श्रावणात घन निळा बरसला

श्रावण मास येतो तोच कवितांची-गीतांची बरसात घेऊन. पावसाचा शिडकावा होऊन हिरवे गालिचे पसरू लागले की, वातावरणात आनंदीआनंद भरून जातो. अशा आनंदी क्षणांमध्ये कविता स्फुरते.
Lata Mangeshkar, shrinivas khale and mangesh padgaonkar
Lata Mangeshkar, shrinivas khale and mangesh padgaonkarsakal
Updated on

श्रावणात घन निळा बरसला

रिमझिम रेशिमधारा

उलगडला झाडांतुन अवचित

हिरवा मोरपिसारा

श्रावण मास येतो तोच कवितांची-गीतांची बरसात घेऊन. पावसाचा शिडकावा होऊन हिरवे गालिचे पसरू लागले की, वातावरणात आनंदीआनंद भरून जातो. अशा आनंदी क्षणांमध्ये कविता स्फुरते.

‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे... क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे’ ही शालेय जीवनात आपण शिकलेली बालकवींची कविता असो, ‘बलम केसरिया भीगा सावन है...मनभावन है, मोरा साँवरिया’ अशी भैरवी असो, ‘रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात, प्रियाविण उदास वाटे रात’ यासारखं मधुकर जोशी यांचं भावगीत असो अथवा ‘आया सावन झूम के’ हे हिंदी सिनेमातलं आनंद बक्षी यांचं गाणं असो... अशी कितीतरी मराठी-हिंदी कवींची-गीतकारांची प्रतिभा श्रावण महिन्याविषयी बहरून येत असते.

सत्तर-ऐंशी-नव्वदच्या दशकात तर कविवर्य मंगेश पाडगावकरांनी, दरवर्षी येणाऱ्या पावसाळ्याच्या सुरुवातीला वर्तमानपत्रातून पावसावर एखादी कविता लिहिली नाही, असं एखादंही वर्ष कधी जात नसे. पावसाळी कविता लिहिण्याच्या त्यांच्या या सातत्यावर एक विनोद त्या काळात प्रचलित होता. तो विनोद असा :

प्रश्न : ‘काय हो, यंदा अजून पाऊस का पडत नाही?’

उत्तर :‘अहो, पाडगावकरांची कविता अद्याप आलेली नाही म्हणून!’ पाडगावकरांच्या कविता होत्यासुद्धा दर्जेदार. वानगीदाखल ही बघा :

पाऊस आला याद घेऊन

ओली चिंब साद घेऊन

बाहेर जरी ढगातून पाऊस आला

खरं म्हणजे आतून आतून पाऊस आला

अशीच आणखी एक कविता पाडगावकरांनी लिहिली. त्यांना ती लोकल ट्रेनमध्ये सुचली आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांनी त्या कवितेला त्याच ट्रेनमध्ये बसल्याबसल्या चाल दिली. हा किस्सा सर्वश्रुत आहे. तीच ही कविता :

श्रावणात घन निळा बरसला

रिमझिम रेशिमधारा

उलगडला झाडांतुन अवचित

हिरवा मोरपिसारा...

कविता ऐकायला गोड तर आहेच; पण ती सरळ-सोपी वाटत असली तरी मोठ्या गहन अर्थानं ती भारलेली आहे. त्या अर्थाला वेगवेगळे पैलू आहेत. पृथ्वी आणि आकाश यांचं नातं हे सृजनाचं आहे. ग्रीष्माच्या उष्म्यानं तप्त झालेली अवनी वरुणाच्या स्पर्शासाठी आसुसलेली असते. आभाळ जेव्हा पाऊस होऊन धरतीवर कोसळतं तेव्हां ती तृप्त होते आणि धरणीवर अंकुर फुटतात. अंबर आणि सृष्टी यांच्या नात्याचं रूपक कवीनं राधा आणि कृष्ण यांच्या भेटीसाठी वापरलं आहे.

जागुन ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी

जिथे जिथे राधेला भेटे आता श्याममुरारी

माझ्याही ओठावर आले नाव तुझेच उदारा...

