भयचकित वनराजा तुज मी नमावे !

भारत हा लोकशाही राज्यपद्धतीने समाजाचे नियमन व संचालन करणारा देश असून सर्वधर्मसमभाव त्यात गृहीत धरला आहे.
भयचकित वनराजा तुज मी नमावे !
Updated on
Summary

भारत हा लोकशाही राज्यपद्धतीने समाजाचे नियमन व संचालन करणारा देश असून सर्वधर्मसमभाव त्यात गृहीत धरला आहे.

दिल्लीत संसदेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या अशोकस्तंभ राजचिन्हाच्या निमित्तानं ‘देशाचे सांस्कृतिक ध्येयधोरणे कोणते आहे?’ हा प्रश्न उपस्थित होतो. कला आणि  संस्कृतीच्या क्षेत्रातील सर्व प्रकारच्या शासकीय कार्यक्रमांचे, उपक्रमांविषयीचे नियमन आणि दिशादर्शन ज्याद्वारे केले जाऊ शकते असा सार्वजनिक धोरणाचा दस्त म्हणजे सांस्कृतिक धोरण, असे थोडक्यात म्हणता येईल. हे धोरण तयार करणे हे देशाच्या संस्कृती मंत्रालयाचे कार्य असते.

राजचिन्हाच्या निमित्ताने भारताच्या संस्कृती व सभ्यताविषयक धोरणाचा प्रश्न हा ‘देशाच्या सौंदर्यशास्त्रविषयक धोरणा’ चा प्रश्न बनला आहे. देशाची कला, साहित्य, संगीत, संस्कृती व सभ्यता (culture and civilization) विषयक धोरणे कोणती असावीत, यांचा खुलासा देणे याचा अर्थ ‘देशाचे सौंदर्यशास्त्र’ धोरण विकसित करणे असे होते.

भारत हा लोकशाही राज्यपद्धतीने समाजाचे नियमन व संचालन करणारा देश असून सर्वधर्मसमभाव त्यात गृहीत धरला आहे. ‘कोणत्याही धोरणात कोणत्याही एका विशिष्ट धर्माला अधिक अग्रक्रम, झुकते माप देणारा हा देश नाही’, ही भारतीय संविधानाची अधिकृत भूमिका आहे. त्यानुसार सौंदर्य व कला यांचे ज्ञान व उपभोग हा सर्वसामान्य नागरिकाचा हक्क असतो, तो प्रत्येक मतदाराच्या जनसंस्कृतीचा हिस्सा असतो, असे मान्य करण्यात आले आहे.

राजकारण, राजकारणी व सत्ताधिकारी मंडळी यांच्याविषयी जनमानसात बरेच गैरसमज असतात. ''राजकारण'' हा गलिच्छ प्रांत असून सभ्य, सुसंस्कृत, कलासक्त माणसांचा प्रांत नाही, सत्ताधिकारी मंडळींना कला व साहित्यविषयक जाण नसते, त्यांना कोणतीही सौंदर्यदृष्टी नसते, असे अनेक आवडते गैरसमज असतात. पण राज्याचे, पर्यायाने देशाचे सांस्कृतिक धोरण नेहमीच राज्याची व राज्यकर्त्यांची सौंदर्यविषयक जाणीव व्यक्त करत असते, हे लक्षात घेणे आवश्यक असते.

सौंदर्य व कला यांचा राजकारणाशी प्राचीन संबंध आहे. प्राचीन ग्रीक काळात तो सॉक्रेटिस-प्लेटोपासून, प्राचीन चिनी काळात तो लाओत्झेपासून आणि प्राचीन भारतात रामायण-महाभारत काळापासून आहे.

प्लेटोने कला आणि कलाकार यांना त्याच्या ''आदर्श राज्या'' तून हद्दपार केले, हे खरे असले तरी त्याने कलेचा अनुकरण सिद्धांतही मांडला व कलाकार-लेखकांना ‘साधू’ माणसाचा दर्जा दिला. (पण सामान्य माणसाकडे पाहाण्याची त्याची दृष्टी माणुसकीची व स्त्युत्य नव्हती, त्यामुळे बर्ट्रांड रसेल प्लेटोला फॅसिस्ट म्हणतो.) अॅरिस्टटलने जगातील पहिल्या काव्यशास्त्राची उभारणी केली.

