अनंताचे फूल...

चिडचिड्या उन्हातदेखील अनंताची फुलं फुलतात अन् राख करणाऱ्या उन्हाचा कसलाही वैताग न ठेवता सुगंधीही असतात. वेदना पिऊन मोगरा गगनावेरी जातो.
अनंताचे फूल...
Updated on
Summary

चिडचिड्या उन्हातदेखील अनंताची फुलं फुलतात अन् राख करणाऱ्या उन्हाचा कसलाही वैताग न ठेवता सुगंधीही असतात. वेदना पिऊन मोगरा गगनावेरी जातो.

चिडचिड्या उन्हातदेखील अनंताची फुलं फुलतात अन् राख करणाऱ्या उन्हाचा कसलाही वैताग न ठेवता सुगंधीही असतात. वेदना पिऊन मोगरा गगनावेरी जातो. वेदनांचीही तक्रार न करता फुलत राहतो तो अनंत. मोगऱ्याला तर शंृगार अन् अध्यात्मातही मानाचं स्थान मिळालंय. अनंत मात्र मोठा असूनही मोगऱ्याचा दुस्वास न करता फुलत राहतो. जगण्यावर प्रेम करायला शिकलं की मग तक्रारीच उरत नाहीत.

सांजेला ऑफिसमधून बाहेर पडल्यावर गर्दीतून वाट काढत एकांतात असलेल्या त्या मंदिराच्या पायरीवर जाऊन बसणं छान वाटतं. बरेचदा तर अगदी सांज मालवली अन् अंधार झाला तरी मी तिथेच बसून असतो. निघतो तेव्हा आठवतं आपण आत जाऊन देवाचं दर्शनदेखील घेतलेलं नाही. त्या वेळी गाभाऱ्यातला तोदेखील आतल्या त्याच त्या वातावरणाचा उबग येऊन माझ्यासारखाच चाफ्याच्या झाडाखाली पायरीवर येऊन बसलेला असला पाहिजे. तिथून निघताना मात्र गाभाऱ्यातील मंद उजेडानं उजळलेल्या अंधाराला छानपैकी सुगंध सुटलेला मी अनेकदा अनुभवला आहे. तो सुगंध ओळखीचा आहे. अगदी आप्त वाटावा असा...

मी निघतो. खरंतर गाडीला कीक मारून होणाऱ्या आवाजानेही शांततेवर ओरखडे पडतील, इतके नीरव अन् नाजूक वातावरण; तरीही मी निघतोच. तेवढ्यात खिशात किणकिण होते. काकांचा फोन असतो. आता कुणाशीही बोलण्याची इच्छा नसते. बरे काका बोलणार काय? ‘काय रे, झालं का बेट्या ऑफिस? घरी पोहोचलास की रस्त्यातच आहेस? रस्त्यातच असशील तर मग नाही बोलत बाप्पा...’ असं म्हणून ते एक दीर्घ विराम घेणार. तेवढ्या वेळात तिकडे घरात आईची सुरू असलेली बडबड, लगबग इकडे मंदिराजवळही जाणवत राहणार. मग त्यांचे नेहमीचेच प्रश्न... जेवलास का, काय भाजी केली होती, मुली काय म्हणतात, तुझी बायको गेली होती का ऑफिसला? असलंच काही. बरऽऽ असा परत एक दीर्घ उसासा टाकून ते फोन ठेवणार. ते कधीही फोन करतात. बरेचदा मग आपण माणसांच्या गर्दीलाच कंटाळलेलो असतो. त्यांचा फोनही त्या वेळी नकोसा असतो. त्यांचाच असल्याने तो घ्यावा तर लागतोच. आपणच आपल्यावर असली जबरदस्ती करीत असल्यानेही कदाचित तो फोन कधीकधी टाळावासा वाटत असेल.

