टर्रेबाज ट्रम्पवाद

Donald Trump
Donald Trump
Updated on

अमेरिकेच्या निवडणुकीत ज्याला २७२ हून अधिक प्रातिनिधिक मतं मिळतील तो विजयी, हे घडताच प्रतिस्पर्धी हार मान्य करतात आणि पुढं काही महिन्यांनी विजयी उमेदवार प्रत्यक्ष अध्यक्षपदाची शपथ घेतो. हे सवयीचं चित्र. डोनाल्ड ट्रम्प नावाच्या उटपटांग नेत्यानं या वाटचालीला हरताळ फासायचा विडाच उचलला असावा. त्यातून त्यांच्या समर्थकांनी, जिथं निर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या विजयावर औपचारिक शिक्कामोर्तब होणार होतं, त्या कायदेमंडळाच्या कॅपिटॉल हिलवरच हल्लाबोल केला. याला बंड म्हणावं, निवडणुकीतला हिंसाचार म्हणावा की हे अमेरिकेच्या निवडणुकीच्या इतिहासातील अपघाती वळण की लोकशाही पोखरत निघाल्याचं लक्षण यावर चर्चा झडत राहतील. दुनियेला लोकशाहीचे धडे देत इतर ठिकाणच्या निवडणुकांतील त्रुटींवर बोट ठेवणाऱ्या अमेरिकी नाकझाड्यांना आपल्या बुडाखाली काय जळतं आहे याची लख्ख जाणीव या घटनेनं करून दिली आहे.

कॅपिटॉल हिलवर गोंधळ माजणं अगदीच दुर्मिळ नाही. संसदेची सभागृहं तिथंच आहेत आणि त्या परिसरात लोकांनी आंदोलनं करणं, त्यांची दखल सभागृहांना घ्यावी लागेल इतका गोंधळ घालणंही नवं नाही. इथल्या इमारती जाळण्याच्या ब्रिटिश सैन्याच्या सन १८१२ मधील प्रयत्नांपासून ते लोकप्रतिनिधींवर गोळीबार, अध्यक्षांना गोळ्या घालण्याचे प्रयत्न ते बॉम्ब पेरण्यापर्यंतचे उद्योग या इमारतींनी पाहिले आहेत. मात्र, सत्तेत असलेल्या अध्यक्षानं चिथावणी दिल्यानं जमलेला जमाव कॅपिटॉल हिल ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतो हे पहिल्यांदाच घडलं. तोही पराक्रम ट्रम्प यांच्या नावे नोंदला गेला. ‘लोकप्रिय मतं’ आणि ‘प्रतिनिधी मतं’ या दोन्ही आघाड्यांवर बायडेन यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, ट्रम्प यांना ‘योग्य मत मोजली गेली नाहीत, चुकीची मतं मात्र मोजली,’ असं वाटतं. ते त्यांनी आपल्या समर्थकांच्या गळीही उतरवलं, तेच त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांना पटवायचं होतं, यासाठीची त्यांची धमकावणीची भाषा जगासमोर आली आहेच. न्यायालयापासून ते अगदी त्यांच्या पक्षाचा निवडणूक अधिकारी ते आतापर्यंत पाठराखण करणारे उपाध्यक्ष पेन्स असे सारेजण ‘निकाल उलटा गेला आहे,’ या निष्कर्षावर आले तेव्हा समर्थकांना चिथावणं हा अखेराच मार्ग होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हा धडा इतर देशांसाठीही
‘निवडणूक लढवतो म्हणजे जिंकलंच पाहिजे, दुसरा कोणताही निकाल असूच शकत नाही, असला तर मला मान्य नाही,’ अशी ठणठणीत भूमिका घेणाऱ्या माणसाचं लोकशाहीशी काही देणं-घेणं असण्याची शक्‍यता नाही. ट्रम्प यांच्या रूपानं असा माणूस जगातील सर्वात जुन्या आणि स्थिर समजल्या जाणाऱ्या लोकशाहीत राज्य करत राहिला. अमेरिकेतील नागरी युद्धानंतरच्या इतिहासात सत्तेचं हस्तांतरण करताना इतका गोंधळ कधीच झाला नाही तो होऊ शकला, याचं कारण, मागच्या वेळी जागतिकीकरणातून आलेल्या समस्यांनी वैतागलेल्या अमेरिकी जनतेनं निवडून दिलेले ट्रम्प. स्वप्रेमात अखंड बुडालेला हा माणूस आपला पराभव पचवू शकत नाही. निवडणुकीत स्पष्ट पराभव झाल्यानंतरही हा निकालच बोगस ठरवावा यासाठी जमेल ते सारं ट्रम्प आणि त्याचे आततायी समर्थक करत राहिले. 

