अक्षयकुमारचा ’टॉयलेट:एक प्रेमकथा’ पाहिला होता. त्यामुळे ’पॅडमॅन’बाबत अपेक्षा वाढल्या होत्या. काही बाबतीत सिनेमा समाजसुधारणेची गरज अधोरेखित करण्यास यशस्वी झालेला आहे. पण त्याच बरोबर अक्षयकुमार कम्युनिस्टांकडून होणार्या बहुराष्ट्रिय कंपन्यांविरोधातील प्रचाराला अनवधानाने बळी पडला आहे.
पहिली गोष्ट म्हणजे मुलगा हवा म्हणुन वाढवलेली लोकसंख्या, लहान घरात कोंबुन राहिलेली माणसे, जुनाट इमारती. लक्ष्मीला किती बहिणी आहेत ते मोजता येत नाही. बहुतेक ४ जणी आहेत. त्यातही बहिणींचा रक्षक म्हणजे भाऊ ही अंधश्रध्दा सिनेमात राखीपौर्णिमा साजरी करुन दाखवली आहे. पाळी आल्यावर मुलगी ४-५ दिवस अस्पृश्य होते. कारण त्याचा पवित्र -अपवित्र असण्याशी जोडलेला संबंध. अस्पृश्यता आणि अमानुषता यांचा जवळचा संबंध आहे. तो इथेही दिसतो. गरीब घरात रहायच्या जागेची पुरेशी सोय नसणे, त्यासाठी थंडी वारा, ऊन सोसत मुलींना, बायकांना पाळीच्या काळात, घरात त्यांचा वावर होऊ नये यासाठी गॅलरीत रहावे लागणे, त्यामुळे त्यांना न टाळता येणारी मवाल्यांकडुन होणारी छेडछाड हे सर्व चांगल्या पध्दतीने दाखवले आहे. ज्या काळात सर्वांत जास्त स्वच्छता बाळगली पाहिजे त्या काळातच स्त्रिला अस्वच्छ रहावे लागणे हा अमानुष प्रकार निव्वळ पवित्र-अपवित्रच्या कल्पनेत अडकल्याने बायकांना सहन करावा लागतो. हिंदु संस्कृतीत स्त्रिला, ’तु पुरुषाच्या सोयीसाठीच जन्माला आली आहेस’ हे बिंबवण्यासाठी काहीतरी निमित्त करुन समाजापासुन लांब ठेवणे गरजेचे असते. ती ’सोय’ अनायासे मासिक पाळीच्या निमित्ताने मिळते. रोजच्या रोज स्त्रिला तिचे दुय्यमत्व दाखवणे, त्यासाठी तिची वेगळी वसाहत करणे (जशी पुर्वी दलित आणि अस्पृश्य लोकांची वेगळी वसाहत केली जात होती त्या प्रमाणे) अशक्य आहे. कारण तीच्या श्रमांवरच कुटुंबव्यवस्था उभी आहे. तिनेच स्वयंपाक करायचा, तिने पुरुषाची लैंगिक भुक भागवायची आणि तिने त्याच्यासाठी पुढचा वंश जन्माला घालायचा हे होण्यासाठी तिला घरापासुन कायमची लांब ठेवणे अशक्य असल्याने निदान ४ दिवसतरी तिला तिची ’जागा’ दाखवुन देण्यासाठी बाजुला काढणे गरजेचे होते. म्हणुन पाप पुण्याच्या, पवित्र -अपवित्रच्या कल्पना बायकांच्या माथी मारल्या गेल्या. दुर्दैवाने अस्पृश्यांचा मंदिर प्रवेश, सार्वजनिक ठिकाणची अस्पृश्यता नाहिशी व्हावी म्हणुन जेवढे प्रयत्न झाले त्याच्या कणभरही प्रयत्न स्त्रियांवर लादलेल्या अस्पृश्यतेच्या निर्मुलनासाठी झाले नाहीत.
