फिर से उड चला...

मुक्कामाचं ठिकाण ठरलेलं असलं, की तिथवर पोहोचेपर्यंत कितीही वळणवाटा लागू देत, घाट लागू दे, भलेही डोंगर-माथा लागू दे, माणूस न कंटाळता सगळं ओलांडत राहतो. वाटेत चारदा विसावा घ्यावा लागला तरी चालतं
फिर से उड चला...
फिर से उड चला...sakal
Updated on

भवताल भान

वाटेत चारदा विसावा घ्यावा लागला तरी चालतं; पण मुक्काम गाठायचा असतो. म्हणूनच मजल-दरमजल करत आपण मुक्कामावर पोहोचतोच. काही मुक्कामाची ठिकाणं जीवाला शांतता देणारी असतात. एक विषय, एक टार्गेट, एक टेरीटेरी घ्यायची... झपाटून त्याच्यामागे लागायचं आणि मग नवीन काही शोधायचं. आपला भोवताल शोधत स्वतःला सांभाळत ‘फिर से उड चला’ म्हणत नव्या मुक्कामाकडे जात राहायचं.

-विशाखा विश्वनाथ

मुक्कामाचं ठिकाण ठरलेलं असलं, की तिथवर पोहोचेपर्यंत कितीही वळणवाटा लागू देत, घाट लागू दे, भलेही डोंगर-माथा लागू दे, माणूस न कंटाळता सगळं ओलांडत राहतो. वाटेत चारदा विसावा घ्यावा लागला तरी चालतं; पण मुक्काम गाठायचा असतो आणि म्हणून तो मजल-दरमजल करत मुक्कामावर पोहोचतोच. काही मुक्कामाची ठिकाणं जीवाला शांतता देणारी असतात, काही हे आपलं अंतिम ध्येयं नव्हतं हे लक्षात आणून देणारी असतात, काही जी वाट तुडवत मी मुक्कामावर पोहोचलो आहे त्या वाटेपलीकडचं जग पाहण्यासाठी उत्सुक असतात. मला वाटतं, मानवाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात या तिसऱ्या प्रकारची भुरळ अनेक पिढ्यांना पडत आलेली आहे. तरीही ती ९० च्या दशकात जन्मलेल्या मुलांना जेवढी पडते तितकी कुठल्याच पिढीला पडलेली नाही. म्हणूनच की काय, मी ज्या पिढीचं प्रतिनिधित्व करते तिला मुक्काम महत्त्वाचा आहे; पण प्रिय नाही... आम्ही ‘परवाज’ आहोत, सतत उडण्याच्या तयारीत असलेले.

अर्थात मी ज्या मुक्कामाविषयी, प्रवासाविषयी लिहितेय तो ध्येयाच्या आणि स्थैर्याच्या दिशेने जाणारा आहे. या प्रवासात पैशाला महत्त्व आहेच; पण सगळ्यात जास्त महत्त्व दिलं गेलंय ते आत्मशोधाला. मी प्रतिनिधित्व करते त्या पिढीत या आत्मशोधाच्या वाटा म्हणजे एकाच झाडाच्या अनेक फांद्यांवर, इकडून-तिकडे जाण्यासारख्या भासतात. यात सगळं एक तर ‘योलो’ (YOLO) तरी आहे नाहीतर ‘सोलो’ तरी. अर्थात ‘यू ओन्ली लिव्ह्स वन’ असं म्हणत सगळं फार उन्मादीपणे करणं किंवा सोलोचा शौक बाळगून ‘सफर’ (Safar) आणि ‘सफर’ (Suffer) दोन्ही गोष्टी एकट्यानेच करणं. यातला चांगल्या अर्थाने सफर करणाऱ्या माणसांचा तांडा, मजल-दरमजल करत आत्मशोधाकडे हळूहळू सरकतो आहे.

नुकतंच असं फार झपाटून सोलो ट्रॅव्हल करणाऱ्या एका मित्राची भेट झाली. सोलो ट्रॅव्हल करताना तो काय विचार करतो, दिशा कशी ठरवतो, तो काय शोधतोय, त्याने काय अनुभवलं वगैरे वगैरे असं बरंच काय काय मी त्याला विचारलं. हे विचारलं, कारण त्याची सोलो ट्रॅव्हलिंगची पद्धत ही इतरांहून वेगळी आहे. तो सोलो ट्रॅव्हल करत गजबजलेल्या आणि पर्यटकांना आकृष्ट करणाऱ्या ठिकाणी जात नाही. परदेशातल्या खेड्यांमध्ये जातो किंवा उपनगरांमध्ये मुक्कामी राहतो. बरं तो हे काही दोन-तीन दिवस राहत नाही. बराच काळ तिथे रेंगाळतो. तो असं का करतो हे मला जाणून घ्यायचं होतं. त्यावर तो म्हणाला, की भारतात असतात तशी परदेशातली माणसं जजमेंटल नसतात. मी हे सगळं मुक्त होण्यासाठी करतो. आता मुक्त आणि मुक्तीची त्याची आपली व्याख्या असणारच म्हणा. मी काही त्या व्याख्येविषयी विचारत बसले नाही. मला तो मुक्कामाचं ठिकाण कसं ठरवतो यात जास्त इंटरेस्ट होता. अर्थात त्याचं उत्तरही तितकंच इंटरेस्टिंग मिळालं. ते असं होतं की, ‘मी ज्या होस्टेलवर राहतोय, तिथून आसपासचा परिसर फिरून झाल्यावर, गुगल मॅप न वापरता परतून येता यायला हवं आणि हे करत असताना त्या हॉस्टेलकडे येणारा नवीन रस्ता रोज तुडवला जायला हवा, हे माझं टार्गेट असतं. ज्यादिवशी मला लक्षात येतं आता हा संपूर्ण परिसर मला समजलाय, मला आता अजिबातच मॅपची गरज भासत नाहीये, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी हॉस्टेल सोडतो.’ हे ऐकल्यावर मला फार प्रकर्षाने जाणवलं, की त्याने दिलेलं उत्तर ही फक्त त्याची ट्रॅव्हलिंग फिलॉसॉफी नाहीये, ही अनेक बाबतींत लागू पडेल अशी आमच्या पिढीची बहुपदरी गोष्ट आहे.

