सोशल डिकोडिंग : ‘समाज’शास्त्र उलगडताना...

यंदा कॉलेजची फी वाढलीय... गावाकडून शहरात शिकायला आलोय... पण कॉलेजात हॉस्टेलची सोय नाही... परीक्षेचं वेळापत्रक अजून निश्चित नाही....
Sociology
Sociologysakal
Updated on
Summary

यंदा कॉलेजची फी वाढलीय... गावाकडून शहरात शिकायला आलोय... पण कॉलेजात हॉस्टेलची सोय नाही... परीक्षेचं वेळापत्रक अजून निश्चित नाही....

यंदा कॉलेजची फी वाढलीय... गावाकडून शहरात शिकायला आलोय... पण कॉलेजात हॉस्टेलची सोय नाही... परीक्षेचं वेळापत्रक अजून निश्चित नाही....

असे एक न अनेक प्रश्न. कॉलेजच्या निवडणुका असोत, वा अभ्यासक्रमनिश्चिती- या सगळ्यांवर काम करणारी, अंमल ठेवून असणारी शिक्षणसंस्था, विद्यापीठ अशी एक व्यापक यंत्रणा कार्यरत असते. याशिवाय खासगी संस्था, सामाजिक संस्थाही यातील काही प्रश्नांच्या उपायांवर काम करत असतात. शासकीय आणि इतर यंत्रणेनं एका सूत्रात काम करावं यासाठी धोरणं असतात. ही धोरणं ठरवणारं सरकार असतं.

सरकार म्हणजे आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या जोडीला असणारी आपल्यातूनच नेमली गेलेली प्रशासकीय यंत्रणा. म्हणूनच म्हणतात, की सरकार हे समाजाचं प्रतिबिंब असतं. सरकारचे निर्णय आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतात, याचं हे प्रातिनिधिक उदाहरण. याशिवाय आरोग्य, सुरक्षा, कायदा, शेती, उद्योग असे इतरही अनेक मुद्दे आहेत. तरीही राजकारण, धोरण, प्रशासकीय रचना या सगळ्यांबद्दल बोलताना आपल्याकडे एक उदासीनता किंवा अज्ञान जाणवत राहतं.

तरुणी - तरुणांसोबत बोलताना ‘राजकारण’ म्हटलं, की दोन टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. एक म्हणजे ‘राजकारण, नको रे बाबा!’ आणि दुसरी म्हणजे ‘घरावर तुळशीपत्र सोडून राज(समाज)कारणात वाहून घेणं.’

जागरूकतेनं बघू या...

तरुणांच्या मनात राजकारणाबद्दलची उदासीनता अधिकच वाढतेय, असं सध्याचं चित्र आहे. ‘तरुणांचा देश’ म्हणून जागतिक ओळख असलेल्या भारताला तरुणाईची ही उदासीनता परवडणारी नाही. कारण सजग युवक हाच उद्याचा सक्षम नागरिक आणि मतदार असेल. त्यामुळे राजकारण, धोरण निर्मिती या सगळ्याकडे थोडं जागरूकतेनं बघणं आवश्यक बनलंय.

काळ बदलला, तंत्रज्ञानाचा आविष्कार होऊन रस्त्यावरच्या आंदोलनांची जागा हॅशटॅग ट्रेंड व्यापू लागलेत. माध्यमं बदलत आहेत. माध्यमांतून सर्वांपर्यंत राजकारण पोचतं. यात पारंपरिक माध्यमं बातमी किंवा मतमतांतरं मांडतात. डिजिटल आणि टीव्हीच्या माध्यमातून अक्षरशः लाईव्ह राजकीय आढावा आपण हल्ली बघतोय. आपल्या पिढीला अजून एक पर्याय उपलब्ध झालाय तो म्हणजे ‘समाजमाध्यमं.’ इथं आपल्या लाडक्या नेत्यांचे अपडेट्स आपण थेट मिळवूच शकतो; शिवाय आपलेही मुद्दे मांडायचं स्वातंत्र्य समाजमाध्यमांमुळे मिळतं; पण राजकारण म्हणजे केवळ माध्यमं हे सूत्र पूर्ण सत्य नाही. माध्यमांचा वाटा महत्त्वाचा आहेच; पण त्यापलीकडे राजकारणाचा आयाम व्यापक आहे. यात व्यवस्थापन आणि संवादकौशल्य आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात ‘समाजशास्त्र’ आहे.

समाजशास्त्रात राजकारणाच्या अनेक व्याख्या विद्वानांनी मांडल्या आहेत; पण आजच्या चर्चेच्या अनुषंगानं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील प्राध्यापक पॉल केली यांची मांडणी अधिक सयुक्तिक वाटते. ते म्हणतात, ‘राजकारण म्हणजे फक्त ठराविक प्रभावी लोकांचं सत्ता मिळविण्यासाठीचं द्वंद्व नाही किंवा प्रभावशाली लोकांनी एकत्र येऊन सरकार चालवणंही नाही. देशाच्या नागरिकांना अपेक्षित असलेला समाज निर्माण करण्याचं साधन म्हणजे ‘राजकारण!’

बदलत्या ट्रेंडनुसार राजकारणही बदलत जातंय, हे मान्य केलंच पाहिजे; पण या बदलातही कायम राहतो तो म्हणजे ‘समाजमनाचा’, ‘माणूसपणाचा’ धागा! ही माणसं.. नागरिक.. यांना वगळून राजकारण होऊच शकत नाही. पण नागरिक याबद्दल जागरूक किती असतात? यांना राजकारणाबद्दलची माहिती कुठून मिळते? नेमकी कोणती माहिती आवश्यक असते? तसंच राजकीय नेत्यांनी नागरिकांचा कल समजून घेण्यासाठी, समाजमनाचा कानोसा घेण्यासाठी नेमकं काय करायला हवं? बदलत्या तंत्रज्ञानाचे आणि माध्यमांचे समाजमनावर काय आणि कसे परिणाम होतात? आभासी जगातील प्रतिमानिर्मितीपलीकडे राजकारण काय असू शकेल?... या आणि अशा अनेक मुद्द्यांवर आपण येत्या वर्षभरात बोलणार आहोत.

राजकारण आणि धोरणनिर्मिती प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुसार सातत्यानं आणि वेगानं बदल होतोय. याच प्रक्रियेत मानवी समाजाला धरून अनेक गोष्टी आजही कायम आहेत. या सगळ्यावर सांगोपांग चर्चा व्हावी. एकतर्फी मांडणी न होता, संवाद व्हावा ही अपेक्षा आहे. तुमचेही अनुभव, प्रश्न असतील तर जरूर पाठवा. तज्ज्ञांद्वारे त्यांना उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करू. बोलत राहू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.