सुंदर, मोहक आणि लक्षवेधक अशा चित्रांत काळा डाग जाणीवपूर्वक शोधण्याचा काहींचा स्वभावाच असतो. अशा लोकांना चांगलं काही दिसतच नाही. वाईट काही घडत नसलं, तरी विनाकारण मिठाचा खडा टाकण्यात असे लोक बहाद्दर असतात. निरर्थक बोलणारे बडबड करत राहतात आणि वाद निर्माण करणारे हवेत बुडबुडे सोडतात, असा काहींचा स्वभावगुण असतो पण, कधी-कधी जाणीवपूर्वक असे प्रकार केले जातात त्यांना नतद्रष्ट असं म्हटलं जातं.
भारतातील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा विजेता ठरण्यासाठी आता काही तासांचा अवधी आहे. गेल्या दीड महिन्यापासून तयार करण्यात येत असलेल्या क्रिकेट महोत्सवाच्या या चित्राला गालबोट लावणारे तयार झाले नसते, तर वर्तुळ पूर्ण होणार कसं. एवढी पार्श्वभूमी तयार केल्यावर तुमच्या लक्षात आलं असेलच, की कोणता मुद्दा या लेखातून उपस्थित करायचा आहे ते....वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टी बदलावरून जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेला वाद!
ऑस्ट्रेलियातल्या माध्यमांच्या नतद्रष्टपणाची बरोबरी कोणीच करू शकत नाही. त्यांना कधीच स्वतःशिवाय दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहवत नाही. हे आज-कालचं नाही, तर पूर्वापार चालत आलं आहे. जिंकण्यासाठी काय वाटेल ते करण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. कर्णधार इयन चॅपेल यांनी पराभव टाळण्यासाठी स्वतःच्या भावाला अंडरआर्म चेंडू टाकायला सांगितलं होतं.
भारतातील एका कसोटीत ‘डीआरएस’चा निर्णय घेऊ, की नको याची खूण करून विचारणा करण्यासाठी ड्रेसिंग रूमची मदत घेणं आणि प्रकरण अंगाशी आल्यावर ‘ब्रेन फेड’ म्हणून आम्ही नाही त्यातले असं भासवणारे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेंडू कुरतडण्यासारखे गैरप्रकार करणारी टीम ऑस्ट्रेलियाचीच असते. एवढंच कशाला मंकिगेट प्रकरणात भारतीय खेळाडूंना गुंतवण्याचा प्रकार करणाऱ्यांत त्यांच्या मीडियाचाही तेवढाच सहभाग असतो.
नतद्रष्टपणाचा इतिहास असलेला ऑस्ट्रेलियाचा मीडिया दिमाखात प्रवास करणाऱ्या भारतातील विश्वकरंडक स्पर्धेबाबत अजून कसा वाद निर्माण करत नाही, असं वाटत असतानाच त्यांनी ‘वानखेडे’वरील खेळपट्टीवरून आपलं कुरूप रूप दाखवलंच.
याची नेमकी कुठून आणि कशी झाली, ते आता सविस्तरपणे पाहू या. दक्षिण आफ्रिकेला हरवून आपण अंतिम फेरी गाठू आणि भारताशी अंतिम सामना झाला, तर अहमदाबादची खेळपट्टी भारताच्या क्षमतेशी पूरक म्हणजेच, दुसऱ्या शब्दांत सांगायचं, तर फिरकीस साथ देणारी तयार केली जाऊ नये म्हणून हा खटाटोप होता.
भारत-न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामन्याच्या दिवशी बरोबर सकाळी ‘डेली मेल’ या ऑस्ट्रेलियतल्या वर्तमानपत्रात वानखेडेची खेळपट्टी अचानकपणे बदलली, असा रिपोर्ट आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि त्यांचे खेळपट्टी क्युरेटर अँडी अॅटकिन्सन यांचा उल्लेख असा बेमालूमपणे करण्यात आला, की त्यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.
‘प्रत्यक्षात तसं काहीच नव्हतं,’ असं मत त्यांनी नोंदवलं. मुळात ऑस्ट्रेलियाच्या ज्या पत्रकारानं खेळपट्टी बदलाची बातमी दिली, तो मुंबईत नव्हताच. ऑस्ट्रेलियाचा संघ कोलकत्यात उपांत्य फेरीचा सामना खेळणार असल्यानं त्यांचं लक्ष ‘ईडन गार्डन’वर असणं अपेक्षित होतं.
