मणिपूरमधले ते तीन दिवस...

मणिपुरी समाजजीवनाची कोणती वैशिष्ट्ये आमच्या मनावर ठसा उमटवून गेली, ते इथं मांडतोय.
Manipur
Manipursakal
Updated on

- शिवराज पिंपुडे, saptrang@esakal.com

पिंपरी-चिंचवडमधल्या आमच्या मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या दोन कार्यकर्त्यांनी, अर्थात मी स्वतः आणि आमच्या संस्थेचे कार्यवाह मनोज देवळेकर अशा आम्ही दोघांनी, पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या (PSVP) कार्याची माहिती घेण्याच्या निमित्ताने मणिपूरचा छोटेखानी दौरा केला. दिवंगत भय्याजी काणे यांनी ही संस्था स्थापन केली आहे. गेले काही महिने मणिपूर अशांत आहे; अस्वस्थ आहे.

त्याविषयीच्या बातम्या सध्या वाचायला मिळत आहेत. पण शांततेच्या काळात म्‍हणजे एप्रिलमध्ये आम्ही तिथे गेले होतो, त्या वेळी मणिपूर आम्हाला कसे दिसले, मणिपुरी समाजजीवनाची कोणती वैशिष्ट्ये आमच्या मनावर ठसा उमटवून गेली, ते इथं मांडतोय.

दिवस पहिला...

सकाळी ठीक सात वाजता आमचा इंफाळपासून खारासोमसाठीचा प्रवास सुरू झाला. पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानची पहिली शाळा उखरूल जिल्ह्यातील खारासोममध्ये सुरू झाली होती. ही शाळा बघणे, विद्यार्थ्यांना-शिक्षकांना भेटणे असा आजचा कार्यक्रम होता. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते नरेंद्र केणी हे सोबत होते.

जागोजागी उखडलेला रस्ता त्यात भर म्हणून ठिकठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे असलेली बाह्य वळणे आणि डोंगराळ भाग त्यामुळे सुमारे १६५ किलोमीटर अंतरासाठी सहा तासांचा प्रवास करावा लागला. आम्ही पोहोचलो तोवर शाळा सुटली होती. पण सगळे शिक्षक आमची वाट बघत थांबले होते. मुख्याध्यापक बसंतसिंग यांनी सगळ्या शिक्षकांचा परिचय करून दिला. शिक्षकांसोबत छोटेखानी बैठक झाली.

शाळेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आजूबाजूचा समाज नागा असूनही इथले मुख्याध्यापक – बसंतसिंग हे मात्र मैतेयी आहे. (मणिपूरमध्ये एका गावात एकाच जनजातीचे लोक राहतात.) बसंतसिंग हे पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे कार्यकर्ते असल्याने स्थानिक लोकांकडून कुठल्याही प्रकारचा त्रास त्यांना होत नाही

शाळेचा या वर्षीचा पट आहे १२९ विद्यार्थ्यांचा. शिशुवर्ग ते सातवीपर्यंत ही शाळा चालते. एकूण ११ अध्यापक शाळेत काम करतात. दोन्हीकडील शैक्षणिक अनुभवांची देवाणघेवाण झाली. इथली मुले कला-क्रीडा क्षेत्रातही उत्तम कामगिरी करत आहेत असे शिक्षकांच्या बोलण्यातून समजले. शिक्षकांचा गट एकदम उत्साही वाटला.

शाळेला छोटेखानी मैदान आहे. त्याच्या एका बाजूला दरी आहे. पण त्या बाजूने नेट बांधून मुलांना फुटबॉल खेळण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. मणिपुरी मुलांमध्ये फुटबॉलचे प्रचंड वेड दिसून आलं. मणिपूरच्या आमच्या वास्तव्यात अनेक ठिकाणी मुले फुटबॉल खेळताना दिसली. बसंतसिंग आवर्जून आम्हाला शाळेच्या गच्चीवर घेऊन गेले.

शाळेच्या गच्चीवरून भारत-म्यानमार सीमेवरील डोंगररांगा अगदी सहज पाहता येतात. शाळेतच आमच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. जेवण करून आजूबाजूचा परिसर बघून लगेचच परतीचा प्रवास सुरू केला.

आजूबाजूचा निसर्ग मन प्रसन्न करत होता. डोंगरातील विशिष्ट प्रकारच्या झाडांना लागलेली पांढरी फुले लक्ष वेधून घेत होती. पण तरी नजर मात्र पक्ष्यांना शोधत होती. आजच्या या येण्या-जाण्याच्या १२ तासांच्या प्रवासात आजूबाजूला दाट जंगल असूनही मोजून दोन पक्षी दिसले. मोठ्या प्रमाणावर प्राणी-पक्ष्यांची शिकार होते हे ऐकले होते... थोडे अंतर पुढे गेल्यावर एका गावातून तीन-चार युवक बंदुका, गलोल घेऊन जंगलाच्या दिशेने जाताना दिसले... पक्षी न दिसण्याचे कारण नजरेसमोर होते.

