सत्यच बोलणाऱ्या मुलाची गोष्ट

तो अनाथ आहे. सत्य तसे अनाथच असते. सत्याचे पालकत्व कुणालाच पत्करता येत नाही. त्याचे निर्वहन करणे तसे कठीणच असते.
Child
ChildSakal
Updated on
Summary

तो अनाथ आहे. सत्य तसे अनाथच असते. सत्याचे पालकत्व कुणालाच पत्करता येत नाही. त्याचे निर्वहन करणे तसे कठीणच असते.

तो अनाथ आहे. सत्य तसे अनाथच असते. सत्याचे पालकत्व कुणालाच पत्करता येत नाही. त्याचे निर्वहन करणे तसे कठीणच असते. सत्याचे पालकत्व स्वीकारणाऱ्याची महाकठीण परीक्षा घेण्याची पौराणिक परंपरा आपल्या देशात आहे. त्यामुळे सत्य बोलणाऱ्या एका राजाची एका महर्षींनी कठीण परीक्षा घेतल्याची कहाणी आजही मोठ्या अभिमामाने सांगितली जाते.

तो अगदी लहानगा आहे. सातआठ वर्षांचा असेल. त्याची जन्मतारीख माहिती नसल्याने त्याच्या वयाचा नेमका अदाज बांधता येत नाही. एक मात्र खरे, की तो केवळ आणि केवळ सत्यच बोलतो. म्हणजे त्याशिवायही दुसऱ्या प्रकारे काही बोलता येते हे त्याच्या जाणिवेतही नाही. एकुणात असत्याचा स्पर्शच त्याच्या आत्मजाणिवांना झालेला नाही.

तो त्या अनाथालयात कुठून आणि कसा आला हे त्याला माहिती असण्याचे काही कारण नाही अन् अनाथालय संचालकांनाही ते माहिती नाही. त्यांनीही ते शोधण्याचा प्रयत्न कधी केला नाही. तसा तो केलाही जात नाही. या जगात केवळ सत्यच अधिकृत असते, हे काही महात्म्यांशिवाय इतर कुणाला कळलेले नाही. आपलं कूळ आणि मूळ शोधण्याची इच्छा किंवा जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्यात निर्माण व्हावी इतक्या त्याच्या जाणीवा प्रगल्भ झालेल्या नव्हत्या आणि आपल्याला इतर मुलांसारखे आई, वडील, कुटुंब, धर्म, जात... असे काहीही नाही, हे सत्य असल्याने त्याने ते स्वीकारले होते. या वयातही तो इतरांना सांगायचा, मीही तुमच्यासारखाच माणूस आहे, हेच सत्य आहे.

त्याच्या जाणिवांना असत्याचा स्पर्श झालेला नव्हता, कारण तो ढोंगी समाजव्यवस्थेपासून दूर होता. त्याला बाप नव्हता, त्यामुळे अगदी ठणठणीत असताना आपल्या आजारपणाचा अर्ज त्याच्या बापाने त्याच्याच हातांनी कचेरीत पाठवला नव्हता. त्याच्या आईने आत्याचे घरी येणे टाळण्यासाठी ‘‘या आठवड्यात आम्ही घरीच नाही...,’’ असे टळटळीत असत्य त्याच्या समोर सांगितलेले नव्हते. पूजाऱ्याने दगडी मूर्तीला सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवून मंदिराबाहेरच्या उपाशी भिकऱ्याला दुर्लक्षित ठेवणे या प्रकारापासून तो दूर होता. दरोडेखोर मागे लागलेला व्यापारी कुठे लपून बसला हे माहिती असताना ‘मला नाही माहिती’ असे शाळेत शिक्षकांनी खोटे बोलणे म्हणजे सत्यापेक्षाही चांगले असते, अशी मखलाशी पढवली नव्हती त्याला. तसे झाले असते, तर त्याने नक्कीच शिक्षकांना विचारले असते, ‘‘त्यापेक्षा त्याने व्यापाऱ्याच्या सोबतीने दरोडेखोराला मारले का नाही?’’ सत्याची कास धरली की जबाबदारी स्वीकारावी लागते. अनिष्ट ते नष्ट करणे आणि असहाय्यांनी मदत करणे हीदेखील आपली जबाबदारी असते, हे त्याला सत्यच बोलत असल्याने कळले होते.

