जगाची विभागणी करणाऱ्या शीतयुद्धातील सोव्हिएत संघाचं नेतृत्व करणारे अखेरचे नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचं निधन झालं, त्यासोबत जगाच्या वाटचालीला कलाटणी देणारा एक दुवा निखळला.
जगाची विभागणी करणाऱ्या शीतयुद्धातील सोव्हिएत संघाचं नेतृत्व करणारे अखेरचे नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचं निधन झालं, त्यासोबत जगाच्या वाटचालीला कलाटणी देणारा एक दुवा निखळला. ज्या प्रकारच्या रशियाचं स्वप्न गोर्बाचेव्ह पाहत होते ते विस्कटताना हयातीतच त्यांना पाहावं लागलं. ज्या आदर्शांवर चालायचा त्यांचा प्रयत्न होता, त्याची पुरती वाट लावणाऱ्या व्लादिमिर पुतिन यांचा रशियाही त्यांना उतारवयात पाहावा लागला. ज्यांच्या सुधारणांना, काळाची हाक ओळखणारं धाडस म्हणावं की देशाला घसरणीकडे घेउन जाणारा मूर्खपणा, यावर रशिया आणि जग वाद घालत राहील; मात्र, दुसऱ्या महायुद्धानंतर जगाच्या इतिहासाला निर्णायक कलाटणी देणारा नेता हे त्यांचं स्थान बदलत नाही.
गोर्बाचेव्ह सोव्हिएत संघाचे अध्यक्ष झाले तेव्हा लष्करी आणि तंत्रज्ञानाच्या आघाडीवर सोव्हिएत संघ अमेरिकेशी टक्कर देत होता. मात्र, आर्थिक आघाडीवर रशियाचा डोलारा कोसळत होता. या दबावातूनच गोर्बाचेव्ह यांनी घेतलेले निर्णय शीतयुद्धाला पूर्णविराम देणारे ठरले, तसंच सोव्हिएत संघाचं विघटन करणारेही ठरले. गोर्बाचेव्ह यांना कम्युनिस्ट पक्षात आणि राज्यप्रणालीत सुधारणा करायच्या होत्या, अधिक लोकशाहीपद्धत आणायची होती आणि नागरिकांना स्वातंत्र्य द्यायचं होतं. त्यांच्या या प्रयत्नांत कम्युनिस्ट-राजवटीचाच अस्त झाला. इतकंच नव्हे तर, सोव्हिएत संघाच्या पंखांखाली असलेल्या पूर्व आणि मध्य युरोपातील अनेक देशांत लोकशाहीसाठीची आंदोलनं सुरू झाली, जी गोर्बाचेव्ह यांच्या आधीच्या काळात झाली असती तर निश्चितपणे बळाच्या जोरावर दडपली गेली असती. पूर्व युरोपातील हे देश एकापाठोपाठ एक सोव्हिएतच्या प्रभावातून बाहेर गेले. तिथं अमेरिकेचा आणि युरोपचा प्रभाव, त्यासोबतच कोणत्या ना कोणत्या प्रकारचं लोकशाहीचं मॉडेल राबवलं जाऊ लागलं. सोव्हिएत संघाच्या प्रभावाला ओहोटी लागत असतानाही गोर्बाचेव्ह यांनी बळाचा वापर केला नाही. शीतयुद्ध संपण्यात त्यांच्या या भूमिकेचा वाटा मोठा होता. ते संपताना अमेरिका आणि सोव्हिएत संघात काहीएक सर्वसाधारण सहमती झाली होती, तिचे हवे तसे अर्थ लावण्यातून भविष्यातील ताणाची पेरणीही झाली. युक्रेनच्या युद्धाला कारणीभूत ठरलेली ‘नाटो’ची रशियाच्या दिशेनं विस्ताराची भीती हे त्यातलंच एक.
चुकांच्या कबुलीचा उमदेपणा
गोर्बाचेव्ह यांनी ‘ग्लासनोस्त’ आणि ‘पेरेस्त्रोईका’ म्हणजे ‘खुलेपणा’ आणि ‘उदारीकरणाचं धोरण’ आणलं, त्याची किंमत त्यांना आणि रशियालाही मोजावी लागली. गोर्बाचेव्ह यांच्याकडे पाश्र्चात्य जग शांततेचा पुरस्कर्ता, त्यासाठी झळ सोसणारा नेता म्हणून पाहतं. रशियासाठी मात्र या शांततेची किंमत देशाच्या घसरणीकडे लोटणारी होती, देशाची जगातील प्रतिष्ठा खालावणारीही होती, जे कोणत्याच देशात सहजी स्वीकारलं जाणारं नसतं. गोर्बाचेव्ह रशियात सत्तेत येण्यापूर्वी ‘अमेरिकेशी प्रत्येक बाबतीत स्पर्धा करणारा देश’ अशीच रशियाची म्हणजे पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत संघाची प्रतिमा होती.
