी, पोवाडे म्हटले जात. त्यामुळे शाळेत देशभक्तीचं वातावरण निर्माण व्हायला या दिवसांचं खूप महत्त्व होतं.

सातवीच्या वर्गाचे ‘इन्स्पेक्शन’ करायला, खरं म्हणजे शिक्षकांची परीक्षा घ्यायला त्या वेळेला शिक्षण अधिकारी येत असत. त्यांना बी. ओ. म्हणजे बीट ऑफिसर असं म्हणत. मनोहर साहेब असं आमच्या बीट ऑफिसरचं नाव होतं. एखाद्या मराठी सिनेमातल्या हिरोसारखे ते दिसत. बऱ्याचदा कोट घालून येत. साधारण उंचीचे, उत्तम बांध्याचे. मिशी व्यवस्थित कातरलेली. आखीव भांग पाडून नीट विंचरलेले केस. त्यांच्या चालण्यातही एक वेगळा रुबाब असे.

ते वारंवार आमच्या वर्गावर परीक्षा घ्यायला येत असत. एकदा ते वर्गावर आले. वर्गावर येण्यापूर्वी आमच्या बाई आम्हाला सांगून ठेवत, ‘बघा हं, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नीट द्या. कारण तुम्ही नीट उत्तरं दिली नाहीत तर परीक्षा माझी होईल, नापास मी होईन... मी नापास झालेली चालेल का तुम्हाला?’ आम्ही एकसुरात म्हणत असू, ‘नाही’... ‘मग उत्तरं व्यवस्थित द्या.

तुम्हाला मी जे शिकवते, त्या सर्वांची नीट उत्तरं द्या...’ आम्ही तशीच उत्तरं देत होतो. मनोहर साहेबांनी सर्व प्रश्न विचारले. आम्ही उत्तरं व्यवस्थित दिली. ते म्हणाले, ‘अरे वाह! उत्तरं तर तुम्ही चांगली दिली. पोपटपंची करून ठेवलेली दिसतेय. आता मला एक सांगा, जवळपास सतत तीन वर्षं तुम्हाला या बाई शिकवत आहेत, तेव्हा बाईंच्या सवयी काय? लकबी काय? त्या कशा शिकवतात? हे तुम्ही पाहिलं असेल, याचं निरीक्षण केलं असेल... तेव्हा तुमच्या बाईंची नक्कल कोण करून दाखवतंय मला?’ सर्व वर्गात शांतता पसरली. बाई वर्गाच्या मागे जाऊन उभ्या राहिल्या. प्रत्येकाकडे त्या मोठ्या आशेने पाहत होत्या, की कोणीतरी माझी नक्कल करील.

आमच्या वर्गातल्या रूपा खानोलकर, स्नेहलता मंत्री, गटी बोर्जेस या मुली थोड्या चुणचुणीत होत्या. मग त्यांच्याकडे बाईंनी पाहिलं; पण त्यांनीही माना खाली घातल्या. बराच वेळ गेला. कोणी तयार होईना. मग मनोहर साहेब म्हणाले, ‘ठीक आहे, मी तुमच्या बाईंचे गुण कमी करतो.’ मग बाईंनी माझ्याकडे पाहिलं आणि मला खूण करताच मी उठलो. मलाही खूप भीती वाटत होती, की आता बाईंची नक्कल कशी करायची? आणि बाईंची नक्कल केल्यानंतर त्यांना काय वाटेल, हा माझ्यासमोर प्रश्न होता.

मी बाईंच्या जवळ जाऊन त्यांच्याकडील किल्ली मागितली. आमच्या बाई एकाच चष्म्याने दूरचे आणि जवळचे दिसण्यासाठी जोडचष्मा वापरीत. आमच्या वर्गातल्या एकाकडे तसा चष्मा होता. मी तो चष्मा घातला. बोटात चावी अडकवून ती गरागरा फिरवण्याची बाईंची लकब होती. मीही तशीच किल्ली फिरवायला सुरुवात केली. बाईंचं चालणं थोडं ठसक्यात असायचं.

डाव्या हातात त्या चावी फिरवत आणि उजवा हात आपला पदर खोचण्यासाठी वापरत आणि त्या ठुमकत चालत. मधेच मान तिरकी करायची सवय होती त्यांना. तसंच करत मी वर्गात प्रवेश केला. बाई नेहमी म्हणायच्या, ‘कसं काय मुलांनो, बरे आहात ना?’ मीही त्याच आवाजात मुलांना विचारलं, ‘काय शिकायचंय मुलांनो? आज आपण कविता शिकूया’ असं म्हणत खडूची पावडर हाताला चिकटू नये म्हणून बाई जशी त्यावर फुंकर मारत, तशी मीही मारली अन् मी एक कविता शिकवायला घेतली... बाईंची मी इतकी छान नक्कल केल्यानंतर त्या मनोमन खूश झाल्या. आमचे बीट ऑफिसर साहेब टाळ्या वाजवत म्हणाले, ‘वाह रे वाह! तुमच्या बाई किती हुशार आहेत. मुलांना किती उत्तम तयार केलंय त्यांनी.’ माझ्या पाठीवर शाबासकी देत त्यांनी आमच्यासह बाईंनाही पास केलं.

