- शुभांगी बहुलीकर
आदिमानवाच्या काळात भाषा नव्हती, त्यामुळे त्याला शब्दांची जाणीव किंवा संगीताची जाणीव नेमकी कशी व कुठं झाली हे सांगणं फार कठीण आहे. सुरुवातीला आनंद व्यक्त करण्यासाठी टाळ्या वाजवणं, काही खाणाखुणा करणं, उड्या मारणं, यांतूनच मग वेगवेगळे आवाज काढणं अशा गोष्टी आदिमानव करू लागला. आपल्या मनातील इच्छा प्रकट करण्यासाठी ज्या वेळी मानवानं बोलायला सुरुवात केली असेल त्या वेळी त्याला आवाज उंच करून बोलणं, हळू व खालच्या आवाजात बोलणं, आवाजातले चढ-उतार, मोठमोठ्यानं ओरडणं वगैरे आवाजाच्या विविध पातळ्यांची जाणीव झाली असावी. संगीतकलेचं मूळ याच आवाजातील चढ-उतारांत लपलेलं आहे.
कोणताही शब्द उच्चारला की नाद हा त्याला चिकटलेलाच असतो. त्याशिवाय बोलण्याची क्रियाच होऊ शकत नाही. शब्द उच्चारला की नाद लगेच प्रकट होतो आणि अर्थही. यालाच ‘अभिधा’शक्ती असं म्हणतात. मनातील भाव व्यक्त करण्यासाठी आपण शब्दांचं साह्य घेतो. हे शब्द आपण पूर्वी ऐकलेले, वाचलेले किंवा शिकलेले असतात आणि ते ऐकून किंवा वाचून आपण ते आपल्या स्मृतीत साठवलेले असतात. पूर्वी ऐकलेले हे शब्द निरनिराळ्या वेळी, निरनिराळ्या ठिकाणी किंवा निरनिराळ्या संदर्भांत आपण ऐकलेले असतात आणि त्यातील काही निवडक शब्दांचा वापर आपण नव्या संदर्भात करत असतो. याचाच अर्थ मनुष्याला त्याच्या ज्ञानेंद्रियांकडून, कानाद्वारे बाह्य वस्तूंची जाणीव होते.
संगीताच्या बाबतीत असं म्हटलं जातं की, श्रोत्यांना शब्द आणि सूर यांची जाणीव गायक कानाद्वारे करून देत असतो. यालाच ‘संवेदन’ असं म्हणतात. संवेदन ही शब्दसौंदर्याची पहिली पायरी होय. शब्दांच्या आणि सुरांच्या या जाणिवेचा अर्थ श्रोता आपल्या पूर्वीच्या अनुभवातून आपल्या मनात तयार करत असतो, याला म्हणायचं ‘अवबोध.’
उदाहरणार्थ : मल्हार या रागाचे स्वर किंवा राग श्रोत्यानं ऐकला असेल तर ‘बोल रे पपीहरा’ ही मल्हारमधील बंदिश व तिच्यावर आधारित असलेलं ‘बोल रे पपीहरा’ हे सिनेगीत त्याला माहीत होणं ही क्रिया म्हणजे ‘अवबोध’ होय. ‘प्रबोध’ म्हणजे श्रोत्यानं जाणिवेचा अर्थ लावून झाल्यानंतर त्याला झालेलं ज्ञान होय. याचा अर्थ ‘बोल रे पपीहरा’ ही बंदिश किंवा चित्रपटातील गाणं हे ‘मल्हार’ या रागात आहे किंवा त्या रागाचं नाव ‘मल्हार’ आहे असं त्याला कळणं. श्रोता आणि गायक हे ‘प्रबोधा’च्या पातळीवर एकत्र आले म्हणजे गायनाचा आनंद त्या दोघांना एकत्रित अनुभवता येतो. प्रख्यात शास्त्रीय गायिका डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या मते, स्वरापासून स्वरजनित आनंद प्राप्त होतो, तर शब्दांपासून शब्दजनित आनंद प्राप्त होतो. भरतमुनींनी तर ‘गांधर्व’चं लक्षण सांगताना ‘स्वरताल पदात्मकं’ असं म्हटलं आहे. याचा अर्थ स्वर, लय, पद किंवा शब्द हे एकमेकांच्या साह्यानंच अवतीर्ण होतात.
