घोळ विश्‍वकरंडकाच्या वेळापत्रकाचा

भारतात होणारी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा आता दोन महिन्यांपेक्षा कमी दिवसांवर आलेली असतानाही कार्यक्रमातला घोळ कायम रहाणं, हे ज्या प्रेक्षकांमुळे क्रिकेटने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे.
ICC World Cup
ICC World CupSakal
Updated on

विश्वकरंडक... मग तो कोणत्याही खेळाचा असो; त्याचं वेळापत्रक किमान वर्षभर अगोदर जाहीर होत असतं आणि ते निश्चित करत असताना सर्व छोटे-मोठे घटक काटेकोरपणे लक्षात घेतले जातात, त्यामुळे एकदा जाहीर झालेल्या कार्यक्रमात बदल होण्याची शक्यता एक टक्काही नसते.

ऑलिंपिकसारख्या विश्वविख्यात स्पर्धेत जिथं अनेक खेळ असतात आणि हजारोंच्या संख्येने खेळाडू सहभागी होत असतात, तेथील कार्यक्रमनिश्चिती वर्षाच्या अगोदरच केली जात असते. यामागचा हेतू एवढाच की, या स्पर्धा - शर्यती स्टेडिअमवर जाऊन पाहण्यासाठी प्रेक्षकांना सहज-सोपं व्हावं. त्यांचं नियोजन अगोदरच निश्चित व्हावं यासाठी असं चोख नियोजन होत असतं.

भारतात होणारी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा आता दोन महिन्यांपेक्षा कमी दिवसांवर आलेली असतानाही कार्यक्रमातला घोळ कायम रहाणं, हे ज्या प्रेक्षकांमुळे क्रिकेटने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे, त्या मायबाप प्रेक्षकांवर अन्याय करणारं आहे.

भारतात आत्तापर्यंत दोन एकदिवसीय आणि एक ट्वेन्टी-२० विश्वकरंडक, तसंच चॅम्पियन्स करंडक अशा तीन बहुराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा झाल्या; पण कार्यक्रमाबाबत काठावर येणारी एवढी परिस्थिती कधीच झाली नव्हती. मग नेमकं या वेळी असं का घडलं... याची अनेक कारणं आहेत.

यातील पहिलं कारण म्हणजे, पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा आडमुठेपणा. त्यांच्या देशात होणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी केवळ नाममात्र यजमान त्यांना ठेवलं आणि ९५ टक्के स्पर्धा श्रीलंकेत खेळवणं भाग पाडलं. यात बीसीसीआयचा तसा थेट संबंध नाही; पण बीसीसीआयचे सचिव जय शहा, जे आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी पाकिस्तान मंडळाला त्यांची जागा दाखवली.

त्यामुळे संधी मिळताच हे पाकिस्तान मंडळ उलटवार करणार हे उघड होतं, तसं त्यांनी केलंच. शंभर दिवसांपूर्वी विश्वकरंडक स्पर्धेचा कार्यक्रम आयसीसी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर करूनही पाकिस्तान मंडळाने स्पर्धेतील आपला सहभाग अजून निश्चित नाही, अशी धमकी देण्यास सुरुवात केली.

सुरक्षा चौकशी समिती भारतात येईल आणि पाकिस्तानचे सामने जिथं होणार तिथं सुरक्षिततेची पाहणी करणार आणि त्यानंतर त्यांच्या अहवालावर त्यांचं केंद्र सरकार निर्णय घेणार... हा सर्व बीसीसीआयला त्रास देण्याचा प्रकार होता हे स्पष्ट होत होतं. मात्र, कोणत्याही परिस्थितीत पाकला भारतात खेळावं लागणार हे निश्चित होतंच.

बीसीसीआय आणि आयसीसीने स्पर्धा कार्यक्रमाची रूपरेषा अगोदरच तयार केली होती आणि मंजुरीसाठी ती सहभागी असलेल्या प्रत्येक क्रिकेट मंडळाला पाठवली होती आणि त्यांच्या होकारानंतरच एका कार्यक्रमाद्वारे वेळापत्रक जाहीर केलं. असं असतानाही तीन मंडळांनी काही दिवसांनंतर कार्यक्रमात बदल करण्याची मागणी केली. या तीन मंडळांत अर्थात पाकिस्तान क्रिकेट मंडळ आहे, हे वेगळं सांगायला नको.

पाकिस्तान मंडळाकडून अखेरपर्यंत नौटंकी केली जाणार हे निश्चित होतं; पण वेळापत्रक निश्चित करताना बीसीसीआयकडूनही काही गोष्टी दुर्लक्षित झाल्याचं स्पष्ट होत आहे. मुळात अशा सर्वांत मोठ्या स्पर्धेचा कालावधी आणि कार्यक्रम निश्चित करताना प्रत्येक दिवसाचा विचार केला जातो.

