सभ्यतेची शिकवण आणि कणखर वृत्ती

भारतीय क्रिकेटची भिन्न रूपं दाखवणाऱ्या दोन घटना काही दिवसांपूर्वी घडल्या. त्यांचा तसा एकमेकांशी संबंध नाही; पण एकीकडे सभ्यतेची शिकवण आणि दुसरीकडे कठोर मनोवृत्ती दाखवणारा प्रसंग होता.
dipti sharma and ajinkya rahane
dipti sharma and ajinkya rahanesakal
Updated on
Summary

भारतीय क्रिकेटची भिन्न रूपं दाखवणाऱ्या दोन घटना काही दिवसांपूर्वी घडल्या. त्यांचा तसा एकमेकांशी संबंध नाही; पण एकीकडे सभ्यतेची शिकवण आणि दुसरीकडे कठोर मनोवृत्ती दाखवणारा प्रसंग होता.

भारतीय क्रिकेटची भिन्न रूपं दाखवणाऱ्या दोन घटना काही दिवसांपूर्वी घडल्या. त्यांचा तसा एकमेकांशी संबंध नाही; पण एकीकडे सभ्यतेची शिकवण आणि दुसरीकडे कठोर मनोवृत्ती दाखवणारा प्रसंग होता. एक होता अजिंक्य रहाणे, तर दुसरी होती महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्मा.

आता नेमकं काय घडलं याची माहिती घेऊ या. दुलीप करंडक अंतिम सामन्यात रहाणे पश्चिम विभागाचं नेतृत्व करत होता. त्याच्या संघात खेळत असलेला मुंबईचाच यशस्वी जयस्वाल, ज्याने शानदार द्विशतक करून संघाच्या विजेतेपदाचा मार्ग मोकळा केला होता, त्या यशस्वीने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाविरुद्ध स्लेजिंग केलं. पंचांच्या निदर्शनास हे कृत्य आणून दिलं, पंचांनी रहाणेकडे तक्रार केली आणि रहाणेने कर्णधारपदाच्या जबाबदारीतून कठोर होत जयस्वालला मैदानाबाहेर जाण्याचे आदेश दिले.

याच सुमारास इंग्लंडमध्ये भारतीय महिला संघ मर्यादित षटकांची मालिका खेळत होता. पहिले दोन सामने जिंकून मालिका तर खिशात टाकली होती. यातील अखेरचा सामना झुलन गोस्वामीच्या निरोपाचा होता. सामना निर्णायक स्थितीत असताना इंग्लंडची अखेरची फलंदाज चार्ली डीन चेंडू टाकण्याच्या अगोदरच क्रीजच्या पुढे जात होती हे लक्षात आल्यावर दीप्ती शर्माने चेंडू टाकण्याअगोदर तिला धावचीत केलं. इंग्लंडचा डाव आटोपला आणि भारताचा विजय झाला... असं धावचीत करणं नियमानुसारच होतं; पण इंग्लंडवासीयांमधील ‘साहेब’ जागा झाला आणि दीप्ती शर्माच्या या प्रकारास अखिलाडूवृत्ती अशी ओरड करत टीका करण्यास सुरुवात केली. पण अशा टीकांना आपल्या खेळाडूंनी केराची टोपली दाखवली. यातून भारतीय महिला क्रिकेट संघाची कणखर वृत्ती अधोरेखित झाली.

इंग्लंडकडून या घटनेबाबत अनेक प्रतिक्रिया उमटल्या; पण क्रिकेटचे नियम तयार करणाऱ्या याच इंग्लंडमधील मेरिलबोर्न क्रिकेट क्लबनेही दीप्ती शर्माने नियमात राहूनच धावचीत केलं, असा दुजोरा दिला. पण, तिळपापड झालेली साहेबांची वृत्ती काही स्वस्थ बसत नव्हती. प्रत्येक खेळाला नियमांची चौकट असते आणि खिलाडूवृत्ती खेळाची उंची वाढवत असते, हे सत्य असलं तरी वारंवार नियम मोडणाऱ्यांना दयामाया दाखवणं हेसुद्धा चुकीचंच आहे. दीप्ती शर्मा आणि चार्ली डीनच्या बाबतीतही तसंच घडलं.