संगीतातील वेगवेगळे प्रकार गाताना शब्दांचा उच्चार फार महत्त्वाचा मानला जातो, त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारे केलेली शब्दफेकसुद्धा. स्वरवाक्यांना भावनिक रंग देण्याचं काम ‘शब्द’ करतात, तर शब्दांद्वारे तयार होणाऱ्या स्वरवाक्यांना स्वर हे आधार देण्याचं काम करतात. संगीतात रागभावनिर्मितीसाठी शब्दांचा वापर करण्याकडे कलाकारांचा ओढा असतो. शब्दांशिवाय गायनात अपूर्णतः जाणवते. स्वर व लय यांच्या संयोगानं रसनिर्मिती होत असताना ‘शब्द’ हे रस-उद्दीपनाचं कार्य करतात. शब्दांमुळेच गायनात ‘भाव’निर्मिती होते आणि यातूनच गायनात विविधता, लालित्य, आकर्षकपणा आपल्याला दिसून येतो. त्यामुळेच शास्त्रीय संगीतात ‘बंदिशी’ निर्माण झालेल्या दिसतात.
शास्त्रीय संगीतात, उपशास्त्रीय संगीतात स्वर आणि लय यांच्याबरोबरीनंच शब्द किंवा बंदिशी या सौंदर्यनिर्मिती करतात. बंदिश म्हणजे ‘स्वर, लय, शब्द आणि रागयुक्त संतुलित रूपातून निर्माण केलेली सुनियोजित, सौंदर्यपूर्ण, रंजक आकृती’ होय. बंदिश म्हणजे बंदिस्त बांधणी. डॉ. अलका देव-मारुलकर यांच्या मते, ‘स्वर, लय, शब्द किंवा काव्य यांचं सप्रमाण सम्मीलन म्हणजे बंदिश.’ बंदिश म्हणजे मांडणी, शब्दयोजना, काव्यरचना असा अर्थ शब्दकोशात आपल्याला पाहायला मिळतो. ‘बंदिस्त गेय रचना’ म्हणजे बंदिश. गाण्यासाठी मुद्दाम रचलेलं काव्य म्हणजे बंदिश.
पूर्वीच्या काळी ईश्र्वराची कृपा राहावी म्हणून ईश्र्वरस्तुतिपर काव्ये रचली गेली. यानंतर यज्ञापासून हे संगीत मंदिरात पोहोचल्यावर ही काव्ये भक्तिरसप्रधान झाली. यातून ध्रुपद, धमार यांची गायनात निर्मिती झाली. पुढं राजाच्या दरबारात या बंदिशी ‘प्रबंध’ स्वरूपात आल्या. राजेरजवाड्यांनी स्वतःचं नाव या बंदिशींमध्ये घालायला लावलं. प्रबंधगायनात ‘पद’गायनाचा उल्लेख आढळतो.
‘संगीत रत्नाकर’मध्ये ‘गीत’ या शब्दाची व्याख्या शारंगदेवांनी, ‘रंजकः स्वरसंदर्भो गीतमित्याभिधीयते’ अशी केलेली दिसते. स्वर, ताल, शब्द यांनी युक्त रंजन करणारी ती ‘बंदिश’ असं म्हटलं जाऊ लागलं. बंदिश ही रागविस्तारासाठी ‘उपज’ म्हणून उपयोगी पडते. बंदिशींमुळे आपल्याला त्या रागाचा रसभाव कळतो, रागरूप स्पष्ट होतं. स्वर व शब्द यांच्या मीलनातून बंदिश निर्माण होत असल्यानं तीतून सौंदर्य निर्माण झालेलं दिसतं. शब्दांमुळे संगीतात दोन प्रकार निर्माण झालेले दिसतात; किंबहुना बंदिशींचे दोन प्रकार पडलेले दिसतात :
१) रागशास्त्रप्रधान, २) शब्दभावप्रधान.