त्या काळात घरात आणि आसपासही समाजवादी विचारसरणीचं वातावरण होतं. समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस आम्हा वयात येणाऱ्या मुलांचा आदर्श होते. त्या वेळी काँग्रेसच्या स. का. पाटलांचे मुंबईत बरेच वर्चस्व होते. ‘मला निवडणुकीत कुणीच पाडू शकत नाहीत’ असा त्यांचा जाहीर दावा होता.

मात्र, अत्यंत निःसंग असलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांनी त्या वेळेस ‘तुम्ही यांना पाडू शकता’ या एका घोषणेने स. का. पाटलांचा सदुसष्ट हजार मतांनी लोकसभेत पराभव केला. त्या वेळेस जॉर्ज फर्नांडिस ‘बंद सम्राट’ म्हणून ओळखले जायचे. कारण त्या वेळेस ‘मुंबई बंद’ करण्यावर त्यांचा अंकुश असे.

बेस्ट, वीज, म्युनिसिपल मजदूर युनियन, बॉम्बे लेबर युनियन, फेरीवाल्यांची युनियन या साऱ्या कामगार संघटनांचे ते प्रमुख. त्यामुळे त्यांनी हाक दिली, की ‘मुंबई बंद’ होत असे... आम्ही शाळेत जायच्या आधी पाठीवर दप्तर लावूनच बंदमध्ये सहभागी होत असू. बंद संपला, की शाळेत जात असू. त्यामुळे शाळेत गेल्यावर गोडसे बाई अनेकदा शिक्षा करीत आणि मग आमचे लक्ष ‘मुंबई बंद’वरून अभ्यासाकडे वेधण्यासाठी त्या आमच्याकडून गाणंही म्हणवून घेत.

आज हे बंद, उद्या ते बंद

आम्ही मुले-मुले आमचा काय संबंध?

आम्ही अभ्यास करू, आम्ही व्यायाम करू

आम्ही एकदिलाने काम करू

जरी झाले सगळे बंद

आम्ही मुले-मुले आमचा काय संबंध?

आम्ही हे गाणं गोडसे बाईंच्या आदरापायी गात असू; पण मनात असंतोषाची ऊर्मी... विद्रोहाचा अंगार जिवंत ठेवूनच.

मी पाचवीत दाखल झालो तेव्हा भारत-चीन युद्ध सुरू होतं, त्यामुळे संपूर्ण देश युद्धाच्या छायेत होता. शाळे-शाळेपर्यंत या युद्धाचं लोण पोहोचलं होतं. गोडसे बाई आम्हाला या युद्धाची अद्ययावत माहिती रोज देत आणि एक गाणं त्या म्हणवून घेत...

चाऊ एन लाय, बेट्या जातोस का नाय

आमच्या भूमीवर एक तुझा पाय

अन् दुसरा यमाच्या दारात हाय

बेट्या जातोस का नाय...

आमच्यावर नकळत होत असलेल्या अशा संस्कारांमुळे आम्ही देशप्रेमाने भारावून जात होतो.

सातवीच्या वर्गाचे ‘इन्स्पेक्शन’ करायला, खरं म्हणजे शिक्षकांची परीक्षा घ्यायला त्या वेळेला शिक्षण अधिकारी येत असत. त्यांना बी. ओ. म्हणजे बीट ऑफिसर असं म्हणत. मनोहर साहेब असं आमच्या बीट ऑफिसरचं नाव होतं. एखाद्या मराठी सिनेमातल्या हिरोसारखे ते दिसत. बऱ्याचदा कोट घालून येत. साधारण उंचीचे, उत्तम बांध्याचे. त्यांच्या चालण्यातही एक वेगळा रुबाब असे. ते वारंवार आमच्या वर्गावर परीक्षा घ्यायला येत असत. एकदा ते वर्गावर आले. वर्गावर येण्यापूर्वी आमच्या बाई आम्हाला सांगून ठेवत, ‘बघा हं, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नीट द्या. कारण तुम्ही नीट उत्तरं दिली नाहीत तर परीक्षा माझी होईल, नापास मी होईन... मी नापास झालेली चालेल का तुम्हाला?’

(क्रमशः)

(लेखक सामाजिक कार्यकर्ते आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.