रणजी क्रिकेटला भारतीय क्रिकेटचा पाया समजला जायचा, आजही तो तसाच आहे; पण त्याचं महत्त्व कमी झालंय की केवळ कवित्वच शिल्लक राहिलंय, असा प्रश्न साहजिकच पडत आहे.
या आठवड्यात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या...
१) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत निवड झालेल्या रवींद्र जडेजाला तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी रणजी सामन्यात खेळण्यास सांगण्यात आलं.
२) न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली होतीच, त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सराव व्हावा म्हणून रोहित शर्मा आणि विराट कोहलीने रणजी सामन्यात खेळावं, असं मत रवी शास्त्रींसह काहींनी व्यक्त केलं होतं.काय घडलं : जडेजाला रणजीत खेळण्याशिवाय पर्याय नव्हता, मात्र रोहित-विराटने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यालाच पसंती दिली.
रणजी क्रिकेटला भारतीय क्रिकेटचा पाया समजला जायचा, आजही तो तसाच आहे; पण त्याचं महत्त्व कमी झालंय की केवळ कवित्वच शिल्लक राहिलंय, असा प्रश्न साहजिकच पडत आहे. हे केवळ रोहित आणि विराट सरावासाठी रणजीत खेळले नाहीत म्हणून नाही; पण एकूणच आयपीएलनंतर रणजी क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्वीसारखा राहिलेला नाही, याची अनेक कारणं देता येतील. त्यातील एक ताजं उदाहरण म्हणजे, मुंबईचा सर्फराझ खान. भरभरून धावांचा पाऊस आणि त्याही सातत्याने पाडणाऱ्या सर्फराझचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी विचार झाला नाही, त्याचवेळी त्याचा मुंबई संघातील सहकारी सूर्यकुमार यादवची निवड झाली.
आता कोणीही म्हणेल की, न्यूझीलंडविरुद्धच्या त्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात रोहितने तीन वर्षांनंतरचं आपलं पहिलं शतक केलं. प्रकार कोणताही असला तरी शतकामुळे मिळणारा आत्मविश्वास पुढच्या सामन्यांसाठी महत्त्वाचा असतो; परंतु या शतकानंतर रोहित शर्मा १५ दिवसांनंतर कसोटीत खेळणार आहे. हा कालावधी तसा मोठा आहे. शेवटी कसोटीत संयमाचा कस लागतो आणि हा संयम किंवा खरी परीक्षा लाल चेंडूवर खेळणाऱ्या सामन्यातूनच मिळते.
रोहित शर्मा अखेरचा कसोटी सामना १२ मार्च २०२२ मध्ये खेळलेला आहे, म्हणजेच जवळजवळ ११ महिन्यांनंतर तो कसोटी खेळणार आहे. म्हणूनच लाल चेंडूवरचा सराव महत्त्वाचा होता.असो, भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आता रणजी क्रिकेट हेच एकमेव दार राहिलेलं नाही.
अन्यथा गतविजेत्या मध्य प्रदेश आणि त्या अगोदर सलग दोनदा रणजी विजेतेपद मिळवणाऱ्या विदर्भाचा एक तरी खेळाडू भारतीय संघात असता. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे रणजीचं महत्त्व किती, हे जयदेव उनाडकट सांगू शकेल. बारा वर्षांनंतर त्याला भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. इतक्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा संघात येण्याचा हा कदाचित विक्रम असेल. त्याचा सौराष्ट्र संघ गत रणजी स्पर्धेत फार मोठी प्रगती करू शकला नव्हता; परंतु जी संधी मिळाली त्याचं सोनं उनाडकटने केलं, त्यामुळे केवळ कवित्व सांगण्यापुरतं रणजी क्रिकेट शिल्लक राहील असं वाटत असताना, उनाडकटच्या निमित्ताने तेवढंच महत्त्व शिल्लक आहे हे सिद्ध होतं, परंतु सर्व प्रमुख खेळाडूंचा या स्पर्धेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय हे तेवढंच खरं आहे.