तो सत्य बोलायचा म्हणून त्याला सत्य दिसायचे आणि कळायचेदेखील. त्यांच्या अनाथालयात एक जोडपे आले. त्यांना बऱ्यापैकी स्वावलंबी झालेला म्हणजे आपले आपण करू शकणारा मुलगा दत्तक घ्यायचा होता. आश्रमवाल्यांनी मग त्यांच्या समोर आपल्या सामाजिक कामाची अन् तत्त्वनिष्ठ प्रामाणिकपणाची दृष्यंच उभी केली. ते भारावले. आजच्या काळातही तुमच्यासारखी माणसे आहेत म्हणून हे जग टिकून आहे, असं टोकाचं ठेवणीतलं वाक्य ते बोलले. त्यांना नेमका हाच पसंत आला. त्याच्याबद्दल ते चौकशी करू लागले. अर्थात, त्यांना त्याची जात, धर्म माहिती करून घ्यायचा होता. यानेच उत्तर दिले, ‘‘कुणी सांगतात मला, की तुझी आई मुसलमान आणि तुझा पिता हिंदू होता. त्यांच्या संबंधांतून तू झालास अन् मग तेच तुला इकडे टाकून गेले...’ बापरे! म्हणत त्या माणसाने घामच पुसला. हा म्हणाला, ‘कुणी सांगतात की तू सख्ख्या बहीण-भावांच्या संबंधांतून झाला आहेस अन् मग ते तुला इकडे टाकून गेले...’ त्यांना आणखीच धक्का बसला.

‘याच वयाची आणखी काही मुलं नाही येणार का येत्या काही दिवसांत तुमच्या आश्रमात?’ अशी विचारणा त्या जोडप्याने केली. म्हणजे कपड्यांच्या दुकानात फ्रेश स्टॉक कधी येणार असंच विचारण्यासारखं. आश्रमवाले म्हणाले, ‘मुलीच जास्त येतात.’

हा म्हणाला, ‘अन् मुलं आलीत तर ही मंडळी परदेशातल्या लोकांना विकतात...’

‘असं काय बोलतो हा? इथली व्यवस्था तर आम्हाला चांगली वाटली...’ ते म्हणाले.

‘गुरुवारीच चांगली असते, कारण गुरुवारी तुमच्यासारखे पालक येतात ना...’ तो बोलला.

तो असे सत्यच बोलतो म्हणून आश्रमवाल्यांनाही तो नकोसा झाला होता. त्यांनी त्याचे खूप कौतुक केले. कुठल्या तरी चांगल्या रस्ताच्या, चांगल्या घरच्या बीजातून हा जन्मला नक्कीच, असा निष्कर्षही काढून दाखवला.

ते दत्तक घ्यायला आलेलेही ‘आम्ही दत्तक घेतोय म्हणजे किती सामाजिक कळवळ्याचे काम करतोय’ असा आव आणत होतेच. ते त्यालाही कणव, करुणा, कीव यातलंच काही संप्रशित करत होते नकळतच. ते त्याला म्हणाले, ‘आम्ही तुला नेतोय आमचा मुलगा म्हणून. तुला आता आई, बाबा मिळतीलच, सोबत आपलं घर, नातेवाईक, धर्म, जात सगळंच मिळेल... ते मिळवून द्यावं किमान एकाला तरी, म्हणून आम्ही दत्तक घेतोय...’

‘इथे ज्यांना मुलंच होत नाहीत, अशीच मंडळी दत्तक घ्यायला येतात, असे आमच्या मॅडम सांगतात... तुम्हाला मूल झालं आहे का?’ ते अर्थातच ‘नाही’ म्हणाले.

