गिरीश अंकल नसते तर खरंच माझं करिअर सुरूच झालं नसतं. चित्रपट कसे बघायचे, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत भारताचं प्रतिनिधीत्व करायचं म्हणजे काय, आपला देश म्हणजे काय याची मला काहीच जाणीव नव्हती. हाडाचे शिक्षक असलेले गिरीश कार्नाड यांनी ते सगळं ज्ञान मला दिलेलं आहे. मला त्यांचे उपकार कधीच फेडता येणार नाहीत. मी चांगलं काम करत राहणं हेच त्यांच्या ऋणात राहण्याचं उत्तर आहे, असं मला असं वाटतं.
मी पुण्यात पंडित सत्यदेव दुबे यांचं नाटकाचं वर्कशॉप करत होते, त्या कार्यशाळेमध्ये "गिरीश कार्नाड आता नवीन चित्रपट करत आहेत आणि त्यांना एका नव्या चेहऱ्याची गरज आहे,' असा निरोप आला. कार्नाड हे दुबेजींचे मित्र-त्यामुळं दुबेजींकडूनच तो निरोप आला. दुबेजींनी आमच्या शिबिरातल्या सगळ्या अभिनेत्रींना पाठवलं. त्यात मी पण होते. असाच टॅलेंट सर्च गिरीश कार्नाड यांनी बंगळूर, दिल्ली, मुंबई अशा विविध शहरांमध्येही केला होता. सुदर्शन रंगमंचच्या जवळ राजाभाऊ नातू यांचा जो वाडा आहे तिथं गिरीश कार्नाड यांच्याबरोबर माझी पहिली भेट झाली. मी खूप साशंक होते, नर्व्हस होते. गिरीश अंकल अजूनही पायऱ्यांवरून खाली येतानाची त्यांची आकृती मला अजूनही आठवते. एवढ्या मोठ्या माणसाशी काय बोलायचं असा प्रश्न मला तेव्हा पडला होता. त्यांनी "काय करतेस' विचारलं, तेव्हा मी कॉलेजबरोबर वर्कशॉपमध्ये नाटकपण करते असं सांगितलं. चिं. त्र्यं. खानोलकरांचं "अपुले मरण' हे नाव सांगितल्यावर त्यांनी खानोलकरांचंच "एक शून्य बाजीराव' हे नाटक केल्याचं त्यांनी सांगितलं. इतरही संवाद झाला. खरं तर बारावीतल्या एका मुलीशी ते इतक्या सन्मानानं बोलले, की पुढं माझं सिलेक्शन होईल, काम मिळेल असली कुठली स्वप्नं मी पाहिली नाहीत, इतकं त्या पहिल्या भेटीतच मला तृप्त वाटलं. पुढं फोटो सेशन झालं, व्हिडिओ शूटिंग झालं. या प्रोसेसमध्ये नचिकेत आणि जयू पटवर्धन कार्नाड यांना बरीच मदत करत होते. त्यांच्या घरीच आमचं शूटिंग झालं.
टू माय सरप्राइज, काही दिवसांनी गिरीश अंकलचा मला फोन आला आणि त्यांनी "आम्हाला सगळ्यांना तू योग्य वाटते आहेस. तुला मुख्य भूमिका करायला आवडेल का,' असं विचारलं. मला ही भाषा खूप वेगळी वाटली. "तुला मी बॉलिवूडमध्ये ब्रेक देतो, पदार्पण करायची संधी देतो' वगैरे सांगण्याच्या जमान्यात त्यांनी "तुझं कास्टिंग योग्य वाटतंय आणि तुला ते काम आवडेल का' असं विचारलं. ते फार मोठं वैशिष्ट्य आहे गिरीश अंकलच्या स्वभावाचं. माझी तेव्हा परीक्षा होती. तेव्हा गिरीश कार्नाड यांनी आमचे प्राचार्य वि. मा. बाचल यांना पत्र लिहिलं होतं आणि बाचल सरांनी त्याला उत्तरही लिहिलं होतं. त्या पत्राची फोटोकॉपी मी का ठेवली नाही याची खंत मला अजूनही वाटते. अर्थात, शूटिंग थोडं पुढं गेलं आणि माझी परीक्षा झाली.