श्रावणात घन निळा बरसला...

हिरव्या हिरव्या मोरपिसाऱ्यात आता राधेला जिकडं तिकडं कान्हा दिसू लागला. त्याच्या भेटीनं ती स्वप्नात रंगून गेली. पाण्यावर पडणाऱ्या थेंबांनी निर्माण होणारी तरंगांची नक्षी जणू तिच्या मनावर उमटू लागली. भगवंताच्या गतजन्मातल्या भेटीचं स्मरण तिला पुनःपुन्हा होऊ लागलं.

रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी

निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी

गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा

श्रावणात घन निळा बरसला...

हिरव्याकंच रानावर पिवळ्याजर्द उन्हाची चादर पसरली, तशी मुरलीधराच्या भेटीनं पुलकित झालेली राधा तृप्त झाली. तृप्तीच्या सुगंधानं तिच्या मनाचा गाभारा भरभरून गेला.

पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले

माझ्या भाळावर थेंबाचे फूलपाखरू झाले

मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा

श्रावणात घन निळा बरसला...

मनात सतत रुंजी घालणारा अंतर्नाद ही प्रेमाची अभिव्यक्ती असते. ती अशी असते की मौनच सारं काही सांगून जातं. ज्याला अंत नाही, किनारा नाही असा प्रीतीचा सूर राधेला गवसला.

पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा

अशा प्रीतीचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा

अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा

श्रावणात घन निळा बरसला...

सृष्टीचा आणि आभाळाचा वापर जरी रूपकासाठी केला गेला आहे तरी त्यांच्यासुद्धा नात्यातला गोडवा प्रत्येक कडव्यातून वर्णन करताना पाडगावकरांनी भाषेचा फुलोरा फुलवत जे सुंदर सुंदर शब्दप्रयोग केले आहेत त्यांना दाद द्यावीशी वाटते.

नेत्रांतलं काजळ, रात्रीचा काळा अंधार, यमुनेच्या डोहातलं काळं पाणी असं जिथं जिथं काळं दिसेल तिथं तिथं राधेला ‘सावळ्या’ दिसायचा. कृष्णाचा सावळा रंग नजरेसमोर ठेवून त्यातला ‘घन-निळा’ हा शब्दप्रयोग खास घनश्यामासाठीच योजला गेला आहे.

घन निळा, रेशीमधारा, हिरवा मोरपिसारा, रंगांचे रान, स्वप्नांचे पक्षी, निळे रेशमी पाणी, थेंबबावरी नक्षी, गतजन्मीची ओळख, गंधित वारा, पाचूचे हिरवे माहेर, ऊन हळदीचे, थेंबाचे फुलपाखरू, गगनाचा गाभारा, नाद अनाहत, शब्दांवाचुन भाषा अशा अनेक शब्दप्रयोगांतून उपमांची आणि अलंकारांची रेलचेल या कवितेत दिसून येते.

योग्य त्या ठिकाणी पॅाझेस घेत आणि योग्य त्या ठिकाणी शब्दांचे उच्चार लांबवत लता मंगेशकरांनी हे गाणं फार छान गायिलं आहे.

संगीतकार आहेत श्रीनिवास खळे. बासरी, वीणा आणि तबला याच वाद्यांचा अतिशय खुबीनं वापर करत त्यांनी हे गीत सजवलं आहे. हे गीत संगीतबद्ध करताना त्यांनी सर्व अंतरे वेगवेगळे केले आहेत. धृपद कम्पोज केल्यानंतर अंतरा कुठं तरी सुरू करून पुन्हा धृपदावर येण्याची अवघड कामगिरी त्यांनी केलेली आहे.

या गाण्याविषयी प्रस्तुत लेखकाशी फोनवर संवाद साधताना विख्यात गायिका देवकी पंडित म्हणाल्या : ‘खळेकाका गाणं करताना एखादा राग धरून करत नसत. ते उत्स्फूर्त संगीतकार होते. ते ठरवून काम करत नसत. जेव्हा सुचेल तेव्हा ते चाली लावत असत. त्यांचा हिशेब अडनीड असायचा; पण तरीही ते गाणं तालात आणि लयीत बसवायचे.

