खेळ मोठा की खेळाडू? असा प्रश्न जेव्हा एखादा खेळाडू एका वेगळ्या उंचीवर जातो तेव्हा निर्माण व्हायचं; त्यावेळी अर्थात खेळ हा अनंत आहे, खेळाडू येतात अन् जातात पण खेळ तिथंच असतो, हे साधं सोपं उत्तर दिलं जायचं! अर्थातच, तो जुना काळ होता; पण आता परिस्थिती बदललीये.
केवळ खेळ आणि त्यातलं कौशल्य एवढ्यापुरताच खेळाडू मर्यादित राहिलेला नाही. निश्चितच खेळ मोठा असला, तरी सर्वार्थानं लोकप्रियता आणि तिच्या पावलांनी येणारी आर्थिक सुबत्ता आजकालच्या जमान्यात सर्वाधिक महत्त्वाची.
खेळाडूचा वैयक्तिक श्रेष्ठपणा खेळाची उंची वाढवतो, यात कुणाचंही दुमत असू शकत नाही. किंबहुना, काही खेळाडूंची नावं घेतली, की तो खेळ लगेचच ओळखता येतो. उदाहरणार्थ, मायकेल शुमाकर म्हणजे कार रेसिंग, टायगर वूड्स म्हणजे गोल्फ, पेले-मॅराडोना म्हणजे फुटबॉल, रॉजर फेडरर-राफेल नदाल म्हणजे टेनिस...आणि क्रिकेट म्हणजे विराट कोहली.
डॉन ब्रॅडमन आणि सचिन तेंडुलकर म्हणजेही निःशंकपणे क्रिकेटच!; पण कोहलीनं केवळ मैदानापुरतंच नाही, तर क्रिकेटला सगळ्याच बाबतींत विराट रूप मिळवून दिलं. मैदानावरची त्याची लोकप्रियता तर अफाट आहेच; शिवाय सोशल मीडियावरचीही त्याची लोकप्रियता केवळ अद्वितीय आहे.
जगात विविध खंडांत खेळले जाणारे खेळ असंख्य आहेत. त्यात लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यासारखे दिग्गज खेळाडूही आहेत. या खेळाडूंच्या मांदियाळीत विराट सोशल मीडियात चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक फॉलोअर्स असलेला खेळाडू आहे.
याच मेस्सी-रोनाल्डो यांना क्रिकेट हा खेळ कदाचित माहीतही नसेल; पण कमाई आणि फॉलोअर्स या निकषांवर विराट जगात भारी आहे. कोहली हाच ब्रँड वापरून क्रिकेटला ज्यावेळी ऑलिंपिकमध्ये स्थान दिलं जातं; त्याचक्षणी विराट खेळापेक्षा काही काळासाठी का होईना, मोठा झालेला असतो.
मुळात क्रिकेट आणि ऑलिंपिक यांचा तसा दुरान्वयानंही संबंध नव्हता. अपवाद फक्त १९०० च्या ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकाच्या झालेल्या लढतीचा. त्यावेळीही क्रिकेटला ऑलिंपिक खेळाचा दर्जा काही मिळालेला नव्हता. अमेरिका आणि बहुतांशी युरोपियन देशांचा विचार करता, क्रिकेट हा त्यांच्यासाठी ‘हा कोणता खेळ?’ असा प्रश्नांकित विचार.
कधी कधी जेव्हा ऑलिंपिकशी तुलना व्हायची, तेव्हा तुमचा हा खेळ ‘ऑलिंपिक खेळ’ आहे का? असंही काही जणांकडून कुत्सितपणानं विचारलं जायचं; पण आता आम्हीसुद्धा ‘ऑलिंपिकवीर’ आहोत, असं २०२८ च्या लॉसएंजेलिस इथं होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये सहभागी होणारे खेळाडू सन्मानानं म्हणू शकतील. ही क्रिकेट या खेळाची महती आहेच; परंतु यात विराटचंही तेवढंच योगदान आहे.
सध्याच्या युगात खेळ कोणताही असो, तो मैदानापुरता मर्यादित राहिलेला नाही. आर्थिक पाठबळ म्हणजेच प्रायोजक हवे असतील, तर लोकप्रियता हवी आणि चर्चा घडवण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी चेहराही हवा. एक साधं उदाहरण पाहूया. मेस्सी आणि रोनाल्डो ‘ला लीगा’त खेळत होते, त्यावेळी स्पॅनिश लीगची किती चर्चा असायची;
पण रोनाल्डो सौदी अरेबियात तर मेस्सी अमेरिकेत लीग खेळायला गेला त्यामुळे या अगोदर कधी कोणी माहितीही घेतली नसेल, त्या सौदी अरेबियातील आणि अमेरिकेतील ‘एमएलएस’ या लीगची चर्चा होऊ लागली. म्हणूनच, आजच्या युगात तुम्हाला तुमचं प्रोडक्ट विकायचं असेल, तर चेहरा हवा. विराट हा या युगातील क्रिकेटचा ज्याच्यावर क्रिकेट विकलं जाऊ शकेल, असा पहिल्या क्रमांकाचा ब्रँड आहे हे निर्विवाद.
