तंत्रज्ञानाच्या गरुडभरारीची पाच क्षेत्रं

हे मी नवं काय सांगतोय असं वाटेल तुम्हाला. अनेक वेळा तुमच्या कानावर पडल्यानं गुळगुळीत वाटली तरी गोष्ट मात्र खरीच आहे.
तंत्रज्ञानाच्या गरुडभरारीची पाच क्षेत्रं
Updated on
Summary

हे मी नवं काय सांगतोय असं वाटेल तुम्हाला. अनेक वेळा तुमच्या कानावर पडल्यानं गुळगुळीत वाटली तरी गोष्ट मात्र खरीच आहे.

- शशी थरूर saptrang@esakal.com

हे मी नवं काय सांगतोय असं वाटेल तुम्हाला. अनेक वेळा तुमच्या कानावर पडल्यानं गुळगुळीत वाटली तरी गोष्ट मात्र खरीच आहे. या सदराच्या बहुसंख्य वाचकांच्या जीवनातील एकंदर बदलाचा वेग विलक्षण झपाट्यानं वाढतच चालला आहे.

यापूर्वीच्या काळात हा बदल इतक्या त्वरेनं होत नसे. साठ आणि सत्तरच्या दशकातील भारतात मी लहानाचा मोठा झालो. या सर्व काळात देशभरात फार मोठे बदल मुळीच झाले नव्हते. जे म्हणून बदल होत, ते सावकाश आणि क्रमाक्रमानं घडून येत असत. होणारा बदल इतका हळूहळू होत राही की तो फारसा डोळ्यात भरत नसे. सन १९५० मध्ये लोक राहत असलेली घरं, त्यांची वाहतुकीची साधनं, त्यांच्या खाण्या-पिण्याच्या आणि वापरातल्या वस्तू, ते वाचत असत ती पुस्तकं, त्यांची परस्परसंवादाची पद्धत, ते घरी-दारी आणि कामकाजात वापरत असत ती उपकरणं आणि साधनं, आकाशवाणीवरून ते ऐकत असलेले कार्यक्रम, त्यांचे सामाजिक नातेसंबंध अथवा व्यापार-उदीमातील कामकाजाची पद्धत यांत १९७५ हे वर्ष उजाडलं तरी फार मोठा फरक पडलेला नव्हता; पण १९७५ ते २००० या कालावधीत मात्र आपल्या देशात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारक परिवर्तन घडून आलं आणि परिवर्तनाचा हा प्रपात कोसळतच राहिला. एखादी बुलेट-ट्रेन यावी तसा हा बदल सुसाट आला आणि आपणा सर्वांना सोबत घेऊन वेगानं पुढं पुढंच जात राहिला. सन १९९१ हे आपल्या देशाला कलाटणी देणारं वर्ष ठरलं खरं; पण त्यापूर्वीच दहा-पंधरा वर्षं आपल्याकडे टेलिव्हिजनचं क्षेत्र विस्तारलं होतं. त्यात रंग भरले गेले होते. डाव्यांच्या प्रतिकाराला न जुमानता कॉम्प्युटरचा शिरकाव झाला होता. ठिकठिकाणच्या कार्यालयांत वर्ड प्रोसेसर्स, फॅक्स मशिन्स यांसारखं नवनवं तंत्रज्ञान वापरलं जाऊ लागलं होतं.

आणि मग उदारीकरण आलं, त्याबरोबर चकचकीत परदेशी गाड्या आल्या...तऱ्हेतऱ्हेची ग्राहकोपयोगी उत्पादनं आली... वैयक्तिक वापराचे संगणक आले...मोबाईल फोन आले...इंटरनेट आलं...आणि ई-मेल आल्या. आऊटसोर्सिंग सुरू झालं. परदेशी उद्योग आपल्या विविध प्रक्रिया भारतीय लोकांकडून भारतीय भूमीतच करून घेऊ लागले.

आपल्याकडे आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर सुरू झाली. आपल्यापैकी बहुसंख्य लोकांनी ज्यांची नावंही ऐकली नव्हती, अशा क्षेत्रांतील कंपन्या देशात उदयाला आल्या. एरवी ज्या उपलब्ध नव्हत्या अशा अनेक संंधी माझ्या पिढीतल्या तरुण पदवीधरांना प्राप्त होऊ लागल्या. नवनव्या विषयात त्यांना प्रभुत्व संपादन करता येऊ लागलं. नवनव्या व्यवसायांची दारं त्यांना खुली झाली.

आणि त्यानंतर या बदलाला आणखीच वेग आला. नवनवे उद्योग सुरू होऊ लागले आणि काही बंदही पडू लागले. सन २००५ ‘उगवते उद्योग’ म्हणवले जाणारे वैद्यकीय प्रतिलेखनासारखे (Medical Transcription) काही व्यवसाय २०१५ हे वर्ष उजाडेपर्यंत लुप्त होऊन गेले. (उदाहरणार्थ : उच्चारलेला ध्वनी ओळखून अचूक प्रतिलेखन करणारे स्वस्त सॉफ्टवेअर अस्तित्वात आल्यामुळे वैद्यकीय प्रतिलेखन हा व्यवसाय नामशेष झाला).