थोडं मोठं झाल्यावर नदीवर पोहायला जाताना किंवा बाजारात भाजी आणायला जाताना त्यांनी दिलेल्या खूप खूप सूचना नकोशा वाटायच्या. एकदा आठवीत असताना मी नागपूरला यायला निघालो तेव्हा त्यांनी अगदी कागदावर लिहून सूचना दिल्या. तेवढ्यावरच ते थांबले नव्हते, बसच्या कंडक्टरलादेखील त्यांनी सांगून ठेवले होते. खूपच राग आला त्यांचा. मला काय इतकंही कळत नाही का? लहान राहिलो का मी आता? माझा राग मी अगदी कसलीही आडकाठी न ठेवता व्यक्तही करून टाकला; तरीही गाडी सुटेपर्यंत ते तिथेच उभे होते अन् कंडक्टरशी बोलत.

गाडी सुटली. गाडीनं गाव ओलांडलं अन् मग नागपूर येतपर्यंत त्यांचा मायेनं ओथंबलेला चेहरा डोळ्यासमोर तरळत होता. उगाच रडायला येत होतं. आताही त्यांचा फोन आला की असं होतं...

त्यांना आम्ही काका का बरं म्हणायला लागलो? एकत्र कुटुंबात जे होतं तेच. अनेकजण आईला वहिनी म्हणतात. ताईदेखील म्हणतात. आमच्या मोठ्या काकांची मुलं त्यांना काका म्हणायची म्हणून आम्हीही त्यांना काका म्हणायला लागलो. भय्या तर आईलाही काकू म्हणायचा म्हणे; मग आईनंच त्याला अगदी प्रसंगी मारूनही आई म्हणायला लावलं. संबोधनानं नाती बदलत नाहीत. भावनाही नको ती वळणं घेत नाहीत.

परवा त्यांनी फोनवर सांगितलं, नोकरी सोडली रे बाबा मी आता... पोस्टमास्तर म्हणून निवृत्त झाल्यावर ऐंशी पार करेपर्यंत त्यांनी वकिलाच्या कचेरीत काम केले. आता डोळ्यांनी दिसतच नाही म्हणून काम थांबविले. केवढा मोठा आटापिटा... कशासाठी?

अगदी रस्ताभर मनात काकांचे जगणे तरळत राहते. पायातले जोडे काढताना बाहेरचं सारंच जग बाहेरच ठेवून मी आत जातो. त्या दोघी चिवचिवत राहतात. हिच्या चेहऱ्यावर दिवसभराचा ताण. तिचाही हळूवार सैलावण्याचा व्यायाम सुरू. जितकं दान पडेल तितक्याच सोंगट्या हलवाव्यात, तशा आपल्या घरातल्या हालचाली. आपल्याला जितकी घरं चालायचंय तितकं दान मात्र कधीच पडत नाही. माफक व्यायाम, थोडे आत्मीक श्रम, थोडं देवदेव करत आपल्याचसाठी हक्काचा एकांत शोधणं, हलकंसं जेवण अन् मग टीव्हीला हुलकावणी देत पुस्तक वाचत बसायचं... हे असं ठरविलेलं. जमेल तसं मनातलं पार पाडून बैठकीत जाऊन बसलो, तर काकूंनी हातातलं पुस्तक बाजूला सारलं अन् त्या गतकाळात हरविल्या... पुस्तकातील कुठल्याशा मजुकराने त्यांच्या स्मृती चाळविल्या गेल्या असाव्यात.

‘काय काय नाही सहन केलं मी...’ आईची ही सुरुवात ऐकून ही चुळबुळली. तिनं ते बरेचदा ऐकलंही असेल, जगलीही असेल त्या आठवणी ती.

“हजार एकर जमीन आम्ही विनोबांच्या भूदानात दान दिली होती. यांच्या एकट्याच्या वाट्याला दोन हजार तोळे सोनं आलं होतं. एक एवढासा पाचू मी मागे पंधरा हजाराला विकला. तुला सांगते, माझ्याकडे पाचूचा पाच पदरी हार होता. यांनी तो विकला. घरात पाच-सात हजार रुपडेच तेवढे आणले. दारूच्या नशेत सैतान व्हायचा तो माणूस... नाहीतर देवच!’’