मागच्या रविवारी बारा तारखेला भारतीय संघ बंगळूरमध्ये आपला अखेरचा साखळी सामना खेळून सोमवारी मुंबईत आला. आल्या-आल्या प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफनं वानखेडे गाठलं. त्यावेळी बाजूबाजूच्या दोन खेळपट्ट्या नियोजित होत्या; परंतु, प्राधान्य होतं ते काही दिवसांपूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीला. बाजूच्या खेळपट्टीवर भारताचा श्रीलंकेविरुद्धचा सामना झाला होता.
त्यात भारतानं मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे साहजिक भारतीय संघ व्यवस्थापनानं स्वतःचा सामना झालेल्या खेळपट्टीवर उपांत्य फेरीचा सामना खेळवावा, असं सुचवलं. यजमान संघ अशा प्रकारे प्राधान्य मिळवत असतो, यात गैर काहीच नसतं. ऑस्ट्रेलिया त्यांच्या मायदेशात असंच करत असते.
आता महत्त्वाचा मुद्दा...जो न्यूझीलंड संघ भारताविरुद्ध खेळणार होता त्यांना कुठलीच अडचण नव्हती. वास्तविक भारतीय संघाच्या एक दिवस अगोदर ते मुंबईत आले होते. त्यांनी आधीची खेळपट्टी पाहिली होती. तरीही नाराजीचा एकही सूर त्यांच्याकडून लावण्यात आला नव्हता. मात्र, खेळपट्टी बदलली हे खुपलं कुणाला, तर ऑस्ट्रेलियाला.
बरं भारतीयांनी बाजूची खेळपट्टी निवडली; पण, ती स्वतःला अनुकूल करा, असा कुठलाही सल्ला दिला नव्हता. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियातच झालेल्या ‘ट्वेन्टी-२०’ विश्वकरंडक स्पर्धेत दोन्ही उपांत्य सामन्यांत अगोदरच्या सामन्यांसाठी वापरण्यात आलेली खेळपट्टी वापरण्यात आली होतीच. म्हणजे, भारतीयांनी काही मोठा गुन्हा केला, असं काहीच नव्हतं.
आता ज्या खेळपट्टीवर भारत-न्यूझीलंड उपांत्य सामना झाला त्यातला स्कोअर पाहू या...दोन्ही संघांच्या मिळून ९८.५ षटकांच्या खेळात ७२४ धावा. तीन शतकं, एक खेळी नाबाद ८० धावांची आणि महंमद शमी या एका गोलंदाजाकडून सात विकेट...प्रेक्षकांना भरभरून चांगल्या खेळाची मेजवानी. फलंदाज आणि गोलंदाजांना समान संधी...थोडक्यात, असं सर्व घडल्यानंतर खेळपट्टी बदलाचा बाऊ करणाऱ्या या मीडियाचा एक नव्हे, तर दुसरा गालही लाल झाला. तोंडावर आपटणं, असंही याला दुसऱ्या शब्दांत म्हटलं जाऊ शकतं.
सामना संपल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सननं हसत-हसत खेळपट्टी बदला संदर्भातल्या प्रश्नाची खिल्ली उडवली. आकडेवारीच बोलकी आहे, असं तो म्हणाला. तसंच, भारताच्या शुभमन गिलनंही खेळपट्टीवरून असं काही घडलं होतं?, असा प्रतिप्रश्न करत हा मुद्दाच बेदखल केला. सुनील गावसकर यांनी तर समालोचन करताना ‘थोबाड बंद करा...’ अशा तिखट शब्दांत चाबकाचे फटके मारले. ते स्वतः प्रतिकूल परिस्थितीत परदेशात क्रिकेट खेळले आहेत आणि त्यानंतर समालोचनाच्या माध्यमातून आताचंही क्रिकेट अनुभवत आहेत.
एकूणच, या प्रकरणाचा मथितार्थ असा, की सुंभ जळाला तरी भारताला नावं ठेवण्याचा ऑस्ट्रेलियतल्या मीडियाचा पीळ काही जात नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.