- केदार गोरे, gore.kedar@gmail.com
समुद्री कासवांच्या प्रजातीत ऑलिव्ह रिडले सगळ्यात लहान. ओडिशातील समुद्रकिनारी ते पाहण्याचा योग आला. कासवाची मादी अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर आली होती. तिने आपल्या पायांनी वाळूत एक फूट खोल खड्डा केला आणि एक-एक करून पांढरीशुभ्र अंडी त्यात सोडायला सुरुवात केली. खड्डा पूर्ण भरल्यावर आपल्या अवजड शरीराने त्यावर ‘थापट्या मारून’ वाळू सारखी करून ती माघारी परतली ते पुन्हा न येण्यासाठी...
२००५ सालच्या फेब्रुवारी महिन्यात एक विलक्षण नैसर्गिक घटना अनुभवण्याचा योग आला. रबिन्द्रनाथ (रबी) साहू नामक तरुणासोबत ओडिशामधील ऋषिकुल्या नदी आणि बंगालच्या उपसागराच्या संगमाजवळ ऑलिव्ह रिडले कासवांची ‘जत्रा’ पाहण्यासाठी गेलो होतो. जगातील सातपैकी भारतात समुद्री कासवांच्या पाच प्रजाती आढळतात. त्यातील ऑलिव्ह रिडले ही सगळ्यात लहान प्रजाती. मी त्याआधी कोणतेही समुद्री कासव पाहिले नव्हते.
२००४ मध्ये सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे भाऊ काटदरे यांच्यासोबत वेळास समुद्रकिनाऱ्यावर रात्रभर समुद्री कासवांच्या प्रतीक्षेत थांबलो होतो; पण त्यांचे दर्शन झाले नव्हते, म्हणून मला ऋषिकुल्यावारीबाबत विशेष उत्कंठा लागून राहिली होती.
फेब्रुवारीच्या त्या सकाळी भुवनेश्वर ते ऋषिकुल्या हे सुमारे १५० किमी अंतर रबीच्या दुचाकीवर बसून गाठायचे होते. माझ्यासाठी ओडिशात येण्याची ती पहिलीच वेळ होती. रस्त्यालगतचे बोर्ड हत्तींच्या पूर्व घाटांतील अधिवासांची आणि भ्रमणमार्गांची आठवण करून देत होते. एखादा हत्ती दिसेल, अशी आशा होती; पण तसे झाले नाही.
साधारण अडीच तास प्रवास झाल्यावर बगळे, करकोचे, तुतवार आणि बदकांचे थवेच्या थवे उडताना दिसू लागले. चिलिका लगून (सरोवर) जवळ आल्याचे ते संकेत होते. डावीकडे मंगलाजोडीचा (चिलिकातील एक प्रसिद्ध ठिकाण) बोर्डही दिसला. चिलिका आशिया खंडातील खऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर असून सुमारे १,१०० वर्ग किमी परिसरावर पसरलेले आहे. अनेक स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांसाठी हे नंदनवन आहे. इर्रावडी डॉल्फिन नावाची धोकाग्रस्त प्रजाती चिलिका येथे पाहावयास मिळते.
माझ्या राहण्याची सोय रबीने चिलिका सरोवराकाठी रंभा येथील ओडिशा पर्यटन विकास मंडळाच्या पंथनिवासात केली होती. पटापट जेवण आटोपून रबी राहत असलेल्या पूर्णबंधा नावाच्या गावात आलो. रबीला गावातील सर्व मंडळी ओळखत होती. त्याच्याशी आदराने बोलत होती. ऋषिकुल्या समुद्री कासव संरक्षण समितीचा तो अध्यक्ष होता. २००२ सालापासून रबीने व त्याच्या काही साथीदारांनी असंख्य समुद्री कासवांच्या घरट्यांचे रक्षण केले होते व कासवांच्या पिलांना सुरक्षित समुद्रात सोडण्याचे महत्त्वाचे कार्य ती मंडळी करीत होती.
थोड्याच वेळात आम्ही ऋषिकुल्या नदीचा आणि समुद्राचा जिथे संगम होतो त्या किनाऱ्याजवळ उभारलेल्या ऋषिकुल्या समुद्री कासव संरक्षण समितीच्या छोट्याशा केंद्रात पोहोचलो. येथे गावातील ग्रामस्थांमध्ये समुद्री कासवांविषयी जागृती करण्याचे महत्त्वाचे काम रबी व त्याचे सहकारी करतात. मला त्याचे कौतुक वाटले; कारण या सगळ्या कामाचे त्याला कोणतेही मानधन मिळत नव्हते. त्याने ध्यास घेतला होता तो फक्त समुद्री कासवांच्या संवर्धनाचा.
