सोशल फॉर अ‍ॅक्शन: बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी 'अवनि संस्था'

महाराष्ट्रात स्वयंसेवी संस्थांद्वारे विविध क्षेत्रात सातत्याने अनेक समाजविधायक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
Sakal
SakalSakal
Updated on

महाराष्ट्रात स्वयंसेवी संस्थांद्वारे विविध क्षेत्रात सातत्याने अनेक समाजविधायक उपक्रमांचे आयोजन केले जाते. अशा स्वयंसेवी संस्थांना सकाळ सोशल फाउंडेशन अंतर्गत क्राउड फंडिंग मार्फत आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी व स्वयंसेवी संस्थां आणि देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी "सोशल फॉर अॅक्शन" हा डिजिटल वेबसाईट स्वरूपात क्राउड फंडिंगचा प्लॅटफॉर्म जानेवारी २०२१ मध्ये सुरु करण्यात आला होता. 

या अभियानास संस्थांकडून व देणगीदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून , एका वर्षात सोशल फॉर अॅक्शन अभियानामार्फत तेरा स्वयंसेवी संस्थांचे अभियान राबविण्यात आले असून, या अभियानांतर्गत आतापर्यंत माहेर (पुणे), माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान (धुळे), एकलव्य बालशिक्षण व आरोग्य न्यास (रत्नागिरी कुडाळ प्रकल्प) , भारत जोडो युवा अकादमी (नांदेड), प्रार्थना फाउंडेशन (सोलापूर) व यशोधन ट्रस्ट (सातारा) या सहा स्वयंसेवी संस्थांचे अभियान पूर्ण करून, त्या - त्या संस्थांना निधी वर्ग केला आहे.

समाजातील विविध उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र व गोवा राज्यातील स्वयंसेवी संस्थांच्या विविध उपक्रमांसाठी क्राउड फंडिंग मिळवून देण्यासाठी "सोशल फॉर अॅक्शन" हा क्राउड फंडिंगसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म नवीन वर्षात सुरु ठेवण्यात येत आहे. "सोशल फॉर अॅक्शन" या अभियानाच्या माध्यमातून 'समाजभान' सदरात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते. आजच्या भागात कोल्हापूर, सांगली व सातारा परिसरात वीटभट्टी कामगार , ऊसतोड कामगार अशा स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देऊन , त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी कार्यरत असलेल्या 'अवनि' या संस्थेची माहिती पाहूया ...

बेळगाव येथील एका छोट्या गावातून कामानिमित्त कोल्हापूर येथील वीटभट्टीवर आपल्या कुटुंबासहित आलेले परशराम कांबळे आपला अनुभव सांगत होते की , आम्ही गावाहून वर्षातील पाच - सहा महिने वीटभट्टीवर कामासाठी आलो की , अवनि संस्थेचे कर्मचारी आमच्या वस्तीवर येत व मुलांची माहिती घेऊन, त्यांना शाळेत पाठविण्यास सांगत. तसेच वीटभट्टीवर लहान मुलांना काम करू देऊ नका असे कळकळीने सांगत.

काही दिवसांनी आमच्या वस्तीवरच ते मुलांसाठी शाळा सुरु करत. दिवसभर कामाच्या नादात आमची मुले कुठे आहेत , काय करत आहेत , त्यांनी काही खाल्लं असेल या सर्वांचा आम्हाला विसर पडत. पण शाळेतच मुले शिक्षणाबरोबर , खेळत होती , पोटभर जेवत होती. हे सर्व पाहून आम्हला आनंद झाला. तसेच कोरोना व लॉकडाऊन मध्ये आमचे काम बंद झाले आणि आम्ही आमच्या गावी जाऊ शकलो नाही तेंव्हा आम्हाला सुरक्षिततेची सर्व साधने व जीवनावश्यक वस्तू - अन्नधान्य व इतर सर्व गोष्टी अवनि संस्थेने दिल्या, त्यामुळे आम्ही जगू शकलो. आता आम्ही आमच्या मुलांना शिकवून खूप मोठे करणार आहोत.

'अवनि' संस्थेची स्थापना सन १९९४ मध्ये सांगली येथे स्वर्गीय अरुण चव्हाण यांनी केली. आता संस्थेचे कार्य संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वीटभट्टी व ऊस तोडणी करीता विदर्भ व मराठवाड्यातून असंख्य कुटुंबांचे स्थलांतर होत असते. स्थलांतरित कामगारांना हंगामानुसार व मिळणाऱ्या कामानुसार एका ठिकाणाहून - दुसऱ्या ठिकाणी कुटुंबासहित सतत स्थलांतर करावे लागते. अशा स्थलांतरित कुटुंबातील लहान मुलांच्या शिक्षणात खंड पडून, ही मुले शिक्षणापासून वंचित राहतात. यापैकी बहुसंख्य मुलांना बालकामगार म्हणून काम करावे लागते. वीट भट्टी व इतर ठिकाणी काम करणाऱ्या बालकामगारांचे प्रमाण फार मोठे असून , परिणामी पुढे ही मुले व्यसनाधीनतेकडे व गुन्हेगारीकडे वळतात. स्थलांतरित कामगारांच्या मुला - मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. अशा मुलांना बालकामगार मधून मुक्त करून, त्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत आणून, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी अवनि संस्थेकडून अनेक समाजविधायक उपक्रम राबविले जातात.

अवनि बालगृह :-

अवनि संस्था गेल्या २८ वर्षांपासून निराधार, वंचित , शाळाबाह्य , एकलपालक , वीटभट्टीवर काम करणारी मुले , भंगार गोळा मुले व कचरावेचक वस्तीमधील मुली यांच्या सर्वांगीण विकासासाठी अवनि बालगृह हा प्रकल्प चालवते. या प्रकल्पात मुलामुलींच्या अन्न , वस्त्र , निवारा , शिक्षण , आरोग्य व मानसिक आरोग्य या गरजा पूर्ण केल्या जातात. आतापर्यंत संस्थेमार्फ़त अकरा हजार पाचशे मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत.

