US Election 2020 : महासत्तेचे ध्रुवीकरण 

US Election 2020 : महासत्तेचे ध्रुवीकरण 
Updated on

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत टोकाच्या संघर्षात जो बायडेन यांनी बाजी मारली. आपण हरणे शक्‍यच नाही असं मनोमन ठरवून टाकलेल्या स्वप्रेमात आकंठ बुडालेल्या ट्रम्प यांचा पराभव झाला ही येऊ घातलेल्या अस्वस्थ दशकातली अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. बायडेन विजयी होताना ट्रम्प यांना, त्यांच्या प्रचाराला जो प्रतिसाद मिळाला त्यातून अमेरिकेत सरळ दोन गटात विभागणी झाली आहे, ती केवळ भूमिका - विचारांवर आधारलेली नाही. काळे - गोरे, आधी आलेले - नंतर आलेले, गरीब ब्लू कॉलर - पोट भरलेले सुखवस्तू अशी साऱ्या प्रकारची आहे. ट्रम्प यांच्या पराभवानं ही फाळणी संपत नाही. दोन्ही गट राहणार आहेत. त्यांच्यात सौहार्द ठेवणं आणि ध्रुवीकरणाची धार बोथट करणं हे अमेरिकेतलं आव्हान आहे तसंच जगभरातील लोकशाही देशातलंही. 

अमेरिकेत जोसेफ बायडेन नवे अध्यक्ष झाले. डेमॉक्रेटिक पक्षासाठी काही महिन्यांपूर्वी अशक्‍य वाटणारा विजय अमेरिकी जनतेनं त्यांच्या पारड्यात टाकला. ट्रम्प यांना हा निकाल मान्य नाही. पण त्याने आता फरक पडत नाही. कोविड - १९ च्या साथीआधी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय जवळपास निश्‍तिच मानला जात होता, मात्र ट्रम्प यांच्या साथीच्या विक्षिप्त हाताळणीतून वातावरण बदलत गेलं ते बायडेन यांच्या पथ्यावर पडलं. अर्थात तरीही या निवडणुकीने अमेरिकी जनता किती दुभंगलेली आहे याचं दर्शन घडवलं, तसंच ज्या सर्वात जुन्या लोकशाहीच्या गप्पा अमेरिकेत मारल्या जातात तिथली निवडणूक प्रक्रीया किती विसविशीत आहे याचंही दर्शन घडवलं. बायडेन विजयी झाले ते ट्रम्प यांची अनेक धोरण उलटी फिरवतील हे उघडच आहे. मात्र ट्रम्प यांच्या २०१६ च्या विजयाने जी बदललेली अमेरिका जगासमोर आली ते परिणाम संपलेले नाहीत. ट्रम्प यांच्या प्रचाराला आणि प्रत्यक्ष निवडणुकीत त्यांना मिळालेला प्रतिसाद अमेरिकेतील अस्वस्थतेला उदारमतवादी, भाडंवलशाहीनं संवेदनशीलपणे हाताळलं नाही तर ट्रम्प हे लक्षण पुन्हा पुन्हा डोकं वर काढेल याचा इशाराही निवडणूक देते. हे अमेरिकेत घडतं तेव्हा त्याचा परिणाम जगावर होतो. जागतिक व्यवहारात चीनच्या आक्रमकतेने आलेला, बदल रशियाच्या धाडसानं आणलेले बदल हे सारं जमेला धरलं तरीही अमेरिकेचा जगाशी वर्तन व्यवहार सर्वाधिक महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच केवळ निवडणुकीच्या निकालाचीच नव्हे तर त्यातून समोर येणाऱ्या अमेरिकी वास्तवाचाही दखल घ्यायला लागते. अमेरिकेतील दुभंगाची कारणं खोलवर रुजलेली आहेत वरवरच्या बदलांना मूलभूत परिवर्तन मानण्यातून जमिनीवरचं वास्तव बदलत नाही, हे ओबामा ते ट्रम्प या अमेरिकेतील प्रवासात दिसतं आहे. ज्या देशात पाणीही काळं आणि गोरं होतं तिथं ओबामांसारखा कृष्णवर्णीय अध्यक्ष झाला याचं मोठं कौतुक होतं ते साजरंही केलं गेलं. मात्र त्यामुळं अमेरिकी समाजातील फूट संपली नव्हती. ट्रम्प यांच्या राजकीय क्षितीजावरील आगमनानं ती स्पष्टपणे समोर आली. उघडपणे श्वेतवर्णीय ख्रिश्‍चनांची बाजू ते घेत होते. आणि हे लोकांना आवडत होतं. लोकशाही मूल्यं रुजलेली आहेत असं मानलं गेलेल्या अमेरिकेत श्वेतवर्णीय कामगारांचा आणि लॅटिनो म्हटल्या जाणाऱ्या दक्षिण अमेरिकी देशातील स्थलांतरितांचा भरघोस पाठिंबा ट्रम्प यांना मिळाला तो या निवडणुकीत कायम होता. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अतार्किक विचार 
अमेरिकेतील ट्रम्प यांची राजवट संपणं हा जगातील अनेक विचारी माणसांसाठी दिलासाच म्हणायचा. याचं कारण ट्रम्प हे लोकशाही मार्गानं निवडून आले असले तरी हुकूमशाहीची मूर्तिमंत लक्षणं त्यांच्यात ठायी ठायी आहेत. हम करेसो हा त्याच्या कार्यपद्धतीचा गाभ्याचा आहे. उघड वंशवादी लिंगभेदवादी, संपत्तीचं जाहीर प्रदर्शन मांडणारा, अनेक वर्षे करचुकवेगिरीचे आरोप असलेला, स्थलांतरित, मुस्लीमांविषयी आक्षेपार्ह भूमिका घेणारा नेता अमेरिकेचा अध्यक्ष झाला हेच आश्‍चर्य होतं. या निवडणुकीत ट्रम्प यांनी दिलेली झुंड अत्यंत अटीतटीची होती. खरंतर कशाला निवडणूक घ्यायला हवी मलाच तर लोकं निवडून देणार हा त्यांचा आविर्भाव होता. रशियासारखी पुतिनशाही आणता येत नाही, चीनसारखी एकपक्षीय हुकूमशाही लावता येत नाही हेच खरंतरं त्याचं दुखणं असावं. मात्र त्यांच्या अतार्किक धोरणांना, विचारांना ती मांडण्याच्या पातळीहिन पद्धतीला लोक दाद देतात तेंव्हा लोकशाहीच्या पोटात काय शिजतं आहे याचचं आश्‍चर्य वाटतं. अमेरिकेला साऱ्यांनी गंडवलं, याचं कारण आपण गंडवलो जात आहेत हेच अमेरिकेच्या आधीच्या कोणा अध्यक्षांच्या गावीही नव्हतं हा ट्रम्प यांचा सिद्धांत. 