रबीने व्यवस्था केलेल्या एका मासेमारीसाठी वापरणाऱ्या बोटीतून कासवांचे ‘मेटिंग’ पाहायला समुद्रात शिरलो. बोटीवर उभे राहून आम्ही कासवांचा शोध घेत होतो. रबीला दूरवर डॉल्फिन पोहताना दिसले. तेवढ्यात पाण्यावर आलेली दोन छोटीशी डोकी नाविकाला दिसली. रबीचा चेहरा आनंदलेला दिसताच ही ऑलिव्ह रिडले कासवांची जोडी आहे हे लक्षात आले. नाविकाने इंजिन बंद केले व वल्हे मारत तो कासवांच्या दिशेने बोट नेऊ लागला.
सुमारे २० मीटर अंतरावर बोट गेली असता, रबीने थांबायला सांगितले. त्या कासवांचे मिलन सुरू होते. कासवे ही सरीसृप आहेत व साधारण दर पाच-दहा मिनिटांनी त्यांना समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन हवेत श्वास घ्यावा लागतो. अशी श्वास घेण्यास आलेली अनेक कासवे तरंगताना, पोहताना दिसली. बोट जवळ आली की ती खोल पाण्याच्या दिशेने जात. आणखी काही वेळ हा अनुभव घ्यावासा वाटत होता; पण काळोख पडायच्या आत आम्हाला किनाऱ्याकडे परतायचे होते.
पूर्वेकडच्या राज्यांमध्ये सूर्य लवकर मावळतो. सुमारे साडेसहाच्या सुमारास पूर्ण रात्र झाली, असे वाटावे इतका अंधार झाला. आम्ही ऋषिकुल्या नदीकाठी चालत होतो. पौर्णिमेच्या शुक्लपक्षाची चतुर्दशी होती. चंद्राच्या प्रकाशात समुद्रकिनारा उजळून निघाला होता. थोड्याच वेळात एक ऑलिव्ह रिडले कासव लाटांमधून वाळूकडे येताना दिसले.
अफाट समुद्रातील पाण्यात तसे लहानसेच भासणारे ते कासव आता मात्र दोन फूट लांब आहे व आकारमानाने सुमारे ४०-५० किलोचे तरी असावे, हे जाणवले. ती कासवाची मादी होती व वाळूत अंडी घालायला ती किनाऱ्यावर आली होती. कासवाच्या चालीने ती आपल्या ‘फ्लिप्पर्स’च्या (पोहण्यासाठी उपयुक्त व्हावे म्हणून काही जलचर प्राण्यांच्या पायांचे झालेले अनुकूलन) सहाय्याने वाळूतून पुढे सरकत होती.
पूर्ण भरतीचे पाणी जिथवर येईल त्याच्याही पुढे जाऊन ती थांबली आणि आपल्या पायांनी वाळूत खणायला सुरुवात केली. बघता बघता तिने एक फूट खोल खड्डा तयार केला व एक-एक करून टेबल टेनिसच्या बॉलच्या आकाराची पांढरीशुभ्र अंडी त्यात सोडायला सुरुवात केली. कासवाची मादी एका वेळेस सुमारे ८० ते १०० अंडी देते. अंडी घालण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तिने उकरलेल्या वाळूने खड्डा बुजवायला सुरुवात केली.
खड्डा पूर्ण भरल्यावर आपल्या अवजड शरीराने त्यावर ‘थापट्या मारून’ तिने वाळू सारखी केली, जणू काही इथे कुणाचे घरटे नाहीच! मग ती कासवीण माघारी परतली आणि त्या विस्तीर्ण समुद्रात निघून गेली. पिलांसाठीही ती परत येणार नव्हती. निसर्गाने ठरवलेला तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा तिने पार केला होता. हा सर्व प्रकार मी काही फुटांवरून विस्मयचकित होऊन पाहत होतो. भानावर आल्यावर मला जाणवले, ही अशा असंख्य कासव माद्या समुद्रातून एखादे सैन्य यावे, त्याप्रमाणे अंडी घालायला बाहेर येत होत्या.
