एकीकडे उदय, दुसरीकडे अस्त

एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असताना, उपांत्य फेरीचं चित्र बहुतांशी स्पष्ट झालंय. खरंतर अशा बहुराष्ट्रीय स्पर्धांचं एक वैशिष्ट्यं असतं, कोणत्यातरी बलाढ्य संघाची अनपेक्षित दाणादाण उडते.
Afghanisthan Cricket Board
Afghanisthan Cricket Boardsakal
Updated on

एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असताना, उपांत्य फेरीचं चित्र बहुतांशी स्पष्ट झालंय. खरंतर अशा बहुराष्ट्रीय स्पर्धांचं एक वैशिष्ट्यं असतं, कोणत्यातरी बलाढ्य संघाची अनपेक्षित दाणादाण उडते, काही केलं तरी त्यांचा पाय घसरतच असतो; तर दुसऱ्या बाजूला असा एखादा संघ असतो, की त्याची प्रगती अनपेक्षित असते. भले त्यांनी मोठी झेप घेतली नसली, तरी त्यांचा प्रभाव थक्क करणारा असतो...या वेळी गटांगळ्या खाणारा संघ आहे इंग्लंड आणि प्रभाव पाडणारा संघ आहे अफगाणिस्तान. अशी या स्पर्धेची ही दोन टोकं आहेत.

२००७ च्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा बांगलादेशकडून धक्कादायक पराभव झाला आणि त्याची परिणिती स्पर्धेतलं आव्हान साखळीतच संपुष्टात येण्यात झालं होतं. १९९२ मध्ये मायदेशात झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आलं होतं. त्यामुळे अशा घटना घडतात. कौतुक मात्र, छाप पाडणाऱ्या संघाचं होत असतं. इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका अशा तीन संघांना पाणी पाजणाऱ्या अफगाणिस्ताननं यातला आपला एकही विजय लॉटरी लागल्याप्रमाणं नव्हता, हे त्यांच्या कामगिरीवरून सिद्ध केलं.

या विश्वकरंडक स्पर्धेच्या काही दिवस अगोदर श्रीलंकेत झालेल्या आशियायी करंडक स्पर्धेतही त्यांनी छाप पाडणारी कामगिरी केली होती. केवळ ‘डकवर्थ लुईस’ या नियमातील त्यांचं गणित चुकलं, म्हणून त्यांना उपांत्य फेरी गाठता आली नव्हती. त्यामुळे या विश्वकरंडक स्पर्धेत त्यांनी असे धक्कादायक विजय मिळवले, याचं खरंतर आश्चर्य वाटायला नको.

मुळात अफगाणिस्तानचा हा संघ प्रामुख्यानं ‘ट्वेन्टी-२०’ प्रकारात कमाल करणारा. श्रीलंका आणि वेस्ट इंडिज जिथं या स्पर्धेला थेट पात्र ठरले नाहीत, तिथं अफगाणचा संघ अगोदर पात्र ठरला होता. यावरून त्यांच्या कामगिरीत सातत्य असल्याचं दिसून येतं. म्हणून, त्यांना मिळालेले विजय हे लॉटरी लागलेले नव्हते, हे पुन्हा एकदा अधोरेखित करणं क्रमप्राप्त आहे.

अफगाण संघाचं नावं घेतलं, की समोर येतो तो रशीद खान! ‘आयपीएल’मधली त्याची करामत सर्वांनीच पाहिली आहे. हा असा खेळाडू आहे, ज्याची मागणी जगभरात होत असलेल्या विविध व्यावसायिक ‘ट्वेन्टी-२०’त होत असते. याआधी तो एकखांबी तंबू होता; पण, आता अफगाण संघाचा डोलारा सांभाळण्यासाठी अनेक खांब तयार झाले आहेत.

विश्वकरंडकासारख्या स्पर्धांत केवळ एका खेळाडूच्या जोरावर विजय मिळवता येत नसतात; त्यासाठी सांघिक प्रयत्न लागतात. म्हणूनच, मुजीब उर रेहमान या अनुभवी खेळाडूंसह हशमतुल्ला शाहिदी, अझमतुल्ला ओमझारी, फझल हक फारुकी, रेहमतुल्ला गुरबाझ अशी अनेक नावं पुढं येतात आणि मुख्य म्हणजे गरज असताना योगदानही देतात.

आता अफगाण संघाबाबत महत्त्वाची माहिती घेऊया. तालिबाननं ताबा मिळवल्यावर त्या देशात अनेक उलथापालथी झाल्या. त्यांचे लाखो लोक पाकिस्तानमध्ये ‘रेफ्यूजी’ म्हणून राहत होते. आता, पाकनं त्यांना हुसकावलं आहे. अशी परिस्थिती असताना तिथं क्रिकेट तर दूर राहुद्या, समाजाशी निगडित इतर महत्त्वाच्या क्षेत्रांत कशी स्थिती असेल, हे तिथले नागरिकच सांगू शकतील.

