हळव्या वणव्यांचा वैशाख

माणसांनी वाटेवर सावली अंथरणारे वृक्ष तोडून टाकले. नदीवर नवा उंच पूल बांधला की यांना विकास झाल्यागत वाटतं, मात्र नदीचा नाला झाला, त्याचं काय? हे पाहून वैशाख थंडगार पडू लागला आजकाल.
nature
naturesakal
Updated on
Summary

माणसांनी वाटेवर सावली अंथरणारे वृक्ष तोडून टाकले. नदीवर नवा उंच पूल बांधला की यांना विकास झाल्यागत वाटतं, मात्र नदीचा नाला झाला, त्याचं काय? हे पाहून वैशाख थंडगार पडू लागला आजकाल.

- श्‍याम पेठकर, pethkar.shyamrao@gmail.com

माणसांनी वाटेवर सावली अंथरणारे वृक्ष तोडून टाकले. नदीवर नवा उंच पूल बांधला की यांना विकास झाल्यागत वाटतं, मात्र नदीचा नाला झाला, त्याचं काय? हे पाहून वैशाख थंडगार पडू लागला आजकाल. अशा वेळी मग वैशाखाचं डोकं फिरतं. तो सैरभैर होतो अन् पाण्याची काळजात साठवून ठेवलेली वाफ मृग नक्षत्राची वाटही न पाहता द्रविभूत होऊन वैशाखाच्या डोळ्यातून बरसून जाते; अन् आपण म्हणतो अवकाळी पाऊस आला... त्याचं दरडावणंही आम्हाला कळलं नाही; अन् आता त्याचं हळवं, केविलवाणं होणंही आम्हाला कळतच नाही... वैशाख २१ एप्रिलपासून सुरू झाला आहे, त्यानिमित्त...

वसंत आणि चैत्राच्या धगीवरच ग्रीष्माची चूल पेटत असते. अवघा ग्रीष्म अंगावर घेतो तो वैशाख. त्यासाठी तो वणव्यांचा महिना म्हणून कुख्यात झालेला. त्याने ते असिधाराव्रत धारण केले तेच मूळात हलाहल गळ्यात सामावून घेणाऱ्या आदिदेवासारखंच आहे.

हेमंतात ऊन्हं किशोरवयात येतात. त्यांना मग अलवार जाणिवांची कोवळी पानं फुटतात. हेमंताच्या दवभरल्या पहाटे तिचे गुलाबी तळवे तळ्याच्या काठी हिरवळीवर दाह पेरत जातात आणि मग अंमळ उशिराने अवतरणारी उन्हं तिच्या त्या अलवार पाऊलठशांवर आपला जीव ओवाळून टाकतात. मुग्ध तळ्याकाठी उन्हं रोजच थंडीने गारठलेल्या झाडांच्या पानांच्या डोळ्यातून तिच्या येण्याची वाट पाहू लागतात. ती मात्र गवतफुलांच्या आडोशाने दडून बसलेले दवाचे थेंब वेचत फिरत असते. ऊन्हं मग तिच्यासाठी बेभान होतात. म्हणून हेमंतातली उन्हं तहान-भूक विसरतात. शिशिरातली पानगळ म्हणजे हेमंतातल्या ऊन्हांचं तिच्या प्रेमात पडून झुरणं असतं. वसंतात मग उन्हाची अन् तिची गाठभेट होत असावी. फुलांच्या सावलीत डोळ्यात डोळे घालून ती दोघं एकमेकांची गाणी गात भरदुपारचीही पहुडलेली ज्यांना आभाळाचे डोळे आहेत त्यांना दिसतात. आभाळाचे डोळे असलेली माणसं तशी प्रेमाच्या बाबत हळवी- नाजूक आणि शहाणी असतात. ती त्यांच्या या निरागस एकांताचा बोभाटा करत नाहीत. ऊन्हं आता धिटावलेली असतात. अधिक तरुणही झालेली असतात. उन्हं अशी तरुण झाली की चैत्र सुरू होतो.

