श्री एम हे एक थोर आध्यात्मिक मार्गदर्शक, समाजसेवाव्रती आहेत. केरळमधील एका मुस्लिम कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
श्री एम हे एक थोर आध्यात्मिक मार्गदर्शक, समाजसेवाव्रती आहेत. केरळमधील एका मुस्लिम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आध्यात्मिक ओढीमुळे त्यांनी या क्षेत्रात मोठं कार्य उभं केलं. प्रवचनांसोबतच त्यांनी विविध आध्यात्मिक पुस्तकांचंही लेखन केलं आहे.
‘शून्य’ ही त्यांची पहिली कादंबरी. आध्यात्मिकतेसंदर्भातील कठीण बाबी त्यांनी अधिक सहज-सुलभ पद्धतीने समजावून सांगण्याच्या उद्देशाने ही कादंबरी लिहिल्याचं जाणवतं. संत किंवा आध्यात्मिक गुरू यांनी काळानुरूप त्याकाळी समजेल अशाच भाषेत मार्गदर्शन केलं.
‘शून्य’ या कादंबरीच्या रूपाने भारतीय जीवनपद्धतीतील ‘अवधूत’ या संकल्पनेविषयी त्यांनी लेखन केलं आहे. अवधूत हे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक उन्नत असतात, ते पारंपरिक नियम किंवा बंधनांना झुगारून कृती करतात. बऱ्याच वेळा ते चमत्कार वाटतात.
मात्र, त्यांच्या त्या कृतीमागे काहीतरी उद्देश असतो, त्यातून काहीतरी सांगायचं असतं. परंतु आपलं लक्ष केवळ चमत्कारांवरच केंद्रित होतं. हे टाळत ‘शून्य’ आपल्याला अवधूतची खरी ओळख करून देतं, वास्तव आणि भ्रम याचं भान देतं.
‘शून्य’ ही खरंतर जगाला भारताने दिलेली एक देण आहे. मात्र, ती प्रामुख्याने गणितीय शाखेपुरतीच ओळखली जाते. ‘शून्य’ कादंबरीत या संकल्पनेवरील अधिक सखोल चिंतन आहे. आपल्या धार्मिक, आध्यात्मिक ग्रंथांमध्ये आत्मा आणि परमात्मा यांचं मीलन म्हणजेच मोक्षप्राप्ती होणं.
जन्म-मरणाच्या चक्रव्यूहातून सुटण्यासाठी मोक्ष मिळविणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे, त्यासाठी षडरिपूंपासून मुक्त होण्यासाठी स्वतःला एकप्रकारे ‘शून्य’ अवस्थेत आणणं आवश्यक आहे. या सर्व संकल्पना ‘शून्य’मधून अतिशय सोप्या व रंजक पद्धतीने समजावून सांगितल्या आहेत. या कादंबरीतील ‘शून्य’ हे मुख्य पात्र. आपल्याला ‘शून्य’ म्हणजे काहीच नाही आणि ‘शून्य’ हेच सर्वकाही असं दाखवलं आहे.
तरुण पिढी आध्यात्मिक पुस्तकं वाचेल, अशी शक्यता खूपच कमी असते; परंतु आध्यात्मिक बाबींमध्ये रस नसलेल्यांना वाचण्यासाठीसुद्धा ही कादंबरी उत्कृष्ट आहे. त्यातील सशक्त पात्रं वाचकांना खिळवून ठेवतात.
कथानकाची गुंफण अतिशय समर्पक आहे. त्यात विविध वळणं आहेत, त्यामुळे ती अधिक चांगली झाली आहे. लेखनशैली तसंच भाषाही अतिशय सुलभ अन् तेवढीच रंजकही आहे. नातेसंबंध, जीवनव्यवहार, स्वार्थ, संघर्ष, विसंगती अशा विविध पद्धतींनी कथानक पुढे जातं.
विविध कथा परस्परांशी सूत्रबद्ध पद्धतीने जोडल्या आहेत, त्यामुळे त्या अधिक मनोरंजकही झाल्या आहेत. कुठं-कुठं आपल्याला अतिरेक वाटू शकतो; पण त्या नाट्यमय चमत्कारिक घडामोडींमुळे कादंबरी हातची सोडवत नाही, एकाच दमात ती वाचून काढावीशी वाटते. त्यातील संदेशही चांगला आहे.
‘कधीही हार मानायची नाही, कुणाचंही अहित चिंतायचं नाही, आपल्या क्षमतेबाहेर आहे त्यासाठी त्रागाही करायचा नाही. आपल्याला अधिकाधिक रितं करीत त्या परमेश्वराशी विलीन होण्यास पात्र करावं’, आदींवर कादंबरीत भर देण्यात आला आहे.
ते समाजातील विविध गुण-अवगुणांची ओळख करून देतानाच सत्याच्या मार्गाकडे नेतात. बुद्धिवाद्यांचं गर्वहरण करतात, तसंच त्यांना योग्य मार्गही दाखवतात. रस्त्यावरून जाणाऱ्या एका मठाधिपतीलासुद्धा दिशा दाखवितात.
दांभिकपणा सोडून परमात्म्याशी जोडण्याचा मार्ग सांगतात. भोंदूगिरी उघड करतात, त्यावर प्रहार करतात. त्यामुळे धार्मिक श्रद्धांचा व्यवसाय करणाऱ्यांना ते शत्रू वाटतात. त्यातून त्यांना संपविण्याचा प्रयत्न होतो; परंतु त्यातून ते नाट्यमयरीत्या बचावतात. हल्ला करणारी व्यक्तीही त्यांचा भक्त बनते.
केरळमधील जीवनव्यवहारांचं चांगलं दर्शन आपल्याला होतं. तेथील चालीरीती, परंपरा यांसह काही शब्द-संकल्पनांचीही ओळख यातून होते. प्रत्येकाने वाचावी अशी ही कादंबरी आहे. पहिल्यांदा ती मनोरंजनपर म्हणून वाचली, तरी ती दुसऱ्यांदा वाचावीशी वाटते.
नंतर ती आपल्याला विचार करण्यास भाग पाडते आणि स्वतःला त्यातील कोणत्या तरी पात्राशी जोडून घेते, किंवा सर्व पात्रांतील काही दोष घालविण्यासाठी आपल्याला बाध्य करते. मराठी भाषेतील भाषांतरित कादंबऱ्यांमध्ये ‘शून्य’ने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अमेय नातू यांनी अतिशय सुंदर अनुवाद केला आहे.
मुख्य पात्र असलेल्या ‘शून्य’ला लोक ‘शून्य सामी’ नावाने ओळखतात. ‘शून्य’ हे लोकांची मनं वाचतात, त्यांना मार्गदर्शन करतात, मदत करतात. ‘शून्य सामी’ यांनी सर्व मर्यादा व भौतिक जीवनातील अनेक नियम तोडून टाकले आहेत. ‘शून्य’ हे एका ताडीच्या दुकानामागे राहतात, मासे खातात, लोकांना प्रसंगी रागावतात, अंगावर येतात... व्यवहारातील जगताच्या नियमांतील विसंगती दाखवितात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.