क्रिकेटबाबत बोलायचं, तर हे आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वतःच्या देशात खेळत नाहीच. कधीतरी भारताला, दुबईला किंवा श्रीलंकेला त्यांचं घर बनवतात. म्हणजेच, त्यांचे मायदेशात अपेक्षित असलेले सामने या तटस्थ देशांत होतात. अशी प्रतिकूल परिस्थिती असतानाही, जर हा देश विश्वकरंडक स्पर्धेत प्रगती करत असेल, तर ते निश्चितच कौतुकाला पात्र आहेत. थोडक्यात सांगायचं, तर विविध व्यावसायिक लीगमध्ये मिळवलेला अनुभव ते देशासाठी देतात.

एकीकडे अफगाणिस्तानचा ‘उदो उदो’ होत असताना आणि त्यांची सर्वत्र चर्चा होत असताना, या विश्वकरंडक स्पर्धेत एकेकाळचा ‘दादा’ संघ, ज्या संघाला कसं पराभूत करायचं याचं उत्तर सहजासहजी न सापडणाऱ्या वेस्ट इंडिजचा कुणी उल्लेखही करत नाही, हे फार मोठं दुर्दैव. वर्ल्डकप फुटबॉलमध्ये कधी-कधी इटली किंवा नेदरलँड्स सारखे संघ पात्र ठरले नसले, तरी त्यांची आठवण स्पर्धेदरम्यान काढली जाते.

त्यांच्या गाजलेल्या खेळाडूंची चर्चा होते; पण, या विश्वकरंडक स्पर्धेतील समालोचनात असो वा सोशल मीडियावरच्या चर्चेत असो; विंडीजचा कुठंही उल्लेख होत नाही. विश्वकरंडक स्पर्धा त्यांनी दोनदा जिंकली आहे. अशी कामगिरी फक्त ऑस्ट्रेलिया (५ वेळा) आणि भारताला करता आलेली आहे. असा विंडीजचा संघ पात्र ठरत नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. केवळ या स्पर्धेसाठी नव्हे, तर ऑस्ट्रेलियात झालेल्या ‘ट्वेन्टी-२०’ विश्वकरंडक स्पर्धेलाही ते पात्र ठरले नव्हते.

प्रेक्षकांना तर नाहीच, वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळालाही त्याचं काही सोयरसुतक आहे, असं वाटत नाही. याचा केवढा मोठा फटका त्यांना बसला असेल! विश्वकरंडक स्पर्धेत खेळत नसल्यामुळे ‘आयसीसी’कडून मिळणारा सहभागाचा वाटा मिळणार नाही, हे झालं आर्थिक नुकसान. त्याचप्रमाणं, पुढच्या स्पर्धांसाठी तुम्हाला प्रायोजक कसे मिळणार? आता, या विश्वकरंडक स्पर्धेतले पहिले सात संघ पाकिस्तानात २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. म्हणजे तिथंही वेस्ट इंडिज नसणार.

वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना त्याचं काही दुःख असेल, असं वाटत नाही. कारण, त्यांचे प्रमुख खेळाडू विविध देशांत होणाऱ्या ‘टी-२०’ लीगमध्ये खेळतात आणि बक्कळ पैसे कमावतात. त्यानंतर वर्षभरासाठी त्यांची चांगली सोय होते. त्यामुळे कशाला हवे देशाकडून खेळणे?, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो; पण, या वृत्तीमुळे पूर्ण वेस्ट इंडिज क्रिकेटचं तसंच भविष्यात पुढच्या पिढीचं मोठं नुकसान होऊ शकतं, याचा विचार त्यांनी कदाचित केला नसेल.

आता तुमची चलती आहे, म्हणून तुम्हाला व्यावसायिक लीगमध्ये संधी मिळते; पण, या लीग ‘कामानुसार दाम’ या धर्तीवर असतात. एकदा का तुमची चलती संपली, की कुणी विचारत नाही. तुम्ही कधीतरी देशाकडून खेळलात, चांगली कामगिरी केलीत म्हणून व्यावसायिक लीगसाठी तुमची मागणी वाढली पण भविष्यात काय?

एकीकडे क्रिकेटचा ऑलिंपिकमध्ये समावेश करण्याचे ‘आयसीसी’चे प्रयत्न यशस्वी ठरले. हा खेळ खेळणाऱ्या देशांची संख्या वाढवली; पण, कधीकाळी अतिबलाढ्य असणाऱ्या वेस्ट इंडिजचं काय? म्हणूनच, विश्वकरंडक स्पर्धेत एकीकडे नवनवे संघ उदयाला येत असताना, दुसरीकडे कधीतरी बलाढ्य असलेल्या संघाचा अस्त होत असल्याचं सध्यातरी चित्र निर्माण करणारी सध्याची स्थिती आहे. भविष्यात त्याच तडफेनं वेस्ट इंडिजचा संघ परतेल, अशी आशा करूया. परंतु, एकूण परिस्थितीचा आढावा घेता, ते शक्य आहे असं वाटत नाही!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.