त्यांना रिपब्लिकन पक्षातील अनेक जण साथही देत होते. यात काही भाबडेही होते ज्यांना, ट्रम्प यांनी त्यांच्या हाती असलेली कायदेशीर आयुधं वापरण्यात गैर काय, असं वाटत होतं. मात्र, सत्तेपायी भ्रमिष्ट झाल्यासारखी ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांची अवस्था आहे. ते केवळ उपलब्ध कायेदशीर मार्ग वापरून थांबणारे नव्हतेच. त्यांचं खरं स्वरूप ट्रम्पसमर्थकांनी कॅपिटॉल हिलवर जो धुमाकूळ घातला त्यातून समोर आलं. या मंडळींना ‘निवडणुकीतील यश आपल्यापासून हिरावून घेतलं जातं,’ हा ट्रम्प यांचा युक्तिवाद पटला आहे. 

ट्रम्प यांच्या समर्थकांनी घातलेला गोंधळ हे कोणत्याही लोकशाहीदेशाला काळिमा फासणारंच वर्तन होतं. ट्रम्प यांची कारकीर्द ही सडकछाप वर्तन-व्यवहारानं गाजलीच; पण जाता जाता त्यांच्या समर्थकांनी ज्या रीतीनं धुमाकूळ घालायचा प्रयत्न केला तो अमेरिकेच्या इतिहासात नोंदला जाईल. कोणतीही लोकशाही कितीही वर्षं जुनी असली तरी आणि स्थिर वाटत असली तरी तिच्या पोटात खदखदणारी अस्वस्थता समजली नाही तर आणि लोकशाहीच्या बळकटीकरणाचे, लोकशाहीमूल्याशी विसंगत वागणाऱ्यांना रोखण्याचे, त्यांना उघडं करण्याचे प्रयत्न कायम ठेवले नाहीत तर काय होऊ शकतं हे अमेरिकेनं दाखवलं आहे. लोकशाही मानणाऱ्या सर्व देशांसाठी हा धडाही आहे. ट्रम्प पराभूत होणं हा दिलासा असेल तर ट्रम्पप्रणित राजकारण कुठल्या थराला जाऊ शकतं याचं अमेरिकेतील गोंधळानं घडवलेलं दर्शन हे ‘लक्षण दूर झालं, आजार नाही’ हे दाखवणारं आहे. नव्या अध्यक्षांपुढं या आजारावर इलाज करायचंही आव्हान असेल.

ट्रम्प यांची अहंमन्यता आणि सगळ्या  प्रश्नांवरची उत्तरं आपल्यालाच काय ती समजली आहेत हा आविर्भाव, त्यातील फोलपणा जगाला माहीत नव्हता असं मुळीच नाही. त्यांच्याविषयी काहीच निश्र्चित सांगता येत नाही एवढंच निश्र्चितपणे सांगता येत होतं, इतकं विचित्र वर्तन या माणसानं जगातील सर्वात शक्तिशाली पदावर काम करताना केलं. हेकेखोरपणा, तर्कदुष्टता याच्या साऱ्या मर्यादा ओलांडणारं त्यांचं वर्तन होतं. इतका उघड वंशवादी, बहुसंख्याकवादी, लिगंभेदवादी माणूस लोकशाहीप्रक्रियेतून अमेरिकेच्या अध्यक्षपदी येतो हेच मुळात आश्र्चर्य होतं. मात्र, त्याकडे केवळ आश्र्चर्य म्हणून किंवा ‘झाला एक अपघात’ म्हणून पाहणं किती धोकायदायक आहे याची जाणीव ट्रम्प यांच्या पराभवातही त्यांना मिळालेल्या समर्थनानं आणि या समर्थकांनी ‘आमचं म्हणणं मान्य होत नसेल तर झुंडशाहीवरच उतरू’ असा पवित्रा घेण्यानं दिली आहे. गुरुवारी ट्रम्पसमर्थकांनी घातलेला गोंधळ ही ट्रम्प यांच्या वाह्यात कारकीर्दीतीतील अखेरची काडी आहे. त्यांचं जाणं निश्र्चित आहे. हा गोंधळ ते टाळण्याचं, सत्तेचं हस्तांतर कटकटीचं बनवण्याचा शेवटचा मार्ग होता. त्याआधी ट्रम्प यांनी न्यायालयाचे दरवाजे खटखटवून झाले होते.