तसं पाहायला गेलं, तर ऑलिंपिकही केवळ खेळ आणि स्पर्धा एवढ्यावर मर्यादित राहिलं असतं, तर पैसा आणि प्रसिद्धी कदाचित अपेक्षितपणानं मिळाली नसती. आता त्यांनीसुद्धा आपल्या नजरेची आणि विचाराची कवाडं उघडली त्यावेळी त्यांना क्रिकेट आणि विराट कोहली ब्रँड सापडतो. तसं पाहायला गेलं, तर क्रिकेटला शंभरपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे; त्यामुळे हा खेळ कधीच अख्ख्या जगात पोहोचायला हवा होता, पण तसं घडलं नाही.
कदाचित, पाच-पाच दिवसांचं कसोटी क्रिकेट किंवा ६०-६० आणि त्यानंतर ५०-५० षटकांचा असा दिवसभर चालणारा प्रकार असेल; पण ‘ट्वेन्टी-२०’ च्या आगमनानंतरही आता या खेळाचा ऑलिंपिकसाठी विचार होतो, म्हणजेच कुठं तरी ‘ब्रँड कोहली’ हा घटक विचारात घेतलेला असतो.
ऑलिंपिकमधल्या क्रिकेटच्या समावेशाचा विचार अगोदरपासून केला जात होता; पण प्रत्यक्ष समावेश २०२८ च्या स्पर्धेत होणार आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या १४४ व्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी क्रिकेटचं प्रेझेंटेशन करण्यात आलं, त्यावेळी एकमेव चेहरा विराट कोहलीचा होता. म्हणजेच, ‘आयसीसी’ आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक यांना विराटच्या पुढं दुसरा विचार नाही, हे त्रिकालाबाधित सत्य.
आता सर्वांत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो, २०२८ च्या ऑलिंपिकमध्ये विराट खेळणार का? सध्या भारताच्या ‘ट्वेन्टी-२०’ संघात विराटचा समावेश होत नाही. शिवाय, २०२८ मध्ये विराट ३९ वर्षांचा होईल, तरीही त्याचा ब्रँड वापरणं हे त्याची महती अधोरेखित करणारं आहे. तसंच, लॉसएंजेलिस ऑलिंपिक समितीचे संचालक निक्कोलो कॅम्पियानी यांनीसुद्धा क्रिकेटच्या समावेशासाठी ‘बॅटिंग’ करताना विराटच्या सगळ्या स्तरातील लोकप्रियतेचा उल्लेख करणं, यावरून कळतं की त्याच्या सीमा किती रुंदावल्या आहेत.
क्रिकेटमुळं तिजोरी भरणार
या लेखात वर उल्लेख केल्याप्रमाणं, आता कोणताही खेळ केवळ मैदानापुरता मर्यादित न राहता, त्यात आर्थिक गणिताला सर्वाधिक प्राधान्य असतं. ते कसं हे पुढील शक्यतेवरून स्पष्ट होतं. २०२४ मध्ये म्हणजेच पुढच्याच वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिकच्या भारतातील प्रक्षेपणाचे हक्क दीड कोटी पौंडला विकण्यात आले. क्रिकेटच्या समावेशामुळं २०२८ मधल्या ऑलिंपिकच्या भारतातील प्रक्षेपण हक्कांची बोली १५ कोटी पौंडांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच, ऑलिंपिक समितीचीही तिजोरी क्रिकेटमुळं भरणार!
विचार बदलायला लावणारा विराट
एक खेळाडू हजारो खेळाडूंचे विचार कसे बदलू शकतो, हे विराटच्या काही क्षणांच्या कृतीतून जगानं पाहिलं. अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन उल हकनं विराटबरोबर ‘आयपीएल’मध्ये पंगा घेतला. त्यानंतर जिथं जिथं नवीन खेळत होता, तिथं तिथं प्रेक्षक त्याला सळो की पळो करून सोडत होते;
पण या विश्वकरंडक स्पर्धेत हे दोघंही आमनेसामने आले आणि विराटनं प्रेक्षकांना उद्देशून ‘नवीनची खिल्ली उडवू नका, त्याला प्रोत्साहन द्या,’ अशी काही सेकंदांची कृती केली आणि त्यानंतर चित्रं कमालीचं बदललं. हाच नवीन प्रेक्षकांसाठी ‘नवीनभाई’ झाला. त्याचे चाहते तयार झाले. ही घटना म्हटली तर छोटी; पण ‘आयसीसी’ असो वा ऑलिंपिक समिती याची दखल घेणारच! यामुळंच सर्वांसाठी ‘ब्रँड कोहली’ तयार होतो.
वास्तव तपासायला हवं
आता थोडं क्रिकेटच्या एकूणच वर्तमान आणि भविष्याचं पाहूया. ऑलिंपिकमल्या ‘ट्वेन्टी-२०’ प्रकारात ‘आयसीसी’शी ८० पेक्षा जास्त देश संलग्न आहेत. म्हणजे, व्याप्ती कमालीची वाढली; पण कधीकाळी आक्रमक आणि ताकदवर खेळाकरता ओळखला जाणारा ‘वेस्ट इंडिज’चा संघ सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय आणि गत ‘ट्वेन्टी-२०’ विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरला नव्हता.
एकीकडं, ऑलिंपिकचं भविष्य पाहताना, संलग्न देशांची संख्या वाढत असताना; असलेल्या संघांतील मोजक्यांचा अपवाद वगळता इतर मुख्य संघांचा दर्जा कमी होतोय का? हे वास्तवही ‘आयसीसी’नं तपासायला हवं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.