पावसाळा दरवर्षीच येतो आणि पाऊसही पडतोच; पण तरीही पहिला पाऊस हा आयुष्यातला पहिलाच वाटतो.
पावसाळा दरवर्षीच येतो आणि पाऊसही पडतोच; पण तरीही पहिला पाऊस हा आयुष्यातला पहिलाच वाटतो. ग्रेसांच्या ‘पाऊस कधीचा पडतो...’ या काव्यपंक्तीतील ‘कधीचा’ म्हणजे गेल्या दोन-चार दिवसांपासून, फार फार तर महिनाभरापासून असे आपण समजतो. वास्तवात कधीचा या संकल्पनेचा अवकाश भूतकाळाच्या अनंत पोकळीच्या गर्भागृहापर्यंत पोहोचलेला असतो. आपल्या मोजमाप करण्याच्या कुवतीतच त्याचाही विचार करतो. म्हणून मग पहिला पाऊसही आपल्याला आजचा वाटतो.
दयाघनानेच धावून यावे मदतीला, असा पाऊस आता येत नाही. आताचा पाऊस हा शहराची लागण झालेला, गरजेनुसार हळवा होणारा... तरीही पाऊस येतोच. दरवर्षी येतो. मृग नक्षत्राचा मान राखत अगदी वेळेवर बरसणारे पावसाळे पाहिलेली म्हातारी आता गावाकडच्या अंगणात बसलेली असते वैशाख संपत आला असताना. तिनेच अंगणात तुळस लावलेली अन् मोगराही... तो मोगरा ऐन वैशाखात फुलतो अन् मोगऱ्याची फुलं ती कौलारू पडवीत ठेवलेल्या लाल मातीच्या माठात टाकत असते. पाणी सुगंधी होते आणि मग पाऊस लवकर येतो, असे तिचेच गणित आहे. तिचे गणित अंकांचे नाही. त्यात मोजूनमापून असे काहीच नसते. बेरजा, गुणाकाराचे नसते. कारण तीच म्हणते, मोजले, बेरजा केल्या की वजाबाक्याही कराव्याच लागतात.
मोजमाप केले तर एका दाण्याचे अगणित दाणे नाही करता येत. जमीन दाणे मोजत नाही अन् आभाळ धारा मोजत नाही. दाणे मोजणाऱ्यांच्या शिवारात पाऊस पडत नाही, असे म्हातारीचे म्हणणे. आताशा पाऊस सर्वदूर सारखा पडत नाही, याचे कारण आम्ही आता दाणे मोजू लागलो आहोत...
म्हातारीने इतके पावसाळे पाहिले तरीही ज्येष्ठात तिच्या अधू झालेल्या नजरेलाही मृग नक्षत्र नेमके दिसते. त्यासाठी तिला दिनर्शिका बघावी लागत नाही. प्रत्येक पावसाळ्याचा पहिला पाऊस तिच्यासाठी तितकाच नवथर असतो.
