तुले का समजतेबे वांगं?

अमेरिकेतील ‘बाजारगुरू’ने विदर्भाची शान असलेली आलू-वांग्याची भाजी वाईट म्हटली अन् इकडे आम्हाले लयच वाईट वाटलं ना राजेहो!
brinjal bharit
brinjal bharitsakal
Updated on

अमेरिकेतील ‘बाजारगुरू’ने विदर्भाची शान असलेली आलू-वांग्याची भाजी वाईट म्हटली अन् इकडे आम्हाले लयच वाईट वाटलं ना राजेहो! वांगी सहज उपलब्ध असतात. औषधी असतात. आठवड्यातून एक-दोन वेळा वांग्याची भाजी खावी, असं म्हणतात. विदर्भच नाही; तर मराठवाडा, उत्तर अन् पश्चिम महाराष्ट्रातही वांग्याचं भरीत अस्सल ग्रामीण रांगड्या गड्याचं खाणं समजलं जातं. वांग्याला ‘गरिबांचं मटण’ही म्हटलं जातं... अमेरिकेत बसून ऑनलाईन रेटिंग करणाऱ्यांना त्याची सर काय कळणार? ‘तुले का समजतेबे वांगं?’ असं त्यांना ठणकावून विचारावं, अशीच एकंदर परिस्थिती आहे.

जगात काय काय सुरू असतं. भरल्या पोटाच्या लोकांनाच असे धंदे सुचतात फुक्कटचे. या दशकातली जगातली फुटबॉलची टीम, क्रिकेटचा संघ, यलो पेजेस, कुठल्या तरी फॅशन डिझायनरने ठरविलेला स्त्रियांसाठीचा (स्त्रियांसाठीचा का?) ड्रेस... असे एक ना अनेक प्रयोग केले जातात. आता बाजाराचं युग नाही, बाजारच आहे. आधी मकान होतं आणि दुकान झालं आहे. लोकं घर बांधण्याच्या आधी दुकानं काढतात अन् मग मागे घर बांधतात.

मार्केटिंग केल्याशिवाय आता पर्याय नाही अन् मार्केटिंगचे फंडे असतात. एक पंधरा वर्षांपूर्वी भारतीय भाकर अन् झुणका हा पदार्थ जगातला सर्वोत्कृष्ट पदार्थ म्हणून निवडण्यात आला होता. दुबईच्या पंचतारांकित हॉटेलने पदार्थांची स्पर्धा भरविली होती. तेव्हा काय अभिमान वाटला होता.

खरं तर भाकरीशी रोजच्या जेवणाने फारकत घेतलेली; पण तरीही आम्ही कसे एकदम अस्सल देशी, हे दाखविण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये भाकर मागितली जाते. आता अमेरिकेच्या ‘टेस्ट अ‍ॅटलस’ या ट्रॅव्हल गाईडने जगातील शंभर वाईट पदार्थांची यादी जाहीर केली. त्यात भारतातील आलू-वांग्याच्या भाजीचा समावेश करण्यात आल्याची बातमी वाचली. लयच वाईट वाटलं ना राजेहो!

आता त्या ‘टेस्ट अ‍ॅटलस’ला वांग्याचं महत्त्व समजावून सांगायला तिकडे कुणी नसावं. ऑनलाईन मतदान घेतलं त्यात आपल्या आलू-वांग्याच्या भाजीला रेटिंग कमी आलं. अमेरिकन लोकांना काय कळणार वांगं? आता वांगं या शब्दाचा वेगळ्या अर्थानेही वापर केला जातो. ‘तुले का समजतेबे वांगं?’, ‘वांगंबी नाही आलं ना हाती तुह्या...’, ‘आता का खासीन वांगं?’ इत्यादी वाक्प्रचारही वांग्याचा वेगवेगळा अर्थ लावून वापरले जातात विदर्भात.