भरतमुनी (इ.स.पू. पहिले शतक) ते जगन्नाथ पंडित (१७ वे शतक) आणि विसाव्या शतकातील आधुनिक साहित्य व कलामीमांसा असा व्यापक पट या परंपरेचा आहे. भारतीय सौंदर्य विचार मूलत: वैदिक असून त्यात जैन दर्शन व धर्म आणि बौद्ध दर्शन व धर्म यांच्या कलाविचारांचा समावेश केला जात नाही. भारतीय सौंदर्य विचारविश्वात पाली, अर्धमागधी व अन्य प्रादेशिक भाषिक व सांस्कृतिक उपप्रवाहांची चर्चाच केली जात नाही. म्हणूनच भारतीय साहित्य जिज्ञासा केवळ वैदिक संस्कृतच्या शिवेपाशी खुंटवली गेली, हे राजकारण बरे नाही, अशी टीका प्रसिद्ध विचारवंत व भाषातज्ज्ञ अशोक केळकर यांनी केली आहे.

आचार्य कौटिल्याने सौंदर्य व कला यांचा राजकीय हत्यार म्हणूनच वापर केला. त्याच्या मते त्याच्या लेखी सौंदर्य म्हणजे केवळ शारीरिक सौंदर्य आणि विशेष करून स्त्री सौंदर्य. मद्य आणि गणिका (मदिराक्षी) यांचा संबंध असल्याने राजाने सुराध्यक्ष नेमून सरकारी गणिकागृहे आणि गुत्ते उभारावीत, त्यांचा राजकीय उपयोग करावा, असा कायदा करण्यास करण्याची शिफारस कौटिल्य करतो. (सुराध्यक्ष २.२५.११, गणिकाध्यक्ष प्रकरण २.२७.२८, २९) कामसूत्रकर वात्सायनाच्या मते, राजकारण ही कला आहे आणि समाजहितासाठी नैतिक कृती करतो तो राजकारणी, अशी व्याख्या तो देतो. तथापि प्राचीन भारतात सौंदर्य व कला यांची रचनाच मुळात वर्णजातीजमाती व लिंगभेद यांचा पक्षपात करणारी राजकीय होती, असा प्राचीन आक्षेप आहे. विसाव्या शतकात या समग्र वैदिक सौंदर्यशास्त्राच्या तीव्र विरोधातून दलित सौंदर्यशास्त्र उदयास आले, पण ते अनेक कारणांमुळे सुव्यस्थितरीत्या मांडले गेलेले नाही.

मुसोलिनीचा राजकारणी शिल्पकार

विसाव्या शतकात मुसोलिनीने सौंदर्य व राजकारण यांचा थेट व उघड संबंध जोडला. त्याच्या मते राजकारण ही कला आहे आणि राजकारणी हा कलाकार असतो. पण त्याने सौंदर्याला अतिशय हिंसक रूप दिले. ‘नंतर’ काहीतरी ‘निर्माण’ करण्यासाठी राजकारणी ‘आधी’ कशाचा तरी ‘विनाश’ करतो. ‘साचे करणे’, ‘शिल्पे बनवणे’ आणि ‘आकार देणे’ ही कामे राजकारणी लोकांसाठी करतो. म्हणून ‘राजकारणी शिल्पकार’ असतो. मुसोलिनी या अर्थाने स्वतःला शिल्पकार समजतो. त्याने भयचकित करणारी शिल्पे तयार करवून घेतली आणि देशात अनेक सार्वजनिक ठिकाणी ती उभी केली.

मुसोलिनीच्या फॅसिझमवादाने आणि हिटलरच्या नाझीवादाने उग्र राष्ट्रवाद मांडला. त्यांच्या मध्यमवर्गाला वेगळे व स्वतंत्र स्थान देण्याच्या घोषणेची मध्यमवर्गीयांना भुरळ पडली आणि स्वार्थासाठी दोघांच्याही जुलूम - जबरदस्तीकडे दुर्लक्ष केले. (त्याचे प्रायश्चित्त त्यांना अर्थातच नंतर भोगावे लागले.) एरिक फ्रॉम या तत्त्ववेत्त्याने त्याच्या Escape from Freedom ग्रंथात या साऱ्यांचे अतिशय यथार्थ विवेचन केले आहे.