आर्थिक आघाडीवर रशिया कोलमडत गेला हे काही गोर्बाचेव्ह यांचं कर्तृत्व नव्हतं, तर हे वास्तव मान्य करायचं धाडस दाखवणारे ते नेते होते. ‘रशियाची घसरण होताना पाहत राहिलेला नेता,’ म्हणूनही गोर्बाचेव्ह यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. मात्र, राष्ट्राच्या जीवनात होणाऱ्या चुका मोकळेपणानं मान्य करायचं धाडस फार क्वचित असू शकतं, ते गोर्बाचेव्ह यांच्याकडे होतं.
रशियातील कम्युनिस्ट-व्यवस्थेत नेमकं काय सुरू आहे हे समजणं बाहेरच्या जगासाठी कठीण होतं त्या काळात, शीतयुद्धातील रशियानं अनेक विकतची दुखणी अंगावर घेतली होती, जी निस्तरण्याची आर्थिक सवड देशाकडे नव्हती. हे वास्तव समजून घेण्यातून गोर्बाचेव्ह याचं धोरण साकारत होतं. सोव्हिएत संघानं अफगाणिस्तानात फौजा पाठवल्या होत्या. अफागणिस्तानातील रशियाधार्जिण्या राजवटीला पाठिंबा देण्यासाठी ही कारवाई होती. मात्र, अफगाणिस्तानात ती मान्य झाली नव्हती. याचा लाभ घेत अमेरिकेनं पाकिस्तानच्या सहकार्यानं अफगाणिस्तानात मुजाहिदीनांच्या फौजा पोसल्या. अनेक ‘वॉरलॉर्डस्’ उभे राहिले, ज्यातून तो देश अखंड युद्धाच्या खाईत जळत राहिला. अमेरिकेच्या पाठिंब्यावर आणि पाकिस्तानच्या सक्रिय साथीनं तयार झालेल्या मुजाहिदींनी रशियन फौजांना मागं जायला भाग पाडलं होतं. गोर्बाचेव्ह यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा न बनवता रशियन सैन्य मागं घेतलं. एवढच नव्हे तर, अफगाणिस्तानात रशियानं फौजा धाडणं हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग होता, अशी कबुलीही दिली. असं करणं हे कोणत्याही देशाच्या नेत्यासाठी अत्यंत दुर्मिळ होतं. चार दशकांनंतर अमेरिकेच्या फौजाही अफगाणिस्तानातून मागं परतल्या त्याही, त्याच मध्ययुगीन प्रवृत्तीच्या ताब्यात देश सोडून अमेरिकेनं सैन्य मागं नेलं तरी, अफगाणिस्तानात सैन्य घुसवणं आणि इतका काळ युद्ध सुरू ठेवणं हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग आहे, असं अमेरिकेनं कधीच मान्य केलं नाही.
चेर्नोबिलच्या अणुभट्टीत झालेल्या अपघाताची कबुलीही गोर्बचेव्ह यांनी दिली होती, जे कम्युनिस्ट-राजवटीसाठी अशक्य कोटीतील धाडस होतं. यामुळे आपलं देशातील आणि जगातील स्थान खालावेल याची जाणीव असूनही त्यांनी त्याला सामोरं जायचं ठरवलं हे त्यांचं वैशिष्ट्य.
