कोकणात जुन्या काळातली एक म्हण फार प्रसिद्ध आहे, ती अशी...‘गेलं वरीस आलं वरीस, बाबा माझा लगीन का नाही करीस’...
कोकणात जुन्या काळातली एक म्हण फार प्रसिद्ध आहे, ती अशी...‘गेलं वरीस आलं वरीस, बाबा माझा लगीन का नाही करीस’... या म्हणीचा आपण वेगळ्या संदर्भाने विचार करू या... ‘सरलं वर्ष, आलं नववर्ष, आता तरी मिळवून द्या क्रिकेट विश्वविजेतेपदाचा हर्ष!’
ही म्हण आणि त्याच्यासोबत क्रिकेट विश्वकरंडकाचा संदर्भ जोडण्याचा हेतू एवढाच की, आजपासून सुरू झालेलं २०२३ हे नवं वर्षसुद्धा क्रिकेट वर्ल्डकपचं आहे आणि हा वर्ल्डकप आपल्या देशात होणार आहे.
या संधीचं तरी सोनं करून पुन्हा विश्वविजेते होण्याची अपेक्षा आहे. १९८३, २००७ आणि २०११ ही आपल्या देशातील क्रिकेटसाठी सुवर्णयश देणारी वर्षं ठरली. ही तिन्ही वर्षं विषम अंकांची होती. २०२३ ही तसंच. हा विचार केवळ योगायोगासाठीच... शेवटी योगायोग नाही तर कर्तृत्वच सर्वश्रेष्ठ असतं. पण सामान्य क्रिकेटप्रेमींसाठी ‘योगायोग’ हे केवळ मनाचं समाधान एवढंच.
जगज्जेत्या महेंद्रसिंह धोनीचे कर्णधार म्हणून विराट कोहली आणि रोहित शर्मा असे दोन वारस झाले. यात विराट कोहली काही लिओनेल मेस्सी झाला नाही, आता रोहित शर्मा तरी (२०२३ मधील वर्ल्डकपमध्ये तो कर्णधार राहील ही अपेक्षा ठेवून) क्रिकेटच्या जर्सीवर चौथा ‘स्टार’ झळकावणार का, हा प्रश्न आहे. २०१९ च्या शेवटी शेवटी जगावर आपत्ती आणणाऱ्या कोरोनाने संपूर्ण क्रीडाविश्वाचं टाइम टेबल बिघडवलं.
आपल्या देशाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध असलेल्या खेळ आणि स्पर्धांचा विचार करता क्रिकेटचे दोन वर्ल्डकप (टी-२० आणि ५०-५० षटकं), ऑलिंपिक, एशियन गेम्स, वर्ल्डकप फुटबॉल, युरो-कोपा अमेरिका या बहुराष्ट्रीय स्पर्धा आपल्याकडे सर्वाधिक लोकप्रिय आहेत.
परंतु, कोरोनामुळे टोकियो ऑलिंपिक एक वर्ष पुढे गेली, ट्वेन्टी-२० वर्ल्डकपचंही तेच झालं, त्यामुळे २०२१, २०२२ आणि २०२३ अशी सलग तीन वर्षं वर्ल्डकप क्रिकेटची झालीत. कोणत्याही प्रकारच्या दोन वर्ल्डकपमध्ये दोन वर्षांचं अंतर असायला हवं;
पण कोरोनाने सर्व चक्र बदललं. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ मध्ये आपल्या देशात मर्यादित षटकांची विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. २०११ ते २०२३ एक तप पूर्ण होत आहे... म्हणून आपली भाबडी अपेक्षा.
महिलांचाही वर्ल्डकप
ज्याप्रमाणे पुरुषांकडून पुन्हा विश्वकरंडक जिंकण्याची अपेक्षा आहे, त्याचप्रमाणे महिला संघाकडूनही प्रथमच विश्वविजेते होण्याची उत्सुकता आहे. महिलांची टी-२० विश्वकरंडक स्पर्धा न्यूझीलंडमध्ये नववर्षात लगेचच, म्हणजेच फेब्रुवारीत नियोजित आहे.
अगोदर मिताली राज, आता हरमनप्रीत कौर कर्णधार असलेल्या आणि स्मृती मानधनासारख्या हरहुन्नरी खेळाडू असलेल्या आपल्या महिला संघाने नेहमीच आशादायी कामगिरी केलेली आहे. मात्र, त्यावर विश्वविजेतेपदाची मोहोर कधी उमटते याची वाट पाहायची.
हॉकीचाही वर्ल्डकप जिंकायचाय?
क्रिकेट भलं आपल्या देशात सर्वाधिक लोकप्रिय असेल; पण हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची भुरळ हिटलरला पडली होती. ऑलिंपिक सुवर्णपदकांचा मोठा इतिहास असला तरी हॉकीचा विश्वकरंडक आपल्या संघाने एकदाच जिंकलाय आणि तोही १९७५ मध्ये.
आता युरोपियन वर्चस्वात आपला संघ पाठी पडतोय; पण नववर्षाच्या सुरुवातीस यंदाची विश्वकरंडक स्पर्धा भुवनेश्वर येथे होत आहे. ओडिशा राज्याने बघता बघता हॉकीची संस्कृती निर्माण केलीय. पाहू या हा वर्ल्डकप तरी प्रदीर्घ कालावधीनंतर हाती लागतोय का!