आपला भारत उत्सवप्रिय देश, सोबत राज्याराज्यांत किंवा देशात कोणत्या ना कोणत्या निवडणुका तरी होत असतात. अशा परिस्थितीत स्पर्धांचा कार्यक्रम तयार करणं हे आव्हानात्मक असतं. श्रावण, गणेशोत्सव, नवरात्र आणि दसरा- दिवाळी हे आपल्या देशातील सर्वांत मोठे सार्वजनिक सण, त्यामुळे या सणांच्या वेळेत एवढ्या मोठ्या स्पर्धेचं नियोजन करणं सोपं नाही.

त्यातही विश्‍वकरंडक क्रिकेट म्हटलं की, भारत-पाक सर्वांत हायव्होल्टेज साखळी सामना मुहूर्त पाहून निश्चित करावा एवढा महत्त्वाचा. घटस्थापनेच्या दिवशी, म्हणजेच १५ ऑक्टोबर ही तारीख हा सामना अधिकृतपणे जाहीर होण्याअगोदरच सर्वांना समजली होती.

आता नवरात्र आणि अहमदाबाद म्हणजे गरबा आलाच, मग १५ ऑक्टोबरला म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी गरबा असणार आणि त्यासाठी पोलिस बंदोबस्तही लागणार, मग अशा परिस्थितीत या सर्वांत मोठ्या सामन्यासाठी सुरक्षा व्यवस्था पुरवणं सोपं असणार नाही, हे बीसीसीआयच्या तेव्हाच कसं लक्षात आलं नाही, याचं आश्चर्य वाटतं.

नवरात्राचा हाच मुद्दा कोलकतामध्ये होणाऱ्या दुर्गापूजेच्या वेळीही पाक-इंग्लंड सामन्याच्या वेळी उपस्थित होत आहे. मग बीसीसीआयने विश्‍वकरंडक स्पर्धेचा कार्यक्रम तयार करताना सणवाराचा विचार केला नाही? परिणामी अगोदरच पाण्यात पहात असलेल्या पाकिस्तान मंडळाला कोलीत मिळालं, त्यांनी पुन्हा एकदा खोडा घालण्यास सुरुवात केली.

कुठं चुकलं गणित...

एकीकडे विश्‍वकरंडक कार्यक्रमाचा खेळखंडोबा सुरू असताना, दुसरीकडे बीसीसीआय देशात पुढील पाच वर्षांत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपण हक्कांचा लिलाव करणार आहे आणि त्यातून एक अब्ज डॉलर कमावणार आहे.

आयपीएल प्रक्षेपण हक्कातून अगोदरच ४८ हजार ३९० कोटींचा करार केलेला आहे. बीसीसीआयची ही श्रीमंती जगाच्या नकाशावर असलेल्या कितीतरी लहान देशांपेक्षा मोठी आहे, त्यामुळे अशा श्रीमंत बीसीसीआयचं विश्‍वकरंडक स्पर्धेचं नियोजनाचं गणित चुकलं कुठं?

परदेशी प्रेक्षकांचीही कसरत

२०११ मध्ये देशात असाच एकदिवसीय विश्वकरंडक झाला होता, तो कालावधी मार्च आणि एप्रिल महिन्याचा होता. म्हणजे सणवार पार पडले होते. म्हणून अशा प्रकारच्या कोणत्या अडचणी आल्या नव्हत्या. आत्ताचा कालावधी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचा आहे, त्यात अधिक मास असल्यामुळे सणवारांच्या तारखांत बदल झालेला आहे, हा मुद्दा बीसीसीआयच्या लक्षात यायला हवा होता.

यामुळे केवळ बीसीसीआय किंवा आयसीसीचं नव्हे, तर क्रिकेटप्रेमींचं गणित बिघडलं आहे. अहमदाबादमधील भारत-पाक लढतीसाठी ५० ते ६० हजारांपर्यंत हॉटेल रूमच्या भाडेदरात वाढ झाली, तरीही प्रेक्षकांनी ती आरक्षित केली. एवढंच काय, तर रुग्णालयांचे बेड्सही संपूर्ण शरीर तपासणीच्या नावासाठी आरक्षित झाले.

अहमदाबादबाहेरून येणाऱ्यांनी विमानांची तिकिटं बुक केली, त्यांचे भावही चढे होऊ लागले होते. आता १५ तारखेला हा सामना होणार नसेल, तर प्रवासापासून ते निवासापर्यंत सर्वच मनस्ताप क्रिकेटप्रेमींना सहन करावा लागणार आहे.

बरं, हे सर्व नंतर, आधी सामन्याचं तिकीट तर मिळायला हवं! थोडक्यात काय, तर आरक्षित नव्हे तर करंट बुकिंग अशी करण्याची वेळ एवढ्या मोठ्या स्पर्धेवर यावी, असं खेदाने म्हणावं लागतंय.

ही बहुराष्ट्रीय स्पर्धा असल्यामुळे परदेशांतून अनेक जण भारतात येणार आहेत. स्पर्धेचे सामने होणाऱ्या १० ठिकाणी त्यांनाही प्रवास आणि निवास करावा लागणार आहे. अशा परदेशी प्रेक्षकांसाठीसुद्धा ही तारेवरची कसरतच असणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.