‘रागशास्त्रप्रधान’मध्ये ध्रुपद, धमार, ख्यालगायकीचा उल्लेख करावा लागतो, तर ‘शब्दभावप्रधान’ गायकीत ठुमरी, गझल, भजन, भावगीत, सुगम संगीत इत्यादी प्रकार दिसून येतात. रागशास्त्रप्रधान बंदिशींमध्ये राग, रागाचं स्वरचलन, रागलक्षणं, स्वरतालचमत्कृती यांच्यावर भर दिलेला दिसतो, तर शब्दभावप्रधान बंदिशींमध्ये स्वर आणि शब्द समतोलानंं वापरले जातात. यातील संगीतप्रकार गाताना शब्दांचा उच्चार, शब्दफेक यांच्याबरोबर स्वरवाक्ये रसभावानं नटवण्याचं काम शब्द करतात. बंदिशीत शब्दांना जेवढं महत्त्व आहे तेवढंच अ, आ, इ, उ, ओंकार या भाषिक स्वरांनासुद्धा आहे. काही गायक अ, आ, ई, उ, ओ, अक्षरांचा उपयोग रागविस्तारात, रागसूचक आलापविस्तारात करतात, तर काही गायक बंदिशीतील शब्दांची गुंफण सुरुवातीच्या आलापात करतात. स्वर आणि शब्द, अक्षरं आणि स्वर यांची उत्तम गुंफण सुरुवातीच्या रागसूचक आलापविस्तारात केल्यास संगीतात सौंदर्यनिर्मिती घडते. शब्दयुक्त आलापांमुळे गायनातला तोच तोचपणा, रटाळपणा निघून जातो. बोलतानेमध्ये बंदिशीच्या शब्दांची स्वरलययुक्त मालिकाच रसिकांपुढं पेश केली जाते.
उपशास्त्रीय संगीतप्रकारांपैकी ठुमरी, गझल, नाट्यसंगीत यांत शब्दांचं नादसौंदर्य, भावसौंदर्य, त्यांच्या मधुर, अर्थवाही उच्चारांतून प्रकट केलं जातं. यात स्वर, शब्दभाव, रसभाव आणि लय या सर्वांचा उत्कट मिलाप झालेला दिसतो. या संगीतप्रकारात काव्यातील शब्द हे त्या बंदिशीचे भाववाहक आणि रसवाहक घटक बनतात. भक्तिसंगीत हे तर शब्दनिष्ठच गायन आहे. भक्तिसंगीतातील स्वरांची, शब्दांची आर्तता आपल्याला भक्तिगायनात सातत्यानं दिसते. ओव्या, साकी, दिंडी आणि अभंग यांतील काव्यातून शब्दांचं ओघवतेपण आपल्या अनुभवास येतं. शब्दांच्या अखंडत्वाला यात विशेष महत्त्व दिसून येतं. लोकसंगीतातील लोकगीतांमध्ये शब्दांनाच प्राधान्यानं महत्त्व दिलेलं दिसतं. स्वरांना त्यात जरा दुय्यम स्थान दिलेलं भासतं. लोकसंगीतात त्यामुळेच शब्दयुक्त लयीचं महत्त्वाचं स्थान दिसून येतं. तराण्यातील अक्षरांना व शब्दांनादेखील महत्त्व प्राप्त होतं ते त्यातील शब्दलय, स्वरलय यांच्या प्रवाहित्वामुळे, अखंडतेमुळे.