मायदेशात पदरी उपेक्षाच
गोर्बाचेव्ह यांच्यासारख्या नेत्याचा उदय सोव्हिएत संघातील कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च पदापर्यंत झाला हेही तसं, तिथली रचना पाहता, अघटितच. ते पारंपरिक कम्युनिस्ट-चौकटीतूनच पुढं आले असले तरी पोथीनिष्ठ धारणांपलीकडे पाहायचा प्रयत्न ते सुरुवातीपासून करत होते. असं असूनही त्यांना पक्षाच्या उतरंडीत सतत पुढं जायची संधी मिळाली. शेतकरी-कुटुंबातील गोर्बाचेव्ह यांनी सक्तीच्या सामूहिक शेतीचे अनुभव घेतले होते. पक्षाच्या युवक शाखेत सहभागी होत त्यांनी मॉस्कोत कायद्याचा अभ्यास करायची अनुमती मिळवली. पुढं ते त्यांच्या प्रांतात आधी पक्षाचे प्रथम सचिव, नंतर प्रांताचे प्रमुख झाले. ‘सुधारणावादी नेता’ अशी त्यांची प्रतिमा तिथंच तयार होऊ लागली. त्यांनी अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बोनस आणि काही प्रमाणात खासगी भूखंड बाळगायला अनुमती देणारं धोरण स्वीकारलं. खरं तर तत्कालीन सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाच्या वाटचालीत या प्रकारचे निर्णय म्हणजे राजकीय कारकीर्दीचा अंतही ठरू शकले असते. मात्र, तेव्हाचे सोव्हिएत गुप्तहेर -‘केजीबी’चे प्रमुख युरी आंद्रेपॉव्ह त्यांच्या बाजूनं उभे राहिले. ‘वेगळ्या रीतीनं विचार करू पाहणारा तरुण चेहरा’ म्हणून त्यांना बळ दिलं गेलं.
भ्रष्टचारविरोधी स्पष्ट भूमिकांमुळेही ते लोकप्रिय होत गेले. यातूनच ते पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात पोहोचले. पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे आणि पॉलिटब्यूरोचे सदस्य झाले. सन १९८२ मध्ये पक्षाचे सरचिटणीस लिओनिद ब्रेझनेव्ह यांचं निधन झालं आणि आर्थिक आघाडीवरचे अधिकार गोर्बाचेव्ह यांच्याकडे एकवटत गेले. याच प्रवासात ते १९८५ मध्ये पक्षाचे सरचिटणीस झाले. गोर्बाचेव्ह तेव्हा पॉलिटब्यूरोचे सर्वात तरुण सदस्य होते. चोपन्नाव्या वर्षी त्याच्याकडं देशाची धुरा आली. त्याआधीच्या वृद्धत्वानं ग्रासलेल्या नेत्यांच्या तुलनेत हा मोठाच बदल होता. सोव्हिएत संघात तयार झालेल्या कमतरतांचा आणि राजकीय जीवनातील बंदिस्तपणाचा पुरेसा अनुभव त्यांना होता. हे असंच कायम चालू शकत नाही याची जाणीवही पक्की होती.
विचारांच्या राजकारणातील एकसुरीपणाला त्यांनी फाटा दिला. कधीच नव्हतं ते स्वातंत्र्य वृत्तपत्रं भोगू लागली. थेट देशाच्या सर्वोच्च नेत्यावर टीकाही करता येऊ लागली. रशियातील कमतरतांवर, दडपशाहीवर केवळ वृत्तपत्रांतूनच नव्हे तर, सिनेमा-नाटकं-कला-साहित्य यांतूनही कोरडे ओढले जाऊ लागले. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हा आविष्कार सोव्हिएतकालीन कम्युनिस्ट कट्टारपंथीयांना सोसणारा नव्हता. यातूनच गोर्बाचेव्ह यांच्या विरोधात बंडही साकारलं.
गोर्बाचेव्ह यांना काळ्या समुद्रालगतच्या त्यांच्या निवासस्थानी स्थानबद्ध केलं गेलं. रशियन सैन्यानं आपल्याच नागरिकांवर गोळीबाराला दिलेला नकार आणि बंडाच्या विरोधातील जनमत यातून ते बंड फसलं. मात्र, त्यातून बाहेर पडलेले गोर्बाचेव्ह राजकीयदृष्ट्या अशक्त झाले होते. बोरिस येल्त्सिन यांनी त्याचा लाभ घेत आपला जम बसवला. पाहता पाहता ज्या सोव्हिएत संघाचे गोर्बाचेव्ह अध्यक्ष होते तो देशच अस्तित्व हरवून बसला. अनेक देश सोव्हिएत संघांतून फुटले. नवी राष्ट्रं उदयाला आली.
