सावंतवाडी आणि लाकडी खेळणी यांच्या नात्यातली रेखीव वीण खूप साऱ्या रंगांनी, राजाश्रयाने, अनेक पिढ्या कोवळ्या चेहऱ्यांवर उमटणाऱ्या आनंदाच्या छटांनी आणि त्याबरोबर तितक्याच चढ-उतारांनी विणलेली आहे.
सावंतवाडी आणि लाकडी खेळणी यांच्या नात्यातली रेखीव वीण खूप साऱ्या रंगांनी, राजाश्रयाने, अनेक पिढ्या कोवळ्या चेहऱ्यांवर उमटणाऱ्या आनंदाच्या छटांनी आणि त्याबरोबर तितक्याच चढ-उतारांनी विणलेली आहे. याच प्रवासातला नवा टप्पा मला आज अनुभवायचा होता. सतराव्या शतकापासून चालत आलेली ही कला नव्या पिढ्यांच्या आगमनाने पारंपरिकता जपून आता ग्लोबल होण्याची स्वप्नं पाहत आहे. ग्लोबल भरारीसाठीचे पंख सध्या चिमुकले असले तरी त्यात शेकडो वर्षांच्या कौशल्याचं, समृद्ध इतिहासाचं बळ आहे. याच ग्लोबल होण्याच्या प्रयत्नांना दिशा देणाऱ्या तरुण कलात्मक हातांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अमितची मी भेट घेतली. अमित अर्थात अमित चितारी. मुंबईच्या जे. जे. फाइन आर्टचा गुणी विद्यार्थी.
कित्येक दशकं लाकडी खेळण्यांची कला जपणाऱ्या सावंतवाडीतील चितारी घराण्यात जन्मल्याने लाकडी खेळण्यांचा ब्रँड जन्मापासूनच त्याला चिकटलेला. त्याच्या सावंतवाडीजवळच्या कोलगाव येथील घर कम लाकडी खेळण्यांच्या कारखान्यात भेटायचं ठरलं.
भोसले घराण्याच्या सत्ताकाळात सतराव्या आणि अठराव्या शतकात सावंतवाडीत अनेक कलांना राजाश्रय मिळाला. तेलंगण, आंध्रमधील अनेक विद्वान ब्राह्मण, कलावंत या काळात इथे आले. याच कालावधीत तिसरे खेम सावंत अर्थात राजश्री राजगादीवर असताना लाकडी खेळण्याची कला सावंतवाडीत पोहोचली. लाखकाम या नावाने ती नावारूपास आली. त्या काळात (कै.) नारायण रामचंद्र केळकर आणि (कै.) विष्णू काशिनाथ म्हापसेकर यांच्या चित्रशाळा प्रसिद्ध होत्या. तिथे प्रशिक्षणही दिलं जायचं. कालौघात या चित्रशाळा बंद पडल्या आणि कलेलाही उतरती कळा लागली.
१९३० च्या दरम्यान गादीवर आलेल्या पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांनी ही कला पुनरुज्जीवित केली. लगतच्या गोव्यातील कलावंतांना इथे आणून त्यांना राजाश्रय दिला. ते चित्रकलेचं काम करत असल्याने त्यांना चितारी अशी ओळख मिळाली. आताही चितारी आणि काणेकर घराणं या कलेत सक्रिय आहे. पुढे पुन्हा या कलेला उभारीची गरज निर्माण झाली. प्रत्यक्ष कारभार पाहिलेले संस्थानचे शेवटचे राजे श्रीमंत शिवरामराजे भोसले आणि राणीसाहेब सत्त्वशीलादेवी भोसले यांनी या कलेला गतवैभव देण्यासाठी काम केलं.
राजमातांनी सांगितलेला हा इतिहास आज जसाच्या तसा आठवत होता, कारण आज मी या कलेचा नवा टप्पा अनुभवण्यासाठी जात होतो. घर कम कारखाना असल्याने तीन मजल्यांची ती इमारत खऱ्या अर्थाने लाकडी खेळण्यांचं घर वाटत होती. पाट रंगवण्यात व्यग्र असलेल्या अमितने हसतमुखाने स्वागत केलं. नेमकं काय जाणून घ्यायचं आहे हे समजून घेतल्यावर आधी आपल्या काकांची, उदय चितारी यांची भेट घालून दिली. त्यांच्याकडून या खेळण्यांचा पारंपरिक प्रवास मला समजणार होता.