वाटेत कोणी आहे, आपल्याला कोणी पाहतेय या दुय्यम गोष्टींचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नव्हता. वाळूत अंडी घालण्याच्या ध्यासानेच त्या किनाऱ्यावर येत होत्या. मी ऑलिव्ह रिडले कासवांची जत्रा म्हणजेच जगप्रसिद्ध ‘अरिबाडा’चा अनुभव घेत होतो. ‘अरिबाडा’ या स्पॅनिश शब्दाचा अर्थ म्हणजे आगमन.
जेव्हा हजारो-लाखो कासवे अंडी घालायला एखाद्या ठिकाणी येतात त्याला ‘अरिबाडा’ म्हणतात. हा प्रकार आठ-दहा दिवस सुरू राहतो. गेली अनेक वर्षे ओडिशातील गहिरमाथा आणि ऋषिकुल्या येथील वाळूच्या किनाऱ्यांवर हजारो-लाखो ऑलिव्ह रिडले कासवांची अशी जत्रा भरत आली आहे.
सकाळी परत समुद्रकिनाऱ्यावर गेलो तेव्हाही काही माद्या अंडी घालून परत चाललेल्या पाहायला मिळाल्या. किनाऱ्याभर कासवांच्या पायांच्या खुणांनी वाळूत एक वेगळीच नक्षी तयार झाली होती. काही माद्या आधी अंडी घालून गेलेल्या घरट्यांमध्ये पुन्हा खणून अंडी घालतात व त्यामुळे अनेक अंडीही विखुरलेली दिसत होती. रात्री कासवांच्या जत्रेने गजबजलेला किनारा आता मात्र शांत दिसत होता. काही कावळे आणि कुरव पक्षी विखुरलेल्या अंड्यांवर ताव मारत होते. वाळूतील उष्णता किती आहे यावर अंड्यात मादी का नर निर्माण होईल, हे ठरते.
उष्णता जास्त असल्यास अधिक मादी पिल्ले तयार होतात. साधारण पन्नास दिवसांनी इवलीशी पिल्ले वाळू खणून बाहेर येतात आणि आकाशातील ताऱ्यांच्या सहाय्याने समुद्रापर्यंतचा खडतर प्रवास करतात. शिकारी पक्षी, कावळे, भटकी कुत्री, कोल्हे इत्यादींपासून बचावली तर पिल्ले पाण्यात सुरक्षितपणे पोचतात. पाण्यातही त्यांना खाणारे अनेक मासे व इतर जीव आहेत.
पिलांचे जगणे-मरणे हा निसर्गातील अन्नसाखळीचा भाग आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, ज्या किनाऱ्यावर पिल्ले अंड्यातून बाहेर येतात बऱ्याचदा त्याच किंवा आसपासच्या किनाऱ्यांवर मोठी झालेली कासवे अंडी घालतात, असे शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात दिसून आले आहे.
समुद्री कासवांच्या सर्वच प्रजातींना धोकाग्रस्त श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे. मासेमारीसाठी वापरणाऱ्या जाळ्यामध्ये अडकल्याने गुदमरून अनेक कासवांच्या बळी जातो. माणसांकरवी अंड्यांची चोरी करण्याचे प्रमाण जरी काही प्रमाणात घटले असले तरी हा धोका पूर्णपणे टळलेला नाही. रबी व इतर कासव रक्षकांच्या अथक प्रयत्नांनी ओडिशातील अनेक गावांमध्ये समुद्री कासवांना वाचवण्यासाठीची चळवळ सुरू झाली आणि दोन दशकांनंतरही ती अव्याहत सुरू आहे.
महाराष्ट्रातील वेळास आणि आंजर्ले येथे भरविला जाणारा कासव उत्सव हे समुद्री कासवांविषयीच्या जनजागृतीचे एक उत्तम द्योतक आहे. महाराष्ट्र वन खाते आणि भारतीय वन्यजीव संस्थेच्या संयुक्त विद्यमाने समुद्री कासवांवर उपग्रह टॅग बसविण्याच्या उपक्रमातून कासवांच्या समुद्रातील हालचालींबाबत अतिशय उपयुक्त माहिती उपलब्ध होत आहे. येणाऱ्या काळात समुद्री कासवांच्या संवर्धनाला भारतात अधिक चालना मिळेल, अशी आशा नक्कीच करता येईल.
(लेखक प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक, निसर्ग संवर्धक आणि ‘द कॉर्बेट फाउंडेशन’चे संचालक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.