अत्यंत गरजेच्या वस्तु खरेदी करताना जीवाची तगमग करणारे देवाधर्माच्या बाबतीत डोके बाजुला ठेऊन कसे वागतात त्याचे दर्शन या सिनेमात चांगल्या प्रकारे दाखवले आहे. ५५ रुपयांचे पॅड खरेदी करणे लक्ष्मीच्या बायकोला खर्चाचे वाटते. पण त्याच वेळी ती देवासमोर ५१ रुपये ठेवते. भारतिय समाजाला पृथ्वीवरचे आयुष्य चांगले जावे असे वाटत नाही. त्यांनी न पाहिलेल्या स्वर्गात जागा मिळावी अशी अपेक्षा असते. या जगातले प्रश्न या जगातच सोडवले जायला हवेत हे समजत नाही. पण या जगातल्या प्रश्नांसाठी या जगात जो नाही त्या देवाला साकडे घालण्याच्या अतार्किकपणा हा नेहमीचा प्रकार. लक्ष्मी हा चांगला, प्रेमळ नवरा आहे. गरीब आहे. त्याच्याजवळ बायकोला फिरायला नेण्यासाठी फक्त सायकलच आहे. बायकोला सायकलच्या बारवर बसवुन तो फिरायला नेतो. त्या बारवर बसण्याचा तिला कसा त्रास होतो हे त्याच्या लक्षात येते आणि तो ताबडतोब तिच्यासाठी सायकलच्या कॅरीयरवर एक खुर्ची करुन घेतो. बायकोची काळजी घेणारे नवरे भारतात दुर्मिळ आहेत. तो त्यातलाच एक दुर्मिळ नवरा आहे. त्यामुळॆच त्याला पाळीच्या चार-पाच दिवसात बायकोला बाहेर गॅलरीत रहावे लागते हे आवडत नाही. पाळीचे रक्त शोषुन घेण्यासाठी कापड वापरणे, धुतलेल्या कापडाला सुर्यप्रकाश न दिसणे हे किती अनारोग्यकारक आहे हे त्याला समजते. त्यासाठी तो पॅड विकत आणायला जातो. पण त्या पॅडची किंमत पाहुन पत्नी ते वापरण्यास नकार देते. त्याला बायकोचा त्रास कमी व्हावा ही तीव्र इच्छा असते आणि उपाय तर सुचत नसतो. अशा वेळची मानसिक तगमग अक्कीने चांगली दाखवली आहे.
भारतिय समाजाची अतार्किकता, तर्कशुध्द विचार करणार्या अत्यल्प संख्येने असलेल्यांना वेड्यात काढायची, त्रास देण्याची वृत्ती आणि त्याच व्यक्तीला जगात मान मिळाला की टाळ्या वाजवणारे तेच लोक हेही चांगले दाखवले आहे. मुलीच्या आयुष्याची वाट लावणारे जन्मदाते. तिचे लग्न करुन टाकले की तिचे काही हा होईना ही अमानुष आणि स्वार्थी मानसिकता असलेले ’वत्सल?’ जन्मदाते. अशा नालायक आईबापाच्या मुलीला नवर्याकडुन होणारा त्रास निमुटपणे सोसावा लागणे हे सर्व अगदी परिणामकारक पध्दतीने दाखवले आहे. एकुण हा सिनेमा स्त्रियांचे घरोघरी या ना त्या कारणाने होणारे शोषण चांगल्या प्रकारे दाखवण्यात यशस्वी झाला आहे. पण...
लक्ष्मी (अक्की) याला चांगल्या प्रतीचे पॅड बनवायचे असते. त्यासाठी लागणारे सेल्युलोज कोठे मिळेल याची तो कॉलेजच्या प्राध्यापकाच्या, लहान मुलाच्या मदतीने गुगलवर माहिती मिळवतो. एक अमेरिकन कंपनी सेल्युलोज विकत असते. त्या वेळी केलेल्या फोन कॉलमधे लक्ष्मी खोटे सांगतो की त्याचा ६००० कोटीचा बिझिनेस आहे. ते ऐकुन त्या कंपनीचा कर्मचारी/अधिकारी त्याला सेल्युलोजचे सॅंपल पाठवतो. हेच न पटणारे आहे. नुसत्या फोन कॉलवरुन सॅंपल पाठवायला त्या कंपनीला दिवाळे काढायचे नसते हे लक्षात घ्यायला हवे. बरं, थोड्या काळासाठी आपण समजुन घेऊ, की ती परदेशी कंपनी असे सॅंपल फुकट पाठवते. सुरुवातीला ते त्याला फुकट मिळते. पण पुढे काय? लक्ष्मी काही सेल्युलोज स्वस्तात कसे तयार करायचे ते सांगु/शोधु शकलेला नाही. अशावेळी त्याला किंवा ज्या कुणाला पॅड तयार करायचे आहे त्यांना ते परदेशातुनच मागवावे लागणार. अशावेळी फक्त २ रुपयात पॅड विकणे शक्य आहे का? त्या कंपन्या ५५ रुपयांना विकत असतील तर फायदा घ्यायचा नाही असे ठरवुनही त्याची किंमत दोन रुपये इतकी कमी करणे अशक्य आहे. कमीत कमी ३० रुपये तरी त्यावर आकारावे लागतीलच. बहुराष्ट्रीय कंपन्या अवाजवी फायदा मिळवतात हा कम्युनिस्टांनी अमेरिकन/परदेशी कंपन्यांविरुध्द केलेल्या अपप्रचाराचा भाग आहे.