दीप्तीच्या म्हणण्यानुसार तिने चार्लीला क्रीज न सोडण्याबाबत अनेकवेळा इशारा दिला होता. शेवटी खिलाडूवृत्तीएवढाच संयमही महत्त्वाचा असतोच. शेवटी प्रत्येक जण सोईनुसार नियम आणि खिलाडूवृत्ती कवटाळत असतो. इंग्लंडचा पुरुष संघ मोईन अलीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानमध्ये मालिका खेळत आहे. या मोईन अलीनेही दीप्ती शर्माने केलेल्या धावचीतवर भाष्य केलं. आपण त्या ठिकाणी असतो, तर अशा प्रकारे धावचीत केलं नसतं, असं तो म्हणाला. पण, याच मोईन अलीचा समावेश असलेल्या इंग्लंड संघाने त्याच लॉर्डस मैदानावर मर्यादित षटकांच्या विश्वकरंडक अंतिम सामन्यात खिलाडूवृत्तीपेक्षा नियमांचा आधार घेत न्यूझीलंडच्या तोंडचा घास हिरावला होता.

मुळात सौरव गांगुली कर्णधार झाल्यापासून भारतीय खेळाडूंची देहबोली बदलली आहे. अरे ला कारे करण्याची मनोवृत्ती त्याने निर्माण केली. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या याच लॉर्डसच्या मैदानावर जिथे सुटाबुटाची कडक परंपरा जपली जाते, त्याच्या ड्रेसिंग रूममध्ये गांगुलीने विजयाचा जल्लोष करताना शर्ट काढून गरागरा फिरवला होता, तेव्हा सर्वच जण अवाक् झाले होते. त्याच मैदानावर आता दीप्ती शर्माने महिला क्रिकेट संघातही रुजलेला निडरपणा दाखवून दिला. त्यामुळे आता येथून पुढे भारतीय महिला संघाला कोणी गृहीत धरणार नाही. मुळात हरमनप्रीतच्या या संघाने इंग्लंडमध्ये पहिल्यांदा मालिका जिंकून आपला दरारा निर्माण केलाच आहे.

आता रहाणेचा कठोरपणा पाहू या. मुळात मृदू स्वभाव, शांत आणि संयमी वृत्ती हा रहाणेचा स्थायीभाव. महेंद्रसिंह धोनीला कॅप्टन कूल असं संबोधलं जायचं; पण त्याच्यापेक्षाही कूल रहाणे आहे. रहाणे मैदानावर रागारागाने काही कृत्य करत आहे, असं एकदाही घडलेलं नाही. पण शांत आणि संयमी स्वभाव म्हणजे सर्व काही खपलं जातं असं होत नाही. कर्णधारपदाची जबाबदारी असताना काही ठिकाणी कठोर रहावंच लागतं, नाहीतर सहकारी पाणी जोखतात आणि आदर रहात नाही. रहाणेने जिथे आवश्यक होता तिथे आपला कठोरपणा दाखवला. आपला कर्णधार मैदानाबाहेर जायला सांगेल असं जयस्वालला वाटलंही नसेल. जयस्वाल हा २० वर्षांचा नवोदित खेळाडू आहे, पुढे अख्खी कारकीर्द आहे. मैदानावरचं आपलं वर्तन कसं असायला हवं, पाय जमिनीवरच रहायला हवेत, याचं बाळकडू त्याला मिळालं. येथून पुढे तो अशा प्रकारचं स्लेजिंग करताना चार वेळा विचार करेल. केवळ तोच कशाला, हा धडा भारतातील तमाम नवोदितांना मिळाला आहे.

या प्रकरणातील दुसरी बाजू समोर आली नाही, किंवा जयस्वालने ती बाहेरही आणली नसेल. त्या दुलीप सामन्यात सुरुवातीला दक्षिण विभागाचं वर्चस्व होतं; पण जयस्वालच्या द्विशतकाने चित्र पालटलं होतं, त्यामुळे जयस्वाल फलंदाजी करत असताना त्याच्याविरुद्ध स्लेजिंग झालं होतं का? त्याची परतफेड क्षेत्ररक्षण करत असताना तो करत होता का? याचा खुलासा झाला नाही. काहीही असो, दुसऱ्याने चूक केली म्हणून आपणही तीच चूक करू नये, हासुद्धा खिलाडूवृत्तीचाच भाग आहे. पण, जिथे दाखवायला पाहिजे तिथे खिलाडूवृत्ती हवीच; पण नाकापर्यंत पाणी येत असेल तर दीप्ती शर्मासारखा कठोरपणाही खेळाचाच भाग आहे, हे नाकारता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.