सांगीतिकी दौलतीची अनुभूती

गावागावात आणि घराघरात भारतीय शास्त्रीय संगीत पेरलं जावं म्हणून पंडित जितेंद्र अभिषेकी कायम प्रयत्नशील राहिले.
pandit jitendra abhisheki
pandit jitendra abhishekisakal
Updated on

- प्रसाद खापर्डे, prasadkhaparde@yahoo.com

गावागावात आणि घराघरात भारतीय शास्त्रीय संगीत पेरलं जावं म्हणून पंडित जितेंद्र अभिषेकी कायम प्रयत्नशील राहिले. प्रत्येक छोट्या गावात संगीत मैफिलींचं आयोजन व्हावं, चांगलं संगीत श्रोत्यांच्या कानावर पडावं आणि नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ते कायम झटत राहिले. आज अभिषेकी बुवांचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा...

२१ सप्टेंबर म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा जन्मदिन. प्रत्येक श्रेष्ठ अशा व्यक्तीचा जन्मदिवस महत्त्वपूर्ण असतोच; परंतु त्यांनी केलेलं कामही अजरामर असतं आणि नवीन पिढीसाठी ते जास्त मार्गदर्शक ठरतं. पंडित अभिषेकी बुवाही असंच एक व्यक्तिमत्त्व होतं. गोव्याच्या मातीत जन्मलेलं; परंतु संपूर्ण भारतीय संगीताच्या विश्वात आपलं नाव कायम करणारं व्यक्तिमत्त्व म्हणजेच पंडित जितेंद्र अभिषेकी.

गोव्यात जन्म झाल्यामुळे उपशास्त्रीय संगीत म्हणजेच पूर्वापार चालत आलेल्या मराठी नाट्यसंगीताचा प्रभाव आणि घरचे कीर्तनाचे संस्कार अभिषेकी बुवांवर होते तरी पारंपरिक संगीत आपल्या पद्धतीने त्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धीने नावीन्यपूर्ण केले. अभिषेकी बुवांनी आग्रा घराण्याची परंपरागत तालीम पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने घेतली.

आग्रा घराण्याची विशाल परंपरा जोपासत त्यांनी ख्याल गायकी आपल्या पद्धतीने विकसित केली किंबहुना ती आपल्या अंगाने अधिक सौंदर्यपूर्ण केली. अभिषेकी बुवा ख्याल गाताना सुरुवातीची आलापी आग्रा घराण्यासारखी; परंतु नोम तोम मर्यादित ठेवून तसेच हरी ओमचा हुंकार भरून सुरू करायचे. नाभिचक्राचा वापर स्वराच्या निर्मितीला किती परिणामकारक असतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकी.

ख्यालाची मांडणी आणि विस्तार आग्रा घराण्याचा पारंपरिक ठेवून त्यात नावीन्य कसे घेता येईल याकडे अभिषेकी बुवांचा कटाक्ष राहिला. मैफिलीत विलंबित ख्यालाची स्थायी ते नेहमीच दोन वेळा गात असत. त्याची दोन कारणं असावीत... एक म्हणजे, रागाचा प्रभाव हा त्वरित मांडला जाई आणि दुसरं म्हणजे आवर्तनाच्या लयीशी गायक, तबला वादक आणि श्रोते सहज समरस होऊन जात.

साहित्य हे पंडितजींच्या संस्कारात आणि मनात असल्यामुळे संगीतामध्ये साहित्य आणि सौंदर्य याचा मेळ अचूक साधत पंडितजी रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत. भारदस्त तरी वर्षानुवर्षांच्या साधनेने समृद्ध झालेला गळा, आवाजाचा पोत कधी-कुठे वाढवावा आणि कमी करावा म्हणजेच गाण्यातील तसेच शब्दातील भाव हे अचूकपणे रसिकांच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील हे तंत्र पंडितजींना अचूक माहीत होतं.

अभिषेकी बुवा शास्त्रीय संगीताची मैफील जशी शंभर टक्के यशस्वी करीत, त्याचप्रमाणे नाट्यसंगीत आणि अभंगवाणीही ते त्याच ताकतीने पेश करीत. कारण पंडितजींच्या हृदयात आणि मनात दडलेला संगीतकार हा ‘मत्स्यगंधा ते महानंदा’ या सत्तावीस नाटकांच्या रूपाने जगासमोर आला. मत्स्यगंधा..., संगीत ययाति आणि देवयानी, कट्यार काळजात घुसली, हे बंध रेशमाचे, कधीतरी कोठेतरी, धाडीला राम तिने का वनी, संत गोरा कुंभार, मीरा मधुरा इत्यादी बुवांनी संगीत दिलेली प्रमुख नाटकं होत.

पंडित अभिषेकी बुवांचं नाट्यसंगीतातील दैवत म्हणजे पंडित बालगंधर्व आणि पंडित दीनानाथ मंगेशकर. हे दोघे जरी दैवत असले तरी पारंपरिक नाट्यसंगीत आणि आधुनिक संगीत या दोघांना जोडणारा सुंदर दुवा म्हणजे पंडित अभिषेकी बुवांनी नाटकाला दिलेलं संगीत, असं म्हणणं वावगं होणार नाही. कारण, नाट्यसंगीतात शास्त्रीय संगीताची तयारी दाखवताना शब्दांचे भावसुद्धा किती महत्त्वपूर्ण असतात याचा प्रत्यय आपल्याला अभिषेकी बुवांनी दिलेल्या नाट्यसंगीतात येऊ शकतो.