अनुस्वाराखालचा मजकूर...
ऑलिंपिकनंतर आपल्यासाठी तेवढीच महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा असते ती एशियन्स गेम्स अर्थात आशिया स्पर्धा. तसं हे वर्ष आशिया स्पर्धेचं नाही. २०२२ मध्ये ही स्पर्धा होणं अपेक्षित होतं, परंतु कोरोनाचं जन्मस्थान असलेल्या चीनमध्ये नियोजित वेळेत ही स्पर्धा होऊ शकली नाही. एका वर्षासाठी स्पर्धा लांबणीवर टाकणं स्वाभाविक होतं;
परंतु चीनमध्ये कोरोनाने पुन्हा हाहाकार उडवला असल्याच्या बातम्या येत आहेत, त्यामुळे हांगझोऊ येथे सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अपेक्षित असलेली स्पर्धा पुन्हा लांबणीवर पडू शकते आणि तसं झालं तर २०२४ मध्ये ऑलिंपिक असताना ही स्पर्धा होणं कठीणच आहे.
ऑलिंपिक पात्रता मिळवण्याचं वर्ष
पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये नियोजित असल्यामुळे २०२३ या वर्षात सर्व खेळांच्या ऑलिंपिक पात्रता स्पर्धा-शर्यती असणार, परिणामी आपल्या खेळाडूंसाठी वे टू ऑलिंपिक हा प्रवास या वर्षात होणार असल्याने हे वर्ष तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यातच जर हांगझोऊ आशिया स्पर्धा झाली, तर खेळाडूंना दोन पातळ्यांवर लढावं लागणार आहे, तेही तेवढं सोपं नसेल.
अशी आहे नववर्षातील निवडक क्रीडा स्पर्धांची मेजवानी
१३ ते २९ जानेवारी : विश्वकरंडक हॉकी स्पर्धा (भुवनेश्वर)- १६ ते २० जानेवारी ः ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस (मेलबर्न)
११ ते १५ जानेवारी : महाराष्ट्र केसरी (पुणे)
१ ते ११ फेब्रुवारी : फिफा क्लब वर्ल्डकप फुटबॉल (मेक्सिको)
१४ ते १९ मार्च : ऑल इंग्लंड बॅडमिंटन (लंडन)
१५ ते ३१ मार्च : महिला विश्वकरंडक बॉक्सिंग (नवी दिल्ली)
२८ मार्च ते २ एप्रिल : आशिया कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा
२२ ते २८ मे : जागतिक टेबल टेनिस स्पर्धा
२८ मे ते ११ जून : फ्रेंच ओपन टेनिस
३१ मे : युरोपा लीग फायनल
२ जून : डायमंड लीग (रोम)
१० जून : चॅम्पियन्स लीग फुटबॉल अंतिम सामना
१६ ते २० जून : कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना
३ ते १६ जुलै : विम्बल्डन
१४ ते ३० जुलै : जागतिक जलतरण स्पर्धा
२० जुलै ते २० ऑगस्ट : फिफा महिला विश्वकरंडक
१९ ते २७ ऑगस्ट : जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा
२१ ते २८ ऑगस्ट : जागतिक बॅडमिंटन स्पर्धा
२८ ऑगस्ट ते १० सप्टेंबर : अमेरिकन ओपन टेनिस (वॉशिंग्टन)
२ ते १७ सप्टेंबर : जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धा
१६ ते २४ सप्टेंबर : जागतिक कुस्ती अजिंक्यपद
२३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर : हांगझोऊ आशिया स्पर्धा
ऑक्टोबर - नोव्हेंबर : ५०-५० षटकांची विश्वकरंडक स्पर्धा (भारत)
१३ ते १७ डिसेंबर : बॅडमिंटन वर्ल्ड टूर फायनल्स
डिसेंबर : एएफसी आशिया कप फुटबॉल
इतर महत्त्वाचे
आयपीएल : एप्रिल ते मे
महिला आयपीएल : कार्यक्रम निश्चित नाही
प्रो कबड्डी : आशिया स्पर्धेच्या कालावधीनुसार
अॅशेस : जून ते जुलै
भारताचा क्रिकेट कार्यक्रम
जानेवारी : श्रीलंकेविरुद्ध ३ एकदिवसीय व ३ टी-२० (भारतात)
जानेवारी - फेब्रुवारी २०२३ : न्यूझीलंडविरुद्ध ३ एकदिवसीय व ३ टी-२० (भारतात)
फेब्रुवारी - मार्च २०२३ : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी आणि ३ एकदिवसीय (भारतात)
जुलै - ऑगस्ट २०२३ : वेस्ट इंडीज दौरा २ कसोटी आणि ३ एकदिवसीय व ३ ट्वेन्टी-२०
सप्टेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ एकदिवसीय सामने (भारतात)
ऑक्टोबर - नोव्हेबर : एकदिवसीय विश्वकरंडक (भारतात)
नोव्हेंबर २०२३ : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ टी-२० (भारतात)
डिसेंबर २०२३ - जानेवारी २४ : दक्षिण आफ्रिका दौरा : २ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ३ टी-२०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.