मीदेखील काकूच्या आठवणींची ही आवर्तनं अनेकदा केलेली. मुलींना शिकविण्यासाठी त्यांनी केलेली तडफड, सीलिंगमध्ये जाणारी शेती वाचविण्यासाठी दिलेला लढा, ओरबाडून घेणाऱ्या आपल्याच माणसांशी केलेला संघर्ष... सगळेच. आता ते सारेच कढ असे त्यांचे त्यांनाच हुलकावून प्रकट होतात. घडून गेलेल्या प्रसंगांनी असे छळणेही जिव्हारी लागणारेच. त्यातही मग आपल्या आतल्या सृजनाला जोजवून त्याला फुलवत राहणेही... काकूंनी तेव्हा नाट्य मंडळ काढले. मुलींना नाटकात कामेही करायला लावली. चिरेबंदी वाड्याची फोलफट इभ्रतीची तटबंदी भेदून गाणेही शिकल्या. सगळ्याच आघाड्यांवर होती. व्यवहाराचे काटे वेचताना कवितेची फुलंही फुलत होतीच.

त्या दिवशी त्या अचानक आल्या. कागदपत्रांचं भलंमोठं बाड टाकून हमसाहमशी रडू लागल्या... लँडलेसऽऽ त्या एकच शब्द बोलत होत्या. लँडलॉर्ड ते लँडलेस... मूठभर मातीही ज्याच्या मालकीची कधीही नव्हती अशा माझ्यासारख्याला ते दु:ख कळणार नव्हते. ‘जाळून टाक ही कागदं...’ असं म्हणत त्यांनी ते भलमोठं बाड माझ्या समोर फेकलं अन् पराभूत सम्राटासारख्या त्या मान खाली घालून बसून राहिल्या.

दोन- चार दिवस गेले. सकाळी चहाला बसलो असताना त्यांनी हळूच विचारले, ‘‘जाळला का तो गठ्ठा खरंच?’’ मी नाही म्हणालो. पलंगाखाली ठेवलेला तो गठ्ठा बाहेर काढला. हरविलेल्या लेकराला मायनं जवळ ओढावे तसे त्यांनी ते बाड जवळ ओढले. जमिनीसाठी दिलेल्या त्यांच्या लढ्याची ती गाथा होती. कायद्याच्या इंद्रायणीत नसेल, तरली पण अश्रूंमध्ये तर ती तोलता येत होती...

आता दोघेही थकलेली आहेत. काका म्हणतो ते वडील आणि काकू म्हणतो त्या सासूबाईदेखील. लेकरांना ताप आल्यावर त्यांच्या बिछान्यापाशी रात्र, रात्र बसणारे काका. पोस्टाच्या नोकरीत पाच लेकरांचा संसार ओढताना ओढगस्तीला येणारे. त्यांना द्यावंसं वाटतं ते देता येत नाही अन् मागितलं तर अगतिकताही दाखविता येत नाही... अशा चक्रात अडकलेले. आमच्या त्या लहानशा गावातील दुकानओळीतून त्यांचा हात धरून भाजी घेऊन परतत असताना गावातल्या एकमेव आयस्क्रीमच्या दुकानाकडे बघत ते मला हळूच म्हणाले होते, ‘‘खातोस का आयस्क्रीम?’’ त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपण अगदी सात-आठ वर्षांच्या त्या वयातदेखील दिसले होते. उन्हाळा लागल्यावर किमान याला तरी आयस्क्रीम घेऊन द्यायला हवे... मग आयस्क्रीम खाऊ शकतील, अशा आणखी दोन मोठ्यांचे काय? हिलादेखील आवडतंच अन् आपल्याला? आपण आपल्याला तर कधी ‘तुला काय आवडतं, काय हवंय?’, हेदेखील विचारलेले नाही... जेवायला बसल्यावर ताट स्वच्छ कपड्याने पुसता पुसता, ‘‘एवढीच असतील ना ती ताटं? चांदीची? तुला सांगते, ५० ताटं होती चांदीची... सगळी गेली. अखेरचे ताट हिला पॉलिटेक्निकला अ‍ॅडमिशन हवी होती तेव्हा विकले...’’ काकू अशा त्या ताटात वितळत जातात. आता त्यांना नीट ऐकूदेखील येत नाही. काका आयुष्याचा रिता भाग भरण्यासाठी झगडत राहिले. काकू ओसंडून वाहणारे वाहून जाऊ नये म्हणून जगत राहिल्या. परसदारीच्या बगिच्यातील झाडांना आपल्या पद्धतीनं वाढविण्याचा प्रयत्न करावा, तसं ते लेकरांना वाढवत राहिले. काकांना आता दिसत नाही. त्यांनी जन्म देतानाच लेकरांना पोट दिलं अन् मग उर्वरित आयुष्य ते पोट भरण्याची कला शिकवत राहिले. आत मुलं विखुरली. पोट भरू लागली. संघर्ष त्यांचाही सुरू झाला. काकूंच्याही मुलींची लग्नं झालीत. काकाही एकटेच... अन् काकूदेखील. काकांचा फोन येतो, स्वत:शीच हसल्यागत करतात. ‘‘तुला आठवते का?’’

