अंतिम टप्प्यात आलेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा विजेता कोण, हे बरोबर पुढच्या रविवारी स्पष्ट होईल; पण विजेता म्हणजेच सर्वश्रेष्ठ असला तरी तो सर्वांगीण, सर्वोत्तम असतोच असं नाही.
अंतिम टप्प्यात आलेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा विजेता कोण, हे बरोबर पुढच्या रविवारी स्पष्ट होईल; पण विजेता म्हणजेच सर्वश्रेष्ठ असला तरी तो सर्वांगीण, सर्वोत्तम असतोच असं नाही. क्रिकेटला सभ्य गृहस्थांचा खेळ असं संबोधलं जातं, तर फुटबॉल हा खेळ मुळातच धसमुसळा ! कितीही सभ्यपणे खेळायचं म्हटलं तरी पायात पाय घालून पाडल्यावर सर्वांचाच संयम राहतो असं नाही. या प्रकाराला आळा घालण्यासाठी तत्काळ यलो आणि रेड कार्डची बंधनं असली तरी रागाचा उद्रेक कोणत्या ना कोणत्या मार्गाने होत राहतोच. अशा या शरीरवेधी खेळात मैदानावर खिलाडूवृत्ती आणि मैदानाबाहेर सभ्यता कशी जपता येते, हे जपाननं सर्व जगाला दाखवून दिलं.
हिरोशिमा, नागासाकीवरील विध्वंसकारी अणुबॉम्बमुळे पिढीच्या पिढी बरबाद झाली, तरी त्या जखमा मागं टाकत नव्यानं उभारी घेणाऱ्या आपल्या देशाला उगवत्या सूर्याचा देश का म्हटलं जातं, हेसुद्धा जपाननं सर्वच क्षेत्रांतील आपल्या व्यवहारातून दाखवून दिलं आहे. मग असा देश आणि त्यांचे नागरिक फुटबॉलचं मैदान का असे ना, त्यांचे व्यवहार आणि कृती नवी दिशा देणारे ठरतात.
कतारमधील या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचं सर्वंकष फलित काय, असा प्रश्न विचारला जाईल तेव्हा विजेता कोण, सर्वोत्तम खेळाडू कोण, यापेक्षा सर्वांगीण ‘टीम’ म्हणून जपानचंच नाव घेतलं जाईल. यातील ‘टीम’ या शब्दप्रयोगात केवळ खेळाडूच नाही, तर जपानमधून कतारमध्ये हजारोंच्या संख्येने आलेल्या प्रेक्षकांचाही समावेश आहे.
मुळात फुटबॉलचे प्रेक्षक बेभान असतात. ९० मिनिटांच्या खेळात बिअर किंवा व्हिस्कीचा आस्वाद घेत, क्षणाक्षणाला स्टेडियमभर नाद निर्माण करणारे; रंगबिरंगी, प्रसंगी तोकड्या कपड्यांनिशी लक्ष वेधून घेणारे आणि आपला संघ जिंकला तर स्टेडियमबाहेर जल्लोष करणारे आणि संघ हरला तर कधी कधी नासधूस करणारे अशा अनेक वृत्ती - प्रवृतींचे प्रेक्षक ही जागतिक फुटबॉल स्पर्धेची ओळख. प्रसंगी अनेक वेळा दंगलीही घडलेल्या आहेत; पण संवेदनशीलपणे आणि सुसंस्कृतपणे फुटबॉल कसं खेळलं जातं आणि पाहिलंही जातं, याचा परिपाठ जपाननं त्यांच्या खेळांडूनी आणि प्रेक्षकांनी कतारमध्ये केवळ घालूनच दिला नाही, तर एक आदर्शही निर्माण केला. प्रत्येक सामन्यानंतर स्टेडियमची साफसफाई करणारे जपानचे प्रेक्षक आणि २०-२५ खेळाडूंचा वावर झाल्यानंतरचं ड्रेसिंगरुम होती तशीच स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवण्यास प्राधान्य, हे केवळ फुटबॉल क्षेत्रालाच नव्हे, तर अख्ख्या जगाला हेवा वाटावा असं आहे.