पार्थिव पटेल ते उम्रान मलिक
आता अजून काही उदाहरणं पाहू या - पार्थिव पटेल हा माजी यष्टिरक्षक - फलंदाज प्रथम कसोटी खेळला आणि त्यानंतर बऱ्याच काळानंतर रणजीत खेळला. सध्याचा वेगवान गोलंदाज जम्मू-काश्मीरचा उम्रान मलिक रणजी क्रिकेटमधून नव्हे, तर आयपीएलमध्ये हैदराबाद संघातून भन्नाट वेगवान माऱ्याची गोलंदाजी केल्यामुळे भारताच्या व्हाइटबॉल क्रिकेट संघात आला.
सचिन तेंडुलकरचं उदाहण या लेखात देणं महत्त्वाचं आहे. सचिन कितीही मोठा खेळाडू झाला तरीही रणजी क्रिकेटची कास त्याने कधी सोडली नव्हती. जेवढ्या सन्मानाने तो अखेरचा कसोटी सामना खेळून निवृत्त झाला, तेवढ्याच सन्मानाने तो चंडीगढविरुद्ध अखेरचा रणजी सामना खेळला होता. निवृत्तीकडे झुकलेला असताना आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यामुळे त्याच्याकडे वेळ होता, अशा वेळी शक्य तेवढे रणजी सामने खेळून तो कसोटी सामन्यांसाठी सज्ज होत असायचा.
पूर्वी परदेशी संघ भारतात कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर यायचा, त्या वेळी त्यांचा सराव सामना रणजी विजेत्या संघाबरोबर व्हायचा. ९० च्या दशकात मार्क टेलरच्या नेतृत्वपदी ऑस्ट्रेलियाचा ताकदवर संघ भारतात आला आणि रणजी विजेत्या मुंबईविरुद्ध त्यांचा सराव सामना होता. सचिन तेंडुलकर या सामन्यात पूर्ण तयारीनिशी खेळला, द्विशतक केलं. शेन वॉर्नची गोलंदाजी कशी खेळायची याचा अभ्यास केला. मुंबईने तो सामना जिंकला, त्यानंतर कसोटी मालिकेत भारतानेही ऑस्ट्रेलियाला हरवलं. सचिनने वॉर्नला धू धू धुतलं... म्हणजेच रणजी क्रिकेटचं महत्त्व सचिनने सिद्ध केलेलं असताना आत्ताचे खेळाडू या प्रतिष्ठित स्पर्धेला प्राधान्य का देत नाहीत?
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तो रणजी स्पर्धेत खेळलेलाच नसणार. आता भारतीय संघातील काही प्रमुख खेळाडू के. एल. राहुल, जसप्रीत बुमरा, रिषभ पंत, महम्मद शमी यांना आपण शेवटचं रणजी सामन्यात कधी खेळलो आहोत हे आठवणारही नाही. रवींद्र जडेजा आता तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी खेळतोय, काही वर्षांपूर्वी हार्दिक पंड्याही याच कारणामुळे रणजीत खेळला होता. भारतीय संघातील स्थान गमावल्यामुळे अजिंक्य रहाणेही आता रणजीत खेळतोय. या मोसमात सूर्यकुमार यादवला वेळ मिळाला आणि तो दोन सामने मुंबईकडून खेळला ही घटना सकारात्मकतेने पाहता येईल.
तुम्ही कितीही मोठे खेळाडू असा; परंतु तुम्ही स्थानिक संघातून खेळता तेव्हा तुमच्या अनुभवाचा निश्चितच फायदा नवोदितांना होत असतो. अशा प्रकारेच बॅटन पुढे जात असतो. आता वर्कलोडचं नियोजन करण्यासाठी कसोटी आणि व्हाइटबॉल क्रिकेटसाठी खेळाडूंची आलटून पालटून निवड केली जात असते. हेच सूत्र पुढेही कायम राहणार असेल, तर प्रमुख खेळाडू रणजी स्पर्धेच्या एक-दोन सामन्यांसाठी उपलब्ध होऊ शकतात, त्यामुळे बीसीसीआयने तशी सक्तीच करावी. तीन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात ३६ धावांत धूळधाण उडाल्यानंतर आणि विराटसह प्रमुख खेळाडू नसताना अजिंक्य रहाणेच्या संघाने कांगारूंना पाणी पाजलं. त्या ऐतिहासिक मालिकेचं विश्लेषण करताना ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग चॅपेलसारख्या माजी दिग्गज खेळाडूंनी भारतातील देशांतर्गत क्रिकेटचा पाया किती मजबूत आहे याचे दाखले दिले होते. मग हा लौकिक कायम ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक खेळाडूवर आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.