‘तुमचं म्हणणं पूर्ण करा आणि मग समेवर या’ अशी त्यांची पद्धती होती. अंतरे वेगवेगळे करून पुन्हा धृपदावर येण्याची किमया त्यांना साध्य होत असे. तीच त्यांची खासियत होती. ते रिहर्सल फार करून घेत. साहजिकच व्यवस्थित, भावपूर्ण गायन होत असे.’ ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ किंवा ‘आनंदाचे डोही, आनंदतरंग’ असे संत तुकाराममहाराजांचे अभंग खळे यांनी सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवले आणि तितक्याच ताकदीनं त्यांनी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे शाहीर साबळे यांचं महाराष्ट्रगीतसुद्धा दिलं.

भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांना एकत्र आणून त्यांनी ‘राम-श्याम गुणगान’ हा अल्बम प्रकाशित केला. संगीतक्षेत्रातली ती ऐतिहासिक घटना होती. मला खळे यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला तेव्हा, झब्बा-पायजमा अशा वेशातल्या अतिशय साध्या आणि विनम्र; पण महान संगीतकाराला मी झुकून वंदन केलं.

पाडगावकरांनी अनेक गीतांतून आणि कवितांतून आपली प्रतिभा आणि भाषाप्रभुत्व दाखवून दिलेलं आहे. ‘शुक्रतारा, मंद वारा...चांदणे पाण्यातुनी’ या गीताच्या पुढच्या ओळीत त्यांनी ‘चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी’ असं लिहिताना स्वप्न एखाद्या गाण्यातून वाहत वाहत जात आहेत असं अतिशय रोमॅंटिक वर्णन प्रणयप्रसंगाचं केलं आहे.

हिरोशिमावर अणुबॅाम्ब पडल्यानं जणू सृष्टीचा विनाश होऊन वंशविच्छेद झाला होता, त्यानंतर हिरोशिमामध्ये गवताच्या ज्या पहिलं पात्यानं जमिनीतून डोकं वर काढलं, त्याविषयी पाडगावकरांनी लिहिलं. सृष्टीतली निर्मितिप्रक्रिया कधी थांबत नाही. सृजन हे सुरूच असतं. त्याविषयीची ही कविता पाहा :

पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार

कवच भूमिचे आणि अचानक

भेदुनि आले हिरवे कवतुक

नचिकेताचे स्वप्नच अवचित हो साकार

मातीची ही मात मृत्युवर

मृत्युंजय श्रद्धेचा अंकुर

हा सृजनांचा विजयध्वज, हा जीवन साक्षात्कार

पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार

पाडगावकर काहीसे निरीश्वरवादी होते. भोवतालच्या सृष्टीत ईश्वर असताना आकाशातल्या देवाकडे पाहण्याची गरज नाही, हे सांगताना ते लिहितात :

कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी

हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी

देव बोलतो बालमुखातुन, देव डोलतो उंच पिकातुन

अवतीभवती असुन दिसेना, शोधितोस आकाशी

विंदा करंदीकर-वसंत बापट-मंगेश पाडगावकर या कवित्रयीनं आपल्या भारावलेल्या कवितांनी मराठी जनांच्या मागील पिढीच्या मनावर गारुड केलं होतं. तिघंही काहीशा डाव्या विचारांकडं झुकलेले असले तरी त्यांच्या कविता मराठी मनात आजही रुंजी घालत असते. मराठी जनांचं सांस्कृतिक विश्व त्यांनी समृद्ध केलं.

जाता जाता : सन १९६८ मध्ये इयत्ता नववीत शिकत असताना एका काव्यवाचन स्पर्धेत मला मिळालेलं बक्षीस मी मंगेश पाडगावकरांच्या हस्ते घेतलं होतं, याचा आनंद आजही मनात साठून आहे.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.