‘मग तुम्हाला तुमचं मूल असतं तर तुम्ही माझे आई, बाबा व्हायला तयार झाला नसातच नं!’ तो बोलला आणि तो सत्यच बोलतो, हे वारंवार लक्षात ठेवायचं आहे.

आता ते दत्तक घ्यायला आलेले कथित कनवाळू थोडे थरारले. आश्रम संचालक म्हणाले, ‘मोठा गोड मुलगा आहे. असाच बोलतो हा म्हणजे सत्यच... अनाथ आहे ना, आता तुमच्या रूपाने आई-वडील, घरदार, धर्म, जात मिळाली की मग रुळेल. सामान्य होईल. तशी माती चांगली आहे त्याची’’ (त्यांना माती म्हणजे ब्रीड चांगले आहे, असेच म्हणायचे होते.)

ते मग त्याचा स्वीकार करून त्याला आपला मुलगा म्हणून आपल्या घरी घेऊन आले. आश्रमवाल्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

तो सत्यच बोलतो, याचे नव्हाळीचे कौतुक झाले काही दिवस. सत्य हे बोचतंच. अडचणीचंही ठरतं, याचा प्रत्यय मग येऊ लागला. आपण सत्य वागत नाही अन् सत्य बोलत तर नाहीच; आपण खोटंच वागतो असंही नाही; मात्र आपण आपल्या सोयीचं वागतो आणि सोयीचंच बोलतोही. प्रेम हे आपल्यासाठी सत्य नाहीच. ती आपली गरज आहे, अशी गरज जिचं मूल्य मुद्रेत नाही चुकवता येत. आपल्या ज्या गरजांची किंमत आपल्याला अदा करता येते, त्या गरजा आपण विकत घेतो. ज्या गरजांचं मूल्य आपल्याला अदाच करता येत नाही, त्यासाठी आपण प्रेम ही मुद्रा वापरतो. त्याच्यासाठी सत्य हेच प्रेम होतं आणि प्रेम हेच सत्य होतं.

त्याचं सत्यवचनी असणं त्यांना अडचणीचं ठरू लागलं. घरचं किराणा दुकान होतं. ग्राहकाने तिखट हातावर घेऊन ‘‘हे इतकं लाल लाल आहे मस्त’’ असं म्हटलं तर हा म्हणाला, ‘‘मग काय तर! त्यात लाल रंगात मिसळून लाकडाचा भुसा मिसळलाय् ना!’’

त्याच्या काकाच्या मुलीला बघायला आले. पसंती देण्याआधी तिच्या संदर्भात स्पष्टच विचारून घेतलं त्यांनी, ‘‘हिचं लग्नाआधी असं काही प्रकरण नव्हतं ना?’’ याचा तो नवा बाप म्हणाला, ‘‘नाही, नाही... ती खालची मान वर करत नाही...’’ त्या पाहुण्यांनी बाजूलाच बसलेल्या याच्याकडे पाहिलं अन् सहज हसत, ‘‘काय म्हणतोस बाळ...’’ असं विचारलं. हा म्हणाला, ‘‘ताई प्रेमळ आहे माझी, तिला दोनतीन मित्र होते... मग त्यांचं भांडण झालं.’’

सत्यच बोलणाऱ्या अन् सत्याशिवाय काहीही न बोलणाऱ्या त्याची आता अडचण होऊ लागली. त्याचे पालकत्व कठीण आहे हे त्यांच्या लक्षात आलं. सत्याची जाणीव झालेला अन् मग सत्याच्या शोधाचा, सहवासाचाच ध्यास लागलेला राजकुमारही असला तरीही त्याला राजमहाल सोडून जंगलातच जावं लागतं. असत्याची घाण पुसून काढण्याची त्याचीच जबाबदारी असते...

त्यालाही घर सोडावंच लागेल... नक्की!

pethkar.shyamrao@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.