एक विषय, एक टार्गेट, एक टेरीटेरी घ्यायची... झपाटून त्याच्यामागे लागायचं आणि मग नवीन काही शोधायचं, हे करत असताना आत्मशोध घ्यायचा... गोष्टी, घटना, माणसं या सगळ्या भवतालात स्वतःला झोकून देण्याचा आणि पुन्हा काठावर आणण्याचा खेळ स्वतःशी खेळत राहायचा. माणूस, परिस्थिती, व्यवहार, व्यापार, तत्त्व, नाती, नातेसंबंध, प्रेम, माया-ममता, विश्वास, विश्वासघात, राग, लोभ, ध्येय, निश्चय, निर्धार या सगळ्यांचा मिळून जो भोवताल तयार झालाय त्यातून नवं भान घेत, नवी झेप घ्यायची. हीच तर आहे माझ्या पिढीची गोष्ट. गेलं वर्षभर हे ‘भवताल भान’ काय असेल, असू शकतं हे दर लेखातून मांडण्याचा प्रयत्न मी केला.

तसा प्रत्येकाचा भोवताल वेगळा असतो. कारण ज्याचा आवाका जसा तशा गोष्टी त्यात सामावलेल्या असतात. मी माझ्या पिढीच्या भोवतालाची गोष्ट माझ्या नजरेने दाखवत होते, ज्यात करियर, प्रेम, जनरेशन गॅप, नातेसंबंध, प्रेमविवाह, लाईफ पार्टनर, आत्मशोध, स्ट्रेस मॅनेजमेंट, वर्क कल्चर, बदललेली लग्नसंस्था या सगळ्याचा समावेश होता. आयुष्य नावाच्या झाडाला या फुटलेल्या फांद्यांवर आळीपाळीने कधी आई-वडील होते तर कधी आमची पिढी. कधी त्यात आदर्शवाद होता, तर कधी आदर्शवादाला दिलेलं आवाहन. कधी मनातलं हितगुज होतं कधी सतत खुणावणारा रखरखीत व्यवहार, कधी आजी-आजोबा, मामा-मावशा हा गोतावळा होता तर कधी मॅनेजर, टीम लीडर, कलिग्ज... पाहुणे कलाकार असल्यासारखी ही माणसं, विषय... कधी फारच पटलेली तर कधी इश्यू क्रिएट होतील अशी निरीक्षण असं सगळंच होतं. प्रत्येक लेख पूर्ण झाल्यावर नवी झेप,झडप होतीच.

ज्या पिढीतल्या मुली ‘मैं अपनी फेव्हरेट हू’ म्हणणाऱ्या गीत गात आहेत, स्वतःचा हक्क मागणाऱ्या, प्रेमात आणि ध्येय साध्य करताना, स्वतःपलीकडे कुणाचीही परवा न करणाऱ्या जॉर्डनचे प्रतिनिधी यात आहेत. ज्यांना राज आणि सिमरनची गोष्ट आवडते, पण ‘जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी’ असं म्हणत कुणी आपल्याला स्वतंत्र करतं यावरचा विश्वास उडालेला आहे. झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे स्वतःला अपग्रेड ठेवताना ज्यांच्या करियरचा पुरता ‘तमाशा’ झालाय, पर्सनल स्पेस, मेंटल पीस या सगळ्या गोष्टी ‘जब वी मेट’नंतर आपल्याला मिळतील ही आशा मनात आहे आणि त्या मिळेस्तोवर ‘डियर जिंदगी’ म्हणत ही पिढी फार धीराने घेते आहे... आणि हे सगळं करताना इथल्या मुली-मुलं ‘पिकू’चं प्रतिनिधित्व करताहेत. जरा दमताहेत, थकताहेत; पण असं झाल्यावर स्वतःपाशी जरा थांबत, स्वतःला सांभाळत ‘फिर से उड चला’ म्हणत नव्या मुक्कामाकडे जाताहेत. आपला नवा भोवताल निर्माण करण्यासाठी, नवं-जुनं ‘भवताल भान’ शाबूत ठेवत... आणि मला माहीत आहे, मीदेखील ‘फिर से उड चला’ म्हणत नवा मुक्काम गाठणार आहे...

vishakhavishwanath11@gmail.com

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’विजेत्या

साहित्यिक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.