देशातील साक्षरतेचं प्रमाण आज वेगानं वाढत आहे; पण एकमेकांना पत्रं लिहिणं मात्र माणसांनी बंद करून टाकलेय. आपल्या प्रियजनांना लोक आता फोन करतात, ‘मेसेज’ किंवा ई-मेल पाठवतात. करमणूक आता सरकारी दूरदर्शन चॅनेलवरून किंवा डिस्कवरून घरात येत नाही. ती तुमच्या हातात तुमच्या फोनवर येते. पुस्तकं हातातल्या छोट्या पडद्यावर वाचता येतात. साक्षात् वाचनालयंसुद्धा काळाबरोबर राहण्यासाठी आपल्या वास्तूत आता संगणककक्षांची उभारणी करत आहेत.

कोरोनाच्या जागतिक महामारीच्या परिणामस्वरूप घरातूनच सगळं कार्यालयीन काम करणं ही आता केवळ एक शक्य कोटीतील बाब राहिली नसून कर्मचाऱ्यांची आणि कंपन्यांचीही ती आता ‘पहिली पसंती’ बनली आहे. व्हिडिओ-कॉन्फरन्सिंग सारख्या सोईंमुळे कामाचंही स्वरूप पार बदलून गेलं आहे. कार्यालयातून कागदपत्रं हळूहळू दिसेनाशी होत आहेत. टेलिमेडिसिन क्षेत्रात नवनव्या कल्पनांची सातत्यानं भर पडत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), रोबोटिक्स आणि इतर काही क्षेत्रांत दर आठवड्याला काही ना काही नाट्यपूर्ण घडामोडीची वदंता पसरतच असते. आपलं सगळं दैनंदिन जीवन आपल्यालाच अनोळखी होईल इतकं बदलून टाकण्याची क्षमता त्यात आहे. उद्याचा दिवस कालच्यासारखाच असेल असं गृहीत धरणं आज धोक्याचं ठरेल; किंबहुना उद्याचा दिवस आजच्यासारखाच असेल याचीही खात्री देणं सध्या कठीण होत आहे!

एकोणिसाव्या शतकाची समाप्ती आणि विसाव्या शतकाचा उदय होत असतानाच्या काळाइतकाच आपल्या जीवनातील हा काळही मोठा रोमांचक आहे. त्या छोट्या पर्वात टेलिफोनचा शोध लागला, वीज आपल्या हाताशी आली आणि स्वयंचलित वाहनांचं बस्तान बसलं. एवढ्या सगळ्या गोष्टी जवळपास एकाच वेळी झाल्या. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील या तीन घटनांमुळे त्या काळात संपूर्ण जग हे विघटन, पुनर्स्थापन आणि रूपांतरण अशा अवस्थांतून गेलं. तज्ज्ञांच्या मते, आपण जगतो आहोत त्या काळावर जणू त्याच शोधपर्वाचं प्रतिबिंब पडलेलं आपल्याला दिसतं.

भविष्यात डोकावत असताना प्रामुख्यानं पाच क्षेत्रात अत्यंत नाट्यपूर्ण तांत्रिक प्रगती होत असल्याचं आपल्या दिसून येतं.

१) रोबोटिक्स

२) दूरनियंत्रित (Remote Controlled) यंत्रांचा वापर

३) ऊर्जा (यात नव्या आणि अधिक परवडणाऱ्या ‘हरित’ ऊर्जेचा आणि तिच्या साठवणुकीचाही समावेश होतो)

४) कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वतःच स्वतःला प्रोग्रॅम देऊ शकणारी यंत्रं

५) क्रिप्टोकरन्सी, तसंच जिनोमिक्स (रेण्वीय जीवशास्त्राची एक शाखा) आणि DNA Sequencing यांचा समावेश असलेली ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ही ती पाच क्षेत्रं होत.

समांतरपणे उत्क्रांत होत असलेल्या यांपैकी प्रत्येक क्षेत्रात आपल्या जीवनात आश्चर्यकारक आणि नाट्यमय बदल घडवून आणण्याचं पुरेपूर सामर्थ्य दडलेलं आहे. अमेरिकी संशोधक आणि भविष्यज्ञ रे कुर्झवेल म्हणतात त्यानुसार, या एकविसाव्या शतकात केवळ १०० च नव्हे तर, चक्क २०००० वर्षांची प्रगती आपल्या वाट्याला येणार आहे. प्रत्येक कंपनीनं आणि प्रत्येक उद्योगानं एक खूणगाठ आता आपल्या मनाशी बांधली पाहिजे. अगदी नजीकच्या भविष्यकाळात त्यांच्यापैकी प्रत्येकाला एकतर विघटित व्हावं लागेल किंवा विघटक व्हावं लागेल. किंवा कदाचित दोन्ही व्हावं लागेल. होणाऱ्या बदलानुरूप स्वतःला बदलणं हाच प्रत्येकाचा मंत्र असला पाहिजे. एका जागी स्थिर राहणं हा नक्कीच मागं मागं जाऊ लागण्याचा ‘राजमार्ग’ ठरेल! परिवर्तनाच्या अवाढव्य चक्रात जग गरगरा पुढं निघून जाईल आणि तुम्ही मात्र जगाच्या मागं पडाल.

(सदराचे लेखक हे खासदार आणि माजी राजनैतिक अधिकारी असून, त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.)

(अनुवाद : अनंत घोटगाळकर)

anant.ghotgalkar@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.