ते मला दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेले. गप्पांच्या ओघात लाकडी खेळण्यांचा एक एक रंग ते उलगडत गेले. ते म्हणाले, ‘‘ही कला जपणारी आमची ही आठवी पिढी. आमचे पूर्वज गोव्यातून इथे आले. परंपरा जपत आम्ही या कलेचं जतन करत गेलो. पूर्वी पारंपरिक पद्धतीने खेळणी, पाट व इतर लाकडाच्या देखण्या वस्तू बनवायला खूप वेळ लागायचा.
सावंतवाडीची प्रसिद्ध असलेली लाकडी फळं, खेळणी त्याकाळात पांगारा, काळा कुडा, हेत या झाडांच्या लाकडापासून बनायची. मऊ लाकूड असल्याने त्यावर कलाकुसर करणं सोपं जायचं. ही प्रक्रिया साधारण वर्षभर चाले. लाकूड तोडून ते एक पावसाळा भिजत ठेवलं जाई. उन्हाळाभर ते सुकलं की, त्याचे छोटे-छोटे तुकडे केले जायचे. या तुकड्यांच्या आकारावरून त्यापासून कोणतं खेळणं, फळ बनवायचं हे ठरायचं. नंतर कोयत्याने लाकडाला त्या खेळण्याचा ढोबळ आकार दिला जायचा. हे काम खूप कष्टाचं असायचं, कुशल कारागीरच ते करू शकत होते. नंतर ड्रिल मशिन, करवत यांचा वापर करून अधिक स्पष्ट आकार साकारायचा. मग हे तयार ठोकळे विस्तवावर ठेवलेल्या लोखंडी जाळीवर टाकून गरम केले जात. असं केल्याने फिनिशिंग चांगलं येतं. नंतर लगेचच दात असलेल्या लोखंडी पट्टीने घासून या खेळण्यांमधील खडबडीतपणा नाहीसा केला जायचा. नंतर कानशीच्या साहाय्याने खेळण्याला किंवा फळाला हुबेहूब आकार दिला जायचा. खेळणी, वेगवेगळे तुकडे जोडून, तर फळं मात्र एकाच सलग लाकडात बनायची.’’
ते म्हणाले, ‘रंगकामाची पूर्वतयारी म्हणून छोटी-छोटी छिद्रं विशिष्ट प्रकारच्या चिकटमातीने आणि चिंचोक्यांपासून बनवलेल्या खळीच्या मिश्रणाने भरली जात. पुढे ती खेळणी सुकवून टप्प्याटप्प्याने चिंचोक्याच्या खळीचे पाच थर चढवले जात. पॉलिश पेपरने चांगलं घासून खेळणं रंगकामासाठी तयार व्हायचं.’
ते म्हणाले, ‘लाखमिश्रित रंग आणि तैलरंग अशा दोन प्रकारांत खेळणी रंगवली जात. लाख रंग टिकावू व अधिक चकाकी देणारे असतात. लाखेचा रंग देण्याची पद्धतही वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या नेहमीच्या वापरातील लाख वितळवून त्यात हवा तो रंग मिसळला जायचा. हा रंग लाखेसारखा घट्ट स्वरूपातच असायचा. केवड्याच्या सुकलेल्या पानांच्या मदतीने तो खेळण्यावर चढवला जात असे. गोल फिरणाऱ्या यंत्रात खेळणं अडकवून केवड्याच्या पानाला लाख रंग लावून तो जिथं द्यायचा तिथं दाबला जात असे, त्यामुळे रंग व्यवस्थित पसरायचा. तैलरंगात पानाऐवजी ब्रश वापरला जात असे.’’
लाकडी खेळण्यांचा पारंपरिक बाज बऱ्यापैकी समजला होता. आता बदललेला ट्रेंड समजून घ्यायला अमितला गाठलं. सफाईदार हातांनी पाटावर नक्षी रेखाटता रेखाटता तो आपला प्रवास सांगू लागला. अमित म्हणाला, ‘‘जे.जे.मध्ये शिक्षण पूर्ण केल्यावर मी मुंबईत एक फिल्म प्रॉडक्शन कंपनीत डिझाइनिंगचं काम सुरू केलं; मात्र आमची पारंपरिक कला मला सावंतवाडीकडे खुणावत होती. एकाक्षणी नोकरी सोडून गाव गाठलं. वडिलोपार्जित व्यवसायात गुंतलो. त्याकाळात कितीही काम केलं तरी आठवड्याला खेळणी किंवा अन्य वस्तूंचे शंभरच सेटच व्हायचे. शिवाय, लाकडाला आकार देणारे कारागीर मिळणं मुश्कील व्हायचं. यामुळे यात आधुनिक यंत्रसामग्री आणण्याचा निर्णय घेतला. सगळ्यात आधी सीएनसी लेथ मशिन घेतलं.