बंदिशीतील शब्दांचा रागविस्तारात समर्पक उपयोग करणं याला रागाचं ‘बोलअंग’ म्हणतात. रागविस्तार करताना तो वेगवेगळ्या प्रकारे खुलवण्यासाठी बोलअंगांचा वापर केला जातो.
बोलामधील पाच उपप्रकारांचा सौंदर्यनिर्मितीसाठी वापर केला जातो-
१) बोलआलाप, २) बोलउपज, ३) बोलतान,
४) बोलबनाव, ५) बोलबाँट.
या सर्वांमध्ये शब्दांचा वापर स्वर व लय यांच्या मदतीनं केला जातो. स्वर उच्चारताना नादाकृतीत विविधता आणणं, त्यांच्या चालीत हवी ती लय निर्माण करणं, त्यांना भावनिक, आध्यात्मिक, शृंगारात्मक, वीररसयुक्त, करुणरसयुक्त, शांतरसयुक्त बनवणं हे केवळ आणि केवळ शब्दांमुळेच शक्य होतं.
१) बोलआलाप म्हणजे विलंबित लयातील शब्दयुक्त स्वरवाक्य.
२) बोलउपज म्हणजे मध्य लयीतील शब्दयुक्त स्वरवाक्य.
३) बोलतान म्हणजे द्रुतलयीतील शब्दयुक्त स्वरवाक्य.
४) बोलबनाव म्हणजे शब्दोच्चार सलगपणे करणं.
५) बोलबाँट म्हणजे शब्दांतील भाव प्रकट करणं.
काव्य-शब्दांनुसार, बोल-अंगांनुसार, शब्द-लयीनुसार भारतीय संगीतात १) शास्त्रीय, २) उपशास्त्रीय, ३) सुगम असे प्रकार निर्माण झालेले दिसतात. या प्रत्येक प्रकाराला स्वतःची अशी स्वतंत्र ओळख आहे. या तिन्ही प्रकारांत स्वरांचा लगाव, शब्दांचं महत्त्व, रसभावसौंदर्य, नादाचा पोत, मांडणी ही वेगवेगळी आहे. याचं कारण, काही ठिकाणी स्वर व शब्द यांच्याकडे पारडं झुकलेलं दिसतं, तर काही ठिकाणी शब्द व भाव, तर काही ठिकाणी शब्द व लय यांचं वर्चस्व आढळतं. शास्त्रीय संगीतात स्वर, शब्द, लय यांचं वर्चस्व दिसतं, तर उपशास्त्रीय संगीतात शब्द, भाव, लय यांचं वर्चस्व दिसतं. सुगमसंगीतात स्वर, शब्द, भाव यांचं वर्चस्व दिसतं. शास्त्रीय संगीतात राग सादर करताना बंदिशीतील शब्द हे स्वरांचे सहाय्यक बनतात, तर बंदिशीतील भाव, आशय, रस व्यक्त करण्यासाठी स्वर उपयोगी पडतात. उपशास्त्रीय संगीतात काव्यातील शब्दोच्चार, स्वरलगाव, बांधणी, शब्दातील भाव हा वेगळा दिसतो. सुगम संगीतात शब्दाला फारच महत्त्वाचं स्थान आहे. कुठलाही शब्द उच्चारला की त्याचा अर्थ प्रकट होतो, म्हणजे हीच नादाची अभिधाशक्ती फार महत्त्वाची असते. सुगम संगीतातील काव्ये ही सुख-दुःख, विरह-मीलन, निसर्ग, वेगवेगळ्या ऋतूंची वर्णनं, देव-देवता यांच्यावरची असल्यानं त्यातील शब्दसामर्थ्याला अतिशय महत्त्व असतं. स्वरांच्या व शब्दांच्या एकीमुळे संगीतातल्या स्वरांना भावनिक अर्थ प्राप्त होतो. यातून रसिकांना सौंदर्यप्राप्तीचा सुखद अनुभव मिळतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.