वांग्यामुळे भाषेला रुचकरपणा आला आहे. आता पाहा ना, वांगंच नाही तर त्याच्या पदार्थांचंही असं शब्दरूपांतर झालं आहे वैदर्भी भाषेत. एखादा जाडा माणूस/बाई असेल तर, ‘भरलेलं वांगं हाय पोरगी निस्ती!’ नाही तर, ‘पोरगं भरलेलं वांगंच हाय ढोल्लं!’, ‘नाही तुहं भरीत केलं त नावाचा अमूक नाही...’, ‘वांग्याच्या खुला करतेत ना तस्या तुह्यापन करून ठेवाले पाहिजे’, ‘जवा पाहावं तवा याच्या घरी वांगेभातच करते याची बायको’... म्हणजे किती सुगरण आहे हे उपहासाने म्हणायचं असेल तर असं...

आता वांगं काही इतकं वाईट नाही. बरं त्यात आलू म्हणजे तर कुणाशीही युती करू शकतो. म्हणजे राजकारणी पक्षापेक्षाही आलू म्हणजे बटाटा हा कुणाशीही युती/आघाडी करू शकतो. कुठल्याही भाजीसोबत बटाटे सहज जमवून घेतात. वाल आणि कुठल्याही शेंगा, दोन्ही प्रकारची कोबी, पालक, मेथीच काय; अगदी भेंडीसोबतही बटाटे सख्य करून घेतात. बरं, बटाट्यांचे आम्हाला इतक्याच जागा हव्यात, असे काही नखरे नसतात.

दिल्या तेवढ्या जागांवर समाधान मानून बटाटे कुठल्याही भाजीत सामील होतात. मात्र, बटाट्यांची नैसर्गिक युती ही वांग्यासोबतचीच. बरं, बटाटे असे की ते उपासालाही चालतात... तरीही वांगे-बटाट्याची भाजी म्हणजे एकदम रापचीक आयटेम असतो. तो कोण ट्रॅव्हल गाईड आहे त्याला विदर्भात मध्यंतरी फेमस झालेलं गाणं ऐकवायला हवं होतं, ‘आलू-वांग्याच्या भाजीचा रस्सा अन् गपगप शिरा रेऽऽ’... हे खरं तर वांग्याचं थीम साँगच म्हणायला हवं.

एक तर वांगी सहज उपलब्ध असतात. म्हटलं तर त्यांचा औषधी गुणधर्मही असतो. म्हणजे वात, अ‍ॅसिडिटी, ताप-खोकला, पोट फुगणं, मूळव्याध, वृषण वृद्धी (अंडकोष सुजणं), झोप न लागणं, गळू, अशक्तपणा... असं कशावरही वांगं गुणकारी असतं. (खोटं वाटत असेल तर ‘गुगल’वर सर्च मारा!). एका आयुर्वेद डॉक्टरने तर सांगूनच ठेवलं आहे, ‘वांगं स्वादिष्ट, पौष्टिक आणि शुक्रधातू (वीर्य) वाढवणारं आहे.

शरीरातील मेद वाढून ज्यांचं शरीर फुगतं; परंतु त्या तुलनेत ज्याच्या अंगात बळ नसतं, अशांनी वांग्याची भाजी अवश्य खावी. याने काही दिवसांत बळ वाढतं. आठवड्यातून एक-दोन वेळा वांग्याची भाजी खावी. त्यामुळे शरीर काटक (प्रतिकारक्षम) होण्यास मदत होते.’

खरं-खोटं वैद्यच जाणे; पण आठवड्यातून दोन-चार वेळा वांग्याची भाजी विदर्भात होतेच. अगदीच विदर्भ नाही; तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अन् पश्चिम महाराष्ट्रातही वांग्याचं भरीत, भरलेलं वांगं हे अस्सल ग्रामीण रांगड्या गड्याचं खाणं समजलं जातं. अगदी वांग्याला, ‘गरिबांचं मटण’ म्हटलं जातं.