स्वतःच्या साधनेत आणि संगीत विश्वामध्ये रममाण राहावं, गाणं हे भरभरून गावं आणि विद्यादान करून आपल्या शिष्यांकडून हा सांगीतिक प्रवाह कायम वाहत राहावा, असं पंडित अभिषेकी बुवांना नेहमी वाटे आणि त्यांनी ते करूनही दाखवलं. बुवांनी स्वतःच्या गायकीचा आणि गळ्याचा ठसा संगीत विश्‍वात उमटवला; परंतु आपल्या शिष्यांनी आपल्या आवाजाची नक्कल करावी, असं त्यांना कधीच वाटलं नाही.

गुरूच्या कल्पना विस्ताराची आणि परंपरेची नक्कल शिष्यांनी त्यांच्या गळ्यातून करावी तसेच इतर सर्व घराण्यांतून किंवा श्रेष्ठ कलाकारांच्या गायनातून ज्या गोष्टी आपल्या गळ्याला झेपेल त्या गोष्टी आत्मसात करून आपल्या गळ्यातून मांडण्याचा प्रयत्न करावा, असं त्यांना वाटे.

गावागावात आणि घराघरात भारतीय शास्त्रीय संगीत पेरलं जावं यासाठी पंडित अभिषेकी बुवा कायम प्रयत्नशील राहिले. प्रत्येक छोट्या गावातसुद्धा संगीत मैफिलींचं आयोजन व्हावं, चांगलं संगीत श्रोत्यांच्या कानावर पडावं आणि नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ते कायम झटले. केवळ पैशासाठी आणि प्रसिद्धीसाठी झटणारे कलाकार आपण नेहमीच बघतो; परंतु पंडित अभिषेकी बुवा या दोन गोष्टींपासून नेहमीच लांब राहिले.

एक किस्सा असा आहे, की एकदा मैफील झाल्यावर आयोजकांनी अभिषेकी बुवांना जास्त पैसे घेण्याचा आग्रह केला; परंतु त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. ते म्हणाले, ‘माझी बिदागी मी इतकीच घेतो आणि तेवढीच घेणार...’ यावरूनच पंडित अभिषेकी बुवा हे संगीत क्षेत्रातलं अस्सल सोनं होतं आणि त्यामुळेच त्यांचं संगीत हे कायम रसिकांच्या हृदयावर कोरलं गेलं आणि अनंत काळ राहील.

पंडित अभिषेकी बुवांनी असंख्य शिष्यवर्ग तयार केला. त्यामध्ये पंडितजींचे सुपुत्र पंडित शौनक अभिषेकी, विदुषी शुभा मुद्‍गल, पंडित प्रभाकर कारेकर, पंडित अजित कडकडे, पंडित राजा काळे, पंडित मोहन दरेकर, विदुषी देवकी पंडित, विदुषी गौरी पाठारे, पंडित हेमंत पेंडसे, पंडित सुधाकर देवळे, पंडित मकरंद हिंगणे, पंडित विनोद डिग्रजकर, पंडित समीर दुबळे इत्यादी अनेक कलाकार आज पंडितजींनी समृद्ध केलेली परंपरा जोपासत असून भारतीय संगीत क्षेत्रात आपलं नाव कमावून आहेत.

पंडित अभिषेकी बुवांनी आकाशवाणीवर नोकरी करताना केलेली अनेक कोकणी गाणी अजरामर आहेत. ‘लेकुरें उदंड जालीं’ या नाटकात तर सगळे संवादच संगीतातून होते. गोव्यातील ‘तियात्र’ या प्रकारचं हे संगीत नाटक खूप लोकप्रिय झालं. बुवांच्या सर्वात्मका सर्वेश्र्वरा, अबीर गुलाल उधळीत रंग इत्यादी गाण्यांनी तर लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे.

काटा रुते कुणाला, देवाघरचे ज्ञात कुणाला, हे बंध रेशमाचे, हरी भजनावीण काळ, सुहास्य तुझे मनासी मोही, रतिरंगी रंगे ध्यान इत्यादी कितीतरी अजरामर गाणी ही पंडित अभिषेकी बुवांच्या रूपाने आपल्यासोबत आहेत आणि राहतील. ‘तीही वरची देवाघरची दौलत लोक पहात’ याप्रमाणेच आपण पंडित अभिषेकी बुवांनी दिलेली सांगीतिक दौलत आज अनुभवत आहोत. अशा या थोर आणि श्रेष्ठ पंडितजींना विनम्र अभिवादन.

(लेखक ‘पद्मभूषण’ उस्ताद राशीद खान यांचे ज्येष्ठ शिष्य आणि गान सरस्वती पुरस्कार प्राप्त प्रथितयश गायक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.