पत सावरायची आहे 
बायडेन विजयी झाल्यानं कोरोनोत्तर जगातील एक वास्तव फार बदलत नाही. २००८ च्या अमेरिकेतील आर्थिक संकटानंतर जागतिक अर्थरचनेत आणि म्हणून भूराजकीय संबंध - हालचालीतही बदल होताहेत. नवी रचना आकाराला येते आहे. त्याचा वेग कोविड१९ च्या साथीने वाढवला. या रचनेत अमेरिकेशिवाय चीनचं स्थानही महत्त्वाचं बनतं आहे. कधीतरी या दोन देशांनी मिळून जगाचं नेतृत्व करावं असं स्वप्न दाखवलं जात होतं. तो पोक्तपणा चीनकडं नाही. शी जिनपिंग याच्या आक्रमक धोरणांनी ते कधीच भंगलं आहे. तेंव्हा या नव्या स्थितीत जगभरातील अनेक देशांना या किंवा त्या बाजूला जावं लागेल. अमेरिकेनं इराण रशियासारख्या देशांना चीनसोबत जाणं हाच पर्याय ठेवला आहे तर चीनच्या साहसवादानं अनेक देशांना अमेरिेकशी जवळीक अनिवार्य वाटेल असं वातावरण तयार केलं आहे. बायडेन यांच्या अध्यक्ष होण्यानं हे मोठ्या प्रमाणात बदलणार नाही याचं कारण चीनी वर्चस्ववादी हालचालीत आहे. अमेरिकेला स्पष्टपणे बाजू घेणारे देश हवे असतात. नाटो सदस्यांना अमेरिका वाटेल ती मदत करीत राहिली त्याचं कारण हेच. प्रश्‍न न विचारता अमेरिकी निर्णयाला मम म्हणणं यात अपेक्षित असतं. हे भारतानं नेहमीच टाळलं. आता चीन दारात उभा राहिल्यानंतर पुन्हा त्याच वळणावर भारत - अमेरिका संबंधांना आणून सोडलं आहे. भारत हा अमेरिकेचा जागतिक रचनेतला भागीदार बनू इच्छितो का? हा कळीचा मुद्दा आहे. बायडेन आल्यानं तो संपत नाही. दुसरीकडे चीनला रोखताना ट्रम्प यांच्या व्यूहरचनेत भारताचं स्थान महत्त्वाचं होतं. तसंच बायडेन यांच्यासाठीही असेल मात्र दोघांची चीनला रोखण्याची रणनीती सारखी नसेल. बायडेन यांनी पॅरिस करार पुन्हा सहभागी होऊ असं मतमोजणी सुरु असतानाच केलेली घोषणा पर्यावरण रक्षणासाठी आग्रही गटांना दिलासा देणारी असेल. करव्यवस्थेविषयी ट्रम्प बायडेन यांच्यात मोठे मतभेद आहेत ट्रम्प श्रीमंतांवर कर कमी करण्याच्या बाजूचे तर बायडेन गरजेनुसार हा कर वाढला पाहिजे असं सांगणारे. यातूनच बायडेन यांना डावे समाजवादी म्हणून प्रगतीला मारक ठरवण्याचे प्रयत्न ट्रम्प यांनी केला तो इतके टोकाला जाऊन केला की बायडेन विजयी झालेच तर वर्षभरात राजीनामा देतील नंतर कमला हॅरिस अध्यक्ष होतील, ज्या पूर्णतः समाजवादी दिशेनं वाटचाल करतील असं ते सांगत होते. टोकाचं ध्रुवीकरण करण्याची कोणतीही संधी ट्रम्प यांनी गमावली नाही. साहजिकच अशी फाळणी असलेला किंवा झालेला समाज सोबत घेऊन बायडेन यांना जागतिक व्यवहारातला घसरत चाललेली अमेरिकेची पत सावरायची आहे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.