एक तर वांगं पिकविण्याचं असं काही रॉकेट सायन्स नाही. पकवण्याचंही काही खास अस तंत्र असतं, असंही नाही. बटाट्यासारखंच वांगंही अनेक भाज्यांशी युती करून सरकार स्थापन करतात. पक्ष फोडून पळून जायचं असेल तर अगदी सुरतच काय, गुवाहाटीपर्यंतही वांग्याची भाजी करून नेली तरी ती आंबत नाही. सहज-साधी फोडणी मारली तरीही वांगं चविष्ट लागतंच. खेड्या-पाड्यात तर अगदी परसदारीही सहज बी फेकलं अन् वांगं आलं, असं होतं.

अगदी कुपालाही (कुंपण) वांग्याचं झाड असतं. आता तर किचन गार्डन नावाचा प्रकार ‘सेंद्रिय खताच्या टूममुळे विकसित झाला आहे. त्यात ‘घरची वांगी’ हा कौतुकाचा प्रकार असतो. त्यात वांगं, ढोबळ्या मिर्च्या (कॅप्सिकम हंऽऽ), टमाटर हे एका प्रकाराचं. म्हणजे त्यांचं घराणं एकच; पण आजकाल घराणेशाहीच्या विरोधात वातावरण आहे. त्यामुळे वांगं अन् ढोबळी मिर्ची यांचं जमत नाही.

वांगी सहज उपलब्ध होतात. बटाटे किंवा कांद्यासारखे वांग्याचे भाव वाढले, असं कधी तुम्ही ऐकलं आहे का? बरं, वांगं असं कट्टर नाही. अमकाच रंग... तमकाच आकार, असं काही नाही. हिरवं, जांभळं, पांढरं, लालसर, चट्ट्यापट्ट्यांचं... अशा कितीतरी रंगांत वांगी असतात. छोटे, भटईचे, गोलाकार, लांबूळके अन् भरताचे लठ्ठ अशा कुठल्याही आकारात वांगी असतात.

तरीही त्यांचे टँट्रम नसतात, की आम्ही अमक्या आकाराचे तर आमचं फक्त भरीतच करा, आम्ही लांबूळके आहोत तर बटाट्यांसोबत भाजीची युती नाही, असं नाही... पावसाळ्यात म्हणजे आषाढीपासून परतीचा पाऊस गावकुसाबाहेर पूर्ण गेला तोवर वांगं मिळत नाही आणि या दिवसात त्याला कीड असल्याने लोक खातही नाहीत.

पावसाळ्यात भाज्या मिळत नाहीत म्हणून वांग्याचे काप करून ते वाळवून ठेवले जातात. या खुलां (सुकवलेल्या कापा)सोबतच विविध भाज्यांच्या मिश्र सांडग्यांमध्येही वांगी असतातच.

चातुर्मासात वांगं वर्ज्य असण्याची प्रथा ग्रामीण भागात आजही पाळली जाते. दिवाळीनंतर म्हणजे कार्तिकी एकादशीनंतर वांगं मोकळं होतं. म्हणजे वांगं खाण्यास सुरुवात करतात. माझ्या एका मित्राने आता मी नागपूरला आलो असताना ‘एकटाच राहतोस? जेवण आणतो’ असं म्हटलं अन् तो डबा घेऊन आला. त्यात पोळ्या सोडल्या तर बाकी सगळे पदार्थ वांग्याचेच होते.

अगदी भरीत, भरली वांगी, तळलेली वांग्याची सांडगी, वांगेभात इतकंच नाही तर बटाट्याचे भजे असतात तसे वांग्याच्या कापाचेही! विचारलं तर म्हणाला, ‘आता चार-पाच दिवस घरात नुसतं वांगंच असणार; कारण कार्तिकीनंतर वांगं मोकळं झालं आमचं...’ हे ऐकून माझ्या डोक्याचं वांगंच झालं!

ग्रामीण भागातच कशाला, अगदी शहरातही सामान्य लग्नात (हो! काही लोकांची लग्नंही असामान्य असतात) आलू-वांग्याची भाजी हा हमखास प्रकार असतो. पूर्वी आंध्रचे आचारी होते विदर्भात तेव्हा तर त्यांच्या हातची आलू-वांग्याची भाजी हा ‘खतरा’ प्रकार होता. नागपुरात सावजी वांगी खाताना आपण मांसाहार तर करत नाही ना, असं वाटतं. आता सगळीकडे भय्ये आचारी आले तरीही आलू-वांग्याची भाजी असतेच. चायनीज अन् मेक्सिकन फूडही लग्नात असतं.