वैशाखात ग्रीष्माच्या झळा असह्य होतात. वाळवणेही संपलेली असतात आणि वाळवणे करणारीही थकलेली असते. तापलेल्या तव्यावरून चालावे तशी जमीन झालेली असते. उन्हाळा नकोशा पाव्हण्यासारखा झालेला. तसाही उन्हाळा नकोसा वाटणारच. अगदी माघात थंडी थोराड होऊ घातलेली. बालपणाच्या क्षितिजाच्या कनातीखालून हळूच साऱ्यांची नजर चुकवून तरुणपण येत असताना आवाज जसा घोगरा होत जातो ना तशीच थंडीही थोडी थोराड होऊ घातलेली असते या दिवसात. फाल्गुनातही होळीला होलिका दहनाच्या झळाही नर्म थंडीमुळे हवाशा वाटतात. फाल्गुनात वसंत ऋतूंचे सोहळे सुरू होतात. ते अलवार असे तारुण्याचे दिवस असतात. बाळ अल्लड, अबोधपण कायम असते अन् तारुण्याच्या मुग्ध भावनाही कोवळ्या असतात. चैत्र चटकदार नव्या नवरीसारखा लाजरा असतो. म्हातारी अजूनही तोंडाला पदर लावत लाजत हसते आणि अशा नव्या नवरीची मस्करी करत तिला, ‘कळसाचं पाणी चढलं बाई तुझ्या अंगोपांगी,’ असं म्हणते. ‘कळसाचं पाणी’ म्हणजे काय हे त्या नव्या नवरीला नेमकेपणाने कळते अन् तिच्या अंगोपांगी त्याच्या अधीर स्पर्शांचा मोगरा फुलतो, तोवर चैत्र सरत आलेला असतो. ग्रीष्माने आपला अंमल बसवला असतो. त्या नवथर सौभाग्यवतीला तिच्या सासूने, ‘आता सकाळच्या भाकऱ्या तूच करायच्या बाई...’ असे म्हणावे अन् आकाशीचा तो चंद्र चुलीत जावा, तसेच काहीसे वसंतातल्या गुलनार वातावरणाचे झाले असते. त्यानंतर ‘जवा हाताले चटके तवा मिळते भाकर’ हे वास्तव करपून गेलेल्या भाकरीसारखे हाती आलेले असते. तव्यावर भाकर टाकल्यावर त्यावर पाण्याचा हात फिरवावा अन् त्याच्या वाफेने तिचे मेहंदीभरले नर्म गुलाबी हळवे तळवे सोलपटून निघावेत तसेच वातावरणाचे झालेले असते. नंतर ज्येष्ठाच्या मृगनक्षत्रापर्यंत वारे सैतानासारखे आगच ओकत असतात. वाळ्याच्या ताट्यांपासून अगदी नव्या जमान्याच्या वातानुकूलित यंत्रापर्यंत सगळेच उपाय थकलेले असतात. अंघोळ करायला वेळ टळून गेली अन् अंगणातल्या ड्रममधले पाणी अंघोळीला काढले की ते तापलेले असते. उन्हाच्या झळांना वाकुल्या दाखवत फुलणारा मोगराही थकलेला असतो. आता दुपारी मोगऱ्याच्या कळ्या करपून जातात. दाणे भाजावेत तशा भाजून निघालेल्या असतात. कातडीवर काजळी धरावी तशी काळपट लव येते अन् मग आता हा उन्हाळा नको असे वाटू लागते. अंगणात टाकलेल्या वाळवणावर ओढाळ जनावर वारंवार हाकलूनही परत परत येत राहते, तसेच उन्हंही ठाण मांडून बसलेली असतात. त्यांना हाकलताही येत नाही अन् उन्हाचा ताप घालवण्यासाठी पाऊस येण्याला पर्याय नसतो...
मग सुरू होते पावसाची आराधना. प्रार्थना. जितकी आर्त असते तितकी ती श्रेयस आणि प्रेयस दोन्ही सिद्ध होते. माणसाला जेव्हा आयुष्यात आता काय करावे, असा प्रश्न पडतो किंवा आता आयुष्याचे काय करावे असा प्रश्न पडतो, तेव्हा आपण पूजा करायची असते. पूजेची सुरुवातच मुळात माणसाच्या आयुष्यात अनाकलनीयाच्या गुढापासून झाली आहे. अगदी त्याच्या सोबत वावरणाऱ्या मादीला आपल्याच सारखी दिसणारी संतती कशी होते, हे गूढ वाटले तेव्हा त्याला मादीच दिव्य वाटू लागली. दिव्यची मग देवी झाली. जे जे दिव्य वाटते त्याला देवत्व देण्याची आपली मानसिकता अनादी आहे अन् अनंतही. तसेच त्याला मातीत टाकलेल्या दाण्याचे असंख्य दाणे असलेले कणीस कसे होते, हे कळले नाही तेव्हा त्याला जमीनही माता वाटू लागली. तो जमिनीची पूजा करू लागला. जमिनीवर पहुडला असताना त्याच्या अंतर्आत्म्यात आकाशाच्या अनंत पोकळीचे गूढ गहिरवले आणि तो आभाळात आपला बाप शोधू लागला. आभाळाला बाप आणि जमिनीला माय मानण्याच्या या प्रेरणा असल्या गुढाच्या गरजेतून निर्माण झाल्या आहेत.
