जेव्हा जेव्हा मी भारत सरकारची पर्यटनाला प्रोत्साहन देणारी जाहिरात 'अतुल्य भारत' पहाते तेव्हा तेव्हा मला विस्मय वाटतो. भारतामध्ये असे काय आहे जे "अतुल्य' आहे ? निसर्ग म्हणावा तर तो वृक्षतोडीने वाटेला लागला आहे; "सुजलाम सुफलाम' असे वर्णन केली गेलेली भुमी आता ना सुजल राहिली आहे; ना सुफल राहिलेली आहे. मग हे अतुल्य म्हणजे नेमके आहे तरी काय? तर इथली स्त्रीद्वेष्टी परंपरा आणि संस्कृती. ती मात्र खरचं अगदी अतुल्य आहे. खरंतर ही स्त्रीद्वेष्टी संस्कृती हे पुर्वेकडचे देश आणि अरबस्तानचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
तर अशा अतुल्य संस्कृतीच्या भारत देशाची "थोरवी' इथे येऊन गेलेल्या परकीय , गौरवर्णी स्त्रिया नेहमीच गात आलेल्या आहेत. त्यामुळेच तेथुन भारताला भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना ते देश सजग करतात की तुम्ही ज्या देशात जात आहात तेथे तुमच्यावर लैंगिक हल्ले, लूटमार होऊ शकते. 22 ऑगस्ट 2013 च्या सी.एन.एन. न्यूज सर्व्हिसने प्रसिद्ध केले होते ते एका अमेरिकन मुलीचे भारताबद्दलचे मत, जे तिने तिच्या भारत भेटीतुन अनुभवलेले होते. तिचे नाव मायकेला क्रॉस. ती भारतात एका अभ्यास दौऱ्यावर आली होती. काय होते तिचे अनुभव ? तर सतत चाललेला लैंगिक छळ, छेडछाड, नकोसे स्पर्श इत्यादी सर्व अप्रिय अनुभव. ती मायदेशी गेली तेव्हा म्हणाली "भारत हा पर्यटकांसाठी स्वर्ग आहे ,पण स्त्रियांसाठी नरक'. तिला आलेल्या वाईट अनुभवांमुळे तिला अनेक दिवस मानसोपचार घ्यावे लागले. तर अशा या अतुल्य भारताबद्दल अलीकडेच आणखी एक बातमी आली. स्वित्झर्लंडच्या एका पर्यटक जोडप्याला फतेहपुर सिक्री येथे 4-5 जणांकडून अमानुष मारहाण झाली. मारहाण करणाऱ्यांतील तीन जण अल्पवयीन आहेत. त्यांना मदत करायचे सोडुन आमचे लोक त्यांचे फोटो मोबाईलवर काढण्यात गुंतले होते. बरोबरच आहे. या देशात सती घालवली जाणारी स्त्री किंचाळत असली तरी तो भयानक प्रकार थांबवावा असे कोणा प्रेक्षकास कधी वाटले नाही. उलट एक धार्मिक कार्य म्हणुन तो भयानक आणि अमानवी प्रकार पहायला लोक जमत. असो. या जोडप्यास झालेल्या मारहाणीचे कारण : त्या जोडप्यातील तरुण मुलीबरोबर सेल्फि काढायची बिचाऱ्या गुंडांची इच्छा होती. पण त्या पाश्चात्य भोगवादी आणि स्वैराचारी तरुणीने आणि तरुणाने त्यांना विरोध केला. या पापाची शिक्षा त्यांना दिली गेली. ते दोघेही अतिशय जखमी झाले - मनाने आणि शरीराने. त्या मुलीची श्रवण क्षमता त्या मारहाणीने कमी झालेली आहे. पाश्चात्य भोगवादी का आहेत? तर तेथे मुलीच्या इच्छेला महत्व दिले जाते. आमच्या देशाचे अर्थातच तसे नाही. आमच्या देशात स्त्रिया एकतर आज्ञाधारक भोग्यवस्तू आहेत; वा स्वतंत्रपणे वागू इच्छिणाऱ्या स्त्रिया पापिणी आहेत.
हे असे का होत आले आहे ? तर त्यासाठी आपल्याकडे ज्या पध्दतीने मुलांना व मुलींना वाढवले जाते त्याकडे पहावे लागेल. पुरुष म्हणजे बाईचा आधार हा मोठाच गैरसमज पसरला असल्याने मुलांना बाई ही त्यांची अंकित असते हे शिकवले जाते. अंकित असलेल्या व्यक्तीचा अपमान केला तरी ती विरोध करु शकत नाही. मुलींना शरणागतता शिकवलेली असते. या शिवाय, मुलगी गरोदर रहाते आणि मुलाने काहीही केले तरी चालते, अशीही एक समजूत करुन दिलेली असते. त्यातुनच बायकांकडे पहाण्याचा दृष्टिकोन हा उपभोग्य वस्तु असा झाला आहे. त्यातही परदेशी गौरवर्णीय स्त्रियांना भारतीयांच्या वर्णद्वेषाचाही सामना करावा लागतो.