स्पर्धेतलं आपलं आव्हान संपुष्टात आलं, हिरमोड झाला, तरी जपानच्या खेळाडूंनी आपल्या नसानसांत भिनलेली वृत्ती सोडली नाही, यालाच तर म्हणतात... नसतो विजयाचा उन्माद, नसते पराभवानंतरची हतबलता.
शाळेतच स्वच्छतेचे धडे
यातून एक साधीसोपी गोष्ट लक्षात घ्यायला हवी. सामना संपल्यानंतर मैदानावर स्वच्छता कोणी करायची, यासाठी कोणी कोणाची नियुक्ती केली नव्हती, किंवा हे प्रेक्षक स्वच्छता कर्मचारीही नव्हते, हा विचार उत्स्फूर्त होता. लहानपणीच स्वच्छता आणि सभ्य आचाराचं बाळकडू मिळालं की आपोआप सर्व घडून येतं. मुळात जपानमध्ये शाळेतही स्वच्छता सेवक नसतात, विद्यार्थीच ही कामं करत असतात, मग असा विद्यार्थी मैदानावर आला काय किंवा रस्त्यांवर फिरत असला काय, स्वच्छता ही राखणारच. मुळात स्वच्छता त्यांच्या डोळ्यांत किंवा हातात नाही, तर मनामध्ये आहे.
प्रगतिपथावर जपान
क्रिकेटसारख्या मोजक्या खेळांचा अपवाद सोडला, तर जपान प्रत्येक खेळात आपलं वर्चस्व प्रस्थापित करून आहे. ऑलिंपिकमध्ये अमेरिका, चीन यांच्यात भले सर्वाधिक पदकांसाठी स्पर्धा असेल; पण जपानही तेवढ्याच शर्थीने स्पर्धा करत असतो. म्हणजेच खेळातील गुणवत्ताही शालेय वयापासूनच तयार झालेली असते. जागतिक फुटबॉलबाबत सांगायचं तर युरोप आणि आफ्रिकन देशांच्या वर्चस्वात जपानला मोठी प्रगती या अगोदर करता आली नव्हती; परंतु यंदा साखळी सामन्यांत जर्मनी आणि स्पेनला हरवून आपली प्रगतीही सिद्ध केली. क्रोएशियाविरुद्धच्या लढतीत पेनल्टी किकवर पराभव झाला आणि त्यांचं आव्हान संपुष्टात आलं, ही वाटचाल थक्क करणारी आहे.
चीनलाही जमलं नाही ते करून दाखवलं
कोरोनाचा उद्रेक चीनमधून सुरू झाला आणि संपूर्ण जगाला त्यानं विळखा घातला. त्या दोन वर्षांच्या काळात क्रीडा क्षेत्राचीही मोठी हानी झाली होती; पण टोकियोने ऑलिंपिकचं शिवधनुष्य यशस्वीपणे पेललं. ऑलिंपिकमध्ये सर्वात मोठा क्रीडा सोहळा, मात्र केवळ आशिया संघांचा सहभाग असलेली एशियाड स्पर्धा चीनला अजूनही शक्य झालेली नाही. अशा या जपानने कतारमधील या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतून खेळ आणि त्याच्या स्पर्धा कशा खिलाडूवृतीने खेळायला पाहिजे याचा संदेश आपल्या कृतीतून दिला. फुटबॉलला मोस्ट ब्यूटिफुल गेम असंही म्हटले जातं. जपानने ते करून दाखवलं. एकीकडे अशा भव्य स्पर्धांचा वापर आपापले वैयक्तिक संदेश देण्यासाठी आणि विरोध दर्शवण्यासाठी केला जातो, तिथं जपानचे खेळाडू आणि समर्थक जीवनमूल्यांचा आदर्श निर्माण करतात. म्हणूनच कोणीही स्पर्धा जिंको... जगासाठी तुम्हीच विजेते आहात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.