शूटिंग केरळमध्ये होतं. आम्ही आधी बंगळूरला गिरीश अंकलच्या घरी गेलो. गिरीश अंकलच्या पत्नी सरस्वती गणपती यांनी खूप छान आदरातिथ्य केलं. मग आम्ही केरळमध्ये गेलो. तिथं मला सोडून आई-बाबा पुण्याला परत आले आणि मी शूटिंगसाठी पालघाट नावाच्या गावामध्ये महिनाभर राहिले होते.
शूटिंगमध्ये खूप मजा होती. गार्गी आकुंडी, प्रशांत राव, गीतांजली किर्लोस्कर, पौर्णिमा चिक्केरूर हे माझे सहकलाकार होते. आजचा प्रथितयश कॅमेरामन राजीव मेनन याचा तो पहिला चित्रपट होता, साबू सिरिल कलादिग्दर्शक होता. आम्ही सगळे नवीन होतो, तरुण होतो. चित्रपट समजावून सांगणं, काम करायला सांगणं, मार्गदर्शन करणं हे गिरीश कार्नाड यांना फार छान माहीत होतं. त्यांनी माझ्यासाठी सुरवातीला सोपे सीन्स ठेवले होते. पहिला सीन तर माझ्या आईकडून (बी. जयश्री) मार खाण्याचा होता. शूटिंगचं ते वातावरण खूप वेगळं होतं आणि खूप चांगल्या अर्थानं मैत्री झाली. अक्षरशः पहिल्या दिवशीच "गिरीश कर्नाड सर'चे "गिरीश अंकल' झाले होते.
एकदा आमचं शूटिंग मध्यापर्यंत आलं, तेव्हा वेगवेगळ्या शहरांमधून पालघाटमध्ये पत्रकार आणि फोटोग्राफर आले होते. लोक मला फोटो वगैरे मागत होते. मला खूप ग्लॅमरस वाटायला लागलं होतं ते वातावरण. मी मग गिरीश अंकलना "फोटो देऊ का' विचारायला गेले. गिरीश अंकलनी मला थांबवलं. तरी कुणी कुणी विचारत होतं, त्यामुळं मी परत त्यांच्याकडं गेले. तेव्हा क्षणभर थांबून गिरीश अंकल म्हणाले ः ""सोनाली, आपण त्यांना लंच ब्रेकचा वेळ दिला आहे. तू प्रसिद्धी आणि ग्लॅमरच्या मागं जाऊ नकोस. तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. ग्लॅमर आणि प्रसिद्धी तुला फॉलो करत येतील. हे कायम लक्षात ठेव.'' ते अत्यंत सौजन्यानं हे मला म्हणाले होते; पण ते माझ्या मनावर कोरलं गेलं. ही छोटीशी शिकवण गेल्या 25 वर्षांतल्या माझ्या करिअरसाठी फार उपयुक्त ठरली आहे. गिरीश कार्नाड स्वतः हे तत्त्व जगत आले, त्यामुळं मला ते फार महत्त्वाचं वाटतं.
"चेलुवी'नं मला खूप दिलं. हा चित्रपट कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही दाखवला गेला. "मुक्ता', "दोघी', "दायरा' आणि एक इंग्लिश चित्रपट मला "चेलुवी'मुळंच मिळाला. त्यामुळं चित्रपटसृष्टीची द्वारं या चित्रपटामुळं उघडली गेली. एक गंमतिशीर आठवण म्हणजे चेलुवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला गेला, तेव्हा मी आणि माझा मोठा भाऊ संदेश आम्ही दोघं गेलो होतो. गिरीश अंकलनी आम्हाला अक्षरशः हॉटेलच्या रूमचं लॅच कसं उघडायचं, तिथं गरम पाणी कसं होतं हे सगळं स्वतः दाखवलं होतं. ते मला फार महत्त्वाचं वाटलं. त्यांनी नंतर एका लायब्ररीत आम्हाला ब्रेकफास्टला नेलं होतं. तिथंही काटा-चमचा कसा धरायचा हेसुद्धा त्यांनी दाखवलं होतं. तिथं वॉक करताना संदेशनं त्यांना "तुम्ही कसं लिहिता' असा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी तो प्रश्न उडवून न लावता ते कसे ड्राफ्ट्स लिहितात, कसं काम करतात हे फार छान पद्धतीनं समजावून सांगितलं होतं. ती सकाळ, किल्ल्याच्या मागून येणारा तो प्रकाश अजूनही माझ्या लक्षात आहे.