चैत्र तसा आर्त आणि आर्ष महिना आहे. वसंताचे सगळेच देणे तो फुलवत नेतो. वसंतातल्या मोहोरोला म्हणूनच चैत्रात बाळफळं लगडून आलेली असतात. फुलांचे रंग अधिक आर्त होतात. त्यांना सुगंधाची भाषा येते आणि मग चैत्रातल्या फुलांच्या सान्निध्यात आलेली पाखरं गातातही अनावर सुगंधी गाणं... त्या गाण्यावर ती ऊन्हसखी अधिकच फुलून येते. फुलण्याच्या साऱ्या मर्यादा पार करू पाहते अन् अशा वेळी वास्तवाचे चटके ऊन्हाला जाणवू लागतात. हृदयाच्या एक वित खालीच जठर असतं आणि त्याच्या भुकेला जे काय दान मिळतं, त्यावरच हृदय पोसलं जात असतं... वसंतातले झरे आटले अन् हृदयापर्यंत जीवनाचा प्रवाह आटला, की समजायचं आता वणव्यांची वैशाख भाषा सुरू झालेली आहे.

सहा ऋतूंमधला वैशाख कुणालाही नकोसाच वाटतो. ऋतुचक्रातलं हे नकोसेपण वैशाखाने स्वीकारलं, त्यातच या महिन्याचा मोठेपणा आहे. साऱ्यांनाच फुलं हवी असतात, बहर हवा असतो, गाणी गाणारे झरे हवे असतात... वणवणत स्वत:चं अवघं अस्तित्वच पोळून काढणाऱ्या वावटळी नको असतात. नको असतात, अश्रूंच्या सुकलेल्या केविलवाण्या रेशांसारख्या अश्रूंच्या कढाइतकेही गहिवरून यायला पाणी नसलेल्या नद्या...

ग्रीष्म सुरू होतो चैत्रात, मात्र त्यानं चैत्राच्या वाट्याला महापुरुषांचे जन्म दिले. आपल्या पत्नीला अग्निपरीक्षेसारखे वैशाखी संचित देणारा मर्यादापुरुषोत्तम असो की आपल्या आराध्याच्या संकटांसमोर आपल्या छातीचा कोट करून कायम उभा असलेला संजीवक सेवक असो, अवघ्या जगाला करुणेचे डोळे देणारा महात्मा असो... सगळेच चैत्रात जन्माला घातले ग्रीष्मानं. त्यानं आपल्या अवतरण्याला फुलं दिली, त्यांना सुगंध दिला, रंग दिले, फुलोर दिला, नद्यांचं अन् जलसाठ्यांचं बांधेसूद होत जाणं दिलं; पण वैशाखात प्रवेश करणाऱ्या ग्रीष्मानं मात्र यातलं काहीही दिलं नाही. एखाद्या बापानं आपल्या दोन मुलांत भेदभाव करावा, असंच हे. वैशाखाचं हे संचित आहे. तो दुष्ट वाटू शकतो; पण तो वाटतो तसा क्रूर अजिबातच नसतो. तो उन्हाला त्याचं कर्तव्य सांगतो. चैत्रात कोकिळेच्या गळ्यात त्याने फुलांचे दागिने घातले. मात्र उन्हांनी सखीच्या नादात रुणझुणत राहिलं तर मग सगळं चक्रच थांबून जाईल, याची जाणीव वैशाखाला असते.

म्हणून वैशाखात तळ्याच्या पाण्याचीच वाफ होते, फुलांना दाह होऊन त्यांची निर्माल्य होतात. पहाटच पेटून उठल्यागत पोळत निघालेली असते. गावाबाहेरचं ते तळं आता केविलवाणं झालेलं असतं... हे ग्रीष्माचं दुसऱ्या चरणातलं अवतरण असलं, तरीही त्याचे भोग मात्र वैशाखाच्या वाट्याला येतात. आपल्या पित्याच्या नाजूक श्रुंगाराला तरणा देह कायमचा हवा म्हणून पितृऋण फेडण्यासाठी पुराणात एका पुत्राने आपले तारुण्यच पित्याला बहाल केल्याची गोष्ट आपण साऱ्यांनीच ऐकली आहे, मात्र ग्रीष्माच्या चैत्रचाळ्याचे भोग आपल्या ओंजळीत घेणारा वैशाख मात्र कुणालाच कळत नाही.

वैशाखाला हे असं करावंच लागतं. ज्या काळात जे घडायला हवं त्यासाठी आपलं कर्तव्यनिहित कर्म करणं हाच निसर्ग असतो. माणसांनी माणसांना मोहामुळे मारून टाकणं हा क्रूर खेळ असेल, मात्र वनात भुकेल्या श्वापदाने त्याचे खाद्य असलेल्या जनावराची शिकार करणं, हे क्रौर्य नाही, हे ज्याला कळलं त्याला वैशाखाने स्वीकारलेले हे ग्रीष्माचे तप्त कढ किती नैसर्गिक आहेत, हे सहज कळून यावे.