सोव्हिएतचा वारस ठरलेल्या रशियानं येल्त्सिन यांचं नेतृत्व स्वीकारलं. गोर्बाचेव्ह यांच्यांशी त्यांचे मतभेद स्पष्ट होते. याच काळात, गोर्बाचेव्ह यांच्या धोरणातूनच बलाढ्य सोव्हिएतचं विघटन झालं, अशी टीका होऊ लागली. राजकीयदृष्ट्या अधिक मोकळेपणा असलेल्या, आर्थिकृष्ट्या खुल्या, प्रगत सोव्हिएत संघाचं स्वप्न पाहणाऱ्या गोर्बाचेव्ह यांचा राजकीय अस्त उघड होता. त्यांना अपेक्षित असलेला देश टिकला नाही. त्याचे तुकडे झाले. त्यांनी निवडणुकाही लढवल्या; मात्र, त्यात त्यांच्या पाठीशी अत्यल्प जनाधार असल्याचंच दिसलं.
शीतयुद्धाचा अंत करून नव्या जागतिक रचनेचा पाळणा हलवायला मदत करणारा नेता रशियातच प्रभावहीन झाला होता. जगात त्याचं नाव सन्मानानं घेतंल जात होतं ते, रक्ताचा थेंबही न सांडता शीतयुद्धाची कृष्णछाया जगावरून हटवल्याबद्दल. त्यांनी ज्यासाठी रशियात खुलेपणा आणला होता ते बहुतेक उद्देश काळाच्या ओघात वाहून गेले आहेत. रशियातच व्लादिमिर पुतिन यांच्या रूपानं गोर्बाचेव्हपूर्व देशाची आठवण व्हावी असं राज्य प्रस्थापित झालं आहे. शीतयुद्धाची समाप्ती आणि अमेरिकेबरोबरच्या शस्त्रनियंत्रण-करारासाठी त्यांना शांततेचं नोबेलही दिलं गेलं. जगात, खासकरून पाश्र्चात्त्यांमध्ये, गोर्बाचेव्ह यांचं असं कौतुक होत असताना रशियात मात्र ‘काहीच न मिळवता सारं डावावर लावणारा नेता,’ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात राहिलं.
स्वप्नभंग ‘खुल्या रशिया’चा
गोर्बाचेव्ह यांनी राजकीय आणि आर्थिक खुलेपणा आणला, त्यात सातत्यानं रशियाच्या खालावत चाललेल्या स्थितीचा वाटा होता. रशियाचं अवलंबन तेल-उत्पादनावर होतं आणि तेलाच्या किमती उतरत होत्या. गोर्बाचेव्ह यांना स्पष्टपणे दिसत होतं की, ज्या प्रकारची स्पर्धा महाशक्ती म्हणून अमेरिकेशी रशिया करतो आहे, त्यात प्रचंड गुंतवणूक शस्त्रांवर करावी लागते आहे, जी वर्षागणिक रशियासाठी कठीण बनत चालली होती. अमेरिकेचा क्षेपणास्त्रविरोधी प्रकल्प मूळ धरू लागला होता, ज्याच्या विरोधात त्यात ताकदीनं उभं राहायचं तर पाण्यासारखा पैसा ओतावा लागला असता. गोर्बाचेव्ह यांनी यातून एक धाडसी प्रस्ताव मांडला. अमेरिकेचे त्या वेळचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यासोबतच्या दोनदिवसीय शिखरपरिषदेत त्यांनी, उभय देशांत कुणी कल्पनाही केली नसेल असा संपूर्ण अण्वस्त्रनिर्मूलनाचा प्रस्ताव मांडला. ‘दोन्ही देशांनी अण्वस्त्रांचा त्याग करावा...प्रयोगशाळेबाहेर कोणताही अणुकार्यक्रम असणार नाही...क्षेपणास्त्रविरोधी हत्यारं प्रत्यक्षात कुठंही ठेवली जाणार नाहीत...’ ही गोर्बाचेव्ह यांची अट रेगन यांनी अमान्य केली. शिखरपरिषद अपयशी ठरली. मात्र, त्यातून सुरू झालेल्या संवादाचं फलित म्हणून अनेक करार झाले, त्यांचा परिणाम म्हणजे, दोन देशांतील अण्वस्त्रांचा साठा ७२ हजारांवरून १३ हजारांवर आला.