यामुळे दिवसाला पाचशे खेळण्यांचे सेट बनण्याएवढी क्षमता निर्माण झाली. पुढे नक्षीकामामधील मर्यादाही जाणवू लागल्या, त्यामुळे कार्विंगचं मशिन आणलं. नंतर लेझर मशिन आणून या व्यवसायात आणखी नवे प्रयोग सुरू केले. रंगकामातील मर्यादा लक्षात घेऊन बाजारात उपलब्ध रंगांचे नवे पर्याय वापरायला सुरुवात केली. लाकडाची उपलब्धता कमी असायची, त्यामुळे प्लायच्या वापराचा प्रयोग यशस्वी केला. आता भुशापासून वस्तू बनवण्याचा प्रयोगही सुरू आहे. या आधुनिकीकरणामुळे काम तर सोपं झालंच; पण उत्पादन क्षमताही वाढली. असं असलं तरी, या खेळण्यांचा पारंपरिक बाज मात्र आम्ही कायम ठेवला. बहुसंख्य रंगकाम हातानेच केलं जातं. यात शक्य तितक्या पारंपरिक गोष्टी, डिझाइन वापरण्याचा आमचा प्रयत्न असतो, त्यामुळे लाकडी खेळण्यांचं सौंदर्य टिकून आहे. या बदलामुळे मार्केटचा विस्तार झाला. मोठ्या शहरांमधून मागणी वाढली. गोवा, बेंगळूर, गुजरात इथेही आम्ही माल पाठवतो; मात्र मार्केटची वाढलेली मागणी पूर्ण करणं आजही शक्य होत नाही. यासाठी शासनस्तरावरून लाकडी खेळण्यांच्या व्यवसायाला खऱ्या अर्थाने ग्लोबल रूप देण्यासाठी प्रोत्साहनाची गरज आहे.’
लाख कला आणि आताचे आधुनिक रंग याबद्दल सांगताना अमित म्हणाला, ‘लाख रंग काही प्रमाणात आजही वापरले जातात. आधुनिक केमिकल रंग वापरताना आम्ही त्यात गम म्हणून पूर्वीप्रमाणे खाण्याचा डिंकच वापरतो. नॉन टॉक्झिन कलरचा वापर केला जातो. गंजीफासारखी कार्डं बनवताना आजही पारंपरिक रंगच वापरले जातात.’ अमित म्हणाला, ‘मध्यंतरीच्या काळात लाकडी खेळण्यांत चायना मार्केटने शिरकाव केला होता. कमी किमतीत पण तकलादू असलेली ही खेळणी होती. आता त्यांच्याशी स्पर्धा करावी लागत आहे. आम्ही त्यांच्या तोडीची; पण सावंतवाडीच्या कलेचा आधार घेत खेळणी बनवत आहोत. याला ग्राहकांचा प्रतिसादही चांगला मिळतो. या सगळ्या बदलांमुळे मार्केट काही पटींनी वाढलं आहे. पुढच्या काळात त्यातही बदलाचे प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात एज्युकेशन टॉइज, ब्रेन डेव्हलपमेंट करणारी खेळणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’
लाकडी खेळण्यांना जागतिक ओळख मिळाली असली तरी इतकी वर्षं उत्पादन मर्यादेमुळे त्याच्या खरेदीसाठी सावंतवाडीच्या चितार आळीतच यावं लागत होतं. आता मात्र अमितसारख्या नव्या पिढीतील कलावंतांच्या प्रयत्नांमुळे या खेळण्यांचं मार्केट ग्लोबल होण्याला पंख फुटू लागल्याची सुखद चाहूल मला परतीच्या प्रवासात जाणवत होती.
‘गोव्याचं वज’
गणेशोत्सवाआधी लाकडी खेळण्यांच्या कारखान्यात गोव्यात नवविवाहितांना देण्यासाठीचं ‘वज’ बसवण्याची लगबग असते. तिथे नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेरहून चतुर्थीच्या आधी रंगीत पाट, विळी, लाकडी फळं, पोळपाट-लाटणं आदींचा सेट देण्याची प्रथा आहे. यालाच ‘वज’ म्हणतात. यातला पाट वैशिष्ट्यपूर्ण असतो, त्यावर पोपटाची नक्षी कोरलेली असते. ‘किराचा पाट’ असंही याला म्हटलं जातं.
‘लाकडी खेळण्याची कला युनिक, राजस आहे, त्याला मागणीही मोठी आहे; मात्र अजूनही मागणीइतकं उत्पादन बनविण्यास मर्यादा आहेत. ही खेळणी ग्लोबल करण्यासाठी शासनस्तरावरून राजाश्रयाची गरज आहे.’
- अमित चितारी, लाकडी खेळणी व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.