सखीच्या अस्तित्वाचा कण कण वेचीत जावा!

प्रत्येकाच्या डोळ्यांच्या किरमिजी पडद्यावर अगदी कळायला लागायच्या आधीपासून सखीचा चेहरा अस्पष्ट, धूसर दिसत असतो.
सखीच्या अस्तित्वाचा कण कण वेचीत जावा!
Updated on
Summary

प्रत्येकाच्या डोळ्यांच्या किरमिजी पडद्यावर अगदी कळायला लागायच्या आधीपासून सखीचा चेहरा अस्पष्ट, धूसर दिसत असतो.

पहाटेचं धुकं दबा धरून बसलेलं असतं. एखाद्या सांजेला त्या दवबिंदूंनाही डोळे फुटतात. अशा एखाद्या स्निग्ध संध्याकाळी विस्तीर्ण पटांगणावर पडून आभाळ डोळ्यांत साठवण्याचा प्रयत्न करावा. डोळे हळूच मिटून घ्यावेत. मिटलेल्या डोळ्यांत आभाळ साकारू लागतं. त्या आभाळात एक चेहरा उमटतो, तीच सखी असते.

प्रत्येकाच्या डोळ्यांच्या किरमिजी पडद्यावर अगदी कळायला लागायच्या आधीपासून सखीचा चेहरा अस्पष्ट, धूसर दिसत असतो. वयाला जाग येते नि फुलांच्या ताज्या सुगंधात न्हालेली सखी गुणगुणायला लागते, पण सखीचा चेहरा काही स्पष्ट नसतो. मग दिवसांच्या गर्दीत काही अबोल चेहरे नजरेला स्पर्श करून जातात. आपण मग स्वत:च्याही नकळत सखीचा चेहरा त्या अनोळखी चेहऱ्याशी जुळवून पाहतो; पण एखादा तरल फरकही आपल्याला त्या चेहऱ्यापासून विलग करतो. चेहऱ्यांचं काय, ते अनेक रूपात येतात. चेहरा दिसला की डोळे मिटून सखीचा शोध सुरू होतो. एखादा चेहरा मग अगदी पापण्यांच्या चिरेबंदी तटबंदीआड लपवून ठेवलेल्या सखीच्या चेहऱ्यासारखाच भासतो. असा चेहराच चोरून नेण्याची आपली गडबड विलोभनीय असते. त्यालाच कदाचित प्रेम म्हणत असावेत!

बरेचदा गर्दीत आपल्याला भावलेल्या चेहऱ्याच्या मालकिणीची आपण सहज चोरी करतो. हळूहळू त्यावर हक्कही प्रस्थापित करतो... मालकी हक्क; पण मालकी हक्काची विखारी भावना आणि तो गाजवण्याची भूक भागली की कळतं, आपली फसगत झालेली आहे. एकदा असं कळायला लागल्यावर माणूस ज्ञानी होत नाही; पण शहाणा मात्र होतो. अशा शहाण्यांना कळतं, चेहरा म्हणजे सखी नव्हे! मालकी हक्क स्थापन करण्याची धडपड म्हणजे प्रेम नव्हे! ती केवळ भुकेजली हाव होती. सखी नावाच्या आत्मशोधाच्या मार्गात अडथळा आणणारी देहाची खाज; पण तोपर्यंत मनावर उपभोगाचे, आसक्तीचे अनेक ओेरखडे पडलेले असतात. टोकदार नखांनी ओरबडणारेही आपणच, जखमाही आपल्यालाच. जखमा बऱ्या होत आल्या, की त्यांना परत भुकेची खाज सुटते. अशा वेळी आपण स्वत:चीही नजर चुकवून अपराधीपणे त्या जखमा खाजवून घेतो. त्या अपराधातही सुख शोधतो.

या अशा प्रवासात काहींचा सखीचा शोध थांबतो. जे भुकेलाच सर्वस्व समजतात, त्यांना देहाचे उंबरे अडवतात, पण काही जण मात्र सखीचा शोध सुरूच ठेवतात. पदरी पडलेलं गुलाबाचं रोपटं जगत राहील याची तजवीज करून सखीचा शोध घेत राहतात. ही प्रतारणा नव्हे. तेजातून अनेक रंग प्रस्फुटित होतात. तेज मात्र रंगांच्या पलीकडचं असतं. सखीचंही नेमकं असंच असतं. सखीचा शोध अनंतापासून अनंतापर्यंत अव्याहत सुरू असतो. देहाची बंधनं आणि यमनियम या शोधाला नसतात आणि हा शोध संपलाच, तर मग आयुष्यात काय उरेल? प्रेम हे मिळवण्यात नाहीच, मिळवण्याच्या विजिगिषेत आहे. शोधच संपला तर कुठल्याही देहाच्या चौकटीतील आयुष्याला अर्थच उरणार नाही. मग एखाद्या भाग्यवंताला सखी सापडली, तरीही फुलांच्या गर्दीत त्याने परत ती हरवून बसावी व शोध सुरू ठेवावा... असेही नाही. सखी अंशाअंशाने भेटत राहते. भेटता भेटता हुलकावणी देते. सखी अंशत: जिथे प्रगट झाली (किमान तसा भास झाला) तिथे त्या देहाचं आपण देऊळ बांधतो. मग पूजा सुरू होते. पूजा डोळे बंद करून, हात जोडूनच करायची असते. डोळे बंद केलेत, की बंद डोळ्यांआडच्या अंधारात सखीचा चंद्र उगवतो. मग ज्याला जिथे सखी दिसेल, तिथे तो देऊळ बांधतो. आपण सीतेचं देऊळ बांधतो. राधेचं, मीरेचं, दमयंतीचं...