गिरीश अंकलनी नंतर कायम संपर्क ठेवला. मला इंग्लिशमध्ये बोलायला किंवा लिहायला त्यांनी धाडस दिलं. त्यांचं स्वतः त्यांच्या मातृभाषेवर इतकं प्रेम होतं, की त्यांनी कायम मला माझं मराठी चांगलं असल्याबद्दल खूप शाबासकी दिली; पण इंग्लिश चांगलं असलं पाहिजे याबद्दल ते आग्रही होते. मी त्यांना किती तरी पत्रं लिहिली आहेत आणि त्यांनीही मला लिहिली आहेत. राजाभाऊ नातू गेले होते तेव्हा मी पोस्टकार्ड टाकलं होतं. नंतर ईमेलचा जमाना आला, तेव्हा माझं लग्न झाल्याचं कळवलं होतं. माझं पुस्तक आलं, मी सदर लिहिते हे सगळं मी त्यांना सांगत होते. हा पत्रव्यवहार आमच्यात कायम होता. पुण्यात आले, की ते मला नक्की कळवायचे आणि सकाळी साडेसात-आठ वाजता आमचा ब्रेकफास्ट ठरलेला असायचा. कधी माझ्या दादाची बाइक किंवा बाबांची स्कूटर घेऊन मी जायचे. एकदा मी गिरीश अंकलना सोडलंही होतं. त्यांना खूप मजा वाटायची, की कसं हे स्ट्रगलर लोकांचं आयुष्य आहे. नंतर पुढं आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आम्ही भेटत राहिलो. एकदा बंगळूरला आम्ही भेटलो, तेव्हा मी एका वेगळ्या चित्रपटाचं शूटिंग करत होते आणि ते एका वेगळ्या चित्रपटाचं शूटिंग करत होते. मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा उद्घाटनाच्या एका कार्यक्रमाच्या ते भेटले होते, तेव्हा ते म्हणाले होते ः ""मी तुला ओळखलंच नाही. किती वेगळी दिसायला लागलीस. मोठी झालीस आता तू. साडी नेसून मेकअप करून कोण ही हिरॉईन माझ्यासमोर आलीय.'' पुण्यात साहित्य-रंगभूमी प्रतिष्ठानच्या एका कार्यक्रमाला गिरीश आले होते, तेव्हा ते माझ्या पतीशी खूप आपुलकीनं बोलले होते, मुलीला कडेवर घेतलं होतं. ती त्यांची खासियतच होती. त्यांनी फक्त करिअरबाबत विचारणा केली नाही. ते कायम कुटुंबाविषयी माहिती करून घ्यायचे, "कसं चाललंय' याचा अर्थ कामं किती मिळतायत, पैसे किती मिळतायत ते नाही, तर "इमोशनल वेलबिइंग' कसं आहे त्याबाबत ते नेहमी कन्सर्न्ड असायचे.
मला असं वाटतं, सत्यदेव दुबे आणि गिरीश कार्नाड हे माझ्या आयुष्याचे खांब आहेत असं म्हटलं तरी चालेल. गिरीश अंकल माझ्या आयुष्यात नसते, तर मी आता जिथं आहे तिथं असूच शकले नसते. त्यांनी मला दिलेली संधी "एका तळ्यात बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयार एक'सारखी आहे. दुबेजी आणि गिरीश अंकल हे दोघं माझ्यासाठी पाणी झाले, "स्वतःला कुरूप आणि वेडं समजू नकोस, स्वतःचा सन्मान ठेवायला शिक,' असं सांगण्यासाठी स्वतः प्रतिबिंब झाले. गिरीश अंकल नसते तर खरंच माझं करिअर सुरूच झालं नसतं. चित्रपट कसे बघायचे, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत भारताचं प्रतिनिधीत्व करायचं म्हणजे काय, आपला देश म्हणजे काय याची मला काहीच जाणीव नव्हती. हाडाचे शिक्षक असलेले गिरीश कार्नाड यांनी ते सगळं ज्ञान मला दिलेलं आहे. मला त्यांचे उपकार कधीच फेडता येणार नाहीत. मी चांगलं काम करत राहणं हेच त्यांच्या ऋणात राहण्याचं उत्तर आहे, असं मला असं वाटतं.
(शब्दांकन ः मंदार कुलकर्णी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.