व्यावसायिक लीगचा भूलभुलैया

क्रिकेट खेळणारा प्रत्येक देश आता स्वतःची लीग तयार करून आपणही त्यामार्गाने तिजोरी भरण्याचा प्रयत्न करत आहे, त्यात गैर काही नाही.
Business Cricket League
Business Cricket Leaguesakal
Updated on
Summary

क्रिकेट खेळणारा प्रत्येक देश आता स्वतःची लीग तयार करून आपणही त्यामार्गाने तिजोरी भरण्याचा प्रयत्न करत आहे, त्यात गैर काही नाही.

वाहत्या प्रवाहात हात धुणारे अनेक असतात किंवा प्रवाह आपल्या बाजूला कसा वळवता येईल यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचीही संख्या लालसेपोटी वाढत असते; परंतु खोलीचा अंदाज असणारा आणि निष्णात पोहणाराच टिकतो आणि बाकीच्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागलं की जीव घुसमटतो... अस्तित्वाची जाणीव झाल्यानंतर अस्सल तेच टिकून रहातं. आयपीएलपासून बोध घेणाऱ्या आणि आपणही या मार्केटमध्ये प्रसिद्धी-पैसा मिळवावा या हेतूने अनेक ट्वेन्टी-२० लीग प्रवाहात पोहण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे हे चित्र असताना महान फलंदाज आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटची अत्यंत चांगली जाण असलेले सौरव गांगुली यांनी वास्तव सर्वांसमोर मांडलं... ‘आर्थिक पाया भक्कम असलेल्या व्यावसायिक टी-२० लीगच टिकतील, बाकीच्या लीग बंद पडतील.’ गांगुली हे सध्या बीसीसीआयच्या प्रशासनात नाहीत. पण, खेळाडू म्हणून त्यांनी अनुभवलेली मैदानावरची दुनिया आणि प्रशासनातील राजकारण, अर्थकारण त्यांनी फार जवळून पाहिलं आहे.

जगमोहन दालमिया हे बीसीसीआय-आयसीसीसाठी ‘डॉलरमिया’ होते, त्यानंतर ललित मोदी यांनी आयपीएल नामक प्रसिद्धी आणि पैशांचा मोठा प्रवाह निर्माण केला; पण गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष असताना कोट्यवधींचे विविध करार झाले, म्हणूनच गांगुली यांचं विधान सर्वांनाच विचार करायला लावणारं आहे.

क्रिकेट खेळणारा प्रत्येक देश आता स्वतःची लीग तयार करून आपणही त्यामार्गाने तिजोरी भरण्याचा प्रयत्न करत आहे, त्यात गैर काही नाही; पण उदंड झाल्या लीग असं चित्र सध्या तयार झालं, त्यामुळे भविष्यात किती जण टिकतील, हा प्रश्न स्वाभाविक आहे. शेवटी हा खेळ पैशांवर आधारलेला असतो. गुंतवणूक करणारा नफ्याचा विचार करणारच; मात्र तो अपेक्षेप्रमाणे झाला नाही, तर दुकान बंद होणारच. क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या देशांत लोकप्रियता असली तरी ओव्हर डोस झाला की अजीर्ण होण्याची भीती असतेच.

आता हेच पहा ना; सध्या दुबई, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या तीन देशांत एकाच वेळी तीन वेगवेगळ्या लीग पार पडल्या. तर पाकिस्तानमध्ये त्यांची लीग सुरू झाली आहे. असा भडिमार एकाच वेळी झाला तर कोणती लीग पहायची, हा प्रश्न सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना पडणारच आणि मग टीआरपी कमी झाला तर आर्थिक गणित बिघडणार आणि पर्यायाने नफ्यापेक्षा तोट्याचाच हिशेब अधिक प्रमाणात होणार.

शेवटी अशा लीगमधून मिळणाऱ्या पैशांसाठी अनेक खेळाडू देशापेक्षा लीगला प्राधान्य देत असतात. मोजक्याच व्हाइट बॉल क्रिकेट सामन्यात देशाकडून खेळणार असं जाहीर करणारा न्यूझीलंडचा निष्णात वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट हा राष्ट्राला प्राधान्य द्यायचं सोडून दुबईतील लीगमध्ये खेळतोय. त्याच वेळी निवृत्त झालेल्या काही खेळाडूंसाठी पुन्हा उत्पन्न मिळण्याचा मार्ग तयार झालेला असतो, ही त्यातील दुसरी बाजू.

आयपीएल, ऑस्ट्रेलियातील बिग बॅश आणि इंग्लंडमधील ‘हंड्रेड’ या लीग ठसा उमटवून आहेत. जिथे क्रिकेट लोकप्रिय आहे, तेथील लीग टिकतील असं गांगुलींनी म्हटलं आहे. कारण या तिन्ही देशांत क्रिकेटचा पाया भक्कम आहे. पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि बांगलादेश यांच्या आपापल्या लीग आहेत; पण आता दक्षिण आफ्रिका आणि दुबईमध्ये इंटरनॅशनल लीग पाय रोवत आहेत. यात महत्त्वाचा मुद्दा असा की, आफ्रिका आणि दुबई लीगमध्ये आयपीएलच्या भारतीय फ्रँचाईसचे संघ आहेत.