त्या लग्नातही तवाभाजीत वांगी असतातच...

पुराणातली वांगी पुराणात, अशी म्हण आहे. मात्र ती पुराणातली वांगी नाही, तर वानगी आहे. तरीही वांग्याच्या खूप गोष्टी आहेत.

पहिली गोष्ट : एक माणूस कदाचित दुसऱ्या प्रदेशातला असावा. त्याने एका मित्राच्या घरी गेल्यावर वांग्याचं भरीत अन् भाकरीवर ताव मारला. त्याला भरीत हा प्रकार खूपच आवडला. त्याने घरी गेल्यावर बायकोलाही तसलाच पदार्थ कर, असं सांगितलं. त्याची बायको विदर्भ-मराठवाड्यातली असावी; पण हा बाहेरच्या प्रदेशातला. त्याला भरीत हे पदार्थाचं नाव आठवेना.

तो बायकोला सारखा ‘तो तमका पदार्थ कर’ म्हणू लागला. नाव आठवेना. अखेर बायकोवरच चिडला तो. बायकोला बदडली त्याने. बायको म्हणे रडत रडत, ‘माह्या पाठीचं मारू मारू भरीत केलं तुम्ही...’ तर हा म्हणतो, ‘तोच तर पदार्थ आहे ना!’

दुसरी गोष्ट : एकदा बिरबल अन् बादशहा (ही पण आलू-वांग्यासारखीच जोडी!) फिरायला निघाले घोड्यावर. रपेट मारताना वाटेत दुतर्फा शेत होतं. वांगी लावली होती. वांगी पाहून बादशहा म्हणाला, ‘बिरबल, वांग्याचं शेत दिसतंय. छान वांगी लागली आहेत. वांगी मला खूप आवडतात. औषधी असतात, रुचकर असतात.

आपल्या राज्यात फक्त वांगीच लावली पाहिजेत, असं फर्मानच काढतो आम्ही आता...’ बिरबल म्हणाला, ‘मला तर वांग्याशिवाय दुसरं काही जेवणात आवडतच नाही. वांगी म्हणजे जीव की प्राण माझ्यासाठी...’ असेच ते थोडे दोन कोस रपेट मारत गेले, तर दुसरं वांग्याचं शेत लागलं. बादशहा म्हणाला, ‘ऊंऽऽ वांगंऽऽ मला अजिबात आवडत नाहीत.

अंगाला खाज सुटते. अत्यंत फालतू भाजी आहे. यापुढे आमच्या राज्यात कुणी वांगी लावली तर त्याला जबर शिक्षा करा...’ बिरबल म्हणाला, ‘जहापनाह, वांगी नकोतच. पृथ्वीवरूनच नष्ट करायला हवीत... शीऽऽ मला तर वांग्याचं नाव ऐकलं तरीही किळस येते.’

बादशहा हसला. त्याने बिरबलाला विचारलं, ‘आम्ही वांग्याची तारीफ केली तर तू दोन पावलं समोर जाऊन वांग्याचं गुणगाण करत होतास. आम्ही वांगी वाईट म्हटलं तर तू पृथ्वीलोकातच वांगं नको म्हणतोस... असं का?’

बिरबल हसून उत्तरला, ‘खाविंद, आम्ही बादशहाचे नोकर आहोत, वांग्याचे नाही!’

तसंच आता आपलं अर्थकारण अमेरिकेचं आहे. त्यात वांग्याचं माहेर म्हणजे चीन. अमेरिकेतील ‘बाजारगुरू’ने वांगी वाईट म्हटली अन् त्यातही वांगी चायनीज म्हटल्यावर आपणही वांग्याच्या भाजीला वाईट म्हणावं का? माझा विचार सुरू आहे, तुमचं तुम्ही ठरवा!

pethkar.shyamrao@gmail.com

(लेखक प्रसिद्ध नाटककार आणि कथाकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()