आपल्याकडच्या जाहिरातीही मवालीपणाचे उदात्तीकरण करणाऱ्या आहेत. त्यातीलच एक जाहिरात म्हणजे Men will be men . या जाहिरातीत पांढरपेशा पुरुषाच्या मवालीपणाचे उघड समर्थन केले आहे. मग अडाणी पुरुषांकडुन जास्त अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे? आता काहीजण या मवालीपणाचे खापर इंटरनेटच्या वापरावर फोडतील. पण इंटरनेटचा वापर इतरही चांगल्या गोष्टींसाठी केला जातो. आपली बुध्दी कशी आहे, त्यावर एखाद्या सोयीचा वापर कसा होणार हे ठरते. जेव्हा इंटरनेट नव्हते तेव्हा ही स्त्रीद्वेष्टी मनोवृत्ती नव्हती का; तर नक्कीच ती होती. काही वर्षांपुर्वी आमच्या सांगलीत दोन जर्मन मुली आल्या होत्या. त्या वालचंद कॉलेजपासून बसने सिटी पोस्टापर्यंत यायच्या. सांगली शहर आणि आसपासच्या खेडेगावातुन आलेली "भोळीभाबडी' मुले त्यांची चेष्टा करण्यात रमलेली असत. आपली धार्मिक स्थळे, देवळे या ठिकाणी असलेली शिल्पेही ही या विकृतीचा उत्तम नमुना म्हणावी लागतील. ही शिल्पे प्रमाणबद्ध आहेत, असे जे कोणी म्हणत असतील त्यांची प्रमाणबध्दतेची व्याख्या तपासून घ्यावी लागेल. या देवळांभोवती जी शिल्पे आहेत ती प्रामुख्याने स्त्री शिल्पे आहेत आणि त्या स्त्रियांचे स्तन आणि नितंब हे अवाजवी मोठे दाखवलेले असतात. एकूणच अगदी "अध्यात्मिक' आनंद घ्यायच्या जागाही वैषयिक भावनेला भडकवत नाहीत, असे होत नाही. अशा परिस्थितीत बाईला फक्त स्तन आणि नितंब नसून मेंदुही असतो हे विसरले जाते आणि मग भारतीय बायकांना जे अप्रिय अनुभव रोजच्या रोज घ्यावे लागतात; ते परदेशी स्त्रियांनाही घ्यावे लागतात.
याच स्त्रिद्वेष्ट्या मनोवृत्तीतुन भारतातील लोकसंख्या भरमसाठ वाढली आहे. त्या लोकसंख्येला चांगल्या कामात गुंतवणे अशक्य झाले आहे. अशी बेबंद झालेली लोकसंख्या देशाची अब्रु जी काही थोडीफार शिल्लक असेल तर पार धुळीला मिळवते. भारतात पर्यटनातून आर्थिक प्राप्ती करावयाच्या योजना आखल्या जातात. पण आम्ही भारतीय स्त्रियाही एकट्या दुकट्या या पर्यटन स्थळांना भेटी द्यायला घाबरतो. कोठे रात्री अपरात्री जायची वेळ आलीच तर एखादे हत्यार जवळ घेऊनच बाहेर पडतो. आपल्या अशा "उच्चउदात्त' संस्कृतीचा डंका अशा अनेक घटनांतून जगात पोहोचत असताना आपल्याला पर्यटनातून पैसा कसा काय मिळणार आहे ते मला समजत नाही .
"करियरिस्ट' स्त्रियांसंदर्भातील गैरसमज
महिलांना उपभोग्य वस्तु म्हणून पाहत त्यांचा विनयभंग वा अन्य मार्गांनी उपमर्द करणाऱ्या किती गुन्हेगारांच्या माता या करियरिस्ट स्त्रिया आहेत त्याचाही शोध घेतला जावा. कारण करियरिस्ट स्त्रियांची मुले बिघडतात, असा एक आवडता प्रचार सुरु असतो. या शिवाय अशी अपेक्षा आहे की मानवीहक्कवाले आता या स्त्रीद्वेष्टया गुन्हेगारांच्या कथित मानवी हक्कांबद्दल आक्रोश करणार नाहीत. कारण हा देशांतर्गत प्रश्न राहिलेला नाही. तो जगाच्या पटलावर आलेला आहे.
एकंदरच भारतीय लोकांचा अदूरदर्शीपणाचा हा एक उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. शेतीत पिकत नाही , बेरोजगारी आहे तर निदान पर्यटनातून तरी पैसा मिळेल असा विचार भारतीय करत नाहीत. त्यांची रानटी मानसिकता ते बदलत नाहीत. भारतीय पुरुष पर्यटकांना, जे पाश्चिमी देशांना आणि अमेरिकेला भेट देऊ इच्छितात त्यांना आपल्या पर्यटन कंपन्यांतुन एक संदेश दिला जातो - "तुम्ही परदेशात गेलात तर तेथील स्त्रियांकडे टक लावुन पहात राहु नका' हे सांगायची वेळ येते कारण त्यांची इथली सवय. "नेकनामदार गोखले' या पुस्तकात मी वाचले ते असे : व्हॉईसरॉयच्या पदरी अनेक शिख सुरक्षारक्षक असत. पण ज्या वेळी तेथे इंग्रज स्त्रिया आणि पुरुषांचे नृत्याचे कार्यक्रम होत; तेव्हा तेथिल शीख सुरक्षारक्षक हटवुन तेथे ब्रिटिश सुरक्षा रक्षकांची नेमणुक केली जात असे. त्यामागचे कारण लॉर्ड मिंटोंच्या लक्षात आले नाही. पण माझ्या लक्षात येते आहे - शिख असोत नाहीतर आणखी कुणी ; ते त्या ब्रिटिश स्त्रियांबरोबर चांगले वागतील याची त्या लोकांना खात्री वाटत नसावी हे माझे अनुमान... |
|