गाडीतूनच दिवसभराचा लेखाजोखा विविध व्हॉटस्ॲप ग्रुपवर पोस्ट केला. एका युवकाचा वैयक्तिक प्रतिसाद आला. त्याने विचारले, ‘खारासोम येथे रेंज होती का रे?’ त्याला म्हटले, संपूर्ण डोंगराळ प्रवासात रेंज नसलेले ठिकाण शोधूनही सापडले नाही. २०१८ साली तो जेव्हा या भागात गेला होता, तेव्हा रेंज अभावी मोबाइल चक्क बंद करून ठेवण्याची वेळ त्याच्यावर आली होती. चार वर्षांत परिस्थिती बरीच बदललेली आहे तर. रस्त्यांची कामेही जोरदार सुरू आहेत. एकूणच ‘कनेक्टिव्हिटी’वर जोरात काम करत असल्याचे जाणवले.

दिवस दुसरा...

आज चुराचांदपूर गाठायचे होते. पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानची दुसरी शाळा या गावात चालते. आजही खूप गप्पा झाल्या नरेंद्रजींशी प्रवासात. नरेंद्रजी चुराचांदपूर विषयी सांगत होते, “ इथले लोक एकमेकांना खूप धरून राहतात. गावात कोणाचे लग्न असले किंवा कोणाचा मृत्यू झाला तर सारा गाव लोटतो तिकडे. शाळेला अघोषित सुट्टीच असते त्या दिवशी... ” , नरेंद्रजी सांगत होते. बाराच्या सुमारास आम्ही शाळेत पोहोचलो. शाळेत केवळ शुकशुकाट होता.

नरेंद्रजीही गडबडले. आम्ही शाळेत येणार आहोत असे कालच त्यांचे बोलणे इथल्या मुख्याध्यापकांशी झाले होते. इतक्यात एक ताई त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या. “ गावात कोणाची तरी मयत झालीये; त्यामुळे सगळे तिकडे गेलेत,” ताईंनी माहिती पुरवली. गाडीत जे ऐकले होते ते प्रत्यक्षात अनुभवले. नरेंद्रजींनी ताईंचा परिचय करून दिला.

जयश्रीताई देसाई पुण्याच्या एका शाळेत काम करत असतानाच दिवाळी व मे महिन्याच्या सुट्टीत मणिपूरमध्ये जाऊन PSVP च्या शाळेत शिकवण्याचे काम करू लागल्या. (मणिपूरमध्ये दिवाळी व मे महिन्याची सुट्टी नसते. शाळा सुरू असतात. खूप पावसामुळे जुलैमध्ये तर खूप थंडीमुळे डिसेंबर-जानेवारी महिन्यात शाळांना सुट्ट्या असतात.) २०१७ मध्ये निवृत्त झाल्यानंतर दर वर्षी तीन-चार महिने जाऊन ताई शिकवण्याचे काम करू लागल्या.

कौतुक वाटले ताईंचे. ताईंनी मस्त चहा करून दिला. मग शाळेचा परिसर दाखवला. शाळेला प्रशस्त मैदान आहे. या शाळेत शिशुवर्ग ते ७ वी पर्यंतच्या वर्गातून सुमारे १८० विद्यार्थी शिकत आहेत. संस्थेचे कार्यवाह जयवंतराव कोंडविलकर व त्यांचे कार्यकर्ते शिक्षणाच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय एकात्मतेचे संस्कार करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.

आज संध्याकाळी मणिपुरात कार्यरत असणाऱ्या शुभान फाउंडेशनचे डॉ. नंदी व डॉ. वेदमणीताई यांची भेट नियोजित होती. जेवण, गप्पा यात बराच उशीर झाला. त्यामुळे पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या कार्यालयात जाण्यासाठी कोणतीही सार्वजनिक वाहन व्यवस्था उपलब्ध नव्हती. त्यामुळे डॉ. नंदी व डॉ. वेदमणी हे त्यांच्या गाडीतून आम्हाला सोडण्यास निघाले. साडेदहा वाजले होते. पान खाणार का, म्हणून नंदींनी विचारले. कोण नाही म्हणणार.

थोडी शोधाशोध केल्यावर एक ठेला सापडला. आणि रात्रीच्या १०/३० वाजता पानाच्या ठेल्यावर चक्क एक युवती पान लावत बसली होती. ही एक छोटीशी गोष्ट तिथल्या महिलाप्रधान संस्कृतीची निदर्शक वाटली. पान खाताना, “मनोजजी, इथल्या महिलांमध्ये तंबाखू/जर्दा खाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे,” वेदमणीताईंनी माहिती पुरवली.