त्यात बचत गटांचे अगदी गुडी गुडी प्रदर्शन केले आहे. पण अनेकदा बचत गट हे गैरव्यवहारांचे कुरण झालेले असतात. बचत गटाची कल्पना स्त्रियांमधे उद्योगिनी तयार व्हाव्यात म्हणुन अस्तित्वात आली. पण उत्पादन हे उद्दिष्ट बाजुला ठेऊन इतर गरजेपोटी बचत गटातुन पैसे उचलायचे आणि नंतर ते फेडायचे नाहीत हा प्रकार अधूनमधून वृत्तपत्रात वाचायला मिळतो. शिवाय बचत गटांकडुन तयार झालेल्या वस्तुंच्या गुणवत्तेची परिक्षा केली जाते का? बेजबाबदारपणे वाढवलेल्या लोकसंख्येत गुणवत्तेची परिक्षा करण्यासाठी नोकरवर्ग नेमणे सरकारला शक्य होत नाही. बहुराष्ट्रिय कंपन्या या ’खल’ प्रवृत्ती आहेत या दृष्टीने पहायची सवय आपल्याइथे समाजवादी आणि कम्युनिस्टांनी लावली आहे. पण बहुराष्ट्रिय कंपन्यात तयार होणार्या वस्तुंना मानवी स्पर्श कमीत कमी होईल याची काळजी घेतली जाते. त्यामुळे आरोग्याशी संबंधीत वस्तु निर्जंतुक असण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी बचत गटाने तयार केलेले उत्पादन हे त्या कंपन्यांनी केलेल्या उत्पादनाच्या योग्यतेचे असेल हे कसे काय शक्य आहे?
हा सिनेमा स्त्रियांचे त्या काळात होणारे हाल चांगल्याप्रकारे दाखवतो. पण लोकसंख्या हा मोठा प्रश्न आहे हे सांगतानाच लक्ष्मी जर तर ची नेहमीची भाषा वापरतो. १२५ कोटी लोक म्हणजे १२५ कोटी मेंदु हे स्पप्नरंजन चांगले आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की ज्या देशांनी संख्या महत्वाची मानली नाही आणि गुणवत्ता महत्वाची मानली तेच देश प्रगती करु शकले आहेत. नुसता मेंदु अनेकांना असतो. त्या मेंदुला सकस आहार आणि विश्रांतीही लागते. ती मिळाली तरच मेंदु काम करु शकतो. असे असताना १२५ कोटी मेंदुंकडुन काम होणे शक्य आहे का? शिवाय ज्या प्रकाराने आपल्या देशात तर्कशुध्द विचार करणार्या व्यक्तीला वेड्यात काढले जाते ते पहाता १२५ कोटी मेंदु जे अतार्किक वागण्यातुनच निर्माण झाले आहेत, त्या मेंदुंकडुन विधायक काही घडणे अशक्य कोटीतले आहे. १२५ कोटी मेंदु खरेच उपयोगाचे असते तर इथे आगरकर, हमीद दलवाई तयार होण्याची गरजच पडली नसती आणि रोजच्या रोज आपल्याला राडा पाहावा/सोसावा लागला नसता.
सारांश एक चांगला सिनेमा, कम्युनिस्टांच्या प्रचाराचा बळी झालेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.