युरोपातून मध्यम पल्ल्याची अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्रं हद्दपार झाली. दोन्ही बाजूंनी तैनात सैन्य लक्षणीयरीत्या कमी झालं. अण्वस्त्रयुद्धाचा सततचा धोका निदान त्या काळात तरी मागं पडला. जर्मनीचं एकीकरण झालं. या घडामोडींसंदर्भात गोर्बाचेव्ह यांनीच एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत, ‘शीतयुद्ध हे इतिहासाचा भाग बनलं आणि अणस्त्रयुद्धाचा धोका तातडीचा उरला नाही हे मोठंच यश होतं,’ असं नमूद केलं आहे. परिणामतः युरोपात पुढची तीन दशकं आर्थिक प्रगती गतीनं झाली; याचं एक कारण, सुरक्षेच्या आघाडीवरचं वातावरण निश्र्चिंत झालं होतं.
गोर्बाचेव्ह नसते तर या घडामोडी एक तर घडल्या नसत्या किंवा ज्या शांततापूर्ण रीतीनं त्या प्रत्यक्षात आल्या तशा आल्या नसत्या. सोव्हिएत संघ कोलमडेल यासाठीची व्यूहरचना आणि त्यासाठी अफाट पैसा ओतायची तयारी अमेरिकेनं केली होतीच. त्या तयारीला तोंड देणारी आर्थिक स्थिती गोर्बाचेव्ह यांच्या रशियाकडे नव्हती. तेव्हा, गोर्बाचेव्ह नसते तर सोव्हिएत संघ टिकला असता, असं जे सांगितलं जातं, त्यात तथ्य असलंच तर, आणखी काही काळ टिकला असता, इतकंच. रेगन यांनी शीतयुद्धाची ‘जैसे थे’ स्थिती मोडायचा पण केलाच होता. पूर्व आणि मध्य युरोपवरचा सोव्हिएतप्रभाव संपवण्यासाठी गोपनीय कारवायांना त्यांनी मान्यता दिली होती. सोव्हिएतची अर्थव्यवस्था कोसळेल यासाठी अप्रत्यक्ष आर्थिक युद्ध पुकारायची तयारी केली होती. या धोरणांना तोंड देणं सोव्हिएतसाठी कठीण होत होतं. गोर्बाचेव्ह यांचं शस्त्रनियंत्रणाकडे आणि खुलेपणाकडे जाणं यात या बाबींचाही वाटा होता. गोर्बाचेव्ह यांच्या धाडसी पवित्र्याचा परिणाम दूरगामी होता. सुमारे १५ नवे देश जगाच्या नकाशावर आकाराला आले, जे सोव्हिएत संघातून बाहेर पडत होते. बर्लिनची भिंत कोसळली, दुसऱ्या महायुद्धाची एक निशाणी हद्दपार झाली. ‘एक युरोप’ची भावना पुढं वाढतं गेली, जी जागतिकीकरणाचा महाप्रकल्प म्हणून पुढं युरोपीय महासंघाच्या रूपानं साकारली. शीतयुद्धात रशियाला माघार घ्यावी लागली त्याचा अनिवार्य परिणाम म्हणजे अमेरिकेची जगभर मुजोरी सुरू झाली. जगाची फौजदारी अमेरिकेनं आपल्या हाती घेतली. हे रोखायला कुणी समोर नाही असं एकध्रुवीय जग आकाराला येत गेलं. हा परिणाम गोर्बाचेव्ह यांना अपेक्षित नसेलही. सोव्हिएत संघ आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि राजकीयदृष्ट्या अधिक मोकळा बनेल हे त्यांचं स्वप्नं मात्र भंगलं.