बीसीसीआयच्या नियमामुळे आयपीएलचे संघ परदेशात कोठेही खेळू शकत नाहीत; पण आफ्रिका, दुबईमध्ये भारतीय फ्रँचाईस वेगळ्या खेळाडूंसह खेळत आहेत. भारतीय फ्रँचाईसचा पैसा असल्यामुळे आफ्रिका, दुबईतील लीगची इनिंग मोठी असू शकेल... मग गांगुली नेमकं कोणत्या व्यावसायिक लीगबाबत म्हणतात, हा प्रश्न आहे. असो, परंतु जिथे मोठी आर्थिक उलाढाल होत असते, तिथे धोकाही तेवढाच असतो. २०१३ मध्ये आयपीएल स्पॉटफिक्सिंग आणि

सट्टेबाजीमुळे बदनाम झाली होती. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांना दोन वर्षांच्या बंदीला सामोरं जावं लागलं होतं. गुरुनाथ मयप्पन या सीईओ असलेल्या जावयाच्या प्रतापामुळे चेन्नई संघाचे मालक असलेल्या एन. श्रीनिवासन यांची बीसीसीआयमधील सद्दी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर संपली होती. आयपीएलमध्ये पुन्हा असे प्रकार घडले नाहीत; पण इतर लीग निर्दोष असतीलच असं नाही. फिक्सिंग आणि सट्टेबाजी हे दोन प्रकार. कडेकोट सुरक्षा उभी करून आपण फिक्सिंग रोखू शकतो; पण या खेळावर होणाऱ्या सट्टेबाजीला आळा घालू शकत नाही.

कोंबड्या झुंजण्याशी मतलब

कोणत्या स्तरावर सट्टेबाजी होऊ शकते यासाठी गेल्या वर्षी घडलेलं पुढील उदाहरण थक्क करणारं आहे... रशियन सट्टेबाजाला हाताशी धरून गुजरातच्या एका दुर्गम भागातील शेताचं क्रिकेटच्या मैदानात रूपांतर करण्यात आलं. त्या कामी मदत करणाऱ्या मजुरांना खेळाडू म्हणून ‘मुंबई इंडियन्स’, ‘चेन्नई सुपर किंग्ज’ अशा बनावट टीमच्या नावांच्या जर्सींसह तयार करण्यात आलं. सामन्यांच्या चित्रीकरणाची आणि समालोचनाचीही व्यवस्था तयार करण्यात आली. आपल्याकडे कुठेही वाच्यता नसताना हा खेळ सट्टेबाजीसाठी परदेशात दाखवला जात होता. अखेर पोलिसांना टीप मिळाली आणि हे रॅकेट उद्‍ध्वस्त झालं. यात सांगायचा मुद्दा असा की, सट्टेबाजांना कोंबड्या झुंजण्याशी मतलब असतो, त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात.

आयपीएलची मक्तेदारी

कोणत्याही लीगचं भवितव्य त्यांना मिळणाऱ्या वर्षातील टाइम टेबलवरही (कालावधी) अवलंबून असतं. मुळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट आता माळेसारखं गुंफलेलं आहे. एक मालिका झाली की दुसरी आणि दुसरी स्पर्धा झाली की तिसरी स्पर्धा... अशा भरगच्च कार्यक्रमात केवळ आयपीएल सोडली तर इतरांसाठी सर्व देशांतील विद्यमान खेळाडू उपलब्ध नसतात, त्यामुळे अर्थातच त्यांची किंमत कमी होते. हा सर्व विचार करून गांगुली यांनी या भुलभुलैयामध्ये मोजकेच टिकतील असं विधान केलं असावं. आयपीएलची बातच वेगळी आहे. आयपीएलच्या काळात इतर कोणत्या देशाचं (अपवाद पाकिस्तानचा, त्यांच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये स्थान नसतं) आंतरराष्ट्रीय क्रिकेट आता असणार नाही.

बीसीसीआयने तशी सोयच केली आहे. भविष्यातील क्रिकेट कार्यक्रमात (एफटीपी - फ्यूचर टूर प्रोग्राम) साधारणतः मार्च-एप्रिल ते मेअखेरपर्यंत आयसीसीने आयपीएलसाठी मोकळा वेळ ठेवला आहे. भविष्यात लोकप्रियता आणि पैसा या दोन्ही पातळ्यांवर आयपीएल आणि एखाद-दुसरी इतर लीग शिल्लक राहिली तर आश्चर्य वाटायला नको.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()