शरद पवार असामान्य कौशल्याचे धनी - गौतम अदानी

sharad pawar with adani
sharad pawar with adani
Updated on
Summary

शरद पवार यांना इतक्या विषयांत इतकी गती कशी असू शकते, याचं मला नेहमीच आश्चर्य वाटत आलं असल्याची भावना अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना व्यक्त केली आहे.

गौतम अदानी, चेअरमन, अदानी ग्रुप - बारामती... मी ज्या थोर नेत्याला ओळखतो, ते शरद पवार (Sharad Pawar) यांची ही जन्मभूमी आणि कर्मभूमी. पवार ज्यांच्याकडून मला गेल्या काही दशकांत खूप काही शिकायला मिळालं. सार्वजनिक हिताची धोरणं असोत; शिक्षण, इतिहास, शेती, संरक्षण, क्रीडा, माहिती तंत्रज्ञान असं कोणतंही क्षेत्र असो, की अगदी जागतिकीकरण, अशा विविध क्षेत्रांतलं त्यांचं सखोल ज्ञान, ग्रहण करण्याची त्यांची क्षमता आणि अशा विविध क्षेत्रांना, त्यातल्या माणसांना परस्परांशी जोडण्याचं, त्यांच्याशी जोडून घेण्याचं त्यांचं असामान्य कौशल्य स्तिमित करणारं आहे. या माणसाला इतक्या विषयांत इतकी गती कशी असू शकते, याचं मला नेहमीच आश्चर्य वाटत आलं आहे. त्यांच्याशी संवाद साधणाऱ्या माणसाकडे, तो सांगत असलेल्या मुद्द्याकडे त्यांचं पूर्ण लक्ष असतं आणि त्यातूनही ते अनेक बाबी टिपत असतात, शिकत असतात.

एक आठवण मला इथे नमूद करावीशी वाटते. पवार यांच्याबरोबर मी इटलीच्या दौऱ्यावर गेलो होतो. तिथल्या सुप्रसिद्ध ‘नॅशनल बफेलो स्पेसिज फार्मर्स असोसिएशन’ला आम्ही भेट दिली. त्या भेटीत तिथले अधिष्ठाता श्री. पवार यांना पशुसंवर्धनाविषयी माहिती देत होते. मोत्झरेला चीज ही इटलीची देणगी. या चीजसाठी मोत्झरेला म्हशीच्या दुधाचाच वापर केला जातो. या म्हशींना कोणतं खाद्य द्यावं लागतं, त्याचा दर्जा, त्यातले घटक कसे कायम ठेवावे लागतात, तसे ते न ठेवल्यास चीजच्या चवीवर व दर्जावर कसा परिणाम होतो, हे सारं ते सांगत होते. हे अधिष्ठाता त्या विषयातले तज्ज्ञ होते. त्यांच्याशी बोलताना पवार यांनी त्यांना असे काही प्रश्न विचारले, की त्यामुळे ते अधिष्ठाताही चकित झाले. पवार यांचं या विषयातलं ज्ञान किती सखोल आहे, हे आम्हालाही दिसून आलंच; पण ते अधिष्ठाताही पवार यांचे (आणखी एक) ‘फॅन’च बनून गेले. हे घडलं ते केवळ पवार त्या अधिष्ठात्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत होते म्हणून. कदाचित त्या अधिष्ठात्यापेक्षा पवारांचं त्या विषयातलं ज्ञान अद्ययावत व अधिक सखोलही असेल; पण पवार शांतपणे व आदरानं त्या अधिष्ठात्याशी संवाद साधत होते. त्याला प्रश्न विचारत होते. त्यातून कदाचित पवारही काही शिकत होते. आमच्यासाठी मात्र हा मोठा धडा होता.

sharad pawar with adani
क्रिकेट समजलेला अभ्यासू संघटक, पवारसाहेबांनी आयुष्याचं शतक पूर्ण करावं - गावस्कर

आपल्याबरोबरच्या लोकांचीही ते कशी कसोशीनं काळजी घेतात, हेही शिकण्यासारखं असतं. मला आठवतंय, आम्ही काही कुटुंबं पवार कुटुंबीयांबरोबर ट्रिपला गेलो होतो. त्या वेळी सर्वजण आपापल्या गाडीत व्यवस्थित बसले आहेत ना, याची खात्री करूनच ते स्वतः गाडीत बसले. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर प्रत्येकाला बसायला जागा मिळाली आहे, याची खात्री करूनच ते स्वतः स्थानापन्न झाले. या गोष्टी छोट्या वाटल्या, तरी त्यातून पवारांची दृष्टी दिसते. सुमारे दहा वर्षांपूर्वी पवारांनी मला बारामती भेटीचं निमंत्रण दिलं होतं. पवारांनी सुमारे दोन तास आपुलकीनं व आदरानं आम्हाला ‘त्यांची’ बारामती दाखवली. एखाद्या नेत्यानं जर मनापासून प्रयत्न केले, तर त्याच्या मतदारसंघाचा किती विकास होऊ शकतो आणि त्याचा लोकांना किती लाभ होऊ शकतो, हे मला तिथे दिसून आलं. गेल्या काही वर्षांच्या आमच्या परिचयातून मला आणखी एक महत्त्वाची बाब निदर्शनास आली. ती म्हणजे पवारांचा ज्यांच्यावर विश्वास आहे, त्या माणसांच्या मागे ते नेहमी भक्कमपणे उभे राहतात. त्या माणसांच्या पडत्या काळातही ते त्यांना साथ देतात.

पवारांविषयी शेवटी मी इतकंच म्हणेन... संत ऑगस्टीनचं एक वचन मला आठवतंय... तुम्हाला मोठं व्हायचंय, मग तुमच्यातला ‘मी’ गळून पडूद्या, तुम्ही आकाशाला गवसणी घालू इच्छिता, तर मग आधी माणुसकीचा पाया भक्कम करा. शरद पवार हे व्यक्तिमत्त्व असं आहे. त्यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्या शुभेच्छा...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()