वीटभट्टी व साखर शाळा प्रकल्प :-

अवनि संस्थेमार्फत वीटभट्टी व साखर शाळा उपक्रम राबविले जातात. वीटभट्टी व साखर कारखाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुटुंबे रोजगारासाठी हंगामी स्थलांतर करतात. अशा कुटुंबातील तीन ते पाच वयोगटातील मुलांसाठी कोल्हापूर , सांगली व सातारा येथे वीटभट्टी व साखर शाळा प्रकल्प राबविले जातात.

डे केअर सेंटर प्रकल्प :-

अवनि संस्थेमार्फत पंधरा वर्षांपासून कचरावेचक महिलांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रक्रियेत आणण्याचे कार्य केले जाते. या मुलांना शिक्षणाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी ३ ते ५ वयोगटातील मुलामुलींसाठी डे केअर सेंटर चालविण्यात येतात. डे केअर सेंटरच्या माध्यमातून दरवर्षी सातशे मुला-मुलींना मोफत शिक्षण दिले जाते.

अभ्यासिका प्रकल्प :-

कचरावेचक वस्त्यांमधील मुला-मुलींना अभ्यासाची सवय व्हावी यासाठी , कचरावेचक महिलांच्या ६ ते १४ वयोगटातील मुलांमुलींसाठी मोफत अभ्यासिका प्रकल्प अवनि संस्थेमार्फत तेरा वस्त्यांमध्ये सुरू आहे.

फिरती लायब्ररी प्रकल्प :-

अवनि संस्थेमार्फत गेल्या सहा वर्षांपासून सात वस्त्यांमध्ये मुला-मुलींना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी तसेच वाचन करण्यासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी फिरती लायब्ररी प्रकल्प राबविला जातो.

संस्थेच्या कोल्हापूर, सांगली, कराड व सातारा याठिकाणी शाखा असून , आतापर्यंत अवनि संस्थेमार्फत बावन्न हजार बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. तसेच संस्थेने २८ वर्षाच्या कालावधीमध्ये कोल्हापूर, सांगली व सातारा येथील कचरावेचक , विधवा , परित्यक्ता, निराधार व गरजू सतरा हजार महिलांचे संघटन करून , त्यांना शासकीय योजना व रोजगार यांची उपलब्धता करून दिली आहे.

सध्यपरिस्थितीत संस्थेचे सांगली व सातारा येथे ३४ डे केअर सेंटर सुरू आहेत .यामध्ये ३ ते ५ वयोगटातील ११५० बालकांना शिक्षणाची गोडी लावली जाते. तसेच ७ ते १४ वयोगटातील ७५४ बालकांना प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार देऊन , प्राथमिक शाळेमध्ये दाखल करून त्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत आणले आहे. संस्थेमार्फत दररोज २७७ बालकांना दुपारचा पोषण आहार दिला जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हणबरवाडी येथे वीटभट्टी व ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहाची इमारत बांधली आहे. येथे सध्या ४५ मुलींचे संगोपन केले जाते. परंतु जागा अपूर्ण असल्यामुळे दोनशे मुलींचे निवासी वसतिगृह सुरू करण्याकरीता इमारतीचे नवीन बांधकाम करण्याचा संस्थेचा प्रयत्न सुरू आहे. अवनि संस्थेच्या या सामाजिक कार्यांसाठी आपल्या सर्वांच्या सामुदायिक मदतीची गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी व माहिती तंत्रज्ञान कंपन्या , इंडस्ट्रियल आस्थापनांनी सीएसआर विभागांतर्गत पुढे येऊन, संस्थेला सढळहाताने मदत करावी.

आपण खालील गोष्टींसाठी देणगीरुपी आर्थिक मदत करू शकता :-

१. इमारतीच्या नवीन बांधकामासाठी आर्थिक स्वरूपात मदत .

२. डे केअर सेंटर मधील बालकांसाठी शैक्षणिक साहित्यासाठी मदत.

३. वीटभट्टी व साखर शाळा प्रकल्पातील बालकांच्या पोषण आहारासाठी मदत.

४. वीटभट्टी व साखर शाळा व डे केअर सेंटर मधील मुलांसाठी संगणक सामग्री व ई - लर्निग सेटअप साठी आर्थिक मदत.

५. ६ ते १४ वयोगटातील बालकांना प्राथमिक शाळेमध्ये जाण्या - येण्यासाठी व प्रवासासाठी आर्थिक मदत .

संस्थेला पाच हजार व त्यापुढील देणगी देणाऱ्या देणगीदारांची नावे पुढील भागात प्रसिद्ध केली जातील.

"अवनि " या स्वयंसेवी संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळे संस्था चालते. सकाळ माध्यम समूहाच्या "सोशल फॉर अॅक्शन" या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर "अवनि" या संस्थेच्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती -तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन , "अवनि" या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

Donate Now: https://www.socialforaction.com/campaign/107/education-of-migrant-children-on-brick-kilns-and-sugarcane-farms-of-kolhapur-sangali-satara

support@socialforaction.com

अधिक माहितीसाठी संपर्क :- ८६०५०१७३६६

आपण ही आपल्या परिसरातील बांधकाम , हॉटेल्स , गॅरेज , दुकान व इतर ठिकाणी काम करणाऱ्या बालकामगारांना बालकामगारीतून सोडवून शिक्षणासाठी मदत करू शकता. किंवा आपला एखादा अनुभव आम्हाला खालील मेल आयडीवर पाठवू शकता. support@socialforaction.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.