महाभारताबद्दलच्या गैरसमजुतींना धक्का...

अमी गणात्रा लिखित ‘महाभारत अनरॅव्हल्ड’ या पुस्तकाचा दीपाली पाटवदकर यांनी मराठी अनुवाद केला आहे. ‘महाभारताचे अनावरण’ या नावानं हे पुस्तक मराठीत आलंय.
महाभारताबद्दलच्या गैरसमजुतींना धक्का...
महाभारताबद्दलच्या गैरसमजुतींना धक्का...sakal
Updated on

पुस्तकपरिचय

डॉ. रमा गर्गे,saptrang@esakal.com

अमी गणात्रा लिखित ‘महाभारत अनरॅव्हल्ड’ या पुस्तकाचा दीपाली पाटवदकर यांनी मराठी अनुवाद केला आहे. ‘महाभारताचे अनावरण’ या नावानं हे पुस्तक मराठीत आलंय. गणात्रा यांनी सुरुवातीला स्पष्ट केलंय महाभारत हा एक इतिहास आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या महान ग्रंथाकडे त्या बघत आहे. त्यांनी एकूण तीन भागांमध्ये या पुस्तकाची मांडणी केली आहे, पहिला भाग संदर्भ स्थापनेचा, दुसरा भाग व्यक्ती आणि घटनांचा तर तिसरा भाग काही विशेष माहितीचा, अशा तीन भागांमध्ये संपूर्ण महाभारताची मांडणी करण्याचा प्रयत्न गणात्रा यांनी केलाय.

ज्यांना महाभारत माहीत नाही त्यांच्यासाठी गणात्रा यांनी सुरवातीला कथेची थोडक्यात मांडणी दिली आहे. ज्यांना महाभारताचे पूर्वज्ञान आहे, त्यांच्यासाठी मात्र हे पुस्तक वेगळा दृष्टिकोन देणारे ठरतं. महाभारत वाचल्यानंतर किंवा दृकश्राव्य माध्यमातून बघितल्यानंतर अनेक प्रश्न उभे राहतात, काही गोष्टींचे विश्लेषण करावे वाटते, काही व्यक्तिरेखा समजून घ्याव्या वाटतात तर काही प्रश्न आपल्याला अनुत्तरीत असले तरी ते मांडावे वाटतात. महाभारतासारखा अत्यंत दिव्य असा ग्रंथ वाचल्यानंतर कोणाही संवेदनशील माणसाला त्यावर स्वाभाविकपणे व्यक्त व्हावं वाटतं. पांडव आणि कौरव यांच्या दोन बाजू महाभारतात आहेत. दोन्ही बाजूंकडे कमीअधिक प्रमाणात आपापली भूमिका कशी योग्य आहे, याची कारणं आहेत. पांडव, ज्यांना नायक मानलं जातं आणि जे शेवटी विजेते ठरले, त्यांना सतत विजनवास, दुःखच मिळाले. मग तरी त्यांचं जीवन सफल मानायचे का? जर तसं मानायचं असेल, तर मग त्यामागं कोणती सयुक्तिक कारणं आहेत? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. गणात्रा दुर्योधनाच्या मृत्युपूर्व हास्यात या प्रश्नाचं उत्तर आहे का, हे शोधू पाहाते.

हे पुस्तक मूळ महाभारताच्या संहितेला धरून आहे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या पुस्तकातून अनेक मिथकांचं स्पष्टीकरण करून मूळ वस्तुस्थिती काय आहे हे सांगितलं आहे. जसे की कृष्ण द्रौपदीच्या नात्याविषयी असलेले गैरसमज, द्रौपदीच्या केसांना भीमानं रक्त माखलं वगैरे मिथके ही कशी नंतरच्या काळात आलेली व काल्पनिक गोष्टींवर आधारित आहेत, हे गणात्रा स्पष्ट करतात. महाभारतात शकुंतला आणि सावित्री यांची उपाख्यानं आलेली आहेत. गणात्रा यांना या दोन्ही राजस्त्रियांचं विशेष महत्त्व वाटतं. त्यामुळं या दोघींच्याही कथा पुस्तकात स्वतंत्रपणे घेण्यात आल्या आहेत. महाभारतातील अनेक पैलूंवर गणात्रा प्रकाश टाकतात. जसे द्रौपदीची कन्या, दुर्योधनाची कन्या यांच्याविषयीची माहिती पुस्तकात मिळते, गांधारीनं कृष्णाला यदुवंश नाशाचा शाप दिल्यानंतर श्रीकृष्णानं त्यावर दिलेले उत्तर हे मुळातून वाचण्यासारखे आहे!

कृष्णाची उंची यातून परत एकदा लक्षात येते. धृतराष्ट्राचा भीमावरील राग कमी व्हावा म्हणून भीमाने दिलेले स्पष्टीकरण अशा अनेक गोष्टी गणात्रा अंधत्वाचा वसा या प्रकरणात जाताजाता सांगतात. महाभारतातील धार्मिक संवाद जसे - रणांगणातील कृष्णार्जुन संवाद, विदुरानं धृतराष्ट्राला दिलेला उपदेश, युधिष्ठिर - यक्ष संवाद, युधिष्ठिर नहुष संवाद, भीष्मांनी दिलेला उपदेश, द्रौपदीचा युधिष्ठिराला उपदेश, कुंतीने सांगितलेली संजय आणि विदुलाची कथा आदी बाबी गणात्रा यांनी संक्षिप्त स्वरूपात दिल्या आहेत. महाभारताचा भूगोल, युद्धाच्या व्यूहरचना, अर्जुनाची मुले, भीमाच्या नातवाची बर्बरीकची कथा, द्रौपदीच्या मुलांचे युद्धातील पराक्रम, नंतरच्या भागवत कथेत आलेले संदर्भ असे सगळे रोचकपणे या पुस्तकात उलगडून दाखवले आहेत.

या पुस्तकात आणखी दोन प्रकरणे विशेष आहेत, ती म्हणजे विनाशकारी मैत्री आणि पोषक मैत्री. कर्ण-दुर्योधन यांची मैत्री, ही मैत्र म्हणून मौल्यवान असली, तरीही ती दोघांनाही विनाशाच्या गर्तेत घेऊन गेली. तर कृष्ण-अर्जुनाची मैत्री दोघांनाही सौख्य, समाधान देणारी ठरली. अनेक घटना, प्रसंग वर्णन करून गणात्रा यांनी ही प्रकरणे उत्तम रंगवली आहेत. हे पुस्तक अनुवादित आहे, पण ते इतक्या प्रवाही भाषेत अनुवादित केले आहे की वाचताना कुठेही आपण अनुवाद वाचत आहोत असे वाटत नाही. उत्तम अनुवाद हा परकाया प्रवेशाइतका कठीण कार्यक्रम असतो. दीपाली पाटवदकर यांना तो उत्तम प्रकारे साधला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com