सगळ्यांची मंदिरं उभारतो. पण सखी काही काळ प्रगट झाली म्हणजे ते अस्तित्व होत नाही. सखी कधी राधा असते; मीरा असते; कालपुरुषाची वनवासात सोबत करणारी सीता असते; पाच पतींचा सांभाळ करणारी द्रौपदी असते आणि तिला आपल्या पाच मुलांची अनभिषिक्त सम्राज्ञी होण्याची आज्ञा करणारी कुंतीही असते. तरीही सखीचं अस्तित्व यांच्याही पलीकडे असतं. सखीला आईच्या हातच्या दूध-भाताचा स्नेहमय गंध असतो. प्रेयसीच्या पेटत्या स्पर्शाचा मोगराही सखीच असते. आराधना जेवढी बळकट, प्रार्थनेत जेवढं बळ आणि समर्पणात जेवढी निरागसता, तेवढी सखी जास्त समीप असते. म्हणून कदाचित सखी प्रेयसी म्हणून अधिक भावते. तसं सखीचं अन् आपलं शरीरसंबंधांतून किंवा शरीरसंबंधांसाठी निर्माण झालेलं कुठलंच नातं नसतं; पण व्यक्ततेची उत्कटता जिथे साध्य होते ते नातं, त्या-त्या परिवेषात आपल्याला जवळचं वाटतं. कुठलंही नातं गरजेवर आधारित असतं. गरज बदलली की नातंही बदलतं. बदलणाऱ्या प्रत्येक गरजेला आपली ओंजळ देण्याची क्षमता आणि इच्छा फक्त सखीतच असते. सखी मग आई होऊन सावली देते, प्रेयसी होऊन समर्पण देते. प्रेयसी झालेली सखी तुमच्यावर संपूर्ण अधिकार मिळविते, पण तिच्या अधिकारात आर्जव असतं. अस्तित्वाच्या चौकटीला तिथे थारा नसतो. देहभान हरवणं आणखी कशाला म्हणायचं? देहभान हरवलं की मग नेमकं देहाचं भान येतं. या नेमकेपणाच्या अवस्थेलाच समाधी म्हणतात.

सखी साधी असते; शृंगाराचा अनैसर्गिक देखावा नसतो. सौभाग्याचा टिळाच तो काय तिच्या भाळी असतो,. असा साधेपणाच तिचं सौंदर्य आणि सामर्थ्य असतो. सखी साजशृंगारानं नटली तर कहर करेल. सखी तरल असते. सख्याच्या बाबतीत ती हळुवार असते. रात्र ओथंबून गेल्यावर आळसावून निजलेल्या सख्याच्या देहाखालून ती हळूच वस्त्र खेचते. शयनगृहाच्या खिडकीचे पडदे ओढून घेते. एखादी चुकलेली चांदणी त्याच्या शेजारी येऊन पहुडली तर...! सख्याकडे नजरेचा रेशमी कटाक्ष टाकून सखी दिवसाच्या स्वागताला लागते. संसाराचा सांभाळ तिलाच करायचा असतो. ती प्रतिपालक असते. अंधारातली मस्ती डोळ्यांत साठवून ती कार्यमग्न होते. अंगण झाडणारी सखी, सडासंमार्जन करणारी सखी, तुळशीजवळ हात जोडून उभी असलेली सखी, स्वयंपाकात मग्न असलेली सखी, तुम्हाला वाढताना तृप्त होणारी सखी... पायात पैंजण, हातातल्या बांगड्या, कानातली कर्णफुलं, केसांत माळलेला गजरा... सखीच्या देहभर संगीताची मैफल सजलेली असते. सखी म्हणजे मूर्तिमंत संगीत. सखी म्हणजे नक्षी. सखी म्हणजे रंग. सखी म्हणजे संग... सौंदर्याचा! हे सौंदर्य मग देहउभारी देतं. वागण्यात डौल येतो. कामाला वेग येतो. आत्मसन्मान डवरतो. सखी हे सारं फुलवते. व्यक्तिमत्त्व खुलवते. सखी म्हणजे आत्म्याचा श्वास. सखी म्हणजे पूर्णत्वाचा ध्यास... सखीच्या देहभर खेळताना तिच्या कुशीत आपण केव्हा वाढू लागतो तेच कळत नाही. कूस खुशीत आली, की सखीला आत्मभान येतं. देहांचं मंदिर होतं. निजलेल्या बाळाला थोपटताना सखीचे हात अंगाई होतात. सखीच्या अस्तित्वाचा असा एक एक कण वेचीत जावा, वाटेला वाट फुटत जाते. ओंजळीतल्या क्षणांची फुलं झालेली असतात. या फुलांच्या माळा करून धावत सुटावं... मंदिराच्या असंख्य घंटा घणघणायला लागतात. आभाळ जमिनीला जिथं टेकतं तिथल्या उंच कड्यावर उभं राहून जलभार झालेल्या ढगातून पाण्याचं तीर्थ घ्यावं आणि साद द्यावी -सखीऽ, सऽऽखी, सऽऽखीऽऽ... सखीची भेट झाली तरीही ओंजळीतल्या फुलांसह सखी उधळून द्यावी उंच कड्यावरून आणि परत फिरावं. शोध मात्र थांबवू नये.

pethkar.shyamrao@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.