राजकारणाचं सौंदर्यीकरण

‘राजकारणाचे सौंदर्यीकरण’ (The aestheticization of politics) ही संज्ञा प्रथम वॉल्टर बेंजामिनने (१५ जुलै १८९२ ते २६ सप्टेंबर १९४०) तयार केली. हा जर्मन ज्यू तत्त्ववेत्ता, समीक्षक आणि निबंधकार होता. त्याने मुसोलिनी आणि हिटलर राजवटीला उद्देशून ही संज्ञा बनवली.

बेंजामिनच्या मते, फॅसिझम नव्याने उदय पावलेल्या मध्यमवर्गाला त्यांची संपत्ती सुरक्षित जपू देण्याची मुभा देवून एकत्र आणतो, त्यांना अभिव्यक्त होण्याची संधीही देतो, पण त्याआधी त्यांचे सारे सार्वजनिक अधिकार नकळत काढून घेतो. त्याची साहित्यिक तार्किक परिणती राजकीय जीवनात भयसूचक सौंदर्यशास्त्राच्या परिचयात होते. आणि असे फार पूर्वी घडलेले आहे. होमरच्या काळात ऑलिंपिककाळातील हिंसक प्राणी व माणूस यांच्या खेळातील सार्वजनिक मनुष्यहत्त्येची मजा लुटणारा वर्ग हा असाच अतिआत्मरत मध्यमवर्ग व उच्चवर्ग होता (पाहा: Gladiator हा चित्रपट). अठराव्या शतकात फ्रेंच राज्यक्रांतीच्या दरम्यान ‘गिलोटीन’ ची सजा पाहाणे सामान्य जनतेला सक्तीचे होते तर मध्यमवर्ग व श्रीमंतवर्ग ‘मनोरंजन’ म्हणून आवर्जून उपस्थित राहात होता.

सुसान बक-मोर्स या हयात अमेरिकन राजकीय तत्त्ववेत्तीने मुसोलिनीच्या ''राजकीय सौंदर्यशास्त्रा'' चे वर्णन ''संवेदनबधीर सौंदर्यशास्त्र'' (anaesthetized aesthetics) या शब्दात केले आहे.

दुष्टपणाचं सौंदर्यशास्त्र

फॅसिझम आणि नाझीवाद यांच्या सौंदर्य संकल्पनेच्या दुष्ट वापरामुळे गेल्या काही दशकात ''दुष्टपणाचे सौंदर्यशास्त्र'' (The Aesthetic of Evil) विषयावर बरेच लेखन झाले. The Photographer of Mauthausen हा ऑस्ट्रियामधील ''माऊथहाऊजन'' या नाझी छळछावणीवरील स्पॅनिश चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला. छळछावणीतील स्पॅनिश फोटोग्राफरची ही सत्यकथा आहे. या चित्रपटात एका फाशीच्या दृश्याचे चित्रीकरण आहे. त्या फाशीच्या दृश्याचे चित्रीकरण संगीतमय आणि सौंदर्यपूर्ण झाले पाहिजे, असा अतिशय कडक हुकूम एसएस नाझी अधिकाऱ्याने दिलेला असतो. त्यानुसार ते चित्रण करणे त्या चित्रकाराला भाग पडते!

दुसऱ्या महायुद्धकाळातील ''नरसंहाराचे छायाचित्रण'' (Photography of the Holocaust ) हाही एक गंभीर विषय आहे. तो आता अगदी विचित्रपणे ‘दृश्य संस्कृती’ आणि ‘दृश्य समाजशास्त्र’ या युरोप-अमेरिकेतील नव्या विद्याशाखांचा अभ्यासविषय बनला आहे. तो हळूहळू तेथे सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्याचे प्रयत्न होत आहेत.