गोर्बाचेव्ह यांच्या प्रयोगांना यशस्वी म्हणाव की नाही, यावरचे मतभेद कायम असतील. मात्र, त्यातून हवी ती शिकवण पुढं घेतली गेली, जी आजचं जग साकारण्यात एक भूमिका निभावणारी आहे. अमेरिकेनं आणि पाश्चात्त्यांनी घेतली, त्यातून त्यांचं भांडवलशाहीचं आणि उदारमतवादी लोकशाहीचं मॉडेलच तग धरू शकतं. बाकी व्यवस्था कधीतरी कोसळतीलच. चीनला अधिक लोकशाहीवादी बनवण्याचा अमेरिकी प्रयोग, त्यासाठीचा भांडवलदारी आग्रह सुरू झाला तो यातूनच. तीन दशकांनंतर मुक्त व्यापार आणि भांडवलशाही- विकासातून आलेल्या विषमतेचे फटके ब्रिटन ते अमेरिका असे सार्वत्रिक आहेत. सरसकट एकच व्यवस्था सक्तीनं लागू करायचा प्रयत्न करण्याइतकं जग एकसारखं नाही, हे वास्तव या काळात पुढं आलं. चीननं गोर्बाचेव्ह यांच्यापासून धडा घेतला तो कम्युनिस्टांची चौकट आणखी घट्ट करण्याचा. सोव्हिएत संघ कोलमडला तो वैचारिक भेसळीमुळे, हे शि जिनपिंग यांचं निदान त्याच पंरपरेतून आलं आहे. सोव्हिएत संघाच्या ‘गोर्बाचेव्ह-प्रयोगा’तून चीनच्या कम्युनिस्टांनी धडा घेतला तो देशाच्या राजकीय व्यवस्थेत अजिबात पकड ढिली न करण्याचा. गोर्बाचेव्ह चीनमध्ये १९८९ मध्ये गेले होते तेव्हा नेमका तिआनमेनचा संघर्ष सुरू होता. विद्यार्थिनेत्यांना गोर्बाचेव्ह यांच्याकडून प्रचंड आशा होत्या.
गोर्बाचेव्ह यांनी चीनमध्ये केलेल्या भाषणांत राजकीय मुक्ततेचा पुरस्कार केला. मात्र, चीननं ते प्रसारित होऊ दिलं नाही. गोर्बाचेव्ह चीनमधून गेल्यानंतर तिआनमेन चौकात रणागाडे चालवून निदर्शनं मोडण्यात आली. तीन दशकांनंतर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा देशातील प्रभाव आणखी ठोक बनला आहे, तसाच चीनच्या विस्तारवादी धोरणांना जगभरातून विरोधाचा सूरही समोर येतो आहे. खुद्द रशियात गोर्बाचेव्ह-प्रयोगातून धडा घेतला गेला तो नेमका जे गोर्बाचेव्ह यांना अभिप्रेत होतं त्याच्या उलटा. नवं शतक येतानाच तिथं पुतिन यांच्या नेतृत्वाचा उदय झाला, ज्याचं गोर्बाचेव्ह यांनीही, ते रशियाला संघटित करत आहेत म्हणून समर्थन केलं होतं. मात्र, २० वर्षांत त्यांचा भ्रमनिरास करणारा कारभार पुतिन यांनी केला. गोर्बाचेव्ह मोकळेपणा आणू पाहत होते, पुतिन यांनी दाखवण्यापुरती लोकशाही ठेवून एकाधिकारशाही प्रत्यक्षात आणली. अभिव्यक्तिस्वातंत्र्य गोर्बाचेव्ह यांच्यासाठी महत्त्वाचं मूल्य बनलं होतं. पुतिन यांना त्याची पत्रास कधीच नव्हती. शीतयुद्ध संपताना आर्थिकदृष्ट्या कमकुवत असला तरी ‘अमेरिकेला धक्का देण्याची क्षमता असलेली महाशक्ती’ असं रशियाचं स्वरूप होतं. पुतिन यांचा रशिया जवळपास असाच आता अमेरिकेसमोर उभा आहे, ज्यानं युरोपातील सुरक्षेची प्रस्थापित समीकरणं उलटीपालटी केली आहेत. अण्वस्त्रयुद्ध आणि अण्वस्त्रस्पर्धा इतिहासजमा झाली असं गोर्बाचेव्ह-रेगन यांच्या समझोत्यानंतरचं वातावरण पुतिन-बायडेन यांच्या काळात बदलतं आहे. रशिया हा युक्रेनच्या युद्धात स्पष्टपणे अण्वस्त्रवापराच्या धमक्या देऊ लागतो असं वळण आलं आहे.
गोर्बाचेव्ह यांनी जे करायचा प्रयत्न केला त्याला उलट दिशेनं घेऊन जाणारं पुतिनराज रशियात प्रस्थापित आहे. गोर्बाचेव्ह जो बदल रशियात आणू पाहत होते, तो आणता आला नाही, त्यातूनच पुतिन यांच्या उदयाची बीजं पेरली गेली. देशाची प्रतिष्ठा, सुरक्षेविषयीची भीती याभोवती एकाधिकारशाही उभी करणं त्यांना शक्य झालं. गोर्बाचेव्ह देशात पराभूत राजकारणी ठरले; मात्र, म्हणून त्यांना अभिप्रेत बदलांचं मोल कमी होत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.