‘काय?’ मग ते परत हसत राहतात.

‘अरे, तू अगदी चार-पाच वर्षांचा होता. लहानपणापासूनच सोशिक बेट्या तू. तू एक-दीड वर्षांचा असताना तुझी आई नदीवर पाणी आणायला जायची. तुला खुर्चीवर बसवून जायची. तास-दीड तासानी ती परत येतपर्यंत तू तसाच बसून राहायचा बेट्या खुर्चीत... नानाजी तांबोळींच्या घरात राहायचो आपण तेव्हा...’

‘पडलं होतं ना ते घर?’

‘आपण राहत होतो तेव्हाच. सगळे म्हणाले बाबूसाब और उनकी फॅमिली दबके मर गई.’ मग काही काळ शांतता.

जगण्यातली ही असली अगतिकता अपरिहार्य म्हणून स्वीकारत अशाच पिढ्या जगत राहणार आहेत का? काका अन् काकूंनीदेखील काय साधले? त्यांच्या आयुष्याचा ताळेबंद काय? चार मुलं, सहा मुली... प्रत्यकजण लागलाय जगण्याचं रहाटगाडगं ओढायला. त्यांचं संचित काय? आयुष्याचा हा सारा आकांत त्यांनी मांडला कशाला? हे सारं नसतंच केलं त्यांनी तर काय बिघडलं असतं?

आमच्या भांडेवालीनं आणलेली फुलं देवाला वाहताना मी असा संन्यस्त विचार करू लागतो. अगदी मोगऱ्यासारखीच ती फुलं पण अगदी मोठी. सुगंध असा की ओंजळ रिती केली, तरीही हात सुगंधानं भारलेलेच. काय म्हणाली होती ती? ‘‘अंताचं व्हय ना जी फुल... फॅक्टरीवाल्या सायबाकडं झाडं हाय. पेटनाऱ्या उनातच फुलतेत हे फुलं...’’ अनंताचं फूल... चिडचिड्या उन्हातदेखील ते टपोरं फुलं फुलतं अन् राख करणाऱ्या उन्हाचा कसलाही वैताग न ठेवता सुगंधीदेखील असतात. वेदना पिऊन मोगरा गगनावेरी जातो. गगनावेरी वेदनांचीही तक्रार न करता फुलत राहतो तो अनंत. मोगऱ्याला तर शृंगार अन् अध्यात्मातही मानाचं स्थान मिळालंय. अनंत मात्र मोठा असूनही मोगऱ्याचा दुस्वास न करता फारसा माहीतही न होता फुलत राहतो. परडीत आता दोनच फुलं उरलीत अनंताची. देवाच्या मूर्तींना न वाहता सखीच्या हातात द्यायची आहेत ती फुलं. तिला प्रेम कळेल अन् जगणंही. जगण्यावर प्रेम करायला शिकलं की मग तक्रारीच उरत नाहीत. परडीतली ती अनंताची फुलं मला काका अन् काकूसारखी वाटू लागतात. ‘कशाला?’ अशी सुरुवात असलेले सारेच प्रश्न संपलेले असतात मनातले.

pethkar.shyamrao@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.