अमेरिकी न्यायालयात नियुक्‍त्या अध्यक्षांच्या संमतीनं होत असल्यानं सर्वोच्च न्यायालयात ट्रम्पकाळात रिपब्लिकन विचारसरणी मानणाऱ्यांचं बहुमत झालं आहे. त्याच ट्रम्प यांना लाभ होण्याची शक्‍यता मात्र प्रगल्भ अमेरिकी न्यायव्यवस्थेनं फोल ठरवली. ज्या ज्या राज्यात ट्रम्प यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरं जावं लागलं त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी हरकती घेतल्या, त्या फेटाळल्या गेल्या. मृतांच्या नावे मतदान झालं. ‘बोगस मतदान झालं’ या प्रकारचे वारेमाप आरोप केले गेले. यातलं काहीही कुठही ट्रम्प आणि ट्रम्पवाद्यांना सिध्द करता आलेलं नाही. अमेरिकेत प्रथेनुसार मतदानातून आलेल्या निकालावर अंतिम शिक्कामोर्तब उभय सभागृहाच्या प्रतिनिधींनी करायंच असतं ही उरते औपचारिकता. ज्यो बायडेन यांची निवड जाहिर करण्याची औपचारिकात पूर्ण करायची वेळ आली तेंव्हा त्यात अडथळे आणणारा हल्ला ट्रम्पसमर्थकांनी केला. त्यामुळं सभागृह तहकूब करावं लागलं. उपाध्यक्षाना सुरक्षित जागेवर हलवावं लागलं. नंतर सुरळीत झालेल्या सभागृहानं बायडेन यांचा विजय मान्य केलाच.

ओढवून घेतलेलं झिडकारलेपण...
ट्रम्प यांच्या वागण्याचा उबग आलेल्या अनेक रिपब्लिकन नेत्यांनी ‘आता बस झालं’ म्हणून ट्रम्प यांच्या आततायीपणाला साथ न देण्याचं ठरवलं. त्याचं प्रत्यंतर सभागृहाच्या चर्चेतही आलं. अमेरिकेत निवडणुकीचा निकाल बळानं बदलू पाहणारे दंगलखोर तयार झाले हे जसं दिसलं, तसंच पक्षापलीकडं जाऊन व्यापक देशहित आणि लोकशाहीसाठी नेते भूमिका घेतात हे अमेरिकी लोकशाहीतलं खणखणीत वैशिष्ट्यही या संघर्षात अधोरेखित झालं.  ट्रम्प गेले काही दिवस ते ज्या रीतीनं निवडणुकीतील निकालावर बोलत होते, त्यातून समर्थकांना चिथावलं जातच होतं. त्यांची महिन्याभरातील ट्विट्स, त्यांच्या कन्येनं दंगलखोरांचा देशभक्त म्हणून घेतलेला कैवार या बाबी ट्रम्प यांचा कल दाखवत होत्या. याचाच परिपाक ‘कॅपिटॉल’वरच्या हल्ल्यात झाला. याचा धक्का इतका मोठा होता की अमेरिकेच्या अध्यक्षांची समाजमाध्यमांवरची हालचाल संबंधित कंपन्यांना सक्तीनं बंद करावी लागली. उपाध्यक्ष माईक पेन्स यांनीही अखेर ‘अध्यक्ष लोकच निवडतात; प्रतिनिधिगृह किंवा अन्य कुणी नव्हे,’ अशी भूमिका घेत बायडेन यांची निवड जाहीर केली आणि ट्रम्प यांच्या हाती असलेला शेवटचा पत्ता रिकामा गेला. आता ट्रम्प हे अध्यक्ष या नात्यानं देशात मार्शल लॉ पुकारू शकतात. मात्र, इतकी शोभा झाल्यानंतर आणि जगभरातील नेत्यांनी, शांततेनं सत्तेचं हस्तांतर कसं आवश्‍यक आहे यावर कानपिचक्‍या दिल्यानंतर ट्रम्प असं टोकाचं पाऊल उचलण्याची शक्‍यता कमी. तरीही ‘कॅपिटॉल’वरच्या गोंधळानंतर अमेरिकेतील अनेक निरीक्षक ‘ट्रम्प यांच्यावर तातडीनं महाभियोग चालवून त्यांना बडतर्फ करावं...अवघ्या दहा दिवसांत (२० जानेवारी) बायडेन अध्यक्षपदाची शपथ घेतील तोवरही ट्रम्प यांना पदावर राहू देऊ नये, तोवर उपाध्यक्षांकडं सूत्र द्यावीत...ट्रम्प यांना बडतर्फ करून त्यांच्यावर तातडीनं खटला भरावा,’ असं सुचवत आहेत. केवळ ध्रुवीकरण हाच राजकारणाचा मंत्र बनवल्यानंतर हाती उरतं ते असं झिडकारलं जाणं. ते ट्रम्प अनुभवत आहेत.