वैशाख असा तापत असला, तरीही तो पाण्याची वाफ आपल्या काळजात साठवून ठेवतो अन् मग एका हळव्या क्षणी वर्षेच्या ओंजळीत ही वाफ द्रविभूत होण्यासाठी टाकून देतो. मृगाच्या नक्षत्राला म्हणूनच वैशाखाचा लळा असतो. वसंताचे लडिवाळ चाळे अन् चैत्राचे गुलजार गाणे आभाळाच्या ओंजळीतून पाण्याच्या कळश्‍या रित्या करू शकत नाहीत. वैशाखाच्या ताप भोगण्याच्या व्रतातूनच वर्षा ऋतू जन्म घेतो; अन् मग चक्र असं फिरत राहतं अन् वसंत येतो, चैत्र बहरतो...

हे सगळं समजून न घेता आपण आता वैशाखाला वणव्यांचा पिता म्हणून बदनाम करून टाकला आहे. या वसंताचा हेतू नवनिर्मिती असला, तरी वसंताच्या दुर्गुणाचेही कौतुक होते, याचे फार वाईट वाटते ग्रीष्माला. यात या ग्रीष्माचा दोष नाही, ऋतूंनी मासांवर असे अत्याचार केल्यावर कधीकाळी आपण वैशाखावर केलेल्या अन्यायाची जाणीव झाल्याने ग्रीष्म असा हळवा होणारच. कुठलाही ऋतू दोषांचे हे अवतरण भर टळटळीत दुपारी कधीच लिहीत नाही. वैशाखाची सकाळच मुळात भरदुपारी होते. वसंतात हळव्या होत जाणाऱ्या थंडीचे पांघरूण ओढून आलेल्या पहाटेच्या पहिल्या सूर्यकिरणांसारखे किंवा चैत्रात रानफुलांचे गुच्छ आपल्या सख्याच्या पायावर अर्पण करून ‘अरे! फुलं अशी वाटेवर कशीकाय उधळली गेली?’ असा लाडीक विभ्रम करीत येणाऱ्या सकाळसारखं वैशाखाच्या दिवसाचं प्राक्तन नसतं. कार्तिकात तापलेल्या तव्यावरची गरम भाकर पानांत टाकली की सुख असतं, वैशाखात तापलेला तवाच पानांत भाकर म्हणून वाढला जातो. वाढत्या वैशाख उन्हाचं ते प्राक्तन असतं.

कुठल्याही फुलाची लाली किंवा कुठल्याही पानाचं हिरवेपण, यावर या तापट ग्रीष्माचा नेहमीच आक्षेप असतो; पण ती हे सगळे करडे भोग त्यानं वैशाखाच्या जळत्या पदरात टाकले आहेत. भागीरथीच्या दुधाचे प्रत्येक माणसाच्या ओठावरून पुसले न जाणारे हे वैशाखाचे अवतरण काही आजच लिहिले गेलेले नाही. त्या आदिमायेने स्वत:च्या करंगळीने जेव्हा या सृष्टिचक्राला गती दिली, तेव्हाच हे भाकीत वैशाखाच्या कपाळी लिहिले गेले. सृष्टीच्या अंताचे भाकीत कुणी केले नाही. करू नये. वैशाखा, तुझ्यात समाधिस्थ झालेल्या दुर्वासाची शपथ! सृष्टीच्या पोटी देवांकुर निर्माण व्हावे म्हणून, कुंतीला ‘देवभूती’ मंत्र देणाऱ्या त्या दुर्वासाची तुझ्यावर कृपा आहे. कुठलेही अनुष्ठान दुर्वास नेमके तुझ्या आमगनानंतरच करायचे. यातले औचित्य ओळखण्यासाठी ऋषींचे हृदय असण्याची काही गरज नाही. कारण कुठल्याही नवनिर्मितीसाठी वासनेचे ऊन इतके तापू द्यावे लागते की, आटून आटून शेवटी त्याचे सोने झाले पाहिजे.