पानासाठी शोधाशोध करताना अजून एक विशेष गोष्ट आम्हाला जाणवली होती. इतक्या रात्री बऱ्याच घरांच्या बाहेर महिला बसलेल्या दिसल्या. ही काय भानगड आहे, असे वेदमणीताईंना विचारले. त्यांनी दिलेल्या उत्तराने केवळ अवाक व्हायला झाले. रात्री १० नंतर जेवण वगैरे करून झालं, की साधारण तास-दीड तास महिला आपापल्या घराच्या बाहेर बसतात.

या महिलांचं काम म्हणजे रात्री उशिरा ज्या कोणी युवती, महिला घरी जात आहेत त्यांना काही अडचण होत नाहीये ना, कुठला मुलगा त्यांच्याशी दांडगाई करत नाहीये ना यावर लक्ष ठेवायचं. आणि चुकून असं काही असं काही वाटलंच तर रस्त्यावरील लाइटच्या पोलवर काठीने आवाज करायचा, मग काही क्षणात मोठा जमाव तिथे एकत्र होतो... पुढचे काही सांगायची गरज नाही. त्यामुळे इथे महिलांच्या वाट्याला जाण्याची हिंमत कोणी करत नाही. “इथे महिला अत्याचारांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे”, ताईंनी आणखी एक माहिती पुरवली.

दिवस तिसरा...

आजचा दिवस मणिपूर भटकण्याचा होता. भल्या सकाळीच मनोजरावांचे परिचित जीवनसिंग घ्यायला आले होते. आधी त्यांनी आग्रहपूर्वक त्यांच्या घरी नेले. घरातील सर्वांनीच खूप प्रेमाने स्वागत केले. काळ्या तांदळाची खीर खाऊ घातली. “सर, बरेच प्रेम आहे की तुमच्यावर.” मी न राहवून विचारले. “अरे बाबा, याचा भाऊ केशव ६ वर्षे माझ्याकडे राहायला होता. माझ्याकडे राहूनच त्याने शिक्षण पूर्ण केले.

आज दिल्लीत एका कंपनीत तो मोठ्या अधिकार पदावर आहे. या घरातील सगळ्यांना मी पूर्वीपासूनच ओळखतो.” (ज्ञान प्रबोधिनी संस्थेद्वारेही पूर्वांचलातील अनेक विद्यार्थी पुण्यात आणून शिकते करण्यात आले होते. श्री. मनोज देवळेकर हे सध्या ज्ञान प्रबोधिनी निगडीचे केंद्रप्रमुख आहेत.) जीवनसिंग यांच्या घराच्या अंगणातही कृत्रिम तळे बघायला मिळाले.

बहुतांश घरांसमोर अशी तळी बघायला मिळाली. त्यात मत्स्यपालन केले जाते. पावसाळा सुरू होईपर्यंत या तळ्यात मासेमारी केली जाते. पावसाळ्यात काही महिने माशांच्या प्रजोत्पादनाचा काळ असल्याने मासेमारी बंद असते.

जीवनसिंग यांच्या घरच्यांचा निरोप घेऊन मणिपूर दर्शनसाठी आम्ही बाहेर पडलो. शहरातील संग्रहालय, कांगला किल्ला असे बघून इंफाळमधील सर्वांत मोठे इमा मार्केट बघायला गेलो. प्रचंड मोठे मार्केट! आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मार्केट केवळ महिलांद्वारे चालवले जाते.

पुरुषांना इथे दुकान चालवण्यास परवानगीच नाही. वैविध्य तर विचारूच नका. सर्व प्रकारची म्हणजे कपड्यापासून ते फळे-भाज्यापर्यंत आणि पूजेच्या साहित्यापासून ते मासेमारीसाठी लागणाऱ्या साहित्यापर्यंत सर्व प्रकारची दुकाने या मार्केटमध्ये आहेत.

तोबा गर्दी बघायला मिळाली. अर्थात आम्हीही खरेदीचा आनंद लुटला. दुपारचे जेवण याच मार्केटमधील एका हॉटेलमध्ये झाले. थाळी होती. दौऱ्यात दोन-तीन वेळा थाळी घेण्याचा योग आला होता. इथल्या थाळीमध्ये शाकाहारी आणि मासे अशा दोन्ही गोष्टी असतात. त्यामुळे दोनतीन प्रकारचे मासे आणि पाच-सहा प्रकारच्या भाज्या ताटात असतात. काळ्या तांदळाची खीर असतेच असते.

अर्थात केवळ भात असतो. पण प्रत्येक पदार्थ चविष्ट. आजच्या दिवसभरात मनोजरावांनी एक वेगळीच गोष्ट टिपून ठेवली होती. 'शिवराज, आज खूप रस्ते भटकलो आपण. पण तुला कोठे भिकारी दिसला का?' खरेच की. आजच नाही गेल्या २/३ दिवसांतील वास्तव्यात एखाददुसरा अपवाद वगळता भिकारी नजरेस पडले नव्हते.

अशा अनेक आठवणी मनात साठवत आम्ही या दौऱ्याची सांगता केली.

(लेखक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या ‘मातृमंदिर विश्वस्त संस्थे’चे कोषाध्यक्ष आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.