नांदी नव्या युगाची !

जिंकून जिंकून जिंकणार कोण ?... रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जोकोविचशिवाय आहेच कोण ? ही आरोळी पुरुषांच्या टेनिसमध्ये गेले अनेक वर्षे गुंजत आहे.
daniil medvedev and raducanu
daniil medvedev and raducanuSakal
Updated on

जिंकून जिंकून जिंकणार कोण ?... रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जोकोविचशिवाय आहेच कोण ? ही आरोळी पुरुषांच्या टेनिसमध्ये गेले अनेक वर्षे गुंजत आहे. महिला ग्रँड स्लॅममध्ये जिंकणार कोण ?.. ताईगिरी तर केव्हाच संपली आता युवतींशिवाय आहेच कोण?...

टेनिसमधील हे बदलाचे चित्र, मुळात बदल हा निसर्गाचा अविभाज्य घटक, पण खेळात मक्तेदारीचे स्थित्यंतर होते तेव्हा त्याची दखल पालवीप्रमाणे घेतली जात असते. नुकत्याच संपलेल्या अमेरिकन अर्थात यूएस ओपन टेनिस स्पर्धेने नव्या युगाची चाहूल दाखवली. गेली अनेक वर्षे ग्रँड स्लॅम विजेतेपद फेडरर-नदाल-जोकोविच यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाला मिळाले नव्हते अपवाद याच यूएस ओपनचा जेथे गतवर्षी नदाल, फेडरर नव्हते आणि जोकोविचला लाईनमला चेंडू मारल्यामुळे बाद करण्यात आले आणि त्यावेळी डॉमनिक थिम याने विजेतेपद मिळवले होते. आता जोकोविचच्या मक्तेदारीला शह देत डॅनिल मेदवेदेवने पहिले वहिले ग्रँड स्लॅम जिंकले तर महिलांमध्ये रादुकानू युवराज्ञी ठरली.

फेडरर ४० वर्षांचा झाला आहे. नदाल ३५ वर्षांचा आणि दोघांनाही दुखापतींची साडेसाती सातत्याने त्रास देत आहे. जोकोविचचेही वय ३४ वर्षे, पण तंदुरुस्तीच्या जोरावर तो सध्याचा आघाडीचा टेनिसपटू आहे. आपल्या जवळपासही त्याने इतरांना फिरकू दिले नव्हते, पण म्हणतात ना, एक वीट निघाली की साम्राज्य डळमळायला सुरुवात होते. तसेच जोकोविचबाबत झाल्याचे जाणवत आहे. सिकंदराप्रमाणे तो टेनिसविश्व म्हणजेच ऑलिंपिकही जिंकून गोल्डन स्लॅम करायला टोकियोत दाखल झाला होता. पण ऐन मोक्याच्या वेळी त्याचे सलग दोन पराभव झाले आणि रिकाम्या हाती तो परतला. झोळीला कोठे तरी भोक पडले होते आणि आता त्यातून यूएस ओपनचे विजेतेपद सांडले.

हमी भी है रेस मे...

संधी एकदाच मिळते असे म्हणतात, पुढचे ऑलिंपिक तीन वर्षांनी होणार आहे. त्यावेळी जोकोविचचे `तारुण्य` ३७ वर्षे वयापर्यंत गेलेले असेल आणि तरीही त्याला गोल्डन स्लॅम करायचा असेल तर त्या वर्षात सर्व ग्रँड स्लॅम जिंकणे अनिवार्य आहे. उमेद आणि जिद्द याचे पाठबळ जोकोविचकडे असेलच पण आता स्पर्धक तयार झाले आहेत हे लक्षात घ्यावे लागेल. अजूनपर्यंत फेडरर-नदाल-जोकोविच हे तिघेच `खेळायचे` इतर जण केवळ `सहभागी` व्हायचे पण आता मेदवेदेव, झ्वेरेव आणि त्सित्सिपाससारखे खेळाडू `हमी भी है रेस मे` असे सांगू लागले आहेत.