वैशाख तापत असतानाही ही नम्र जाणीव मातीच्या साधकांना असते की, बीज पेरणीची तयारी आताच करून ठेवायला हवी. कारण वैशाखाचे तापणे हे वर्षेच्या आगमनासाठीच आहे. वैशाख जमिनीचे करतो तरी काय? तर नांगराच्या फाळाने तिची तहान अधोरेखित करण्याआधी, तिची सोनकूस उष्णतेच्या आगीने इतकी तापवून टाकतो की, पाण्याचा एक थेंब जरी तिच्या तापत्या वक्षावर पडला, तरी त्याची वाफ व्हावी. थेंबाचे हे स्खलन अनवरत भूमंडळाच्या सर्वांगभर होण्याआधी पृथ्वीचे हृदय इतके तापावे की, तिच्या प्रणयाची पूजा सुरू असताना, या तापलेपणाच्या तेजाचे दीप लागावे.

प्रकाश नेहमी सोन्यासारखाच असतो आणि अग्नी नेहमीच उजळण्याचे काम करीत असतो. वैशाखा, तुझ्या डोळ्यांतील प्रकाश आणि तुझ्या उरातील अग्नी नेहमीच पृथ्वीची कूस उजळण्याचे काम करीत असतो.

पुढे हा ‘काम’ कलेचे रूप घेतो. कारण कुठल्याही विकृतीची तुझ्याजवळ येण्याआधीच राख होते. तुझ्याजवळ येईल ते मंगल. तुझ्याजवळ येईल ते सुवर्ण. तुझ्याजवळ येईल ती सुविद्या. म्हणूनच कुठल्याही व्रताची सुरुवात, दुर्वास तुझ्या आगमनानंतर करतात. अमंगलाचे तुझ्यामध्ये समर्पण होते आणि मंगलाची सुरुवात. म्हणूनच तुझ्या आगमनानंतरच लग्नविधीच्या नावाखाली दोन शरीरांचे मीलन होते. पूर्वी लोक पापी नव्हते, तेव्हा लग्नपत्रिकेत सरळ लिहायचे की, आमच्या मुलीचा शरीरसंबंध अमक्या तमक्याशी ठरला आहे. मुळांना तहान लागली असताना पानांवर पाणी शिंपडणारी विकृती ही कधीच संस्कृती होऊ शकत नाही. म्हणून खजूराहोतील संभोगचित्रांना कोणी विकृती मानत नाही. मानू नये. या चित्रांचे रेखांकन ग्रीष्माच्या उन्हात आणि प्रकाशात झाल्याचे संशोधन आता नवीन नाही. एरवी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात रंगांना चित्रांच्या अंगोपांगी इतके भिनता येणे शक्य नाही. रंगांना रंगात आणण्यासाठी कुठेतरी धग असावी लागते.

त्रिविध तापांच्या रंगांनीच या कामचित्रांचे अधोरेखन झाले आहे. अंगांच्याही उपांगांनी ही लेणी कोरली गेली आहेत. कुठल्याही क्रांतीचा रंग लाल आणि वैराग्याचा भगवा असतो. कारण उजळणाऱ्या आगीचा रंग लाल आणि जळणाऱ्या आगीचा रंग भगवाच असतो. म्हणून वैशाखा! तू हिरण्यगर्भाच्या वंशजांपैकीच एक. म्हणून तुझ्या वैराग्याचा रंग उन्हाळी उष्ण. रंग हा उन्हाळी उष्णसुद्धा असू शकतो. झाडांची सावली काळी नसून ‘हिरवी’ असते. ज्यात गारपण असते ते काळे कसे राहील? निसर्गाच्या सौंदर्यशास्त्राप्रमाणे सावलीचा रंग ‘गारवा’ असतो.

वैशाखा, तुझ्या पोटातल्या आगीत शिरण्याचा प्रयत्न कुणी कधीच करणार नाही. कारण माणसांच्या कातडीला पृथ्वीच्या पश्चात्तापाचे हे अग्निदिव्य सहन करणे कधीच शक्य नसते. तुझ्या या अखंड बिनसावलीच्या प्रवासात, अवचित कधी तुला जर दुर्वासाच्या कमंडलूतील शिल्लक असलेले कुंतीच्या डोळ्यांतील पाणी कधी गवसलेच, तर एक कर -भर दुपारी खूप खोल विहिरीच्या तळाशी असलेल्या माणूसभर पाण्यात स्वत:चे आभाळभर अस्तित्व बुडवून टाकण्यास आलेल्या त्या कुँवारणीच्या पोटातील ते प्रेमाशय तुला स्वत:च्या आगीने परतविता आले तर पाहा. तसे झाले तर तुझ्या हृदयात लागलेली ही चिरंतन आग कायमची शमविण्यासाठी ही जगन्माता पृथ्वी, स्वत: ऋतुस्नात होण्यासाठी वापरत असलेले सप्त समुद्राचे पाणी तुझ्या पायाशी वाहून देईल.