जमीन, पाणी आणि हवा यांना तो देव मानायला लागला. वृक्ष, प्राणी, फुलं, वनस्पती, पक्षी यांना त्याने देवत्वाशी जोडून टाकले. त्यांच्या कहाण्या केल्या. कहाण्या ओल्याचिंबच असतात भावनांनी न्हाऊ घातल्यागत. तशाच त्या मग पावसाच्याही कहाण्या झाल्या. पावसाळा दरवर्षीच येतो आणि पाऊसही पडतोच; पण तरीही पहिला पाऊस हा आयुष्यातला पहिलाच वाटतो. आपण दोन आणि दोन चार असे गणित करतो. अगणिताचे गणित आपल्याला कळलेले नाही. त्यामुळे ग्रेसांच्या कवितेत ‘पाऊस कधीचा पडतो...’ असे आपण म्हणतो तेव्हा ‘कधीचा’ हा सान्त शब्द नव्हे तर ती अनंत कल्पना आहे, हे आपल्या लक्षातच येत नाही. म्हणून मग आपण ‘कधीचा’ म्हणजे गेल्या दोन-चार दिवसांपासून, फार फार तर महिनाभरापासून असे समजतो. वास्तवात कधीचा या संकल्पनेचा अवकाश भूतकाळाच्या अनंत पोकळीच्या गर्भागृहापर्यंत पोहोचलेला असतो. पाऊस कधीचा पडतो म्हणजे सृष्टीच्या प्रारंभापासूनच पाऊस पडतो आहे, असेच असते ते. पाऊस असा कधीचा पडत असला तरीही आपल्या मोजमाप करण्याच्या कुवतीतच आपण त्याचाही विचार करतो. म्हणून मग पहिला पाऊसही आपल्याला आजचा वाटतो. तो कालही पहिलाच होता आणि उद्याही पहिलाच असणार आहे.
तसे नसते तर अगदीच एखाद् वर्षांची असतानाच्या छकुलीला बोलताही येत नव्हते तेव्हाही पावसाची अन् तिची ओळख होती. तसा तिच्या आयुष्यातला तो दुसराच पावसाळा होता. अद्याप तिने या जगाला अन् जगाच्या अभिव्यक्तिला, नात्यांना शब्द दिले नव्हते. तिला बोलताच येत नव्हते. कावळा दिसताच तिला विचारले, हे काय? तर ती ‘काऊ!’ असे म्हणत टाळ्या पिटत नव्हती. कावळा तिच्यासाठी एक हालचाल करणारी वस्तूच होती इतरांसारखी. ती आईला आई आणि पित्याला बाप असे संबोधन आहे, हेही शिकली नव्हती. अशातही ती उन्हाळा असह्य होऊन पावसाची वाट मात्र बघत होती.
...अन् पाऊस आला. ती छकुली आनंदली. पहिल्या पावसाइतकेच नवथर आणि अबोध असे निर्व्याज भाव तिच्या चेहऱ्यावर होते. पाऊस तिच्या डोळ्यात दिसू लागला... तिला विचारले, ‘हे काय छकुली?’ अन् ती एका हाताची दुसऱ्याशी नीट गाठही घालता न येणारी अडखळती टाळी देत म्हणाली, ‘पाऊच्छ!’ माझ्याही आयुष्यातला तो पहिलाच पाऊस होता. प्रत्येकाने आपल्या आयुष्यातला असा पहिला पाऊस शोधला पाहिजे. पहिल्या पावसाची अशी भेट झाली की मग आयुष्यच संपन्नचिंब होते...
pethkar.shyamrao@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.