दंगलखोरांच्या उच्छादानंतर बायडेन सांगत होते ते म्हणजे, ‘दंगलखोर अमेरिकेचं प्रतिनिधित्व करत नाहीत.’ ते खरंही आहे. अमेरिकेचे लोकनियुक्त प्रतिनिधी, न्यायालयं, निवडणूकयंत्रणा यातलं कुणी या वाह्यातपणाच्या कह्यात गेलं नाही हे खरंच; पण अमेरिकेत हे दंगलखोर तयार झाले आहेत हाही मोठाच बदल.

अमेरिकेतील हा राडा नेमका अशा वेळी घडतो आहे, जेव्हा उदारमतवादी लोकशाहीसमोरची आव्हानं बिकट होत आहेत. लोकशाहीमार्गानंच; पण ध्रुवीकरणाचं हत्यार बनवून, समाजात भिंती पाडून सत्ता मिळवणारे प्रवाह, त्यावर स्वार होणारे कथित कणखर नेते निवडणुकीपुरती लोकशाही मानत असले तरी लोकशाही मूल्यव्यवस्थेला खिळखिळं करत असतात. लोकानुनयाच्या आडून प्रत्यक्षात एकाधिकारशाही पोसली जाते, तिला विरोध करणारे देशद्रोही, अमेरिकेत चिनी एजंट ठरवले जातात. इतर देशांत असलीच शब्दरत्नं शहाणपणाच्या गोष्टी सांगणाऱ्यांच्या वाट्याला येतात. यातून मग प्रश्‍न सोडवण्यासाठी चिनी पद्धतीचा समाजवाद हा अक्‍सीर इलाज असल्याचं शी जिनपिंग यांना सांगता येतं, व्लादिमीर पुतीन यांना उदारमतवादाचे दिवस सरल्याचं सांगावंसं वाटतं, कुणा व्हिक्‍टर ओर्बन यांना ‘हंगेरीत आहे ती असहिष्णू लोकशाहीच,’ असं ठोकून सांगावंसं वाटतं. आपल्याकडे‌ही कुणा नोकरशहाला ‘फार झाली लोकशाही,’ अशी सुरसुरी येते. लोकशाहीमार्गानं प्रश्‍न सुटत नाहीत - रेंगळतात, असं दाखवत उलट्या प्रवासाला बळ द्यायचा प्रयत्न होतो. हे प्रवाह शीतयुद्ध संपल्यानंतर पहिल्यांदाच इतके बलिष्ठ होत आहेत. अशा वेळी अमेरिकाच नव्हे तर, कोणत्याही लोकशाहीदेशातील व्यवस्था लडखडणं हे बरं लक्षण नव्हे.

ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव करता येतो, ट्रम्पवादाचा नाही. त्यासाठी फूटपाड्यांना रोखावं लागतं, समाज जोडण्याला बळ द्यावं लागतं, जाणीवपूर्वक. अमेरिकेतील ट्रम्पूल्यांच्या उच्छादाची दखल यासाठीच घ्यायची.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.