बदलत्या काळात जमीन, आकाश अन् पाण्याशी नातेच तोडून टाकलेल्यांना हे कळत नाही की जमीन, पाणी आणि आकाश प्रयोगशाळेत निर्माण करता येत नाहीत. कुठल्याही वाद्यांमधून पाखरांच्या ताना प्रसवता येत नाहीत. रात्र सरली की कोमेजून जात असली, तरीही देवमूर्तीवर प्लास्टिकची फुलं वाहता येत नाहीत. आता मात्र घरात नवी प्लास्टिकची फुलं आणली की लोकांना वसंत आला, असं वाटतं. वणव्याच्या ठिणग्यांच्या डोळ्यातही अश्रूंचे कढ पेरणाऱ्या वैशाखाला याच्या वेदना होतात.

वैशाख कडवा असेल; पण तो मातीशी बेईमानी करणाऱ्या माणसांइतका कृतघ्न नसतो. वैशाख कुठल्या तरी तळ्याच्या काठी असलेल्या औदुंबराच्या वृक्षाखाली पाखरांसाठी पाण्याचं डबकं राखून ठेवत असतो. आता मात्र तळ्यांना पाणी देणाऱ्या नद्या आटल्या आहेत अन् नदीचा बांधा कमनीय करणारे पाण्याचे तिला येऊन मिळणारे प्रवाहदेखील आता माणसांनी पिऊन टाकली आहेत, याची खंत ग्रीष्माला अधिक ज्वालाग्राही करते आहे. वैशाखातही हिरवेपणाशी नातं न तोडणारी झाडंही माणसांना नकोशी असतात. माणसं जंगल खाऊन टाकतात, नद्या पिऊन टाकतात, अगस्तीनी समुद्र प्यायले होते ते समुद्राच्या मायेपोटी, मात्र अगस्तीशी नातं सांगणाऱ्या ‍ माणसांनी समुद्राचं पोटंही ढवळून टाकलं आहे. पायवाटेचे रस्ते करण्याच्या नादात माणसांनी वाटेवर सावली अंथरणारे वृक्षच तोडून टाकले.

नदीवर नवा उंच पुल बांधला की यांना विकास झाल्यागत वाटतं, मात्र नदीचा नाला झाला, त्याचे काय, असा प्रश्न माणसांना पडतच नाही, हे पाहून वैशाख थंडगार पडू लागला आहे आजकाल. अशा वेळी मग वैशाखाचं डोकं फिरतं. तो सैरभैर होतो अन् पाण्याची काळजात साठवून ठेवलेली वाफ मृग नक्षत्राची वाटही न पाहता द्रविभूत होऊन वैशाखाच्या डोळ्यातून बरसून जाते अन् आपण म्हणतो अवकाळी पाऊस आला... त्याचं दरडावणंही आम्हाला कळलं नाही अन् आता त्याचं हे हळवं; केविलवाणं होणंही आम्हाला कळतच नाही. बाप रडतो तेव्हा तो घाबरला असतो, असे नाही. बापाने केविलवाणे होऊ नये; पण लेकरांनी असे काही केले, की बाप केविलवाणा होतो. बापाच्या अश्रूंचे संदर्भ कळले नाहीत, तर आयुष्याचं हसं होतं, हे लेकारांना कळायला हवं... ग्रीष्माचं वैशाखी अवतरण हे असं आहे.

म्हणून ग्रीष्णाला सांगावंसं वाटतं की, वसंताच्या दुर्गुणावर इतके नाराज होण्यासारखे काहीच नसते. प्रेमाच्या पराभवानंतर ग्रीष्म तळ्यातल्या वाफाळल्या पाण्यात इथल्या सर्वच जीवांना एक पाऊसशोध घ्यायचा असतो. लक्षात ठेव, आमचे घर गळते तेव्हाच आमची चूल जळत असते. आमच्या प्रारब्धाचे हे प्राक्तन तुलाच काय, पण असेल अस्तित्वात तर त्या परमेश्वरालाही पुसता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.