सैतानाचं सौंदर्यशास्त्र

युरोपीय विद्यापीठे व इतर सामाजिक क्षेत्रात नाझींच्या गणवेशाचे बरेच संशोधन आता सुरु झाले आहे. अतिशय सुंदर दिसणारे, महागडे आणि मृत्यूसूचक विविध चिन्हे असणारे हे नाझींचे गणवेश होते. सैनिक व अधिकारी यांच्या वेगवेगळ्या अधिकार पदानुसार एकूण २४० गणवेश होते. उच्चाधिकाऱ्यांचे गणवेश सर्वाधिक दिमाखदार आणि अधिक चिन्हे असलेली असत. ‘विसाव्या शतकातील सर्वोत्तम पोशाख परिधान करणारी व्यक्ती’ या विषयावर जगप्रसिद्ध जीक्यू (GQ) या नियतकालिकाने १९९९ साली एक यादी प्रसिद्ध केली. त्यावेळी संपादकाने नाझी फिल्डमार्शल इर्विन रोमेलचे छायाचित्र प्रसिद्ध केले! (अर्थातच या संपादक महोदयाची तातडीने गचांडी वळण्यात आली.) रोमेल अतिशय उच्च दिमाखदार, प्रचंड महागडे, सोन्याची चमचमणारी सर्वाधिक स्कंधभूषणे असणारे विविध गणवेश परिधान करणारा होता. अर्थात हे सारे गणवेश व त्यावरील आभूषणे हत्याकांडातील ज्यूंची होती.

नाझींच्या गणवेशातील सैनिक आणि अधिकारी दृश्य म्हणून अतिशय विलोभनीय, चित्तवेधक, शिस्तबद्ध, सुबक, कवायतबद्ध असत. पण ते ''सुरक्षेचे नव्हे तर ''भयाचे गणवेश'' होते. फॅसिस्ट आणि नाझी गणवेश हे केवळ गणवेश नसून ते ‘सैतानाचे सौंदर्यशास्त्र’ (The aesthetic of evil - Fascist uniforms) होते, या निष्कर्षाला हे अभ्यासक आले आहेत.

अन्तोनिओ सेन्तेनो या हयात अमेरिकन शिंपी सद्गृहस्थाने “नाझी इतके दिमाखदार का होते?” (Why Were The Nazis So Stylish?) या विषयावर लघुचित्रपट बनवला. थोडक्यात, ‘राजकारणाचे सौंदर्यीकरण’ ही फॅसिझमची निष्पत्ति आहे. ती असे सांगते की आपले जगणे हा केवळ कलाविष्कार आहे आणि घाई करण्याची सत्ता असणाऱ्या लोकांना ती थेट कृती करण्याची मुभा देते. केशभूषा व वस्त्रभूषांच्या पद्धती नेहमीच राजकीय असतात. म. गांधीजींचा उत्तरायुष्यातील पंचा-धोतर हा पोशाख हे त्यांचे ‘राजकीय विधान’ होते आणि तत्कालिन भारतीय जनतेची स्थिती निदर्शक होते. पण विद्यमान राजकीय नेत्यांच्या वेशभूषा आणि राहाणीमान मात्र भारतीय जनतेची विद्यमान स्थिती दर्शवत नाहीत, उलट ती लपवतात, असे आढळते.

स्वस्तिकाचं गौडबंगाल

वस्तुतः ‘सौंदर्यशास्त्र आणि दुरिताची समस्या’ हा तत्त्वज्ञानातील एक प्राचीन प्रश्न आहे. पण नव्या रुपात तो समोर आला ते दुसऱ्या महायुद्धात. या दोन्ही चित्रफितीत वैदिक हिंदू ‘स्वस्तिक’ चा कसा गैरवापर हिटलरने करून घेतला त्याचीही माहिती दिली आहे. पण हिटलरने वापरलेले स्वस्तिक हे चिन्ह भारतीय स्वस्तिक नव्हते, अशी खळबळजनक माहिती देणारा The Silence of Swastik हा नुकताच प्रदर्शित झालेला माहितीपट धक्कादायक सत्य समोर आणतो.

गेल्या काही दशकातील भारतीय समाजातही या समस्या आढळतात. धर्मवादाची धार लावून त्या हेतुपूर्वक उग्र केल्या जात आहेत, असेही आढळते.

(लेखक तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि तत्त्ववेत्ते आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.