जोकोविचच्या पराभवाचे सूत्र

मेदवेदेवने एक यूएस ओपन जिंकली म्हणून लगेचच बदलाचे वारे वाहू लागले असे नाही. ऑलिंपिकचा उपांत्य आणि ब्राँझपदचा सामना तसेच या यूएस ओपनचे जोकोविचनने खेळलेले सर्व सामन्यांचा स्कोअर पाहिला तर जोकोविच सुरवातीपासून अडखळत होता. पहिला सेट गमावल्यावर त्याने विजय मिळवले होते. अंतिम सामन्यात मात्र मेदवेदेवने त्याला पुनरागमन करण्याची संधीच ठेवली नाही. यंदाच्या वर्षात फ्रेंच आणि विम्बल्डनचे अंतिम सामनेही विचारात घेऊया. तेथेही अनुक्रमे राफेल नदाल आणि त्सित्सिपासविरुद्ध पहिले एक दोन सेट गमावल्यानंतर जोकोविच जिंकला होता. आता जोकोविचची भींत कशी भेदायची हे सूत्र तयार झाले आहे त्यामुळे पुढच्या वर्षात फेडरर-नदाल-जोकोविच यांच्याशिवाय दुसरा विजेता झाला तर आश्चर्य निश्चित वाटणार नाही.

महिलांमध्ये आता तसे पाहिले तर ज्युनिअर गटातील म्हणजेच १८-१९ वयोगटातील खेळाडू थक्क करणारी कामगिरी करत आहे. एक जमाना होता सेरेना विल्यम्सच्या जवळपासही कोणाला जाता येत नव्हते, पण सेरेना आणि अगोदरच्या पिढीतील खेळाडू झाली. नाओमी ओसाका, अॅश्ले बार्ती, कर्बर स्वेतोलेना, प्लिस्कोवा किंवा अँड्रेस्क्यू यांच्या भोवती महिला टेनिस फिरत आहे. तसे पहायला गेले तर या सहाही जणी सध्याच्या पिढीतीलच खेळाडू पण त्यांच्या एक पाऊल पुढे जाणारा खेळ एम्मा रादुकानू आणि लैला फर्नांडिस या अनुक्रमे १८, १९ वर्षांच्या खेळाडूंनी केला. रादुकानू तर पात्रता स्पर्धेतून मुख्य स्पर्धेत खेळत होती. लैलाने तर ओसाका, कर्बर आणि स्वेतोलिना यांची शिकार करून अंतिम फेरी गाठली. एकूणच महिला टेनिसमधली पिढी झपाट्याने बदलत आहे हे अधोरेखित होते. एक काळ होता. मार्टिन नवरातिलोवा, ख्रिस एवर्ट लॉईड, स्टेफी ग्राफ, मार्टिना हिंगिस, मोनिका सेलेस, गॅब्रियला साबातिनी आणि आरांता सांचेस यांनी महिला टेनिस नजाकतदार आणि कमालीचे स्पर्धात्मक बनवले होते. त्यानंतर व्हिल्यम्स भगिनींची ताईगिरी सोडली तर आता या नव्या पिढीच्या महिलांनी कमालीची चुरस निर्माण केली आहे.

यूएस ओपन एक आरसा

यंदाची युएस ओपन प्रतिथयश आणि नवोदितांसाठीही आरसा ठरली आहे. शाश्वत असे काहीच नसते, कोणालाही गृहीत धरणे. किंवा एखादी ठेच सुद्धा मोठी जखम निर्माण करणरी असते, हेच पहा ना, नाओमी ओसाकाला कोणी स्पर्धक असेल असे वाटत नव्हते एवढा तिचा खेळ प्रभावशाली होता, पण पत्रकार परिषदा नको म्हणून आणि मानसिक स्वास्थ चांगले नसल्यामुळे तिने ऐन स्पर्धेतून माघार घेतली अशामुळे लय तुटली. ती परतली खरी, पण मायदेशात टोकियो ऑलिंपिकमध्ये कोणतेच पदक जिंकू शकली नाही. यूएस स्पर्धेतही पराभूत झाल्यानंतर पुन्हा कधी कोर्टवर परतु हे माहित नाही असे निर्वाणीचे ती बोलू लागली...

एकूणच काय तर येथून पुढे ग्रँड स्लॅम टेनिसमध्ये कोणा एकाची मक्तदारी असणार नाही हे स्पष्ट होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.